" मला प्रवासात भेटलेली माणसं..!"
" ये...वडा...वडा..! कट लेट अमलेट..!समोसा..समोसा..!"
===================================
आज दिनांक २१ एप्रिल २०१९ रोजी कल्याण ते औरंगाबाद दरम्यान रेल्वेने प्रवास करताना ,त्या रेल्वेतून फिरणाऱ्या विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांना पाहून माझ्या अनुभवांच्या स्मृती जाग्या झाल्या..!
एखादं मध्यम किंवा मोठं रेल्वे स्टेशन आलं रे आलं की,
" ये...वडा...वडा..! कट लेट अमलेट..!समोसा..समोसा..!"
हे आपल्या नाकाला खाजविणारे स्वर किंवा अनुनासिक स्वरात म्हंटले जाणारे वाक्य नेहमी ऐकू येतात..! या बाबतीत मी जरा जास्तच अनुभवी आहे..! कारण तब्बल १८ वर्ष रेल्वे स्टेशन च्या गावाला लासूर स्टेशन येथे राहिलो अन् याच रेल्वेतून याच खाद्य पदार्थांचा प्रवासात वास घेत घेत प्रवास केला..!☺
बरं ही विक्रेते मंडळी, एखाद बऱ्यापैकी रेल्वे स्टेशन आलं रे आलं की, एखाद्या मोहळाच्या गरदार घसाला एखाद्याने दगड मारावा अन् लगेच त्याच मोहळाच्या माश्या उठून समोरच्यावर तुटून पडाव्यात अगदी तसाच प्रकार सुरू होतो..!☺ एका मागून एक हे खाद्य पदार्थ विक्रेते डब्यात घुसतात अन् मुद्दामहून प्रवाशांच्या तोंडाजवळ त्यातल्या त्यात नाका जवळ ,वडा,समोसा,शेव चिवडा इ.पदार्थ आणतात..! बरं,या खाद्य पदार्थांचा " सेंट " पण लई भारी येतो..! कसं काय येतो काय माहीत...? हा सेंट आल्या आल्या.. मग काय..! ज्यांच्या पोटात पशू पक्षी ओरडत असतात,ते लगेच तुटून पडतात..या शिकारीवर..!☺
जर एखादा चहा पिवय्या असेल तर तो आद्रक टाकलेल्या चहाचा एकच प्याला सुध्दा स्वतः च्या तोंडाला लावून गरम तृष्णा शांत करतो..! मी चहा पीत नाही पण बऱ्याच चहा पिताडांच्या प्रतिक्रिया अशा असतात की,त्यात प्रत्यक्ष अद्रक नसतेच..! फक्त तोंडी अद्रक टाकलेलं असतं..!☺
रेल्वेच्या प्रवासातील या खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी प्रवाश्यांचं एक मानसशास्त्र अचूक ओळखलेले आहे..! अन् ते म्हणजे रेल्वेत ,चिल्लर पार्टी दिसली की, यांच्या आवाजाचा डेसिबल अजुन वाढतो..! विशेष म्हणजे रेल्वे प्रवासातील महिलांना भगिनींना पाहून देखील,या खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या ,आवाजाला अजुन चेव येतो..! या विक्रेत्यांना पक्के माहीत आहे की, ही दोन्ही त्यांची हमखास गिऱ्हाईकं..! चिल्लर पार्टी अन् महिला भगिनींच्या सोबत असणारे पुरुष मंडळी,एवढ्या मोठ्या गर्दीत ,आपला आर्थिक पान उतारा करून घेणार नाहीत हे मानसशास्त्र अचूक यांनी हेरलेले आहे..!😊
ता.क.: ज्यांना कुणाला अशा खाद्य पदार्थांचा रेल्वेत सेंट आलेला नसेल त्यांनी आयुष्यात एकदा तरी रेल्वेने प्रवास करून स्वतः च्या नाकाला कृतार्थ करावे..!
ता.क. - लासूर स्टेशन येथील आमचे बरेच स्नेही स्वतः च्या नाकाला याच खाद्य पदार्थांच्या वासांच्या बाबतीत समृद्ध आहोत, कारण रेल्वे अन् आमचं अतूट नाते आहे..!☺
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक : २१ एप्रिल २०१९
प्रवास स्थळ: कल्याण ते औरंगाबाद, जनशताब्दी एक्स्प्रेस..!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा