सोमवार, ४ मे, २०२०

" संगीत एकच प्याला..!"



आमचे गाव आमची माणसं

" संगीत एकच प्याला..!"

==================================

आमच्या पालखेड गावात ऐंशीच्या दशकात आमच्या बालपणी राम गणेश गडकरी लिखित अजरामर संगीत नाटक,
' एकच प्याला ' हे नाटक झालेले आहे.

आम्ही त्यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी वयोगटातील  होतो. एकच प्याला या नाटकातील सुधाकर ची अजरामर भूमिका आमच्या कुटुंबाच्या जवळ जवळ तीन पिढ्यांपासून घरगुती स्नेही असलेल्या ' मुलमुले ' कुटुंबातील आदरणीय तुळशीदास पा.मुलमुले यांनी अतिशय उत्कृष्ट केली होती..! आणि सिंधूची अजरामर भूमिका आदरणीय अशोक भाऊ पा. वाणी यांनी केली होती.

संगीत एकच प्याला या नाटकाचा प्रयोग करण्याचे शिवधनुष्य उचलणे सोपी गोष्ट अजिबात नव्हती.मात्र कला आमच्या पालखेड गावातील माणसांच्या रक्तात असल्याने " रोकडिया हनुमान नाट्य पार्टी ने हे शिवधनुष्य उचलले होते. नुसते  या नाटकाचे प्रयोग करण्याचे शिवधनुष्य उचलले नव्हते,तर एकच प्याला हे संगीत नाटक एक यशस्वी नाट्यप्रयोग म्हणून आमच्या पालखेड गावातील नाट्य इतिहासात नोंदविल्या गेलेले आहे..!

या नाटकाच्या रंगीत तालीमी बऱ्याच दिवस दररोज रात्री सुरू होत्या.नाटक खूप मोठे अन् त्यात खूप नाट्यगीते असल्याने त्यांच्या तालमी खूप वेळा कराव्या लागल्या होत्या..! एकच प्याला या नाटकातील आदरणीय तुळशीदास भाऊ मुलमुले व  आदरणीय अशोक भाऊ वाणी यांनी जीव तोडून यात सुधाकर व सिंधूची अजरामर भूमिका केली होती.एकच प्याला या संगीत नाटकाचे वैशिष्ट्ये म्हणजे,यातील शास्त्रीय संगीत..!

एकच प्याला या नाटकातील सुधाकरची दारूच्या व्यसनाने होणारी  राखरांगोळी अन् सुधाकरची पत्नी सिंधूची होणारी ससेहोलपट  हे पाहून आजही मन खूप दुःखी होते..!😔

एकच प्याला हे संगीत नाटक अभिनय अन् संगीतबद्ध करण्याच्या दृष्टीने एवढे कठीण नाटक होते की,त्या एकमेव नाट्य प्रयोगानंतर पुन्हा या नाटकाचा नाट्य प्रयोग करण्याचे धाडस  आमच्या पालखेड गावात कोणत्याही नाटक पार्टीने केलेच नाही..!

ऐंशीच्या दशकात ,आमच्या पालखेड गावात साजऱ्या झालेल्या या ऐतिहासिक नाट्य प्रयोगातील सर्व कलाकारांना एका अर्धवट वादकाकडून विनम्र वंदन..!

वंदे मातरम्...!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक : ४/५/२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा