चिंतन
" गेला तो उन्हाळा..अन्
राहिल्या त्या फक्त कडक आठवणी..! "
______________________________________
मागील महिन्यात एका भर दुपारी ऐन उन्हात काढलेलं हे माझे स्वयं छायाचित्र म्हणजे असं वाटतं मी लई गोरा..गोरापान आहे..! पण...तसे अजिबात नाही..! ही सगळी त्या सूर्य नारायणाच्या प्रकाशाची किमया आहे..! ज्याच्या प्रकाशात माझ्या सारखा निव्वळ काळा सावळा वर्ण असलेला माणूस सुध्दा उजळून निघाला आहे अन् असे
" भासतं " की मी लई गोरा गोमटा आहे.!
ज्या एका माजी अती उच्च पदस्थ पोलिस अधिकाऱ्याला त्याच्या ऐन जवानीतील, बलदंड असणाऱ्या पिळदार शरीरयष्टीचा खूप अभिमान वाटायचा.त्याच तारुण्यात तेच शरीर जेंव्हा अचानक उद्भवलेल्या गंभीर आजाराने ग्रस्त झाले..! ज्यावेळी जगाला नेहमी दाखविणाऱ्या सुंदर शरीराने जेंव्हा दगा दिला, तेंव्हा एकच सल मनात वाटू लागली की ,जे सुंदर शरीर मी जगाला नेहमी दाखवीत होतो..ते आता तसे अजिबात राहिले नाही..! आता ही कृश देहयष्टी कशी जगाला दाखवू..? आणि मग असा निर्णय घेतला की,प्रत्यक्षात असणाऱ्या शरीराचा या इहलोकातून कायमचा निरोप घेतला, आत्महत्या करून..!😔
एकदा सम्राट ययाति स्वतःला आरशात पाहत असताना ,त्याला त्याच्या डोक्यावरील एक पांढरा केस दिसला...अन् तिथेच त्या अमरत्व लाभलेल्या ययातिचा सुध्दा आपल्या सौंदर्याचा अहंकार एक..एक केस गळून अख्खे टक्कल पडावे तसा त्याचा स्वतच्या सौंदर्याचा अहंकार पार गळून पडला..!
जगाच्या चित्रपट सृष्टीत तर अशी कित्येक उदाहरणे आहेत,की ज्यांना आपल्या ऐन तारुण्याच्या आयुष्यातील सौंदर्याने पार अहंकाराच्या कळसावर चढविले..! पण जेंव्हा तेच शरीर निसर्ग नियमाने कृश व्हायला लागले..तेंव्हा हीच कृत्रिम सौंदर्याचा आविष्कार असलेली मंडळी आपले तोंड लपवत हिंडू लागली..!काहींनी तर आत्महत्या देखील केल्या आहेत..!
आपले शिवाजी भाऊ गायकवाड उपाख्य रजनीकांत महाराष्ट्रवाले ह.मु. तामिळनाडूवाले व नाना भाऊ पाटेकर महाराष्ट्रवाले यांचं मात्र असं काहीही नाही. कारण त्यांनी त्यांचे अस्सल रूप जगापासून कधीच लपविले नाही..! आहे तसे समोर आले आणि त्यांच्या आहे त्या रुपावर लोक किती प्रेम करतात हे सांगायला नकोच..!
कुणी कुणाच्या हयातीत असणाऱ्या सौंदर्यावर भाळून प्रेम करतं,तर कुणी कुणाच्या हयातीच्या पश्चात देखील जीव ओवाळून टाकावा असे निरागस प्रेम करत असतं..! माणसाला प्रेम ही ईश्वराची सर्वोत्तम भाव विश्वातील देणगी लाभलेली आहे. माणसाच्या आयुष्याचा प्रारंभ, त्याच्या आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर त्याची नाळ तुटल्यावर होतो, अगदी त्याच माणसाचा शेवट देखील विधात्याने दिलेल्या अंतिम वरदानाच्या रुपात, त्याच्या अंतिम श्वासाच्या पूर्णविरामाने मृत्युत होतो..! कुणी ,कुणाच्या मृत्यूची टिंगलटवाळी विकृत हास्यानं करतं तर कुणी कुणाच्या मृत्यूची श्रद्धेने पूजा देखील करतं..! हा ज्याच्या त्याच्या मानसिक प्रवृत्तीचा भाग असतो.मात्र हीच मानसिक प्रवृत्ती जेव्हा स्वतच्या मृत्यू वर जर इतरांनी विकृत हास्य करून प्रदर्शित केली तर..? इथेच तर खरी मेख आहे.माणूस, इतरांच्या वाईट दिवसांवर, मृत्यूवर विकृत हास्य करतो. मात्र त्याला निसर्गाकडून, इतर माणसांकडून अशी परतफेड नको असते..!
मृत्यू कुणाचाही असो,तो कुणाला तरी नक्कीच क्लेश देऊन जातो..! मी माझ्या आयुष्यातील ज्यांच्यावर सर्वोत्तम प्रेम केलं ते दोन मृत्यू पाहिलेले आहे, त्यामुळं कुणाचाही मृत्यू झाला की, खूप गहिवरून येतं,कारण प्रत्येक माणसाचा मृत्यू कुणाच्या तरी आयुष्याला पोरकं करून जातो..!😔
शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात....
" गेला तो उन्हाळा..अन् राहिल्या त्या फक्त कडक आठवणी..! " असंच झालेलं आहे अन् असंच होत राहणार..!🙏🏻
ता.क. - काही मृत्यूलाही ग्लॅमर असतं हेही तितकंच खरं आहे..! अन् काही मृत्यू अश्रू ढाळत असतात, आपल्या ग्लॅमर नसलेल्या आयुष्यावर..! 😔
वंदे मातरम्...!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक : ३०/४/२०२१, शुक्रवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा