आमचे गाव आमची माणसं
" संयमित वर्तन असलेले आदरणीय म्हस्के सर..!"
==================================
परिस्थिती अन् जबाबदारी माणसाला संयमित वर्तन करायला शिकविते..! आमच्या पालखेड गावात याच सुवचणाला अनुसरून एक व्यक्तिमत्व आहे; अन् ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब कारभारी म्हस्के..!
( मुख्याध्यापक तथा प्र.केंद्रप्रमुख कें.प्रा.शा.महालगाव, ता. वैजापूर)
पिढीजात श्रीमंतीचा अजिबात वारसा न लाभलेल्या एका अतिशय सर्व सामान्य परिस्थिती असलेल्या कुटुंबात आदरणीय म्हस्के सरांचा जन्म झाला..! मात्र त्याच पिढीजात गरिबीला शिक्षणाचे हत्यार जोडून सरांनी आपल्या आयुष्यात स्थैर्य प्राप्त केले आहे.ज्यावेळी आदरणीय म्हस्के सरांच्या मातोश्री हयात होत्या ,त्यावेळी माझा खूप जिवलग बालमित्र तथा वर्गमित्र आण्णासाहेब कारभारी म्हस्के( सरांचा धाकटा भाऊ) याच्या बजाजनगर, औरंगाबाद येथील घरी त्यांना भेटायला अधून मधून जात असायचो. बाईंच्या ( सरांची , आण्णाची मातोश्री ) प्रत्येक भेटीत मी बाईंना आमच्या गावातल्या अनेक आठवणीत मुद्दामहून घेऊन जात असायचो..! विशेष म्हणजे तिर्थस्वरुप बाईंच्या मृत्यूच्या काही दिवसापूर्वीच मी आण्णासाहेब म्हस्के याच्या बजाजनगर येथील घरी बाईंना घरी भेटायला गेलो होतो. त्यावेळी बाईंनी आदरणीय बाळासाहेब म्हस्के यांनी किती खडतर परिस्थितीत शिक्षण घेतले ,यावर भरभरून बोलल्या होत्या..!
( तिर्थस्वरुप बाईंच्या त्या शेवटच्या भेटीवर मी एक लेख यापूर्वीच प्रकाशित केलेला आहे) बाईंचं त्यावेळी एक वाक्य माझ्या मनात खूप भावून गेले होते..! त्यावेळी तिर्थस्वरुप बाई म्हणाल्या होत्या -
"नंदु, मह्या बाळुनं लई गरिबीत शिक्षण घेतलं..! घरी काय बी कुणी शिकलेलं नसुन बी, त्यो, शिकला आण..आमच्या खानदानीत कुणीतरी पहिल्यांदा एवढं कुणीतरी शिकलं..!"
तिर्थस्वरुप बाईंचं हे वाक्य त्या अनेकानेक मातांचे प्रतिनिधित्व करणारे होते,ज्यांच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य असूनही ज्यांची मूलं शिकली आहेत..!
आमचा खूप जिवलग बालमित्र आण्णासाहेब कारभारी म्हस्के सह ,पालखेड येथील वास्तव्याच्या काळात विशेषकरून माध्यमिक वयाच्या कालखंडात आम्ही अनेक मित्र एकमेकांच्या घरी नेहमी जात असायचो..! अगदी थेट स्वयंपाक घरात..! त्यामुळं एकमेकांचा कौटुंबिक इतिहास हा खूप जवळून पाहता आला..!
आदरणीय म्हस्के सरांना शैक्षणिक प्रशासनातील अचूक नाडी माहीत आहे,कारण त्यांनी बरीच वर्षे पंचायत समिती वैजापूर येथे गट समन्वयक म्हणून यशस्वी काम केलेलं आहे..! आदरणीय म्हस्के सरांचा आदरयुक्त प्रेमळ धाक पहिल्यापासून आम्हा सर्व बालमित्रांना होता, आहे अन् नेहमी राहील..! सरांच्या बोलण्यात समयसूचकता अन् अचूक शब्दात व्यक्त करायचे उत्तम भाषिक कौशल्य आहे..! मराठी भाषेतील उत्कृष्ट सहज सुंदर अन् अगदी साधी वाक्य रचना त्यांच्या भाषणातून,बोलण्यातून जाणवत असते..! हाच गुण त्यांच्या धाकट्या भावात ,आण्णासाहेब म्हस्के याच्यात देखील आहे,फक्त आमच्या या बालमित्राचा हा भाषिक कौशल्याचा गुण आमच्या बालमित्रांच्या मैफीलीत विशेष दिसून येतो..!😊
आदरणीय म्हस्के सर,तुमचा आशीर्वाद नेहमी असू द्या..!🙏🌹
वंदे मातरम्...!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक : १३ मे २०२०, बुधवार.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा