आमचे गाव आमची माणसं
" जेंव्हा आम्ही शाळेत होतो..! "
===============================
जेंव्हा आम्ही शाळेत होतो,बहुतेक जग मोठं होतं
जेंव्हा पारेश्वर मंदिराच्या गल्लीतून जायचो,रस्त्यावर काय..काय नव्हते
वाळेकर आप्पा तळत असलेली शेव व उत्तम काकांचे डाळीचे लाडू
आज या वस्तू कुठेही सहज मिळतात पण आप्पा व काकांची लज्जत त्यात नाही
बहुतेक वाटतंय जग खूप मोठं झालंय.
जेंव्हा आम्ही शाळेत होतो, संध्याकाळ खूप मोठी होती
अन् रात्र तर त्याहूनही खूप मोठी होती
असं म्हणतात की,रम्य सकाळ असते
पण आमच्यातील काहीजणांसाठी रम्य रात्र होती
रम्य त्या रात्री जागून आम्ही काढल्या
अनेक गमतीशीर आठवणी त्यात दडल्या
अभ्यास करत होतो रात्र..रात्रभर
गणेश वाणीच्या बकरीचे दूध चोरत होतो दररोज कपभर
त्या दुधाची सर देवादिकांच्या अमृतातही नाही
बहुतेक वाटतयं जग खूप मोठं झालंय
रम्य त्या रात्री जागत होत्या आमच्या आभ्यासिका
अन् कुणी कुणासाठी जीव धोक्यात घालून वाचविले होते एकमेका
आज असे वाचविणारे मित्र भेटत नाही बहुदा
बहुतेक वाटतयं जग खूप मोठं झालंय
जेंव्हा आम्ही शाळेत होतो,तेंव्हा आमची मैत्री खूप पक्की होती(अर्थात आजही आहे)
दोघा तिघांनी हिंडण, मित्रांच्या घरात थेट स्वयंपाक घरात जेवण करणं
हसणं,रडणं व भांडणही सोबत होतं
आज या सर्वांची खूप आठवण येते,कारण ............................
बहुतेक वाटतंय जग खूप मोठं झालंय
जेंव्हा आम्ही शाळेत होतो तेंव्हा खेळही वेगळेच होते
गावच्या वेशीबाहेर, पिंपळाखाली भोवरा, विटीदांडू इ. बरच काही
आता,इंटरनेट,फेसबुक, वॉट्स अॅप मधून वेळच मिळत नाही
बहुतेक वाटतंय जग खूप मोठं झालंय
सर्वच पळताहेत..काय..काय विसरताहेत
बरीच पत्र तर कधीचीच हरवलीयं
त्या गतकाळातील रम्य आठवणीत खूप काही दडलंय
आमच्या सर्वांचे स्मृतीगंध त्यात लपलेयं
आज आम्ही जरी प्रौढ झालो असलो तरी
त्या रम्य काळात जीवन आम्ही आमुचे आजही शोधतोय
बहुतेक वाटतंय जग खूप मोठं झालंय
आज संध्याकाळ होत नाही,दिवस सरतो,थेट रात्र होते
बहुतेक वेळ छोटी झालीयं
या मित्रांच्या त्या खोड्या नाहीश्या झाल्या
प्रौढपणाचं आयुष्य जगतांना सर्व आठवणी दाटून आल्या
बहुतेक वाटतंय जग खूप मोठं झालंय
गेले ते दिवस,राहिल्या त्या रम्य आठवणी
मी तर दररोज जगतोय त्या सर्व " आठवूनी "
आजही मी माझ्या बालमित्रात बालपण जगतोय
आयुष्यात कधी व्यथीत झालो तर त्यांच्या घरी जाऊन मनमोकळे करतोय
कधी रम्य आठवणी शोधत..तर कधी ह्रदयातील व्यथा मांडत
बहुतेक वाटतंय जग खूप मोठं झालंय
आजही आम्ही बालपण जगतोय
श्री.पारेश्र्वर विद्यालय,पालखेड इ.१० वी बॅच इ. स.१९९१-९२ सोबत हिंडतोय,स्नेहाने भांडतोही
हेच जगणं साठवतोय,पुढच्या पिढीला देण्यासाठी
बालमैत्रीचे ईश्वरी संस्कार या प्रौढपणाला खेळकर बनविण्यासाठी..!
आजकाल आयुष्य कमी झालंय असं म्हणतात
आपण सर्वजण ऐन आयुष्याच्या आलो अर्ध्यात
कोणाचं,काय कधी होईल याचा भरवसा नाही
म्हणून नम्र विनवणी करतो तुम्हा
आता खरंच विसरू नका राव एकमेका
आयुष्याच्या जबाबदारीने पार कधी..कधी थकून जातो
आठवणीत पुन्हा तोच गतकाळातील तुम्हा सोबतचा दिवस येतो
म्हणून मस्त जगा राव..एकमेकांना आठवत,सहाय्य करत
आज शपथ घ्या, त्या सर्व आठवणींची
नाही सोडणार साथ एकमेकांची
आता...आता मला वाटतंय जग खूप जवळ आलंय कारण...
तुम्हा सर्व वर्गमित्रांच्या सहवासात माझं ह्रदय भरून आलंय
तुमचा मित्र व एक तात्पुरता कवी : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
वंदे मातरम्..!
फेसबुकवर लिखाण दिनांक : २१ मार्च २०१८ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक : १९ फेब्रुवारी २०२०, बुधवार
ता.क.: सदरील कविता मी, दिनांक २१/१/२०१८ रोजी, आमची इ.१० वी च्या बॅच चे स्नेहमिलन च्या वेळी, पालखेड येथे सादर केली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा