#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
" पहिला शिक्षक मित्र - शाम भाऊ राजपूत "
===================================
माझ्या शिक्षकी आयुष्यातील सर्वात पहिला शिक्षक नेता अन् पहिला शिक्षक मित्र प्रिय शाम..! उपाख्य शाम भाऊ..!
माणसाच्या आयुष्याच्या रंगमंचावर पहिलं आलेलं काहीही असो ते भावूक माणसांच्या आयुष्यात चिरकाल स्मरणात सदैव टवटवीत असते. हा निकष मुर्दाड माणसांच्या बाबतीत लागू पडत नाही. कारण मुर्दाड मनाची माणसं आपल्या आयुष्यातील भेटलेल्या पहिल्या कोणत्याही गोष्टीना सहजपणे विसरून जातात. मात्र जी माणसं आपल्या आयुष्यातील सर्वात पाहिल्या कोणत्याही गोष्टीना खूप आत्मीयतेने लक्षात ठेवतात,हृदयात घर करून ठेवतात तीच माणसं पहिल्या भेटलेल्या प्रत्येक बाबींवर निस्सीम प्रेम करत असतात. जसं की,माझ्या शिक्षकी आयुष्यातील वाटेवर भेटलेला पहिला शिक्षक नेता अन् पहिला शिक्षक मित्र प्रिय शाम भाऊ..! तसे बघितले तर मी शिक्षक म्हणून नोकरीला लागण्यापूर्वी आदरणीय संजय जाधव पाटील उपाख्य बापू हे अगोदर भेटले होते,पण अधिकृत शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यावर पाहिला शिक्षक नेता मित्र म्हणून लाभला अन् ते म्हणजे प्रिय शाम भाऊ राजपूत..!
मी अन् शाम भाऊ तसे शिव भाऊ..! परसोडा गाव अन् त्या गावातील सर्व शिक्षकांनी माझ्या वडिलांवर खूप खूप प्रेम केलं. नव्हे.. नव्हे या गावातील सर्व शिक्षकांनी माझ्या वडिलांना खूप जीव लावला. तत्कालीन काळातील तीर्थस्वरुप फुलसिंग दादा राजपूत ( शाम भाऊचे वडील) , सुधा बापू धाडबळे, शिवाजी काका धाडबळे सर, रमेश काका धाडबळे सर..! त्यानंतरच्या पिढीत प्रिय राजू भाऊ कवडे सर, शाम भाऊ राजपूत,लक्ष्मीकांत धाडबळे उपाख्य कांतू आबा सर, सुनील धाडबळे सर..! या सर्वांच्या माझ्या तीर्थरूप वडिलांच्या प्रती असणाऱ्या ऋणानुबंधनातुन त्या नात्यात माझ्या कडून नेहमी आदराने पाहिल्या गेले. वरील उल्लेखित सर्वजणांचे फक्त मायेचं अन् आपुलकीचं ऋण मी कधीही फेडू शकत नाही हे शाश्वत सत्य आहे.या सर्वांनी माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांवर निस्सीम प्रेम केले. जे आपल्या आई वडिलांवर प्रेम करतात, त्यांच्यावर आपण निस्सीम प्रेम करावं या मताचा मी..!
शाम भाऊ अन् माझी नेमणूक सोबतचीच..! मला ज्या दिवशी शिक्षक पदाचा नेमणूक आदेश आला, त्याच दिवशी माझे स्व.वडील मला म्हणाले होते..
" तू जेंव्हा वैजापूर पंचायत समिती मध्ये जाशील तेव्हा शाम राजपूत नावाचा ,तुझ्याच वयाच्या आसपास असणाऱ्या नवीन नियुक्त शिक्षकाची भेट घे. मी फुलासिंग दादा राजपूत यांच्याशी बोललो आहे..!"
मी " बरं..!" म्हणून जून १९९५ मध्ये वैजापूर पंचायत समितीच्या कार्यालयात गेलो.तेंव्हा पहिल्यांदा शाम भाऊ राजपूत यांची भेट झाली. शाम भाऊ राजपूत सोबतच लक्ष्मीकांत धाडबळे उपाख्य कांतू आबा देखील होते.त्यावेळी कांतु आबाच्या हाताला काहीतरी जखम झालेली असल्याने पट्टी बांधून हजर व्हायला आलेले होते.आम्हाला साधारणतः सात दिवस दररोज उपस्थिती लावण्यासाठी पंचायत समिती वैजापूर कार्यालयात जावे लागत होते.अखेर आम्हा सर्वांना शिक्षक म्हणून अधिकृत नोकरीचे गाव मिळाले अन् आम्ही आमच्या नोकरीच्या गावी प्रथम नेमणूक आदेश घेऊन हजर झालो.
माझे तीर्थरूप वडिल भिवगाव , ता. वैजापूर येथे कार्यरत असताना बोर नदीला कधी पुर असला की, माझे वडील परसोडा ,ता.वैजापूर येथेच आदरणीय शिवाजी काका धाडबळे सर यांच्या घरी मुक्कामी थांबायचे. हक्काने जीव लावणारे समस्त परसोडाकर शिक्षक माझ्या तीर्थरूप वडिलांच्या आयुष्यात कायम शीर्षस्थानीच राहिले. आदरणीय फुलसिंग दादांचा एक भक्कम आधार होता माझ्या स्व. वडिलांना..!
ज्यादिवशी आदरणीय शिवाजी काका धाडबळे सर स्वर्गवासी झाले त्या दिवशी मी अन् माझे वडील परसोडा येथील शिवाजी काकांच्या शेतात गेलो होतो.ज्या शिक्षक मित्राचे सर्वोच्च स्थान माझ्या वडिलांच्या आयुष्यात होते, त्यांच्या अंत्यसंस्कार स्थळी गेल्यावर माझ्या वडिलांना अतिशय शोक अनावर झाला होता.तिथेच बाजूला शाम भाऊ राजपूत बसलेले होते.माझे वडील शाम भाऊ राजपूत यांच्या खांद्यावर डोके ठेवून खूप रडले होते.मी पहिल्यांदा माझ्या कणखर वडिलांना अश्रू ढाळतांना बघत होतो अन् समोर शाम भाऊ राजपूत माझ्या वडिलांचे सांत्वन करत होते.अश्रू ढाळत असताना विश्वासाने एखाद्याचा खांदा मिळावा लागतो अन् तो विश्वासू खांदा प्रिय शाम भाऊ राजपूत यांच्या रूपाने माझ्या तीर्थरूप वडिलांना त्या ठिकाणी मिळाला होता.मी तेंव्हा विचार केला की, शाम भाऊ राजपूत सारखा माणूस, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणून जाणवला होता.
काळाच्या ओघात जेंव्हा जेंव्हा शाम भाऊ राजपूत अन् माझ्या वडिलांची भेट व्हायची तेंव्हा तेंव्हा शाम भाऊ राजपूत कितीही गर्दीत , कामात असू द्या, माझ्या तीर्थरूप वडिलांचे दर्शन घायचेच..! हा संस्कार शाम भाऊंना जाणिवेतून आलेला होता. घरी आल्यावर माझे वडील मोठ्या अभिमानाने सांगायचे..
" फुलसिंग दादांचा पोरगा ,खूप आदर करतो, नेहमी त्याच्या सोबत रहा..!"
शाम भाऊ राजपूत यांनी त्यांच्या शिक्षकी आयुष्यात असे काही निष्ठावान शिक्षक मिळविले, ज्यांची निष्ठा इतर ठिकाणी दुर्मिळ प्रमाणात आढळते. हीच शाम भाऊ राजपूत यांची कमाई होती अन् आयुष्यभर राहील. बाकी यापेक्षा दुसरं काही अनमोल असूच शकत नाही अन् त्या श्रीमंतीचे हकदार प्रिय शाम भाऊ राजपूत नक्कीच आहेत.पद, प्रतिष्ठा अन् पैसा माणसाला बऱ्याचदा संकुचित करतो,पण शाम भाऊ राजपूत यांनी त्यांच्या निष्ठावान शिक्षक मित्रांसाठी या बाबी कोसोदुर ठेवल्या आहेत, यातच त्यांचं श्रेष्ठत्व आहे. माझा प्रिय बालमित्र शेख फारुख सर हा त्या अनेक निष्ठावान शिक्षक मित्रांपैकी एक आहे याचा मला अभिमान वाटतो..!
शाम भाऊ राजपूत यांचं आयुष्याच्या आनंदावर निस्सीम प्रेम आहे.सतत एकाच पठडीत न राहता, स्वतः साठी आवर्जून वेळ काढतात अन् मस्तपैकी आनंदाचे पर्यटन करतात.शाम भाऊ राजपूत यांचा मूळ बाज ग्रामीण असल्याने स्वतच्या गावावर निस्सीम प्रेम करणारा माणूस..!
माझा खूप जिवलग बालमित्र डॉ.संजय राऊत परसोडा येथेच वैद्यकीय सेवा करत असल्याने बऱ्याचदा तिथल्या कोणत्याही समाजाच्या लग्नाला निमंत्रण नसलेला पण बालमित्राच्या सोबत जाणे व्हायचे.जरी यदा कदाचित मी डॉ.संजय राऊत सोबत एखाद्या लग्नाला नसलो तर, शाम भाऊ राजपूत हमखास विचारायचे...
" डॉक्टर, नंदन का बरं आला नाही..?"
यात हक्काचे अन् निव्वळ मित्राचे नाते जाणवत असायचे.
असो, स्वतच्या कुटुंबावर, मित्रांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मित्राला ,प्रिय शाम भाऊ राजपूत यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹
एकच नम्र अपेक्षा व्यक्त करतो, जसे आहात तसेच रहा, मित्रांसाठी..! राहणारच हा विश्वास आहे..!
ता.क. - सदरील छायाचित्रात माझ्या सोबत प्रिय मित्र शाम भाऊ राजपूत अन् माझा खूप जिवलग बालमित्र डॉ.संजय राऊत आहेत. निमित्त होते, शाम भाऊ राजपूत यांच्या नातेवाईकाचे लग्न..!
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक -२३/९/२०२१, गुरुवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा