" आमचे गाव , आमची माणसं..!"
विजय वैजिनाथ गायकवाड, माझ्या आयुष्याचा साक्षीदार..!
======================================
विजय हे नाव ऐकल्याबरोबर विजुचे आम्ही बालमित्र सोडून त्याच्या इतर मित्रांना मुकुल आनंद दिग्दर्शित " अग्निपथ " चित्रपटातील विजय दीनानाथ चव्हाण या व्यक्तिरेखेतील " काही गुणांचा " पदोपदी अनुभव येत असेल..!अर्थात आम्हा बालमित्रांनाही विजू मधील " विजय दीनानाथ चव्हाण " म्हणून भेट झाल्यावर कधी..कधी अनुभव येतो..! विजू मध्ये " विजय दीनानाथ चव्हाण " या व्यक्तिरेखेतील काही गुणवैशिष्ट्ये उतरली आहे..जसे..आक्रमकता,निर्भिडता, रूबाब,स्वतःचे विश्व स्वतः उभारणे,हे विश्व उभारतांना आप्तस्वकीयांना संरक्षण,सेवा व समर्पण निर्विकारपणे पुरविणे हे विजूने " विजय दिनानाथ चव्हाण " च्या व्यक्तिरेखेतील गुणांसारखे गुण आजतागायत जपलेले आहे..!
विजय दिनानाथ चव्हाण ने आपले ध्येय साध्य करण्यासाठी खूप गोष्टींचा ,मोहपाशांचा त्याग केला होता,अगदी विजूनेही तसाच त्याग केलेला आहे..!आपली भावंडे,त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात स्थिर होऊन यशस्वी होण्यामध्ये विजुचा हा त्याग मी पाहिलेला आहे..!काहीजण त्याच्या त्यागाकडे दुर्लक्ष करतात.कदाचित विजूच्या आक्रमक स्वभावामुळे त्याचा त्याग जाणवत नसेल..! किंवा अशी आक्रमक माणसं कशाची त्याग करतात..?या मनोवृत्तीमूळे काहींना तो लक्षात येत नसेल...बहुधा..!मुळात कमालीची आक्रमकअसलेली माणसं भावनेच्या बाबतीत कमालीची भावूकही असतात..! विजू,दार्शनिक अंगाने जरी आक्रमक दिसत असला तरी तो भावनेच्या बाबतीत अंतर्मुख होणारा माणूस आहे..!
एखादी व्यक्ती,लेखक,चित्रपट,चित्रपटातील व्यक्तिरेखा,इ.अनेक बाबतीत विजूने त्याची भावुकता जपलेली आहे.मग व.पू. काळेंचे लेखन असो,अभिनेत्री रेखाचे सौंदर्य असो, ओशोंचे विचार असो,अथवा शक्ती सामंत दिग्दर्शित " शक्ती " हा हिंदी चित्रपट असो या सर्वांवर विजूने स्वतपेक्षा काकणभर जास्त प्रेम केले आहे..!
हा माझा बालमैत्रीचा त्याच्या सोबतचा असलेला सजीव अनुभव सांगतो..! माझ्या आयुष्यात बालमित्रांनी मला खूप काही भरभरून दिले आहे..! विशेषतः डॉ.गणेश वाणी,डॉ.संजय राऊत,आण्णासाहेब म्हस्के व विजू..आणि हे आमचे सर्व बालमित्र जाणतात..!इतरही मित्रांचे माझ्या आयुष्यात खूप योगदान आहे.कोंदणात गोंदून ठेवावे असे हे बालमित्र..!
मी,सार्वजनिकरीत्या सांगू इच्छितो की, या मित्रांनी माझ्या घरात कायमचे जरी वास्तव्य केले तरी तो माझा आयुष्याचा कृतार्थाने भरलेला सर्वार्थ असेल..! वास्तविक विजू व माझ्यात बऱ्याच बाबतीत विचारधारा भिन्न आहेत.पण त्या जिथे जुळलेल्या आहेत,त्यावर आम्ही दोघांनीही भरभरून प्रेम केले आहे व करत राहणार..! प्रिय बालमित्र विजू,माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाचा साक्षीदार आहे..!
आमचा बालमित्र विष्णु एकनाथराव पगार (ह.मु.औरंगाबाद)आम्हाला
" दोन ध्रुव " म्हणतो..!तरी देखील आम्ही खूप जिवलग मित्र आहोत..!
" विजय गायकवाड " हे पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक नामांकित नाव आहे..!
विजू तुला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
वंदे मातरम्..!
ता.क. मित्र फक्त कौतुकी नसावेत,तर एकमेकांचे गुणदोष दाखविणारे असावेत.तसेच भिन्न विचारधारा असूनही जुळणाऱ्या धारांवर नितांत प्रेम करणारे असावेत.. दोन्ही बाजूंनी..!
उदा.विजू व माझ्यासारखे..!
लेखक व विजुचा बालमित्र: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दि.३ ऑगस्ट २०१७



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा