मला प्रवासात भेटलेली माणसं
" जो मदत करतो तो विठ्ठल...! "
==================================
आज दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी, गेल्या वर्षी " हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन अंतर्गत " लासूर स्टेशन येथील लासुरगाव रोड लगत लावलेलं एक कडुलिंबाच्या झाडाला सरळ करत होतो. ते झाड लई मोक्कार वाकडं झालेलं होतं..!काही माणसं व काही झाडं त्यांच्या लहानपणीच सरळ करावी लागतात..! नसता एकदा का...कवळ्यापणी वाढीत बाक पडला तर...तो बाक..आयुष्यभर वाकडाच राहतो..!
सोबतीला कुणीच नव्हतं..!काही " सुशिक्षित माणसं " ,दोन,चार, पाच इ. ..सल्ले देऊन त्या क्षणाचे माझे हेड मास्तर होऊन पुढे चालले होते..!😊
मी आपला त्या " सुशिक्षित माणसांना " कोणत्याही शब्दाने प्रत्युत्तर न देता फक्त मुक मौखिक व काही प्रमाणात नेत्राभिनयाने मुक प्रत्युत्तर देत होतो..! असो..
मी अगोदर एक बांबू बांधला होता..पण अजून उंची वाढविण्यासाठी त्यावर अजुन एक बांबू बांधायचा होता..!मला एकट्याला त्या बाक पडलेल्या झाडाला बांबू धरून दोरी बांधायला अडचण येत होती. पण...काय करणार मदत कुणाला मागावी..? त्या " सुशिक्षित माणसांना..?" छे.. छे..!ते तर मोफत सल्ला केंद्रातील सुशिक्षित सक्रिय सदस्य होते..!😊
इतक्यात...बहुदा कडुलिंबाच्या झाडाच्या देवाने माझे गाऱ्हाने ऐकले असावे..अन् तेवढ्यात लासूरगाव कडून भल्या सकाळी दाक्षायणी देवीच्या जत्रातून एक निव्वळ खेडवळ भला माणूस येताना दिसला..! मनात म्हणलं ,
" यांना कसं काय म्हणावं मदत करा म्हणून...?" कारण बरेच जण म्हणतात की,सुशिक्षितांना " मॅनर्स " असतात...अन् गावंढळ माणसांना नसतात..वगैरे..!त्या तथाकथित धाकापोटी मी काहीच मदत न मागायची ठरवली..!
पण काय आश्चर्य..!
तो खेडवळ भला माणूस लगबगीने माझ्याकडे आला...हातात बांबू घेतला..अन् मला म्हणाला..
" साहेब,तुम्ही फकस्त मला दोऱ्या कापून द्या..!"
त्या भल्या माणसाने मला " साहेब " म्हंटल्याबरोबर माझ्या व अनेक सुशिक्षितांच्या चांगली जमून थोबाडीत मारल्यासारखे झाले..! मी आपला त्या भल्या खेडवळ माणसाला तो जी..जी..मदत लागेल ती.. ती पुरवत होतो..! तो गावंढळ माणूस, व मी त्याच्या भाषेतील " साहेब " व माझ्या भाषेतील सुशिक्षित माणूस ,असे आम्ही दोघे मिळून त्या कडुलिंबाच्या झाडाला ताठ मानेने उभा राहायला लावले..!
तो खेडवळ माणूस एवढ्यावरच थांबला नाही ,तर मला नेहमी झाडाच्या कामात मदत करणारे तिर्थस्वरुप एरंडे पाटील बाबा यांच्याकडून कुऱ्हाड घेतली... काट्या तोडून आणल्या...झाडाला लावल्या..अन् मग तेंव्हा तो खेडवळ भला माणूस मला म्हणाला..
" साहेब, आता कुठ लई भारी झालं बघा..!"
त्या भल्या खेडवळ माणसाने मला " साहेब " म्हणल्यावर मी पुन्हा रस्त्यावर कुणी सुशिक्षित माणसं दिसतात का ते पाहू लागलो..!😂
शेवटी त्या खेडवळ,गावंढळ माणसाला मी, माझ्या घरी घेऊन गेलो,त्याचे माझ्या कुवतीनुसार योग्य आदरतिथ्य केले..आणि लासूर स्टेशन येथील बस स्थानकावर सोडले..!
आणि निरोप घेतला एका खेडवळ,गावंढळ भारतीय माणसाचा..निरोप घेताना आलिंगन दिले अन् म्हणालो
" खूप खूप धन्यवाद, विठ्ठल भाऊ..!"
त्या सद्गृहस्थाचे पूर्ण नाव अन् पत्ता होता विठ्ठल काशिनाथ बनसोड..!
रा. बोडखा, ता.खूल्ताबाद,जि.औरंगाबाद
त्या एका खेडवळ,गावंढळ माणसाला निरोप देतांना मला त्या भल्या माणसाने उद्देशून केलेला " साहेब " हा उल्लेख सारखा बोचत होता..! त्या भल्या माणसाने तो शब्द सहज ,निरागसपणे उच्चारला होता..! पण माझ्या दृष्टीने ती सणसणीत चपराक लगावली होती...आजच्या सुशिक्षितांच्या फक्त मोफत सल्ला केंद्र चालविणाऱ्यांच्या गालफडात...!
ताजा कलम : आजचे तथकाधित सुशिक्षित ,सुशिक्षित आहेत की,खेड्यातील खेडवळ,गावंढळ सुशिक्षित...? सुशिक्षतांची नेमकी व्याख्या काय असेल बरं..?
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १५ एप्रिल २०१८,



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा