मला प्रवासात भेटलेली माणसं..!
आम्हा तत्कालीन शिक्षकांचे मामा - मेंढे मामा..!
=============================
माझी शिक्षक म्हणून प्रथम नेमणूक आमच्याच वैजापूर तालुक्यातील लासुरगाव केंद्रात जळगाव येथे जून १९९५ मध्ये झाली होती. सर्व भौगोलिक परिसर आसपासचा असल्याने केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांशी हळूहळू परिचय होत गेला.लासुरगाव केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांशी परिचय होणं विशेष काही नव्हतं, कारण शिक्षकांशी शैक्षणिक कारणांनी , भेटींनी ते मैत्रीचे संबंध निर्माण होणारच होते..! मात्र माझ्या लासुरगाव केंद्रातील तब्बल सोळा वर्षांच्या सुखाच्या कारकिर्दीत अशी दोन माणसं माझ्या आयुष्यात बिगर शिक्षक म्हणून आली, ज्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण माझ्या वैयक्तिक आयुष्यात अन् तत्कालीन लासुरगाव केंद्रातील काही शिक्षक मित्रांच्या आयुष्यात अजरामर होऊन गेलेला आहे.त्या दोन बिगर शिक्षक म्हणून आमच्या आयुष्यात आलेल्या दोन ग्रेट माणसांपैकी एक होता, तत्कालीन लासुरगाव केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांचा आम्हा सर्वांचा प्रिय मित्र स्वर्गीय मनोहर काळे आणि दुसरे ग्रेट व्यक्तिमत्व आहे, आम्हा तत्कालीन शिक्षकांचे प्रिय मित्र तीर्थरूप - मेंढे मामा..!
या दोघांपैकी प्रिय सखा स्वर्गीय मनोहर काळे याच्या आणि माझ्या नात्यावर आधारित एक लेख यापूर्वीच "मला प्रवासात भेटलेली माणसं " या सदराखाली लिहून माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केलेला आहे. आज या दोघांपैकी आदरणीय मेंढे मामा यांच्याविषयी व्यक्त होतोय..!
जून १९९५ मध्ये नोकरीला लागलो तेंव्हा आम्ही काही नवीन शिक्षक , इतरांच्या तुलनेत वयाने अगदी कोवळे होतो.जून १९९५ मध्ये आणि त्यानंतर नोव्हेंबर १९९५ मध्ये माझ्यामते संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच खूप मोठ्या प्रमाणात अगदी तरुण ,नवीन शिक्षकाची नवीन भरती करण्यात आली होती. अधून मधून केंद्रीय शाळा लासुरगाव येथे प्रशासकीय कामानिमित्त जाणं येणं व्हायचे. मी तिथं कधीही आलो की, धोतर सदरा आणि टोपी घातलेली एक ज्येष्ठ व्यक्ती नेहमी शाळा सुरू असल्यावर शाळा समोरील लिंबाच्या झाडाखाली नाहीतर व्हरांड्यात नाहीतर तत्कालीन आमचे केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय अभंग सर, स्व.आदरणीय सावळे सरांच्या सोबत मुख्याध्यापक कक्षात बसलेली दिसायची.मला अगदी सुरुवातीला वाटलं, आपल्याच केंद्रातील एखादे जेष्ठ शिक्षक असतील.एक दिवस स्वर्गीय सावळे सरांना त्या व्यक्तीकडे पाहून विचारलेच ,
" का, हो सावळे सर, हे सर कोणत्या शाळेत आहे..?"
या माझ्या प्रश्नांवर स्वर्गीय सावळे सर हसून मला म्हणाले..
" अरे, नंदन, हे शिक्षक नाही, आपल्या सर्व शिक्षकांचे मामा आहेत, यांचं नाव, मेंढे मामा..!
एखाद्या व्यक्तीचं, सर्व वयोगटातील माणसांशी मैत्रीचं नातं कसं नितांत सुंदर आणि निरपेक्ष असतं, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आम्हा तत्कालीन सर्व शिक्षकांचे मामा, मेंढे मामा..! शिक्षकांचे शिक्षकांशी मैत्रीचे नाते निर्माण होणे ,त्यात विशेष काहीच नाही,पण शिक्षकाचे एखाद्या बिगर शिक्षकांशी किंवा बिगर नोकरदाराशी निव्वळ प्रेमळ मैत्रीचे नाते निर्माण होणे अतिशय दुर्लभ..! त्याच अतिशय दुर्लभ नात्याच्या बाबतीत नव्वदच्या दशकातील तत्कालीन लासुरगाव केंद्रांतर्गत आम्ही काही शिक्षक खूप खूप नशीबवान ठरलो..! नियतीने असे दोन गोड मित्र आम्हा तत्कालीन सर्व शिक्षकांच्या आयुष्यात दिले त्यापैकी एक स्वर्गीय मनोहर काळे आणि तिर्थस्वरूप मेंढे मामा..!
लक्ष्मणराव मेंढे पाटील उपाख्य मेंढे मामा..!
राहणार - हडस पिंपळगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद.
मैत्रीला वय नसते, अन् जर त्या मैत्रीच्या आड वय आले तर ती मैत्री असूच शकत नाही..! मेंढे मामा ,वास्तविक आमच्या वडिलांच्या वयाचे; पण त्यांचं जेष्ठ वय आणि आम्हा तत्कालीन सर्व शिक्षकांचे वय यात कधीही अंतर असे जाणवलेच नाही..! मेंढे मामा आणि आम्ही तत्कालीन सर्व शिक्षकांच्या नात्यात एक प्रचंड ओढ निर्माण झाली होती..! तत्कालीन लासुरगाव केंद्रांतर्गत कोणताही शैक्षणिक कार्यक्रम असो, मेंढे मामा ,आमच्यापैकी कोणत्याही शिक्षकाच्या सोबत दुचाकीवर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे.तत्कालीन तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनाही आमच्यातील आणि मेंढे मामातील निख्खळ प्रेमाच्या नात्याची जाणीव होती..! मुळात मेंढे मामा, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते त्यामुळेच त्यांच्यातील अन् आमच्यातील अनौपचारिक मैत्रीच्या नात्याला आमच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी, गावकऱ्यांनी त्याच सन्मानाने आणि निख्खळ मैत्रीच्या नात्यात पहिले..! हेच आमच्या अन् तीर्थस्वरुप मेंढे मामातील निख्खळ प्रेमळ नात्याच्या यशाचे गमक होते अन् आहे..!
इ. स.१९९९ मधील दिवाळीच्या सुट्टीत आम्ही तत्कालीन लासुरगाव केंद्रांतर्गत असलेले मी स्वतः ,सर्वजण आदरणीय शेषराव गंडे सर, दिलीपराव शेलार सर, ज्ञानेश्वरराव घोडके सर, ठोकळ सर, वाघुर्डे सर, दत्तू मालकर, इत्यादी लासूर स्टेशन येथून रेल्वेने तिरुपती बालाजी येथे जाण्याचे नियोजन केले होते.त्या प्रवासात देखील फक्त आणि फक्त मेंढे मामा आणि आमच्यातील निख्खळ प्रेमाच्या नात्यातील मैत्रीमूळे मेंढे मामा देखील आमच्या सोबत होते.माझ्यामते एखाद्या दूरच्या ठिकाणी अन् तेही धार्मिक कार्यासाठी केलेलं पर्यटन, मामांच्या आयुष्यातील तेच एकमेव असावं..!
लासूर स्टेशन ते तिरुपती बालाजी , तिथला मुक्काम, परतीचा प्रवास हा आम्हा सर्वांच्या आयुष्यातील सदैव स्मरणात राहणारा प्रवास..! विशेषकरून तिरुपती हून तिरुमला येथे मुक्कामी जाण्याचे नियोजन आणि तेथील मुक्कामाच्या आठवणी..!😊🙏
( कृपया तिरुमला येथील मुक्कामाच्या रात्रीच्या आठवणी कुणीही विचारण्याचा प्रेमळ अट्टाहास करू नये, नसता ऐन मध्यरात्री रूम सोडून बाहेर व्हावे लागेल..!😊🙏)
मेंढे मामा अन् आम्ही तत्कालीन लासुरगाव केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांच्या नात्यात एवढा जिव्हाळा होता की, मामा आमच्या सोबत शिक्षक अधिवेशनाला देखील आले होते..! आमच्या शिवाय मेंढे मामा अन् मेंढे मामा शिवाय आम्ही तत्कालीन काही शिक्षक याची कुणी कल्पनाच करू शकत नाही..! मेंढे मामा यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ..! त्यांच्या त्याच प्रेमळ स्वभावाची जादू होती अन् आहे की,आजही आम्हा काही शिक्षकांच्या आयुष्यात मेंढे मामा यांचे प्रेमाचे अन् मैत्रीचे स्थान अढळ ध्रुव ताऱ्या सारखे आहे..!
मेंढे मामा अन् आमच्यात मैत्री निर्माण व्हायचे एक सर्वात मुख्य कारण होते अन् ते म्हणजे आमच्यात अन् मेंढे मामा मध्ये असलेले निव्वळ अनौपचारिक नाते संबंध..!आमच्या अन् मेंढे मामांच्या मध्ये वयाचा संबंध कधी आलाच नाही. आयुष्यातील अगदी पौगंडावस्था, तारुण्य, म्हातारपण या टप्प्यातील गप्पांचा फड मेंढे मामा यांच्याशी रंगीबेरंरंगात रंगायचा..! अर्थात आजही भेट झाल्यावर नक्कीच तोच गप्पांचा फड नक्कीच रंगतो..! आमच्यातील अन् मेंढे मामांच्या मधील नाते इतके अनौपचारिक होते की, मेंढे मामांनी अन् आम्ही तत्कालीन काही शिक्षकांनी एकमेकांना एकेरी नावाचा उल्लेख करून एकमेकांना उल्लेखित करायचो..! यात कधीही एकमेकांना कमीपणा जाणवला नाही,कारण त्यात निव्वळ बालमैत्रीचा सुगंध दरवळत असायचा..! असा सुगंध तेंव्हाच दरवळतो जेंव्हा त्या मैत्रीरुपी नात्याला निव्वळ अनौपचारिक नात्याचे पाणी दिलेले असते अन् मैत्रीच्या प्रेमाची बाग बहरलेली असते..! आमचे मैत्रीचे नाते ज्यांना माहीत नाही त्यांना हे ऐकून अन् वाचून आश्चर्य वाटेल..! त्याच निव्वळ प्रेमामुळे हे नातं खोलवर रुजलं..! कोणत्याही वयोगटातील जर मैत्रीचे नाते घट्ट रुजवयाचे असेल तर त्यात सर्व वयोगटातील गप्पांचा रंग असेल तरच ते घट्ट होते..!
आजही जेंव्हा कधी मेंढे मामा यांचे खूप चांगल्या स्वभावाचे सुपुत्र प्रिय मित्र अशोकराव पाटील मेंढे मला भेटतात, तेंव्हा माझ्या मुखातून तीर्थरूप मेंढे मामा यांच्या खुशालीची चौकशी आपसूकच होते. मी माझ्या गावाकडे गेलो तर मेंढे मामा यांची सहकुटुंब भेट देखील घेत असतो..! घरातील बाप माणूस भेटल्याचे आत्मिक समाधान मिळते..!
आज मेंढे मामा शरीराने थकले आहेत,पण मनाने आजही ताजे टवटवीत आहे.आजही त्यांच्याशी गप्पांचा फड रंगला की, तोच गोडवा जाणवतो.शेवटी माणूस, मनाने तरुण हवा, हे मेंढे मामा यांच्याकडे पाहून नक्कीच जाणवते..!
आम्ही तत्कालीन लासुरगाव केंद्रांतर्गत शिक्षक खूप नशीबवान ठरलो, कारण आमच्या आयुष्यात स्वर्गीय मनोहर काळे अन् तीर्थरूप मेंढे मामा सारखे बिगर शिक्षक असलेले सदा सर्वदा श्रेष्ठ मित्र आले..! आम्ही तत्कालीन लासुरगाव केंद्रांतर्गत शिक्षकांपैकी आज कुणी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे,कुणी पन्नाशीकडे जात आहे.या सरकारी आयुष्याच्या वाटचालीत आम्हा तत्कालीन लासुरगाव केंद्रांतर्गत शिक्षकांची कायमची उणीव असेल अन् ती म्हणजे पुन्हा कधीही अन् कुणीही स्वर्गीय मनोहर काळे अन् तीर्थरूप मेंढे मामा यांच्या सारखं बिगर शिक्षक असलेलं मैत्रीचं रोपटं पुन्हा आमच्या आयुष्यात निर्माण झालं नाही अन् होण्याची तिळमात्र शक्यता देखील नाही..! त्याचं कारणही तसंच आहे,शिक्षकांच्या सरकारी आयुष्यात कुणालाही पुन्हा स्वर्गीय मनोहर काळे लासुरगावकर अन् तीर्थरूप मेंढे हडस पिंपळगावकर पुन्हा भेटूच शकत नाही..!
त्यालाही नशीब लागते मित्रांनो..!🙏👬🌹
ता.क.- विठोबा सारख्या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाला , विठोबाची मूर्ती निव्वळ प्रेमाची भेट म्हणून दिलेली आहे..! त्यात फक्त आणि फक्त मैत्रीची श्रद्धा आहे..!❤️🙏
वंदे मातरम्..!
तीर्थरूप मेंढे मामांचा एक लेखक मित्र - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक - १४ एप्रिल २०२१, बुधवार.