चिंतन
" नट्टापट्टा..! "
=================================
एखाद्या लहान लेकराचा नट्टापट्टा करताना,आपल्या बालपणी आपल्याच आईनं ,आपला केलेला साजशृंगार आठवतो.
बालवयात कोणत्याही सौंदर्याचा तिळमात्र अहंकार नसतो. इथं असतो फक्त ईश्वराने दिलेल्या आनंदाचा ,आनंद व्यक्त करणे.याच बालवयात प्रत्येक बालकाला केलेला नट्टापट्टा ,हा थेट देवतेला समर्पित केलेला सौंदर्याचा भावप्रसाद असतो. आपल्या सारख्या अनेकानेक तरुण किंवा अगदी वार्धक्यातील स्री अन् पुरुषांना जो त्यांच्या पोकळ सौंदर्याचा अहंकार असतो ना, तो या लेकरांच्या नट्टापट्टा केलेल्या पवित्र अशा ईश्वरीय सौंदर्याच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या गर्वाचे हरण होते.
आमची ही भावना दीदी..!
आमची सख्खी शेजारी..! आमच्या घरी आली की, तिच्या बोबड्या बोलीत मला किंवा माझ्या पत्नीला म्हणते,
" नेल पॉलिश लावून द्या..!"
अन् मग मी किंवा माझी पत्नी या ईश्वराच्या नट्टापट्टा करण्याच्या कार्यात स्वतः ला झोकून देतो. आपल्याच गतकाळातील आपल्या आईने आपल्याला केलेल्या साजशृंगाराच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत..!
हे निरागस मन,आपल्याच भावविश्वात रमून आयुष्याला देखील रमायला भाग पाडते. या निरागस बालकांच्या अंतर्मनात त्या विधात्याने असं काही सौदर्य निर्माण केलेलं असतं की, आपल्या सारख्या असंख्य तथाकथित मोठ्या माणसांच बेगडी सौदर्य या बालकांच्या समोर सपशेल शरणागती पत्करतं.
आपल्या सारख्या वयाने मोठ्या असलेल्या असंख्य माणसांना , त्यांनी केलेल्या नट्टापट्टांचा खूप बेगडी अभिमान..!
मात्र मोठ्या माणसांचा, त्यात स्री अन् पुरुष दोघेही आले आत्मस्तुतीच्या मायाजालात अडकून एका वेगळ्याच मानसिक रोगाचे रुग्ण होऊन जगत असतो. ययातिला देखील त्याच्या पुरुषी सौंदर्याचा अन् देवयानीला देखील तिच्या पोकळ सौंदर्याचा अहंकार होता. मात्र दोघांच्याही सौंदर्याचा शेवट हा एकमेकांच्या नैराश्यपूर्ण आयुष्यातच झाला. आजही समाजात अनेकानेक ययाति अन् देवयानी आढळून येतात.
बालकांचं असं मोठ्या माणसांसारखं काहीही होत नसतं. बालकांचं असं मोठया माणसांसारखं नैराश्यपूर्ण का होत नसावं..?
तर बालकांच्या अंतर्मनात अन् बाह्य आयुष्यात निव्वळ निर्विकार भाव असतो..! असा निर्विकार भाव,जिथं जात,धर्म,रंग, हुशारी, सौंदर्य,संपत्ती इत्यादी अनेकांचा मोहपाश नसतो.
वरील सगळं काही कवटाळून बसतो आपण सर्व मोठी माणसं नैराश्याच्या गर्तेत जायला..!😊🙏
वंदे मातरम्...!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक : १२/४/२०२०, रविवार


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा