=====================
माधुरीचे वडील शेतातून नुकतेच घरी आले होते.आई आजारी असल्याने घरचा स्वयंपाक , आईची सेवा अन् मग अभ्यास माधुरीची ही दिनचर्या दररोज सुरू होती.माधुरी आपल्या बापाला ' आण्णा ' म्हणत असे.आण्णा शेतातून आल्या आल्या माधुरीला म्हणाले...
" माधुरी, तुझ्या आईची तब्येत बरी हाय का ग आता..?
आज जेवण केलं होतं का तिनं..?
औषधं घेतले ना बरोबर टायमाला..?"
अशा अनेक प्रश्नातून आपल्या बापाची आपल्या आईवर जीव आहे याची जाणीव माधुरीला झाली होती.
माधुरी म्हणाली.." आता आईची तब्येत ठीक आहे.फक्त थोडासा अशक्तपणा आहे. थोडं थोडं जेवण करू लागली आहे.पण आण्णा तुम्ही काहीच काळजी करू नका.मी आहे ना..! तुम्ही आईच्या दुखण्याचे टेन्शन घेऊ नका..!"
आपल्या लेकीचे हे वाक्य ऐकल्या ऐकल्या आण्णांच्या डोळ्यात पाणी आले.
आण्णा म्हणाले..
" पोरी, तू लई समजूतदार हायेस. परवा तुला पहायला पाहुणे येणार आहेत.घरदार आवरून सावरून ठेव..!"
हे ऐकल्या ऐकल्या माधुरीला आपल्या आण्णांची त्यांच्या लेकीच्या लग्नाची चिंता अन् जबाबदारी याची जाणीव झाली होती. कॉलेज चे शिक्षण पूर्ण होऊन दोन वर्षे पूर्ण झाले होते.आपल्या बापाला आपल्या लग्नाच्या जबाबदारीची जाणीव माधुरीला झाली होती.शेतात राब राब राबून कमी येणारं पीक, त्यात ऐनवेळी येणारे नैसर्गिक संकट , त्यामुळं होणारे पिकांचे नुकसान यामुळे आपले आण्णा खूप खचून गेल्या सारखे दिसत होते.आपले कधी ना कधी तरी लग्न होणार, मात्र एका वधू पित्याला देखील मन असते, एका वधू पित्याला देखील हौसमौज करावी वाटते ,पण तो वधू पिता , आपल्या कित्येक हौसमौज विसरून आपल्या लेकीच्या लग्नाची तयारी त्याचं नियोजन यायचं आपलं आयुष्य वेचत वेचत जगत असतो.
वधू पित्याला देखील भावना असतात, व्यथा असतात, फक्त त्या व्यक्त होत नसतात. माधुरीला आपल्या आण्णांकडे बघून एका वधू पित्याच्या व्यथा जाणवल्या अन् मनातल्या मनात त्या व्यथांच्या विचारांचे चक्र सुरु झाले.माधुरी आपल्या आण्णांकडे दुरून बघत बघत वधू पित्याच्या व्यथा आपल्या अंतर्मनात व्यक्त करू लागली....
सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे.प्रत्येक विवाहस्थळी एक वधू पिता हा येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करण्यात मग्न झालेला दिसत असतो.मी बऱ्याच वेळा असे निरीक्षण करून पाहिले आहे की, त्या विवाह प्रसंगी सगळे नवे नवे कपडे घालून मिरवत असतात. मात्र जो वधू पिता असतो तो पार मुख्य विवाह विधी होण्याच्या वेळेपूर्वी स्वतः ला नव्या कपड्यात सजवून घेत असतो. किंवा जरी अगोदर नवे कपडे परिधान केलेच तर ते कधी पार मळून जातात याचे भान देखील त्या वधू पित्याला नसते.
काय असेल बरं याचे कारण...?
माझ्या मते हा तोच बाप असतो जो आपल्या मुलीच्या विवाह प्रसंगी सगळ्यांची सर्व सरबराई करण्यात स्वतच्या अस्तित्वालाच पार विसरून गेलेला असतो. अगदी स्वतच्या होणाऱ्या तब्येतीची हेळसांड सुध्दा..! मग नवे कपडे अंगावर परिधान करण्याची कृती तर फार क्षुल्लक ठरते अशावेळी..!
लग्न मंडपात वधू पित्याची नजर आलेल्या पाहुण्यांना सतत काय हवं काय नको याच प्रश्नांचे उत्तर शोधण्यात मग्न झालेली असते. त्या वधू पित्याची नजर स्वतच्या अस्तित्वाला न पाहता फक्त आणि फक्त येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांकडेच पाहत असते. त्या नजरेत जर आपण भावुकतेने निरीक्षण करून पाहिल्यावर असे लक्षात येईल की, त्या प्रत्येकाच्या काळजी घेणाऱ्या नजरेत लग्नाच्या शेवटी होणाऱ्या एका बापाची व त्याच्या लाडक्या लेकीची होणारी ताटातूट त्या वधू पित्याला कासावीस करत असते.
मित्रानो, माझ्या मते एक बाप व त्याच्या मुलीचे जेवढे नाते घट्ट असते तेवढे फक्त आई व आपल्या मुलाचेच असते. ज्यावेळी ती मुलगी सासरी निघून जाते त्यावेळी सर्वात जास्त कोण खचून जात असेल तर... तो बापच..! फक्त तो बाप हे भाव व्यक्त होऊ देत नाही इतकेच. तुम्ही प्रत्येक लग्नाच्या ठिकाणी निरीक्षण करा हाच तो बाप असतो जो सतत आलेल्या पाहुण्यांची सरबराई करण्यात झोकून देत असतो.मी ज्या..ज्या वेळी कुणाच्या लग्नाला जातो त्यावेळी मी पहिले दुरून का होईना , त्या वंदनीय बापाचे अंतर्मनात दर्शन घेत असतो.
बऱ्याच वेळा माझी हिम्मत देखील होत नाही ते दृश्य पाहण्यासाठी, ज्यावेळी एक मुलगी लग्नाच्या वेळी शेवटचा निरोप घेण्यासाठी आपल्या बापाकडे जाते. काय अवस्था असेल त्यावेळी त्या बापाची..? माझ्या मते एक श्वास दुसऱ्या श्वासापासून दूर होत असतो. फार गहिवरून येतं त्यावेळी..!
एक बाप अन् त्याची मुलगी,जेवढी नात्यानं एकमेकात घट्ट विणलेले असतात, तेवढं आत्मियतेेचं कदाचित दुसरंच एखादं नातं असेल. कोणत्याही बापाची मुलगी ही त्याचा स्वाभिमान असते अन् कोणत्याही मुलीसाठी तिचा बाप हा तिचा प्राण असतो. स्वाभिमानात माणूस स्वतः चे अस्तित्व शोधत असतो. या ओळी फक्त साहित्यातील शृंगार निर्माण करत नाहीत, तर बाप अन् त्याच्या मुलीच्या नात्याची खरी हीच एकमेव प्रेमळ व्याख्या आहे. कोणताही बाप,त्याच्या आयुष्यात विनम्रता हे मूल्य कुणाकडे पाहून शिकत असेल तर ते फक्त त्याच्या कन्येकडेच..! विनम्रता माणसाला जमिनीवर राहायला शिकवते. बापाच्या आयुष्यात विनम्रता मूल्याचे प्रेरणास्थान त्याची आपली कन्याच असते.
आपल्या लेकीचे लग्न झाल्यानंतर त्या वधू पित्याची जी कुणी आप्तेष्ट,मित्र मंडळी असतात त्यांनी आवर्जू .त्या वधू पित्या जवळ नक्कीच जायला हवे. वधू पित्याच्या जवळ जाऊन त्या बापाला खूप भावनिक आधार द्यायला हवा. कारण एक स्री जी वधू माता असते ती आपले दुःख ढसाढसा रडून मोकळं करत असते, पण .एक बाप असे करताना कचरत असतो. त्याचे कारण तो बाप स्वतच्या मनाला म्हणत असेल...
" मीच जर ढसाढसा रडत बसलो तर...माझ्यावर अवलंबून असलेल्यांना कोण सावरणार..?"
असे आत्मविचार आणून तो वधू पिता मनातल्या मनात आपल्या लेकीपासून झालेल्या विरहाला दमण करत असतो. अशा वेळी त्या वधू पित्याच्या आप्तेष्टांची विशेषकरून मित्रांची विशेष जबाबदारी बनते की ,त्या आपल्या मित्राला खूप मोठा भावनिक आधार देण्याची..!
लग्नाला गेल्यावर नवरा नवरीला शुभेच्छा द्या अथवा नका देऊ ; पण एका व्यक्तीला आवर्जुन भेटा ती व्यक्ती म्हणजे वधुपिता होय. भले लग्न कसेही झाले असेल पण " लग्न व जेवण" खुप छान झाले व तुमच्या मुलीचे कल्याण झाले " असे वधु पित्याला आवर्जून सांगा. हेच शब्द ऐकण्यासाठी वधू पित्याने आयुष्यभर कष्ट उपसलेले असतात.
मग...देणार ना असा भावनिक आधार वधू पित्याला..? हा अत्यंत भावनिक प्रश्न माधुरीने समस्त समाजव्यवस्थेला विचारला.🙏🏻
इतक्यात आण्णांनी आवाज दिला...
" पोरी , मी आता लासूर स्टेशनला जातो.काही किराणा सामान अन् काही कपडे घेऊन येतो. तुझ्या आईची काळजी घे..!"
आण्णांचा आवाज ऐकल्या ऐकल्या माधुरीचे विचारचक्र थांबले होते.माधुरीच्या डोळ्यात पाणी आले होते. एवढं काबाडकष्ट करून, स्वतःचे थकलेले शरीर विसरून आपले आण्णा आमची किती काळजी घेतात या विचाराने माधुरीचे डोळे पाणावले होते. आपल्या बापाला दूर सायकलवर जाताना बघून माधुरीने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती.एका देव माणसाला तिने आपल्या अंतर्मनातून वंदन केले अन् ईश्वराच्या अस्तित्वाला अनुभवले होते, आपल्या आण्णांच्या रूपातून..!
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव. ©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
माझ्या फेसबुक पेजवर लिखाण दिनांक: ६ मे २०१८
अन् माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक - ६ मे २०२०

अप्रतिम आणि वास्तव लेखन सर.
उत्तर द्याहटवावंदे मातरम्!