बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

" मलाही एक दिवस वर जायचे आहे..!"


 

चिंतन


" मलाही एक दिवस वर जायचे आहे..!"


=====================================


मलाही एक दिवस वर जायचे आहे,

पण अद्याप मी जमिनीवर उभा आहे..!


एक ना एक दिवस या सुखद  दुःखद आठवणींना येथेच सोडून जायचे ,

पण अद्याप मी जमिनीवर उभा आहे..!


हा माझा, ही माझी या मायाजालात अडकून बसायचे आहे,

पण अद्याप मी जमिनीवर उभा आहे..!


गतकाळातील आठवणींना आज आठवून जसे जमेल तसे जगायचे आहे,

पण अद्याप मी जमिनीवर उभा आहे..!


याच भूमीत रामदेवराय यादव जन्मले, त्यांच्याच गौरवशाली भूमीत,

अद्याप मी जमिनीवर उभा आहे..!


आसपास, माझा मराठवाडा हिरवागार दिसत आहे,पण त्याच हिरवेगार दिसणं, फक्त वर्षा ऋतु इतकेच मर्यादित आहे, हेच पाहण्यासाठी,

अद्याप मी जमिनीवर उभा आहे..!


कदाचित अजुन कित्येक पिढ्यांना हेच फक्त वर्षा ऋतूतील हिरवे रुप पाहणे नशिबी असेल,

कारण मी अद्याप त्याच त्या  मानसिकतेत अगदी घट्ट पाय रोवून याच भूमीत उभा आहे..!


पूर्वी, आता अन् भविष्यातही कदाचित माझं , असं फक्त दुसऱ्यांसाठी उभा राहणं नशिबी आहे,

अद्याप मी याच जमिनीवर अस्तित्वहीन ताठ मानेने येथेच उभा आहे..!😔🙏


स्थळ - भांगसी माता गड ( औरंगाबाद )


वंदे मातरम्..!


एक तात्पुरता कवी - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - २९/१०/२०२०, गुरुवार

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

" नवरात्रोत्सव गरबा नृत्य, खरा स्री शक्तीचा उत्सव..! "


 

चिंतन


" नवरात्रोत्सव गरबा नृत्य, खरा स्री शक्तीचा उत्सव..! "


==================================


माझ्यामते नवरात्रोत्सव मधील गरबा नृत्य दांडिया हा खरा फक्त स्त्रीयांचा, स्री शक्तीला आणि आदिशक्तीला समर्पित केलेला अतिशय पवित्र उत्सव..!


मात्र कालपरत्वे महिलांच्या  याच नवरात्रोत्सव मध्ये पुरुषांनी नेहमीप्रमाणे आपल्या अहंकारी पुरूषी मानसिकतेनुसार त्यात घुसखोरी केली अन् पुरूषी संस्कृतीचे त्यावर ग्लॅमर चढवायला सुरुवात केली..!


वास्तविक नवरात्रोत्सव मध्ये महिलांनी महिलांच्या सोबत एकत्रीत येऊन आपला आनंदोत्सव, नवरात्रोत्सव साजरा करायला हवा, जेणेकरून महिलांना त्याचा निसंकोचपणे खरा अत्यानंद घेता येईल..! 


जरी यदा कदाचित पुरुष त्या नवरात्रोत्सव मध्ये सहभागी झालेच तर त्यांनी त्यांचा रास गरबा नृत्य दांडिया स्वतंत्रपणे वेगळा आयोजित करून त्यात मनसोक्त आनंद घ्यावा..! किंवा फक्त पती पत्नी यांच्याच एकत्रीत रास गरबा नृत्य दांडिया स्वतंत्रपणे आयोजित करून त्यात मनसोक्त आनंद घ्यावा असे मला वैयक्तिक वाटते..! माझ्या या वैयक्तिक मताचे पुरूषी मानसिकतेच्या लोकांनी जास्त मनावर घेऊ नये ही नम्र अपेक्षा..! 🙏 


 मी लासूर स्टेशन येथे राहत असताना लासूर स्टेशन येथील माझे स्नेही आदरणीय संजयजी शर्मा यांनी  त्यांच्याच घराच्या समोर असलेल्या मैदानात अतिशय उत्कृष्ट प्रकारे रास गरबा नृत्य दांडिया नवरात्रोत्सव आयोजित केला होता. त्यात  फक्त आणि फक्त महिलाच सहभी होत्या..!आदरणीय संजयजी शर्मा यांनी स्त्रीयांचा, स्री शक्तीला आणि आदिशक्तीला समर्पित केलेला अतिशय पवित्र नवरात्रोत्सव आयोजित केला होता. त्याबद्दल आदरणीय संजयजी शर्मा यांना त्रिवार वंदन..!🙏🙏🙏


असो, 


खालील व्हिडिओ मध्ये जो गरबा नृत्य सादर करताना फक्त आणि फक्त महिला दिसत आहेत. तिथं एकच पुरुष आहे जो की ढोल वाजवत आहे.त्या पुरुषानेही स्त्रीयांच्या गरबा नृत्याच्या विरूद्ध दिशेला तोंड केलेले आहे..!जेणेकरून तेथील महिलांना निसंकोचपणे आपला आनंदोत्सव साजरा करता यावा. 


सदरील दृश्य  गुजरातमधील, कच्छ वाळवंटातील  भूज अंजार भचाउ येथील...! सदरील स्थळ राजस्थान, पाकिस्तान सीमेलगत बाखासर चौकीजवळील आहे.


सदरील सुमधुर गरबा नृत्य गीत गायन केले आहे गुजरातमधील सुप्रसिद्ध गायिका गीता रेबारी यांनी..!


आज नवरात्रोत्सव मधील सातवी माळ..! त्यानिमित्त सर्व महिला भगिनींना आणि पुरुषांना देखील श्रद्धेय शुभेच्छा..!🌹

व्हिडिओ स्रोत - व्हॉट्स ऍप

अंबाबाईचा उदो उदो..!


वंदे मातरम्..!


आईचा एक उपासक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - २३/१०/२०२०, शुक्रवार

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

" ज्येष्ठांच्या सहवासातील दैनिक दिन..!


 

चिंतन


" ज्येष्ठांच्या सहवासातील दैनिक दिन..!



==================================


ज्येष्ठांच्या सोबत बसून, त्यांच्याकडील अतिशय समृद्ध अनुभवाचा ठेवा समजून घ्यायचा असतो. घरातील ज्येष्ठ जो पर्यंत हयात असतात तो पर्यंतच खरा संजीवन सहवास असतो..! बाकी ज्येष्ठांच्या हयाती नंतर कितीही उमाळा, प्रेम प्रदर्शित केला तर तो फक्त एकतर अभिनय वाटतो किंवा औपचारिक आयुष्याचे , कृत्रिम अनौपचारिक प्रदर्शन वाटते..!


ज्येष्ठांच्या सहवासातील प्रत्येक क्षण, एखाद्या विद्यापीठात उच्च कोटीची शिक्षण घेतल्यासारखेच असते..! जर ज्येष्ठांच्या सहवासातील क्षणास आपण मुकलो तर, बाकी औपचारिक शिक्षणाच्या कितीही पदव्या घरातील फाईल मध्ये ठेवा, त्या फक्त कागदाच्या सुशोभित पावत्या वाटतात..!


घरातील ज्येष्ठ , आपल्या घरात इष्टच करत असतात..! फक्त आपण त्यांच्या कलाने अन् त्यांच्या म्हातारपणातील लहान बालकाच्या सोयीने घ्यायचे असते..! घरातील ज्येष्ठामूळे , घरातील सातच्या आत ही अस्सल भारतील संस्कृती सदैव चिरंजीव असते..! भले घरातील ज्येष्ठ, घरातील तरुणांना, मुलांना सातच्या आत या अस्सल भारतीय संस्कृतीचे डोस प्रत्यक्ष पाजाळणार नाहीत, पण त्यांच्या फक्त असण्याने सातच्या आत ही अस्सल भारतीय संस्कृती आपोआप झिरपत जाते..!

( येथे ' सातच्या आत ' हा शबदप्रयोग आहे, शब्दशः अर्थ अपेक्षित नाही..!)


आमच्या घरात आमचे जेष्ठ आहेत म्हणून आम्ही इष्ट राहण्याचा प्रयत्न करतो..! आमच्या घरातील आमच्या ज्येष्ठांच्या अस्त्तित्वामूळे , आपण काही चुकल्या नंतर आजही आपल्या कानाखाली आवाज काढल्या जाईल याचा धाक सदैव असतो..! कारण आमच्या घरातील आमच्या ज्येष्ठांचं अख्ख आयुष्याच अतिशय स्वयंशिस्तीचे अन् आजही स्वावलंबी जीवनाचे आहे..! 


कुणाच्याही घरातील ज्येष्ठांच्या गरजा , आजच्या पिढीतील माणसांपेक्षा अतिशय नगण्य असतात..! त्यांची एकच गरज असते अन् ती म्हणजे, घरातील कनिष्ठांनी  मायेचे अन् मी घरात आहे याचं अस्तित्व दर्शविणारे  दोन  निव्वळ प्रेमळ शब्द बोलावेत म्हणून..! आमच्या घरातील आमच्या ज्येष्ठांचं, आम्हाला नेहमी एकच सांगणं असतं की, " आपल्या लायकी पेक्षा , श्री.पारेश्र्वर भगवंताने आपल्याला लई दिलं आहे, जास्तीचा हव्यास धरू नका, धपकन जमिनीवर आदळशाल..! 


आमच्या घरातील आमच्या जेष्ठांच्या त्वचेवरील प्रत्येक सुरुकुती , प्रत्येक काहीतरी शिकवून जाते..! कारण त्या प्रत्येक सूरुकुती मागे, त्यांच्या अख्ख्या आयुष्याची तपश्चर्या दडलेली आहे..! ती तपश्चर्या साधी सुधी मुळीच नाही..! तर त्या मागे त्यांच्या गतकाळातील अतिशय दारिद्र्य अवस्थेत शिक्षण घेतलेला खूप मोठा कालखंड दडलेला आहे..!


आज आम्ही जे काही आहोत त्यामागे एक जेष्ठ अजुन होते, पण नियतीने त्या अतिशय गोड अन् अतिशय मायाळू जेष्ठाला आमच्यातून पाच वर्षांपूर्वीच हिरावून घेतले आहे..! त्या आमच्या अतिशय मायाळू जेष्ठाचं नाव होतं..आई..! आणि एक ज्येष्ठ आज त्याच स्वावलंबी जीवनाचे संतुलित आयुष्य आमच्या सोबत व्यतीत करत आहे, त्यांचं नाव आहे..दादा, आमचे तीर्थरूप वडील..!🙏


असो, आज जेष्ठ नागरिक दिन आहे..! तसा आमच्या घरात निदान माझ्या पिढीत तरी दररोज जेष्ठ नागरिक दिन आहे..! बाकी आम्ही उभय जेष्ठ नागरिक झाल्यावर आमची पुढील पिढी आमच्या सारखाच दररोज प्रेमळ जेष्ठ नागरिक दिन अस्तित्वात ठेवील की नाही हा खूप मोठा चिंतनाचा विषय आहे...! हा चिंतनाचा विषय, आम्हा उभयतांचाच नाही, तर माझे जे समकालीन मित्र आहेत त्यांच्याही आयुष्यातील खूप मोठा चिंतनाचा विषय असेल यात तिळमात्र शंका नाही..! कारण अजुन दहा वीस वर्षानंतर मी अन् माझ्या समकालीन मित्रांच्या घरात जेष्ठ औषधाला देखील सापडणार नाहीत..! कारण, त्यावेळची पिढी जरा जास्तच सुशिक्षित असणार आहे..!🙏


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - १/१०/२०२०,गुरुवार.