चिंतन ©️
" आणि अखेर नियतीने मला बलुतेदार केलेच...!"😊🙏
==================================
मी पालखेड येथे शिक्षण घेत असताना माझे परम वंदनीय गुरू,आदरणीय भगत सर मला एकदा म्हणाले होते...
( मला सर, कधी मधी प्रेमाने नंदू तात्या म्हणायचे..!)
" नंदू तात्या, तू कुठं जरी गेला तरी बलुतेदारीची निदान कोणतीही एक तरी कला शिकून जवळ असू दे, कधीही कामं येईल..!"
आदरणीय भगत सरांनी तब्बल एकोणतीस वर्षापूर्वी मला केलेला उपदेश असा अन् या परिस्थितीत कामं येईल याची कल्पना देखील केली नव्हती..! परिस्थिती माणसाला सगळं सोंग करायला अन् तेच सोंग प्रत्यक्षात आणायला बाध्य करते हे कुठेतरी वाचलेलं होतं..! पण तेच वाचलेलं प्रत्यक्षात आमच्याच आयुष्यात घडेल याची खात्री नव्हती..! मी माझ्या एका लेखात जसं लिहिलं होतं की,
" प्रत्येकात दादा कोंडके लपलेला असतो..!"
अगदी तसंच " प्रत्येकात निदान एकतरी बलुतेदार लपलेला असतोच, फक्त वेळ अन् प्रसंग यानुसार तो जागृत होत असतो.....! "
अखेर नियतीने लॉक डाऊन मुळे आम्हाला बलुतेदार केलेच..! 🙏😊 अर्थात पूर्णपणे टक्कल न करता यथायोग्य जमेल तशी बलुतेदारी कामी आली..! याच बलुतेदारीचा प्रयोग मी, माझे तीर्थरूप वडिल, माझे दोन्ही मुलं यांच्यावर बऱ्यापैकी करू लागलो आहे.माझे तीर्थरूप वडील तर ,त्यांची या लॉकडाऊन काळात मी केलेल्या प्रत्येक कटिंगच्या वेळी मला माझ्या या बलुतेदारीचे मोल म्हणून योग्य तो मोबदला देखील देत आहेत. अर्थात माझ्या बलुतेदारीचा माझ्या तीर्थरूप वडिलांनी मला दिलेला मोबदला मी श्रद्धेने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजनाला ठेवणार,कारण त्यांनी दिलेला मोबदला हीच खरी लक्ष्मी असे माझे वैयक्तिक मत आहे. वास्तविक मी, माझ्या वडीलांकडून त्यांची कटिंग केल्यावर ,त्या कटिंगचा मोबदला घ्यायला नकार देतो पण माझे वडील प्रत्येकवेळी मी त्यांची कटिंग केल्यावर म्हणतात..
" तुला एवढी भारी कटिंग कशी जमते..? आपल्या पालखेड गावातील माणिक अनर्थे अन् लासूर स्टेशन येथील राजू भाऊ तुपे यांच्या सारखीच करतो, एकदम मापात..! त्यामुळं राहू दे, नाही म्हणुच नको..!"
माझ्या वडिलांची कौतुकाची थाप मिळाल्यावर माझ्यातली बलुतेदारी अजुन धारदार होऊ पाहते.मी अशावेळी माझ्या वडिलांना म्हणतो की,
" दादा, हे सगळं भगत सरांनी ,आम्ही हायस्कूल मध्ये असताना आम्हाला सांगितल्याचा परिणाम आहे..!त्यावेळी भगत सर,एकदा मला म्हणाले होते की,
" नंदू तात्या, तू कुठं जरी गेला तरी बलुतेदारीची निदान कोणतीही एक तरी कला शिकून जवळ असू दे, कधीही कामं येईल..!"
आज , भगत सरांनी त्याकाळी केलेला बहुमोल उपदेश या लॉकडाऊन काळात कामी येत आहे. खूप खूप धन्यवाद आदरणीय भगत सर, तुमचा उपदेश माझ्या आयुष्यात असाही कामी आला..!🙏
माझी पंच्चेशाळीशी ओलांडली तरी आजही मला माझ्या तीर्थरूप वडिलांचा खूप धाक वाटतो. वडिलांची कटिंग चुकली तर रागावतील की काय याची भीती वाटते. तीर्थरूप वडिलांची कटिंग करायला मी ज्यावेळी सुरुवात करतो, त्यापूर्वी मी आसपास माझा थोरला मुलगा अन् धाकटा मुलगा यांना उभे करतो. त्याचं कारण, माझी मुलं माझ्या तीर्थरूप वडिलांची खूप जिवलग मित्र आहेत. जरी यदा कदाचित कटिंग करताना माझ्याकडून काही कमी जास्त झालेच तर, माझे तीर्थरूप वडील मला रागावणार नाही, कारण त्यांच्या जवळ त्यांचे खूप जिवलग मित्र उभे आहेत म्हणून..! आणि माझे हे व्यावसायिक मानसशास्त्र उपयोगी पडून त्यात यश मिळत आहे.😊
या लॉक डाऊन काळात माझी कटिंग माझा मोठा मुलगा किंवा माझी पत्नी करत आहे. मी त्यांना म्हणालो..
" अरे, घ्या शिकून बलुतेदारी, कधी पण कामं येईल..! "
ता.क.- हा कोरोना भाऊ, माणसाला अजुन काय काय करायला लावील ,हे त्याच नियतीला माहीत..!😔
वंदे मातरम्..!
एक बलुतेदार : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : २६/४/२०२०, रविवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा