" मिठाई सारखा खूप गोड माणूस..! "
=====================
" वंदे मातरम्, गुरु देव...!"
असा आवाज कानी पडला की,समजून घ्यायचे.. मला प्रिय जालमसिंग राजपुत यांनी आवाज दिला. त्यानंतर मात्र माझी अन् माझ्या सोबत माझ्या मुलांची पुढे जाण्याची प्रेमळ हिम्मत झालीच नाही. हा आवाज मी जो पर्यंत लासूर स्टेशन येथे स्थायिक होतो तो पर्यंत..दररोज मी सकाळी गणपती मंदिरात दर्शनाला जायचो त्यावेळी नक्की कानी पडायचा. हा वंदे मातरम् जयघोष करताना मला बऱ्याचदा माझ्या गाडीला मागून किंवा पुढून कुणीतरी धडक देईल की काय याची खूप भीती वाटायची. पण प्रिय जालमसिंग भाऊ, यांच्या त्या प्रेमळ स्वभावाची आणि त्यांच्या दुकानातील स्वादिष्ट मिठाईची शक्ती होती की, असा प्रसंग कडवट प्रसंग अजुन पर्यंत घडला नाही.
यांच्या मिठाई भांडार चा मी हक्काचा गिऱ्हाईक..! अर्थात मी काही दररोजचा गिऱ्हाईक नव्हतो..पण जेंव्हा कधी मिठाई घ्यायची तेंव्हा यांच्याच दुकानातून..! नाहीतर नाहीच..! माणसानं कसं एकनिष्ठ असावं..कुणाशी तरी...हे मी यांच्यावरील माझ्या खाद्य संस्कृती च्या एकनिष्ठ प्रेमामुळेच शिकलो. माझ्या घरात माझे वडील वगळता आम्ही सर्वजण गोड पदार्थ खाण्याच्या बाबतीत जरा जास्तच उतावीळ आणि गोड खवय्ये..! मी लासूर स्टेशन येथील महावीर नगर येथे राहायचो. माझे घर ते यांचे मिठाई भांडार यातील अंतर अंदाजे दीड किलोमीटर. यदा कदाचित यांचे दुकान बंद असले तर मी किंवा माझा थोरला मुलगा नमन गेल्या पावली आम्ही परत यायचो. आम्ही जालमसिंग भाऊ यांच्या मिठाईशी बेइमानी ,विश्वासघात कधीच केला नव्हता. माणसानं कसं एकनिष्ठ असावं हे यांच्यातील त्याच गोडव्या मुळे शिकलो.
आता सध्या मी लासूर स्टेशन येथे राहत नाही.पण जेंव्हा कधी लासूर स्टेशन येथे जातो तेंव्हा जालमसिंग भाऊंच्या दुकानासमोरून गेलोच तर तोच जयघोष नक्की कानी पडतो...
" वंदे मातरम् गुरु देव..!"
मला माझ्या लासूर स्टेशन येथील वास्तव्याच्या कालावधीत मिठाई भांडार मधील खूप आवडलेला खूप गोड माणूस. विविध प्रसार माध्यमांद्वारे आम्ही आजही संपर्कात आहोत.
आज या खूप गोड स्वभावाच्या मित्राचा वाढदिवस आहे. मी जर लासूर स्टेशन येथे राहत असतो तर आज नक्कीच हक्काने काहीतरी मिठाई यांच्या कडून खायला घेतलीच असती.पण जाऊ द्या..! याची भरपाई जेंव्हा कधी माझी लासूर स्टेशन येथे भेट होईल तेंव्हा मिठाईवर मिठाई मोफत या आकर्षक योजने अंतर्गत नक्की घेईल..!
प्रिय जालमसिंग राजपुत भाऊ, आपणास जन्मदिनानिमित्त, जिलेबी ,इम्रती,तऱ्हेतऱ्हेचे पेढे, सडपातळ आणि लठ्ठ असलेले गुलाब जामुन,चंचल स्वभावाचे कलाकंद , अजुन ज्यांचे नाव माहीत नाही पण ज्यांना पाहून जिभेला लई पाणी सुटते अशा अनेकानेक मिठाई सारख्या गोड गोड शुभेच्छा..!😋 😊
वंदे मातरम्..!
शूभेच्छूक लेखक, व गोड पदार्थांवर निस्सीम प्रेम करणारा:
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २ फेब्रुवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा