रविवार, २४ जुलै, २०२२

अलबेला शाम - भाग क्रमांक: ४



 


आमचे गाव आमची माणसं ©️


अलबेला शाम - भाग क्रमांक: ४


" अभ्यासिका करिता बल्पची चोरी..!"


===============================


माध्यमिक शाळेतील वयोगटात असताना आमच्या वर्गातील मित्रांचा अभ्यास तर सुरूच होता ,पण त्यासोबत खोड्या देखील सुरू होत्या.अर्थात त्याकाळी होणाऱ्या खोड्या या आमच्या वयोगटाचा अन् गरजेचा जाणवणारा दृश्य परिणाम होता असं आज प्रौढत्वाकडे झुकत चाललेल्या मनाला अन् शरीराला जाणवत राहतं.


अभ्यासाच्या खोल्या एकूण तीन होत्या.मी , गणेश वाणी अन् विजू गायकवाड आमची एक..! विजू गायकवाड हा काही दिवसांनी त्याच्या घरीच अभ्यास करायला गेला होता. दुसरी अभ्यासिका होती शाम शेळके,बाळू कचरू घोडके अन् बाळू माळी यांची..! तिसरी अभ्यासिका होती आण्णासाहेब कारभारी म्हस्के, ज्ञानेश्वर मोकाटे यांची..! अभ्यासिकेत अभ्यास करणारे आम्ही कधीही आमच्या अभ्यासाच्या खोलीत बल्प विकत घेतला नाही.त्यावेळी पिवळ्या रंगाचा प्रकाश पडणारा साठ किंवा शंभर वॅटचा बल्प सर्रास वापरले जायचे. आमची अभ्यासाची खोली,आमच्याच गल्लीत होती.आमच्या अभ्यासाच्या खोलीत असणारा लाईट, खोलीच्या लगतच असणाऱ्या मुलमुले कुटुंबाच्या घरातून भिंतीला छिद्र पाडून घेतलेली होती.एका महिन्यासाठी दरमहा पाच रु. आम्ही मित्र  मुलमुले मामींना द्यायचो.


आमच्याच गल्लीत आमच्या घराच्या समोर एक विद्युत खांब होता.माझे वडील त्या खांबाच्या खालील बाजूला घरातून वायर घेऊन एक बल्प लावायचे.गावातील ग्रामपंचायत गल्लीतील खंब्यावर बल्प सहसा लावतच नसे, त्यामुळं घरातून लाईट आणून वायर द्वारे तो गल्लीत उजेड पडेल या हेतूने बल्प लावल्या जायचा. आमच्याच गल्लीत कोपऱ्यावर माझे चुलत्याचे घर होते. माझे चुलते तत्कालीन पालखेड गावचे पोलीस पाटील होते.माझे चुलते त्यांच्या घराच्या समोरच राहणाऱ्या पोपटराव ऋषीपाठक गुरू यांच्या घरातून लाईट, वायर घेऊन गुरूंच्या घराच्या कोपऱ्यावर बल्प लावायचे.


आम्हा मित्रांच्या अभ्यासिका मधील कुणाच्याही खोलीतील बल्प शॉट झाला की, शाम शेळके याची लगेच आठवण आम्हा मित्रांना यायची.अर्थात आम्हीही त्यात सहभागी असायचो,पण शाम शेळके हा खूप धाडसी असल्याने त्याची आठवण यायची अन् पुढील नियोजनाला सुरुवात व्हायची. सहसा पुढील नियोजन बैठक रात्री व्हायची ती प्रिय वर्गमित्र नंदकिशोर भाऊसाहेब जाधव याच्या घरी किंवा शाम शेळके यांच्या अभ्यासाच्या खोलीत व्हायची..! ज्याच्या अभ्यासाच्या खोलीतील बल्प शॉट झाला आहे त्याच्या खोलीसाठी बल्प कसा मिळवायचा याचं बैठकीत चिंतन, मनन अन् नियोजन व्हायचे. असेच एकदा शाम शेळके यांच्या अभ्यासाच्या खोलीतील बल्प शॉट झाल्यामुळे त्याच्याच खोलीत नियोजन सुरू झाले.मी, गणेश वाणी, आण्णासाहेब म्हस्के, बाळू माळी, बाळू घोडके इत्यादी आम्ही तिथं रात्री एकत्र जमलो. शाम शेळके म्हणाला..

" का, रे..नंद्या ,दादा ( माझे वडील) तुमच्या घराच्या बाहेरील लाईटच्या खांब्यावर बल्प लावत्या ना..रे..!"

मी " हो..!" म्हणालो. पुढे काय होणार याचा मला अंदाज आला होता.लगेच शाम शेळके म्हणाला..

" मंग, तुमचाच बल्प मध्यरात्री काढून आणु..!"

मी म्हणालो - " अरे शाम्या,  मी नियोजन करायच्या बैठकीत हाये अन् तू आमचाच बल्प रात्री काढून आणायचा म्हणतो, बावळट हाये का तू..?"

शाम म्हणाला - " चूप रे , नको शहाणपणा शिकू, चूप बैस..! फक्त दादांना ( माझ्या वडिलांना ) जाग यायला नको.नाहीतर तुझं म्हातारं लई डेंजर हाये भो, आपली लई धुलाई करील..!"  बाकीच्या मित्रांनी शामला सहकार्य करायचे ठरवले त्यामुळे मी चिडीचूप झालो.शाम शेळके म्हणाला..

" ठरलं तर मग, हे पहाय नंद्या, बरोबर रात्री बारा ते एकच्या सुमारास मी, म्हस्क्या ( आण्णासाहेब म्हस्के ) बाळ्या ( बाळू माळी ) अन् हा बाळ्या ( बाळू घोडके ) तुमच्या खोलीकडे येतो. गण्या ( गणेश वाणी ) तू खोलीतच थांब, तू बाहेर येऊ नको. बाळ्या ( बाळू माळी) अन् म्हस्क्या तूम्ही पोपट गुरूच्या घराच्या कोपऱ्यावर थांबा..! बाळ्या ( बाळू घोडके ) अन् नंद्या तुम्ही दोघेजण सुंदर शेठ जैन यांच्या घराच्या कोपऱ्यावर थांबा. नंद्या, मी तुझ्या घराच्या समोरील खांबावर  हळूच चढत चढत वर जाईल. तुम्ही जिथं आहात, तिकडून कुणी येताना दिसलं रे  दिसलं की, तुमच्या हातातील लाल बॅटरीचा उजेड माझ्याकडे करा.मी लगेच खाली उतरून नंद्याच्या खोलीत पळून जाईल..!"


शाम शेळके याने केलेलं नियोजन ऐंकुन मी पार थिजून गेलो होतो,कारण मी माझ्याच घरी बल्प चोरणाऱ्या मोहिमेत सहभागी होणार होतो.स्वतः ,स्वतच्या घरी चोरी  करणाऱ्या अतिशय दुर्मिळ माणसांच्या पंक्तीत मी स्वतः ला सुशोभित होताना बघत होतो. मला सगळ्यात मोठा धाक पडला होता तो दादांचा, म्हणजेच माझ्या वडिलांचा..! माझ्या वडिलांचा स्वभाव अतिशय शिस्तप्रिय अन् करारी होता. पण मित्रांच्या पुढे माझी कोणतीच दाळ शिजली नाही. जसे नियोजन केले होते त्यानुसार आम्ही आपापल्या नेमून दिलेल्या ठिकाणी मध्यरात्री जाऊन उभा राहिलो होतो.


मध्यरात्री सुराशे यांच्या दगडी जोत्यावर बसलेला शाम हळूच दबक्या पावलांनी आमच्या घराच्या समोरील खांबावर हळूच चढला अन् हळूच बल्प काढला.गल्लीत पूर्ण अंधार झाला होता.आम्ही सर्वजण आपापल्या ठिकाणावरून आमच्या अभ्यासाच्या खोलीत जमा झालो होतो.मला पार घाम फुटला होता.माझ्याच साक्षीने, मीच पहारा देऊन , माझ्याच डोळ्यासमोर आमच्याच बल्पची चोरी झाली होती.


दुसऱ्या दिवशी, दादांच्या लक्षात आले की, आपल्या घरासमोरील खांबावरील बल्प कुणीतरी चोरून नेला आहे म्हणून. माझे वडील बल्प चोरी गेलेल्या होल्डर कडे बघत होते अन् मी मुकाट्याने त्यांच्या बाजूला उभा राहून त्यांच्याकडे बघत होतो.


असाच पुन्हा दुसऱ्यांदा प्रिय बालमित्र आण्णासाहेब म्हस्के याच्या खोलीतील बल्प शॉट झाला होता.त्यावेळी जो बल्प मध्यरात्री गुपचूप काढून घेतला होता तो होता माझ्या चुलत्याने, पोपट गुरूंच्या घराच्या कोपऱ्यावर लावलेला तो..! तिथला बल्प चोरीला गेला की, माझे चुलते विचारात पडायचे की, आपला बल्प कोण चोरून नेत असेल..? असेच  बल्प आम्ही ज्या ज्यावेळी आमच्या खोलीतील शॉट झाले होते त्या त्यावेळी काढून आणलेले होते. सर्वात जास्त बल्प आम्ही काढले होते ते स्व.सुभाष शेठ छाजेड यांच्या दुकानाच्या बाहेर लावलेले. अर्थात या मोहिमेचे नेतृत्व असायचे ते आमचा प्रिय बालमित्र शाम शेळके याच्याकडे.


बल्पची चोरी आम्ही केली होती, ती कृती चूकच होती. या गोष्टी चुकीच्या आहेत ,हे त्या वयोगटात  आमच्या लक्षात येत नव्हतं, किंबहुना तो आमच्याकडून होणारा तो खोडसाळपणाच होता. आम्हा मित्रांच्या अभ्यासिका मधील काही मित्रांची आर्थिक परिस्तिथी मध्यम ते बिकट असायची ,त्यामुळं आम्हाला असे वाटायचे की, आपण अभ्यास करण्यासाठीच बल्पची चोरी करतोय, त्यात चुकीचे काहीच नाही अशी आमच्या त्या काळातील पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटाची धारणा होती.


काळाच्या ओघात मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो.शाम शेळके हा छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे महानगरपालिका अंतर्गत पाणी पुरवठा करायला लागला.बाळू माळी हा शिक्षक झाला.गणेश वाणी हा डॉक्टर झाला.आण्णासाहेब म्हस्के हा एमआयडीसी बजाजनगर ( औरंगाबाद ) येथे सुपरवायझर म्हणून नोकरीला लागला.विजू गायकवाड हा वैजापूर येथे नामांकित पत्रकार झाला.बाळू कचरू घोडके हा वाळूज - पंढरपूर येथील भाजी मंडई भाजीपाला संघटनेचा अध्यक्ष झाला. नंदकिशोर जाधव हा राजकीय क्षेत्रात आपलं करियर करू लागला.मी नोकरीला लागल्यावर  असेच एकदा मी पालखेड येथे स्थायिक असताना  शाम शेळके माझ्या घरी आला होता.माझे स्व. वडील बाहेरील ओट्यावर बसलेले होते. मीही बाजूलाच बसलेलो होतो. कित्येक वेळ त्यांचा गप्पांचा फड रंगला होता.ओघाओघात शामने माझ्या स्व.वडिलांना सांगून टाकले की, आम्ही मित्रांनी तुम्ही लावलेला बल्प चोरला होता म्हणून..! माझे वडील रागावले नाही. फक्त त्यांना याचे नवल वाटले की, एवढ्या बेमालूमपणे तुम्ही बल्पची चोरी केली ते ऐकून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.माझे वडील त्यावेळी एक वाक्य शाम शेळके अन् मला  म्हणाले होते  की, " जाऊ द्या, तुम्ही अभ्यासासाठी बल्पची चोरी केली, पण इथून पुढं असं काहीही करू नका..! चूक ती चूकच असते..! " माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी माझ्या सर्व वर्गमित्रांना, बालमित्रांना कधीच परकं समजलं नाही.माझे सर्व बालमित्र माझ्या स्व.वडिलांचे मित्रच होते.वास्तविक माझे स्व.वडील अतिशय शिस्तप्रिय अन् करारी व्यक्तिमत्व होते,पण माझ्या मित्रांच्या बाबतीत ते नेहमी हळुवार मायेनं वर्तन करणारे नाते निभायचे. विशेषतः शाम शेळके, विजू गायकवाड,डॉ.गणेश वाणी आण्णासाहेब म्हस्के यांच्या बाबतीत..!


आमच्या पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटातील या खोडकर आठवणी आठवल्या की, आमच्या धाडसी मित्राची म्हणजेच स्वर्गीय शामकांत मुरलीधर शेळके याची खूप खूप आठवण येते.शाम शिवाय आम्हा सर्व वर्गमित्रांचे वृंदावन सूने सुने झाले आहे.शाम शेळके हा आम्हा सर्व मित्रांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक होता. नियतीने याच आमच्या जिवलग वर्गमित्राला दिनांक ८/७/२०२२, शुक्रवार रोजी आमच्यातून कायमचे हिरावून घेतले.मात्र या जिवलग मित्राच्या आठवणी आम्हा सर्व मित्रांच्या आयुष्यात आम्ही जो पर्यंत हयात आहोत तो पर्यंत त्या सर्व आठवणी संजीवन असतील यात तिळमात्र शंका नाही..!


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २४/०७/२०२२, रविवार


क्रमशः

गुरुवार, २१ जुलै, २०२२

आभासी विश्वातील वास्तववादी मित्र, शिरीष भाऊ..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


आभासी विश्वातील वास्तववादी  मित्र, शिरीष भाऊ..!


===================================


आभासी विश्वात पण ,आपलं कुणीतरी भेटतं, फक्त आपलं त्याच्याशी भेटणं हे आभासी का असेना,पण त्याला वास्तवाची किनार असावी लागते. त्याच आभासी विश्वात आपल्या सारखं , साध्या सरळ पद्धतीने आयुष्य जगणारं ज्यावेळी कुणीतरी भेटतं तेंव्हा आभासी विश्वात देखील आपलं कुणीतरी आहे याची जाणीव होते. याच आभासी विश्वातील फेसबुक या माध्यमाचा वापर आपण कसा अन् कुणाच्या सोबत करतो त्यावर या विश्वातील नात्याची गुंफण तयार व्हायला सुरुवात होते. फेसबुक या आभासी विश्वात मी इ. स.२०१२ पासून कार्यरत आहे.फेसबुकचा योग्य वेळी अन् माझ्या दृष्टीने योग्य भासणाऱ्या फेसबुक मित्रांच्या सहवासात वावरणं मला आवडते. फेसबुक माध्यमावर वावरत असताना असाच एक प्रेमळ मित्र लाभला. त्यांचं नाव आदरणीय शिरीष भाऊ पडवळ..!


शिरीष भाऊ दिगंबर पडवळ..! ( राहणार - पुणे )

एकदम मस्त माणूस..! आयुष्यावर निस्सीम प्रेम करणारा एक अवलिया माणूस. आयुष्यावर निस्सीम प्रेम करत करत याच आयुष्याच्या प्रवासात सतत भटकंती करत असतो.मी मागील एका लेखात म्हंटले  होते की, प्रत्येक माणूस हा भटका आहे,फक्त प्रत्येकाची भटकी अवस्था भिन्न भिन्न असते, इतकेच..! शिरीष भाऊ पडवळ हे सध्या फार्मासिस्ट म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल,खडकी,पुणे येथे कार्यरत आहे. निसर्गावर अन् विद्यार्थ्यावर निस्सीम प्रेम करणारा एक अवलिया निसर्गवेडा , माणूसवेडा, माणूस अन् एक प्रांजळ मनाचा शिक्षक..! बऱ्याच वाचकांना प्रश्न पडला असेल की, शिरीष भाऊ तर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागात नोकरी करत आहेत अन् मी त्यांना शिक्षक का म्हणतोय..? शिरीष भाऊ पडवळ यांनी आपली आरोग्य विभागातील नोकरी सांभाळत विविध शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे.


शिरीष भाऊ यांची अन् माझी फेसबुक मैत्री झाली अन् काळाच्या ओघात प्रिय शिरीष भाऊ पडवळ माझ्या ब्लॉगवरील लेखांच्या प्रेमात पडले अन् मीही त्यांच्यातील असणाऱ्या निसर्गवेड्या पर्यटकाच्या अन् प्रांजळ मनाच्या शिक्षकाच्या प्रेमात पडलो. प्रेम हे असेच असते.त्याला नेहमी दोन बाजू असतात.त्या जर एकमेकांकडे आकर्षित होणाऱ्या अन् पूरक असतील तर मानवी नात्याची वेल खुप सुंदर प्रकारे बहरते असे माझे ठाम मत आहे.अर्थात या मानसिक अवस्थेला शिरीष भाऊ अन् मीही अपवाद नव्हतो.


आम्हा दोघांचा फेसबुक या आभासी विश्वात बऱ्याच दिवसांपासून आभासी संबंध होताच,पण तो आभासी संबंध प्रत्यक्षात आला तो दिनांक १८ जुलै २०२२ अन्  १९ जुलै २०२२ रोजी..! यापैकी दिनांक १९ जुलै २०२२ मंगळवार रोजी, प्रिय शिरीष भाऊ पडवळ यांनी माझ्या सध्याच्या माध्यामिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, गणित, बुध्दीमत्ता इत्यादी घटकांवर सखोल मार्गदर्शन केले.फक्त आणि फक्त विद्यार्थांच्या प्रेमापोटी अन् आम्हा दोघांतील असलेल्या निव्वळ प्रेमळ नात्यापोटी शिरीष भाऊ, आपण दूर असणाऱ्या आमच्या शाळेत आलात.सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप आनंद वाटला. पाऊस होता, रस्त्याचे काम सुरू होते, तरी शिरीष भाऊ, स्वतः ची चार चाकी गाडी घेऊन माझ्या सध्याच्या शाळेत आले.यात त्यांचं निरपेक्ष प्रेम जाणवलं , दुसरं काहीही नाही..!


फेसबुक सारख्या आभासी विश्वात देखील, आपल्याला आपल्या सारखं घरगुती कुणीतरी भेटावं याची नेहमी अपेक्षा असायची.ती प्रिय शिरीष भाऊ पडवळ ( राहणार - पुणे ) यांच्या रूपाने पूर्ण झाली.शिरीष भाऊ, माझ्या छोट्या घरी दोन दिवस मुक्कामी होते.या मुक्कामात असे कधीच वाटले नाही की, आपण एका तात्पुरत्या ओळखीच्या व्यक्तीच्या सहवासात दोन दिवस व्यतीत केले म्हणून..! सध्या शिरीष भाऊ यांचे वय अठ्ठावण्ण वर्षे आहे. त्यांची दिनचर्या अन् आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे ते अन् अजूनही अगदी ठणठणीत वाटतात. वाटतात नव्हे आहेच..!  शिरीष भाऊ यांचा मुलगा अमेरिकेत उच्च पदावर नोकरीला आहे. आपल्या मुलाकडून कोणतीही अपेक्षा न बाळगणारे एक स्वावलंबी व्यक्तिमत्व म्हणून मला शिरीष भाऊ विषयी अजुन नितांत आदर वाढला.


दिनांक २०/७/२०२२ बुधवार रोजी सकाळी प्रिय शिरीष भाऊ यांना आपल्या संस्कृतीनुसार पूजन करून योग्य तो सन्मान देऊन सन्मानपूर्वक पुन्हा त्याच्या गावी जाण्यासाठी निरोप दिला.प्रिय शिरीष भाऊ पडवळ, तुमच्या सारखी भावप्रधान अन् जाणीव असणारी माणसं , घरी आल्यावर घरात आपलंच कुणीतरी असल्याची जाणीव होते.ज्याचा अनुभव आम्ही घेतला.


प्रिय शिरीष भाऊ पडवळ म्हणजे नियतीचे रक्तविरहीत नात्यातील असणारे सुंदर नाते म्हणजेच खूप संवेदनशील मित्र होय..! अशीच माया कायमस्वरूपी असू द्या हीच प्रेमळ अपेक्षा..! 🌹🙏🏻


ता.क. - प्रिय शिरीष भाऊ यांनी त्यांच्या आयुष्यावर ' मास्तरचं पोर ' हे पुस्तक लिहिलं आहे.मला त्यांनी ते पुस्तक सप्रेम भेट दिले आहे.


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २२/०७/२०२२, शुक्रवार

शनिवार, १६ जुलै, २०२२

अलबेला शाम - भाग क्रमांक: ३






आमचे गाव आमची माणसं ©️

अलबेला शाम - भाग क्रमांक: ३

" फुटाण्याच्या चोरीचे आम्ही मुक साक्षीदार..!"

====================================

माध्यमिक शाळेतील वयोगटात आम्ही सर्व बालमित्र स्वर्गसुख अनुभवत होतो. शाम शेळके हा जरी आमच्या पालखेड येथील घरापासून गावातच दूर राहत होता ,तरी आमच्या मधील मैत्रीने ते अंतर कधीच दूर केले होते. मी, विजू  गायकवाड अन् गणेश वाणी ज्या अभ्यासाच्या खोलीत अभ्यास करायचो त्या खोलीत आम्ही अन् आमचे बालमित्र अभ्यास झाला की,कधीमधी रात्री जमायचो.

आम्ही इयत्ता दहावीत असताना आमच्या वर्गातील सर्वात शांत अन् समंजस असलेला  आमचा प्रिय बालमित्र गणेश वाणी याने एकदा त्याच्या घरून रात्रीच्या वेळी खायला फुटाणे आणले होते.काही फुटाणे खाल्ले अन् उरलेले थोड्यावेळाने खाऊ या हेतूने गणेशने ते फुटाणे आमच्याच अभ्यासाच्या खोलीत गोधडीच्या खाली कोपऱ्यात  ठेवून दिले.काही वेळाने साधारणतः रात्री नऊच्या वेळी इतर अभ्यासाच्या खोलीत राहणारे मित्र जसे की, शाम शेळके अन् आण्णासाहेब म्हस्के त्यांचा अभ्यास झाल्यावर गप्पा मारायला आमच्या अभ्यासाच्या खोलीत आले होते.गणेश वाणी याने फुटाणे खायला आणलेले आहेत अन् ते गोधडीच्या खाली ठेवलेले आहेत, हे आण्णासाहेब म्हस्के याला कसे काय माहित झाले ,माहीत नाही,पण आण्णाने हळूच ,गुपचूप फुटण्याची पुडी घेतली अन् मस्तपैकी आमच्या अभासाच्या खोलीच्या समोर असणाऱ्या सुराशे पाटील यांच्या दगडी जोत्यावर खात बसला. शाम शेळके याला , आण्णासाहेब म्हस्के याने गुपचूप अर्थात चोरून घेतलेले फुटाणे खायचे नसल्याने तो सूराशे यांच्या जोत्यावर बाजूला बसला होता. थोड्यावेळाने गणेश वाणी याला , त्याने आणलेल्या फुटाण्याची आठवण आली अन् आता ते फुटाणे खावे या हेतूने त्याने फुटाणे ठेवलेल्या  अंथरलेल्या गोधडीच्या खाली  हात घातला. मी माझा अभ्यास करत बसलेलो होतो.गणेश अंथरलेल्या गोधडीला पुन्हा पुन्हा वर खाली करून बघू लागला , पण त्याला काही फुटाण्याची पुडी सापडेना.गणेशचे लक्ष आमच्या अभ्यासाच्या खोलीच्या बाहेर गेले.त्याला समोरील दगडी जोत्यावर आण्णासाहेब म्हस्के अन् शाम शेळके हे दोघेजण ऋषिपाठक गुरू यांचा जो वाडा होता त्या बाजूला तोंड करून बसलेले दिसले.

गणेशला पक्का संशय आला होता की, माझे फुटाणे या दोघांनीच लंपास केले आहे.गणेश हळूहळू खोलीच्या बाहेर आला अन् जोत्याच्या दिशेने चालला. मीही त्याच्या मागोमाग चाललो होतो. त्याला तिथं आण्णासाहेब म्हस्के हा मस्तपैकी फुटाणे खाताना दिसला.शाम शेळके बाजूला बसलेला होता.गणेशला कधीच राग येत नव्हता,पण त्याला त्यावेळी इतका राग आला होता की, त्याने मोठ्याने आण्णासाहेब म्हस्के याला बोलायला सुरुवात केली.शाम शेळके नुसता डोळे वटारून पाहत होता.मी अन् शाम शेळके सज्जन असल्याचा आव आणून समजूतदारपणा असल्याची भाषा वापरू लागलो होतो.गुपचूप अन् अचानकपणे गणेशने येऊन आण्णासाहेब म्हस्के वर सुरू केलेल्या शब्दांच्या भडीमाराने आण्णासाहेब म्हस्के पुरता गडबडून गेला होता.आण्णासाहेब म्हस्के याने जे तिथून धूम ठोकली तो सरळ आमच्या घराच्या बाजूला असणाऱ्या बोळीत शिरला अन् गणेश वाणी सरळ पळत जैन गल्लीत आण्णासाहेब म्हस्के याला पकडायला धावत गेला होता. आण्णासाहेब म्हस्के हा बोळीत शिरून नंतर त्याच ठिकाणी असणाऱ्या  नळाच्या पाण्याच्या खड्ड्यात लपून बसला होता, हे मी अन् शाम शेळके आम्ही दोघांनी बघितले होते. अंधाराचा फायदा घेऊन आण्णासाहेब म्हस्के हा नळाच्या पाण्याच्या खड्ड्यात लपून बसला होता.गणेशने त्याला गल्लीत शोधले पण म्हस्के काही सापडला नाही.वास्तविक मला अन् शाम शेळके आम्हाला माहीत होते की, ज्या नळाच्या पाण्याच्या खड्ड्यात आण्णासाहेब म्हस्के लपून बसलेला आहे म्हणून..! त्याच खड्ड्याच्या बाजूला उभा राहून गणेश वाणी,सापडत नसलेल्या आण्णासाहेब म्हस्के याला रागारागाने बोलत होता. इकडे मला अन् शाम शेळकेला हसू येत होते. ज्याला गणेश वाणी शोधत होता, तो आण्णासाहेब म्हस्के,गणेश वाणी उभा असलेल्या पाठीमागील खड्ड्यातच होता.पण आम्ही शेवटपर्यंत गणेश वाणी याला सांगितलेच नाही की,तू ज्याला शोधतोय तो तुझ्या पाठीमागेच आहे म्हणून..!

अखेर गणेश वाणी वैतागून अभ्यासाच्या खोलीत आला अन् झोपी गेला.मी अन् शाम शेळके त्या नळाच्या पाण्याच्या खड्ड्याकडे गेलो अन् आण्णासाहेब म्हस्के याला गुपचूप त्याच्या अभ्यासाच्या खोलीकडे जायला सांगितले. शाम शेळके देखील त्याच्या अभ्यासाच्या खोलीकडे निघून गेला अन् मीही आमच्या अभ्यासाच्या खोलीत येऊन झोपी गेलो.

आम्हा बालमित्रांना, आमच्या प्राथमिक अन् माध्यमिक शाळेतील वयोगटात असताना जे आयुष्य लाभले होते ते नियतीने आम्हाला आयुष्यात दिलेले सर्वोत्तम वरदान होते.आम्ही सर्व वर्गमित्रांनी तत्कालीन आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतला होता.तो गतकाळातील लाभलेला ,मिळालेला आनंद, एकमेकांच्या खोड्या आज आठवल्या की, प्रौढत्वाकडे झुकत चाललेले आमचे शरीर अन् मन अजुन चिरतरुण होत जाते.खंत फक्त याची वाटते की, या सगळ्या आठवणी ज्या बालमित्राच्या साक्षीने झाल्या, तो शाम मुरलीधर शेळके आज हयात नाही..!😔

वंदे मातरम्..!

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १६/०७/२०२२, शनिवार.

क्रमशः

 

मंगळवार, १२ जुलै, २०२२

" ते माझे गुरू..!"

 



चिंतन ©️


" ते माझे गुरू..!"


===============================


ज्यांनी ज्यांनी मला माझ्या आयुष्यात वाईट अनुभव दिले ते माझे गुरू ,कारण त्यांनी मला माणसं ओळखायला फुकटमध्ये शिकवलं..!


ज्यांनी ज्यांनी मला माझ्या आयुष्यात ज्ञान दिले ते माझे गुरू, कारण त्यांनी  माझ्या आयुष्याला समज दिली..!


जे कुणी,  माझ्या आयुष्यात, मी ऐन संकटात असताना  माझ्या मदतीला धावून आले ते माझे गुरू, कारण, त्यांच्यात त्या परम पित्या परामात्याचं रूप मला जाणवलं..!


जे कुणी नाहक कारणांनी या सुंदर आयुष्याची राख रांगोळी करून घेतात ते माझे गुरू, कारण त्यांनी त्यांचं आयुष्य ज्या नाहक कारणांनी उध्वस्त केले ते बघून मी वेळीच सावध झालो..!


ज्यांनी कुणी माझ्या आयुष्यात मायेचा अंकुर फुलविला ते माझे  गुरू, कारण ते  आई - वडील होते..! 


ज्यांनी कुणी माझ्या आयुष्यात मैत्रीचा अंकुर फुलविला ते माझे गुरू, कारण त्यांनी रक्तविरहित नात्यात विधात्याचा अंश असतो याची अनुभूती मला करून दिली..!


ज्यांनी कुणी माझ्या आयुष्यात वैचारिक, अध्यात्मिक शक्ती दिली ते माझे गुरू कारण त्यांच्यामुळे खूप थोडी फार मानसिक शांती लाभली..!


आणि...

सजीव कधी कधी चुकू शकतात, पण निर्जीव भासणाऱ्या ध्वजात चूक होत नाही,कारण तो ध्वज सतत आपल्याला प्रेरणा देत असतो,जगण्याची, सतत आयुष्यात फडफडण्याची, उभा राहण्याची, आपला दैदिप्यमान इतिहास , त्यातील प्रेरक शक्तींना आठवून त्यांच्यामुळे आज माझ्यातला मी उभा आहे याची जाणीव सतत होत असते..! ते ध्वज देखील माझे गुरू आहेत,कारण तो राष्ट्रध्वज आहे, तो भगवा ध्वज आहे..! 

🇮🇳 🙏🏻 🚩


वंदे मातरम्..!


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १३/७/२०२२,बुधवार, गुरू पौर्णिमा.

शनिवार, ९ जुलै, २०२२

अलबेला शाम - भाग क्रमांक: २


 


आमचे गाव आमची माणसं ©️


अलबेला शाम - भाग क्रमांक: २


" आमच्या अभ्यासिका ,एक रम्य ठिकाण..!"


===============================


शाम शेळके अन् आमच्या मैत्रीचा वेल बहरत चालला होता.माध्यमिक शाळेतील वयोगट हा तसा खूपच संवेदशील असतो.आम्हीही त्याला अपवाद नव्हतो.आमच्या पालखेड गावात केवळ आमचीच वर्गमित्रांची बॅच अशी होती, ज्यातील आम्ही वर्गमित्रांनी अभ्यासाच्या अभ्यासिका केलेल्या होत्या. आमच्या अभ्यासिका आलिशान अजिबात नव्हत्या.निव्वळ मातीची अन् धाब्याची घरे होती. त्यांना दर आठवड्याला शेण गोळा करून सारवून घेत होतो.पालखेड गावात आमच्या वर्गमित्रांच्या साधारणतः एकूण तीन अभ्यासिका होत्या.एक अभ्यासिका आमचेच एक जुने मातीचे घर होते.ते आमच्याच गल्लीत होते.त्यात मी , विजू वैजिनाथ गायकवाड अन् गणेश जगन्नाथ वाणी अभ्यास करायचो. दुसरी अभ्यासिका ही नंदकिशोर भाऊसाहेब जाधव याच्या माडीच्या समोर थोरात पाटील यांचं मातीचं घर होते.त्यात शाम शेळके, बाळू माळी अन् तिसरा सदस्य नेहमी बदलत असायचा.कधी तो बाळू कचरू घोडके असायचा तर कधी शेख फारुख तर कधी अजुन इतर कुणी..! तिसरी अभ्यासिका होती आण्णासाहेब कारभारी म्हस्के याच्या घराच्या बाजूला असणारी त्यांचीच एक खोली..! त्यात आण्णासाहेब म्हस्के, ज्ञानेश्वर मोकाटे असायचा. या अभ्यासिका मध्ये देखील तिसरा सदस्य नेहमी बदलत असायचा.कधी तो अजय काळे ( गुरु ) असायचा तर कधी अजुन इतर कुणी..! आम्ही वरील उल्लेखित वर्गमित्र वर उल्लेख केल्याप्रमाणे वेगवेगळ्या अभ्यासाच्या खोल्यात दररोज रात्री मुक्कामी अभ्यास करायला यायचो. फक्त आमचा बालमित्र नंदकिशोर भाऊसाहेब जाधव हाच एकटा त्याच्या माडीच्या खालच्या मजल्यावर अभ्यासाला असायचा.


आमच्या अभ्यासाच्या खोल्यांनी आम्हाला आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्यायला शिकवला.आमच्या अभ्यासाच्या खोल्यांनी आम्हा वर्गमित्रांमध्ये मैत्रीची घट्ट वीण तयार केली होती. रात्री खूप उशिरा पर्यंत अभ्यास करून झाला की, आमच्या सर्व अभ्यासिका मधील मित्रांचे भेटण्याचे ठिकाण ठरलेले असायचे अन् ते म्हणजे नंदकिशोर जाधव याच्या खोलीत.आज ज्यात ठिकाणी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्याच ठिकाणी आम्ही मित्र बऱ्याचदा रात्री अभ्यास झाल्यावर गप्पांचा फड रंगवायचो. प्रिय बालमित्र नंदकिशोर जाधव यांचे जे माडीचे घर होते, त्यातील खालच्या मजल्यावर असणाऱ्या घरातील ओट्यावर सकाळीच नंदू अंघोळ करून रेडी व्हायचा. घरातील ज्या ओट्यावर नंदू अंघोळ करायचा ते पाणी त्याच ओट्यात जिरून जायचे.नंदू भाऊसाहेब जाधव याची दररोज घराच्या आतल्या बाजूला असलेल्या ओट्यावर होणारी अंघोळ आमच्या दृष्टीने एक आश्चर्यच असायचे,कारण अंघोळ झाल्यावर काही क्षणातच ओट्यावरील पाणी पूर्णपणे जिरून जायचे.जसं काय या ठिकाणी अंघोळ कुणी केलीच नाही..! 


आम्ही इयत्ता नववी मध्ये असताना गावात चोरांचा सुळसुळाट झाला होता.त्यामुळे गावातील तत्कालीन पोक्त लोकांनी गावातील तरुणांचे गट तयार केले होते.त्यांना राखण करण्यासाठी रात्रपाळी दिली होती अन् गावातील गल्ल्यांचे वाटप करून दिले होते.कोणत्या गटाने कोणत्या गल्लीत रात्रपाळी साठी चक्कर मारायची याचे नियोजन केले होते.आम्ही जरी माध्यमिक शाळेतील वयोगटात होतो तरी आम्ही आमचा एक गट तयार केला होता अन् आम्हीही मध्यरात्रीच्या नंतर पहारा द्यायला जायचो.अर्थात पुढाकार असायचा प्रिय मित्र शाम शेळके याचा..! पहारा कमी अन् एका जागी बसून अन् शेकोटी पेटवून गप्पांचा फडच जास्त रंगायचा.मी बऱ्याचदा पेटलेल्या शेकोटी जवळच झोपी जायचो.शेकोटी पेटविण्याचं ठिकाण गावातील नाटकाचा ओटा परिसर असायचे.शाम शेळके याचे घरही तिथून जवळच होते. मुद्दामहून मध्यरात्री नंतर रस्त्याने दगडावर काठ्या वाजवत जायचो.अधून मधून जत्रेतील शिट्टी देखील वाजवायचो.याही कामात शाम शेळके हाच पुढाकार घ्यायचा.


शाम शेळके याच्या अभ्यासाच्या खोलीत एके दिवशी मध्यरात्री मित्रांचे कशावरून तरी कडाक्याचे भांडण झाले.त्या अभ्यासाच्या खोलीत एक लाकडी टेबल होता. ऐन मध्यरात्री शाम शेळके टेबल घेऊन अभ्यासाच्या खोलीतून बाहेर पडला होता. एका वर्तुळात आमच्या अभ्यासाच्या खोल्या असल्याने त्याचवेळी मध्यरात्री लगेच आण्णासाहेब म्हस्के आमच्या खोलीकडे पळत पळत आला अन् आम्हाला म्हणाला की, " अय, पटकन चला ,शाम त्याचा टेबल खोलीच्या बाहेर घेऊन घरी चालला आहे. ते चांगदेव शेळके गुरुजींच्या घरासमोर गल्लीतच बोलू राहिले...!"

मी, गणेश वाणी,विजू गायकवाड , आण्णासाहेब म्हस्के, नंदकिशोर जाधव तिथं जमा झालो. कसाबसा ऐन मध्यरात्री होणारा धुडगूस थांबवला अन् तो लाकडी टेबल पुन्हा अभ्यासाच्या खोलीत परत घेतला.


असे दिवसामागून दिवस जात होते अन् आमच्या अभ्यासाच्या खोल्या आम्हा वर्गमित्रांना आयुष्याचा अर्थ समजावून सांगत होत्या.त्या अभ्यासाच्या खोल्या आमच्यासाठी आमच्या प्रत्येकाच्या आई वडिलांच्या घरांपेक्षा प्रिय वाटत होत्या.आम्ही प्रत्येकजण आपापल्या घरी रमणार नाही, एवढे आमच्या प्रत्येकाच्या अभ्यासाच्या खोल्यात, अभ्यासिकेत रमून आमचं आयुष्य व्यतीत करू लागलो होतो.


ता.क. - प्रस्तुत फोटोत प्रिय बालमित्र स्वर्गीय शाम शेळके याच्या पायाच्या मागे जो खड्डा दिसत आहे, त्यावर एक प्रसंग आम्हा वर्गमित्रांच्या आयुष्यात त्याकाळी घडला होता.त्यावर पुढील भागात व्यक्त होईल..!


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ०९/०७/२०२२, शनिवार.


क्रमशः

रविवार, ३ जुलै, २०२२

" राॅकेट्री : द नंबी इफेक्ट "


 


चिंतन ©️


" राॅकेट्री : द नंबी इफेक्ट "


=============================


भारतीय माणसाने, भारतीय माणसासाठी , भारताच्या महान शास्त्रज्ञाला आपल्या कलात्मक अन् सर्वोत्तम अभिनयाच्या द्वारे वाहिलेली सर्वोत्तम कलाकृती म्हणजे राॅकेट्री : द नंबी इफेक्ट होय..!


आर. माधवन दिग्दर्शित अन् अभिनित राॅकेट्री : द नंबी इफेक्ट हा चित्रपट महान भारतीय अंतरीक्ष शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या कार्यावर आधारित आहे. अंतरीक्ष क्षेत्र, रॉकेट तंत्रज्ञान अन् त्यातील अभ्यासपूर्ण घटक याविषयी मला फारसे ज्ञान नाही, पण हे सर्व घटक ज्या पद्धतीने या चित्रपटात आर.माधवन यांनी सादर केले आहेत, त्यासाठी त्यांना ग्रेट सॅल्युट..!🙏🏻  


एवढे महान अन् विद्वत्तेचे धनी असलेले थोर शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी आपल्या आयुष्यात कुणीतरी आरोप केले अन् त्यामुळे केवळ संशयाच्या भोवऱ्यात ज्या मरण यातना भोगल्या त्या बघून अंगावर काटे उभे राहतात.प्रचंड मानसिक अन् शारीरिक त्रास होऊनही नंबी नारायणन ज्या पद्धतीने स्वतः ला आयुष्यात सिध्द करतात ते बघून त्यांच्या समोर नतमस्तक झाल्या शिवाय राहवलं जात नाही. पण असे होताना भारताचा एक नागरिक म्हणून माझी मलाच लाज वाटते . कारण एवढ्या खूप मोठ्या उंचीच्या भारतीयाला आपण काय दिले तर.. त्यांच्या कुटुंबीयांला, त्यांना स्वतःला होणारा त्रास..!😔 नशीब, इ. स.२०१९ मध्ये भारत सरकारने थोर शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांचा योग्य तो सन्मान राखत त्यांना पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


चित्रपटाची सुरुवात ज्या पद्धतीने होते, विशेषतः बॅक ग्राउंड वर सुरू असलेल्या मंत्रोच्चारात होते, ते ऐकून तो प्रसंग दक्षिण भारतातील आहे याची जाणीव होते.या चित्रपटात आर.माधवन ,नंबी नारायणन यांचं अख्खं आयुष्य अक्षरशः जगले आहेत.आर.माधवन यांनी त्यांच्या आज पर्यंतच्या आयुष्यातील सर्वोत्तम भूमिका सादर केली आहे यात तिळमात्र शंका नाही.


भारताला रॉकेट तंत्रज्ञान प्राप्त करण्यासाठी नंबी नारायणन यांनी फ्रान्स मध्ये ज्या पद्धतीने आपली अस्सल विद्वत्ता ,समयसूचकता, जिद्द, चिकाटी उपयोगात आणली, ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्या गुरूंच्या घरी वाटेल ती घरगुती कामे केली, ते बघून क्षणक्षणाला या थोर व्यक्तिमत्वासमोर आपले शरीर अन् मन पुन्हा पुन्हा नतमस्तक होते.


या चित्रपटात आर.माधवन यांनी माझ्या मते तीन प्रसंगात आपल्यातील सर्वोत्तम अभिनयाला सादर केले आहे. ते प्रसंग पुढील प्रमाणे..

(१) थोर शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना तुरुंगात थर्ड डिग्री शिक्षा दिली जाते.काही दिवसांनी त्यांचा एक माजी सहकारी संशोधक मित्र त्यांना भेटायला पोलीस स्टेशन मध्ये येतो.त्यावेळी आर.माधवन यांनी जो अभिनय सादर केला आहे तो निव्वळ लाजवाब आहे.

(२) देशद्रोही म्हणून समाज थोर शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना अन् त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकतो. नंबी नारायणन यांचं वय वाढत जाते.तब्येत देखील काहीशी स्थूल होत जाते. विशेष म्हणजे आर.माधवन यांनी खरोखर आपली तब्येत वाढवलेली आहे.त्यांची पत्नी आजारी पडते.आपल्या पत्नीला दवाखान्यात न्यायचे असते.बाहेर पाऊस सुरू असतो. एका रिक्षाला हात देऊन थांबवतात.रिक्षा थाबते, त्यात दोघे पती पत्नी बसतात,पण काही अंतर रिक्षा गेल्यावर दोघाही पती पत्नीला रिक्षातून ढकलून दिल्या जाते.त्यावेळी भर पावसात, आर.माधवन यांनी इतर वाहनांना थांबविण्यासाठी जो अभिनय केला आहे तो बघून मशाल अन् घायल चित्रपटातील अनुक्रमे दिलीपकुमार अन् सनी देओल यांच्या सर्वोत्तम अभिनयाची नक्कीच आठवण येते..! 

(३) नंबी नारायणन अन् त्यांची पत्नी एका लग्न समारंभात गेलेले असतात.तिथं ज्यावेळी वयस्कर होत चाललेल्या नंबी नारायणन यांना ते निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे असा फोन येतो. त्यानंतर आर.माधवन यांनी आपल्या पत्नीला मायेच्या कुशीत घेऊन जो अभिनय केला आहे, तो बघून तर असे वाटते की, आर.माधवन किती मोठ्या उंचीचा अभिनेता आहे म्हणून..!


फक्त संशयाच्या आधारावर एका खूप महान भारतीय अंतरीक्ष शास्त्रज्ञाला किती मरण यातना सोसाव्या लागल्या ते बघून आपले शरीर थिजून जाते.


मी अगोदरच उल्लेख केला आहे की, अंतरीक्ष क्षेत्र, रॉकेट तंत्रज्ञान अन् त्यातील अभ्यासपूर्ण घटक याविषयी मला फारसे ज्ञान नाही. पण रॉकेट तंत्रज्ञान, विकास इंजिन नसते तर आपण मंगळ ग्रहावर जगातील सर्वात स्वतः खर्चात पोहोचू शकलो असतो का..?

आपल्या देशाची आर्थिक स्थिती भक्कम नसताना ,आपल्या देशात जे आज अंतरीक्ष तंत्रज्ञान विकसित झाले आहे ते विकसित झाले असते का..?

इत्यादी अनेक बाबींमध्ये आज आपला भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे,त्याचे खूप मोठे श्रेय जाते ते थोर अंतरीक्ष शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनाच..!


चित्रपटाच्या शेवटी भारताचे पंतप्रधान वंदनीय नरेंद्र मोदी यांचे शास्त्रज्ञ अन् त्यांच्या कार्याविषयी जे मनोगत बॅक ग्राउंड वर सुरू असते त्यावेळी आपला भारत आता जगाच्या पटलावर मोठी सत्ता होण्याच्या मार्गावर पुढे पुढे जात आहे याची जाणीव होते..!


वंदे मातरम्..!🙏🏻🇮🇳🙏🏻


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ३ जुलै २०२२, रविवार.

शुक्रवार, १ जुलै, २०२२

अलबेला शाम - भाग क्र.१


 


आमचे गाव आमची माणसं ©️


अलबेला शाम


" प्रारंभ, मैत्रीच्या पर्वाचा..!"


==============================


मित्र अन् मैत्री काय असते असं कुणी विचारलं तर अनेकजण आपापल्या परीने आपल्या आयुष्यात भेटलेल्या अनेकांना त्यात शोधत बसतील.आपल्या आयुष्यात भेटलेल्या प्रत्येक मित्राचे अस्तित्व तसे बघितले तर त्या प्रत्येक मित्राच्या भिन्न भिन्न प्रकारच्या स्वभाव वैशिष्ट्यांनी सजलेले असते. कुणाला तो मित्र श्रीकृष्णा - सुदामा सारखा भेटतो, कुणाला तो मित्र राज ठाकरे - बाळा नांदगावकर यांच्या सारखा भेटतो, तर कुणाला तो मित्र थोर लेखक सुहास शिरवळकर सरांच्या दुनियादारी मधील DSP उपाख्य दिगंबर शंकर पाटील उपाख्य दिग्या सारखा भेटतो. दुनियादारी मधील दिग्या जसा डेरींगबाज अन् मनाने निर्मळ ,तसाच आमचा प्रिय शाम..! या सर्व प्रकारच्या स्वभाव गुणांनी युक्त भेटणाऱ्या सर्व मित्रात तेच मित्र प्रत्येक रंगात आपल्या सोबत न्हावून निघतात,ज्यात दुनियादारी मधील दिग्या लपलेला असतो..!


थोर लेखक सुहास शिरवळकर सरांनी ज्या ताकदीने आपल्या दुनियादारी या कादंबरीत दिग्या उभा केला, रेखाटला तोच दिग्या एखाद्याच्या आयुष्यात प्रत्यक्ष भेटला तर अशा माणसाच्या आयुष्याची दुनियादारी नक्कीच प्रगल्भ होते. 


थोर लेखक सुहास शिरवळकर सरांचा मानसपुत्र असलेला दिग्या आम्हा काही बालमित्रांना त्यांच्या आयुष्यात लाभला अन् आमची मित्रांची दुनियादारी बहरत गेली.कोण होता तो, ज्यानं आम्हाला निडर व्हायला शिकवलं, रफ अँड टफ व्हायला शिकवलं.! तो होता आम्हा सर्व बालमित्रांच्या गळ्यातील ताईत शामकांत मुरलीधर शेळके..!


शामकांत मुरलीधर शेळके, ज्याला आजही आम्ही नेहमी आमच्या बालमैत्रीच्या नात्यातून ' शाम्या ' म्हणत असतो अन् तो ही आम्हाला आमच्या एकेरी नावाने हाक देत असतो.जसे की, ' नंद्या..! ' अर्थात वेळ काळ प्रसंग पाहून त्यात बदल होतो. शाम अन् माझ्या मैत्रीचा अध्याय तसा सुरू झाला तो आमच्या माध्यमिक शाळेतील वयोगटापासून..! त्याचं कारण आमची एकमेकांची पालखेड येथील घरे दूर होती, त्यामुळं प्राथमिक शाळेतील वयोगटात तो मैत्रीचा बहर,बहरला नाही. जेंव्हा आम्ही इयत्ता आठवी मध्ये प्रवेशित झालो त्यावेळी माझ्या सोबत होते, माझ्या गल्लीतील माझे खूप जिवलग बालमित्र गणेश वाणी अन् विजू गायकवाड..! जसजसा मैत्रीचा पसारा वाढत गेला तसतसे त्यात अजुन हिरे,माणिक मोती सामील होत गेले.इयत्ता आठवी मध्ये प्रवेशित झाल्यावर हा शाम आम्हाला त्याच्याकडे आकर्षित करायला लागला. त्यांचं बोलणे, त्याचा डेरींगबाज स्वभाव, त्याची प्रत्येक खेळातील चपळाई, त्याचा हजरजबाबीपणा इत्यादी गुणांनी आम्ही एकमेकांच्या मैत्रीच्या विश्वात सामील झालो. आमचा हा बालमित्र हजरजबाबीपणा मध्ये इतका तरबेज आहे की, एकदा त्याने कुलूप अन् किल्ली वरून सहजपणे व्यक्त केलेलं वाक्य आम्हा काही बालमित्रांच्या आयुष्यात अजरामर होऊन गेलेलं आहे. कुलूप अन् किल्लीचा विनोद बहुदा फक्त विजू गायकवाड, मी अन् शाम आम्हालाच माहीत असावा..! 😊


तसे बघितले तर आमच्या वर्गात तऱ्हेतऱ्हेचे नमुने होते. , काहीजण तथाकथित सभ्य श्रेणीत मोडणारे होते.अर्थात या संपूर्ण विश्वात, संपूर्ण मानव जातीस सभ्य श्रेणीत मोडणारे कुणीच नाही,कारण प्रत्येकात दादा कोंडके लपलेला असतो या सिद्धांतावर माझा प्रचंड विश्वास आहे. आमची श्री.पारेश्वर माध्यमिक विद्यालय ही शाळा इ. स.१९९२ पर्यंत , सध्याची पालखेड येथील जी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची इमारत आहे तिथं होती.याच इमारती मधील तीन वर्गखोल्या इयत्ता आठवी,नववी अन् दहावी साठी त्यावेळी उसन्या , वापरायला दिलेल्या होत्या.आमचा इयत्ता आठवीचा कोपऱ्यात होता. आमच्या माध्यमिक शाळेतील तुकड्या वाढल्यानंतर काही वर्ग रवींद्रनाथ टागोर यांच्या आयुष्यातील झाडाखाली भरणाऱ्या शांतिनिकेतन सारखा शाळेच्या प्रांगणात असलेल्या कडुलिंबाच्या झाडाखाली भरायचा. त्यामुळं निसर्गातलं निरीक्षण अन् गावाच्या आत बाहेर जाणारी माणसं अधून मधून दिसायची अन् त्यांचं निरीक्षण करून जे भेटेल तेही ज्ञान प्राप्त व्हायचे.


आमचा खूप जिवलग बालमित्र शाम हा वर्गात आमच्या बॅक बँचर असणाऱ्या मोजक्या मित्रांपैकी एक होता.त्यात मी स्वतः, आण्णासाहेब म्हस्के ( ह.मु. औरंगाबाद ), शेख खाजा बागवान ( ह.मु. औरंगाबाद ), भागिनाथ गोरे, संतराम काळे ( खिर्डी ), गणेश निकम ( ह.मु. औरंगाबाद) कंमु बेग मिर्झा ( जळगाव) नंदकिशोर जाधव इत्यादी आम्ही प्रामुख्याने आम्ही मागेच बसायचो. शाळेच्या क्रीडा तासिकेला असणाऱ्या प्रत्येक वेळी हाच शाम पुढाकार घ्यायचा.क्रिकेट हा खेळ याचा जीव की प्राण..! क्रिकेट खेळाचे गारूड एवढे अंगात भिनलेले होते की, अक्षरशः याच प्रिय बालमित्र शामची गाय जळगाव अन् पालखेड सीमेवर असणाऱ्या बोर नदी परिसरात चरायला गेली होती. पावसाचे दिवस असल्याने तेथील गाळात फसली होती. शामला ही बातमी समजली ,तरी पठ्ठ्या एकदा क्रिकेट सामना खेळला अन् मग ती गाय आणायला गेला.अर्थात गायीला सुखरूप घरी घेऊन आला होता. बरेच दिवस ही आम्हाला दंतकथा वाटत होती,पण हे खरं होतं.


याच प्रिय बालमित्र शाम मुळे त्याच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या, त्याच्या सानिध्यात राहणाऱ्या अनेक मित्रांचे आगमन माझ्या आयुष्यात होणार होते.माझा शामशी खूप संपर्क वाढला होता. शामची जी त्याच्या घराच्या परिसरातील मित्रमंडळी होती, ती देखील मैत्रीच्या देवतेने आपल्याला एखादा प्रसाद द्यावा तशीच खूप गोड होती.असणारच,कारण मुळात शाम हाच स्वच्छ मैत्रीच्या नात्यातील कोहिनूर होता..!🌹


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ०१/०७/२०२२, शुक्रवार


क्रमशः