मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" टाईमपास...!"
=====================================
शाळा सुटली की,आम्हा काहींची लई धावपळ सुरू होते..बस पकडण्याची..! पण नेहमीप्रमाणे बऱ्याचदा बस एकतर उशिरा येते किंवा आलीच तर त्यात चीन आणि भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारी घनदाट लोकसंख्या असतेच..! या परतीच्या प्रवासात आम्हा परतीच्या मित्रांना एक वस्तू प्रेमाने ,तोंड चावळत चावळत साथ देते.प्रेमाने तोंड चावळत चावळत साथ देणाऱ्या इवल्याश्या खाद्य पदार्थांचे नाव आहे.....
खारट सूर्यफूल बी..! त्याला आम्ही टाईमपास असेही म्हणतो..!☺
हा टाईमपास दिसतो एवढासा पण आमचे अख्खे तोंड ढवळून काढायची भर भक्कम ताकद याच खारट सूर्यफूल बियांमध्ये आहे..!या टाईमपास ला अलगदपणे फोडून त्यातील पौष्टीक पदार्थ खाण्यासाठी निष्णात बी फोडणाराच बी फोड्या असावा लागतो..!☺ हे टाईमपास हातात घेतले की, पाहिले खारट बी फोडून खाण्याची तीव्र लालसा निर्माण होऊन ते पाहिले खारट बी फोडून ,बोटात पकडून पोटात ढकलले की,अजुन अजुन खाद्य लालसा वाढत जाते..!
जो पर्यंत आम्ही बस स्थानकावर उभे असतो तो पर्यंत खारट बी फोडून खाण्याची कसरत सुरू असते..! मात्र एकदाका बस आली रे आली अन् त्यात आम्ही चढलो की मग आमच्यातील ते बी फोडून खाण्याचे कौशल्य पणाला लावावे लागते..! खारट बी त्या चीन आणि भारताच्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घनदाट गर्दीत खाणे म्हणजे त्या खारट सूर्यफूल बियांवर केलेलं सर्जिकल स्ट्राईकच असते..! अचूक टायमिंग साधून अचूकपणे बी मधील नेमका पौष्टिक पदार्थ खाणारे आमच्या सारखे आम्हीच..!😂
आमच्या या निष्णात खाण्या बाबत आम्हीच आमची पाठ अन् कंबर थोपटून घेतो..! कारण औरंगाबाद ते जळगाव रस्ता अन् त्यावरील सुंदर, सुबक विविध भौमितिक आकृत्या सारखे अंगवळणी पडलेले खड्डे..!☺ आपले भारतीय अशा बऱ्याच गोष्टी अंगवळणी पाडून घेतो त्याबद्दल त्या सर्वांचे कौतुक करावे तितके कमीच..!😂
एखादा खड्डा आला की हातातील बी निसटून ते बी आमच्या पासून दुरावण्याची शक्यता निर्माण होते.अशावेळी मला व माझ्या या मित्रांना खूप खूप दुःख होते..! पण काय करता..आम्ही पडलो अंगवळणी पडलेले दैनिक प्रवासी..!☺जे खारट बी हातातून निसटून खाली पडले त्याचा शोक न करता आम्ही मित्र पुन्हा दुसऱ्या खारट सूर्यफूल बियांवर सर्जीकल स्ट्राईक करायला सज्ज होतो..! या सर्व कौशल्यपूर्ण खाण्याच्या क्रियेत जेंव्हा त्या खारट बियांमधील पौष्टीक पदार्थ जेंव्हा तोंडात जातो त्यावेळी स्वर्गापेक्षा लई मोक्कार आनंद आम्हा मित्रांना होतो..!☺
तर..असे हे आमचे टाईमपास अन् त्याला खाण्याची तऱ्हेवाईक पद्धत..! त्या तऱ्हेवाईक खाण्याच्या पद्धतीत माझ्या सोबत जे माझे मित्र आहेत ते...प्रिय निकम सर, प्रिय परदेशी सर अन् प्रिय डॉ. गिरी सर..आम्ही या टाईमपास खारट सूर्यफूल चे निष्णात खवय्ये आहोत याचा आमच्या आम्हालाच लई अभिमान वाटतो..!
ता.क.: सदरील आम्हा मित्रांचे छायाचित्र आज दिनांक २४ सप्टेंबर २०१९ रोजी शाळा सुटल्यावर टाईमपास खारट सूर्यफूल बी खातांनाचे आहे..!
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २४ सप्टेंबर २०१९


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा