आमचे गाव आमची माणसं..!©️
" प्यूवर दुष्काळात आम्ही सोबत होतो..! "😊
==================================
मराठवाडा अन् दुष्काळ यांचं नातं, प्रियकर अन् प्रेयसी यांचं जसं नातं असतं अगदी तसंच आहे. दोघेही एकमेकांना जीवापाड जीव लावतात. याला निसर्ग कारणीभूत आहे की, राजकीय इच्छाशक्ती कारणीभूत आहे की अजुन कुणी, यावर ज्यानं त्यानं आपापल्या सोयीने काथ्याकूट करावा..! कितीही काथ्याकूट केला तरी एक दुजे के लिये असल्यानं यांना एकमेकांपासून अद्याप पर्यंत तरी कुणीही दूर करू शकलेले नाही..! बहुदा काही प्रश्न मुद्दामहून सोडवायचे नसल्याने असं होत असावं..!😊
याच मराठवाडी दुष्काळाची झळ आम्ही पालखेडकरांनी साधारणतः इ. स.१९९५ ते १९९७ दरम्यान सोसलेली आहे. गावाच्या उत्त्तर दिशेला पाण्याचा आड होता, अर्थात सध्याही आहे.हाच आड गावच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवायचा. काळाच्या ओघात या आडाचे पाणी देखील कमी झाले होते.वर उल्लेख केलेल्या काळात गावात तीव्र पाणी टंचाई होती.
आज दिनांक १६/१/२०२२ रविवार रोजी गोरज मुहूर्तावर औरंगाबाद येथे अचानक भेट झालेल्या माझ्या दोन धाकट्या भावासारखे असणाऱ्या जिवलग मित्रांची भेट झाली अन् आम्ही त्याच दुष्काळी कालखंडात गेलो. त्या काळातील प्यूवर दुष्काळात आम्ही सोबत होतो त्या दुष्काळी आठवणीत रमून गेलो..!
सदरील फोटोत पांढरा सदरा परिधान केलेला प्रिय बंधू डॉ.गणेश पा.भेंडे अन् काळया रंगाचे जॅकेट परिधान केलेला प्रिय बंधू डॉ.प्रमोद राऊत उपाख्य बबलू..! मी वर उल्लेखित केलेल्या कालखंडात प्राथमिक शिक्षक म्हणून जळगाव, ता. वैजापूर येथे सेवा करत होतो. आम्ही वरील मित्रांनी सोबतच तीव्र पाणी टंचाई काळात आपापल्या घरी सायकलवर प्लास्टिक कॅन अडकवून पाण्याची जी सेवा दिली होती, त्यानं आमच्या प्रत्येकाच्या घरातील आमच्या मातोश्री सुखावून जात होत्या..!
माझ्याकडे सायकल होती.याच सायकलच्या मागील कॅरियरला दोन्ही बाजूला पस्तीस पस्तीस लिटरच्या कॅन अडकवायचो. सीट पुढील नळीला दोन्ही बाजूला पस्तीस पस्तीस लिटरच्या दोन कॅन अडकवायचो. पाणी मिळण्याचं ठिकाण होते, गावच्या पश्चिम दिशेला आदरणीय के. टी. त्रिभुवन यांच्या घरासमोरील हातपंप..! पस्तीस लिटरच्या चार कॅनी हातपंप हाताने हाफसून भरणे म्हणजे खूप कष्टाचे काम होते.त्यात पुन्हा सदरील हातपंपाचे पाणी, खूप खोलवर असल्याने हातपंप हाफसतांना दमछाक व्हायची.हातपंप हाताने हाफसायची जबाबदारी प्रामुख्याने प्रिय गणू अन् प्रिय बबलू पार पाडायचे. त्यांना दम लागला की, मी हातपंप हाफसायचो. एवढ्या वजनदार कॅन अडकवल्याने सायकल तिच्या प्रचंड शारीरिक दबावात यायची,पण एकाच खेपेत जास्त पाणी न्यायचे या हावरट अट्टाहासापाई आम्ही तीन सजीव, त्या एका निर्जीव सायकलवर अत्याचारच करत असायचो. सायकल हॅण्डलला धरून लोटायची जबाबदारी माझी असायची. के. टी. त्रिभुवन यांचं घर ते आम्हा तिघांचे घर साधारणतः अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावर होते. एक एक खेप आम्ही प्रत्येकाच्या घरी घेऊन जायचो.सांघिक कार्यातून आम्ही हे काम करत असायचो, त्यामुळं काम सोपे वाटायचे.
अखेर एक दिवस, ज्याची भीती वाटायची तेच झाले.जास्त वजनामुळे सायकलची नळी पूर्णपणे वाकून गेली. आता घरी कसं जायचं याचा मला धाक पडला होता.माझे वडील अतिशय शिस्तप्रिय असल्याने वडील रागावतील याची भीती वाटायला लागली होती.मी प्रिय गणू अन् प्रिय बबलू यांना माझ्या घरापर्यंत यायला सांगितले, जेणेकरून सोबत हे दोघे असल्याने वडील रागावणार नाही हा उद्देश होता.आमचा उद्देश सफल झाला होता. माझ्या वडिलांनी सायकल पाहिली अन् वाड्यात लावून दिली.
सायकलची नळी मोडल्याने आम्ही आता, माझ्या राजदूत दुचाकीवर पस्तीस लिटरच्या कॅनने पाणी आणू लागलो होतो.पाणी आणण्याचे ठिकाण बदलले होते.परसराम पाटील रोठे यांच्या शेतातील हातपंपाचे पाणी हाफसून आणू लागलो होतो. परसराम पाटील रोठे यांचे शेत अन् आमचे घर, यातील अंतर साधारणतः दीड किलोमीटर होते.दर रविवारी अन् शाळेतून घरी आल्यावर हा दिनक्रम सुरू झाला होता. आदरणीय के. टी. त्रिभुवन यांच्या घरासमोरील हातपंपाला पूर्वीसारखे पाणी राहिले नव्हते.
काळाच्या ओघात प्रिय गणू भेंडे अन् प्रिय प्रमोद ( बबलू ) राऊत यांनी व्हेटरनरीचे शिक्षण पूर्ण केले.आमच्या पालखेड गावाच्या पंचक्रोशीत मुक्या पाळीव प्राण्यांची आजारपणात सेवा पुरविण्याचे पवित्र कार्य दोघेही करत आहे. यातील प्रिय गणू उपाख्य डॉ.गणेश पा.भेंडे हा काही काळ, आमच्या पालखेड येथील ग्रापंचायतीचा उपसरपंच देखील राहिला आहे. आदरणीय शरद पवार साहेबांवर निष्ठा बाळगून असणारा प्रिय गणू..!
आमच्या पालखेड गावातील नागरिक कलेवर निस्सीम प्रेम करणारे..! नाटकं अन् चित्रपट यावर निस्सीम प्रेम करणारे..! त्यातल्या त्यात नाटकं, कारण आमच्या पालखेड गावाला अंदाजे शंभर वर्षांची गावच्या यात्रेत रात्री नाटके सादर करण्याची परंपरा आहे.मागील काही वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील संत एकनाथ नाट्यगृहात शरद पोंक्षे अभिनित ' मी नथुराम गोडसे बोलतोय ' हे नाटक होते, त्यावेळी आमच्या पालखेड गावातून जीप भरून नाट्य रसिक ' मी नथुराम गोडसे बोलतोय ' हे नाटक पाहण्यासाठी आले होते, त्यात प्रिय डॉ.गणेश पा.भेंडे अन् प्रिय डॉ. प्रमोद राऊत देखील होते..! मी त्यावेळी लासूर स्टेशन येथे वास्तव्यास होतो. मी लासूर स्टेशन येथून रेल्वेने सदरील नाटक पाहण्यासाठी औरंगाबाद येथे आलो होतो.आजची आमची भेट देखील अशाच कलेच्या व्यासंगाच्या निमित्ताने झाली हे विशेष..!
काळ बदलत असतो,पण त्याच काळातील आठवणी कधीही बदलत नसतात.प्यूवर दुष्काळात आम्ही सोबत होतो या आठवणी आजही आम्हाला टवटवीत करतात.भले त्या आठवणी दुष्काळी असतील,पण आमच्या मनाला हिरवेगार करून प्रफुल्लित नक्कीच करतात..!😊
असो, प्रिय गणू अन् प्रिय प्रमोद आज ज्या निमित्ताने आपली औरंगाबाद येथे अचानक भेट झाली, पुन्हा त्याच निमित्ताने दुसऱ्या वेळी नक्कीच होईल याची खात्री आहे..!
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - १६/१/२०२२, रविवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा