मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
मला भूतकाळ भेटला..! 😊
==================================
आज खोडेगाव ( कचनेर जवळील ) ता. औरंगाबाद येथे रेणूका देवीच्या दर्शनाला तेथील जत्रेच्या निमित्ताने सहपरिवार जाण्याचा योग आला.माझ्या सासुरवाडी कडील नातेवाईकांचे कुलदैवत असलेलं देवीचं गाव, अर्थात सोबत सासुरवाडी कडील नातेवाईक होतेच..!🙏🏻
तिथल्या जत्रात भर उन्हात फिरलो अन् मला मीच माझ्या लहानपणीच्या काळातील नंदनला भेटलो. पालखेड येथील आम्हा बऱ्याच बालमित्रांना गावातील यात्रे निमित्त ' खर्ची ' पाच ते दहा रू.आमच्या घरच्यांकडून मिळायचे. त्या खर्चीत ( रकमेत ) गावातील यात्रेत आलेल्या दुकानात जाऊन काय विकत घेता येईल याची इकडं तिकडं हिंडून चौकशी करायचो.
आज खोडेगाव येथील देवीच्या जत्रेत मला माझा भूतकाळ या फोटोतील मुलात दिसला अन् मला माझा भूतकाळ वर्तमानकाळ भेटल्याची जाणीव झाली..! माझे मन माझ्या बालवयातील गावच्या यात्रेतील आठवणीत रमून गेले.
आमच्या बालपणी आमच्या पालखेड गावातील यात्रेचं आम्हाला खूप आकर्षण असायचं.नवे नवे कपडे घालून गावातील गल्लीत हिंडायचो.त्या हिंडण्यामध्ये एक उत्साह संचारायचा. जर यदा कदाचित दिवाळीला नवे कपडे विकत घेतले असेल तर त्या दिवशी घातल्या नंतर थेट कार्तिकी अमावास्येला असणाऱ्या यात्रेच्या दिवशीच ते दिवाळीचे नवे कपडे अंगात परिधान करायचो.माझ्या बालपणी कार्तिकी अमावस्येच्या दिवशी पहाटेच आई तिच्या हाताने अंघोळ घालून द्यायची.पहाटेच श्री.पारेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जायचो.सोबत गल्लीतील बालमित्र रमेश गायकवाड, सोमनाथ गायकवाड, विजू गायकवाड, स्व.आप्पा सूराशे अन् नितीन जैन हमखास असायचे.
मंदिरात दर्शनाला आल्यावर मंदिराच्या समोरील मुख्य प्रांगणात भला मोठ्ठा कापडी मंडप यात्रेच्या निमित्ताने गावकरी मोठ्या मेहनतीने टाकायचे.तो मंडप खूप उंच अंदाजे ऐंशी ते शंभर फूट उंच अन् साधारणत: अडीच ते तीन फूट रुंदीच्या सागवानी खांबावर शंकूच्या आकाराचा असायचा. वरील आसपासच्या उंच बाजूला मोठ्या नाड्या दोरीने मंडप बांधलेला असायचा. आमचे दर्शन झाले की, त्या मधोमध असणाऱ्या लाकडी खांबाला धरून आम्ही बालमित्र गोल गोल फिरायचो. एक वेगळाच आनंद मिळायचा.आज भले अत्याधुनिक पाळणे , आनंदनगरीतील विविध उंच पाळणे आलेत, पण आम्ही बालपणी ज्या खांबाला धरून गोल गोल फिरत असायचो त्याची सर किंवा तो आनंद आजच्या आधुनिक गोल गोल फिरण्याच्या पाळण्यात नाही असे आम्हा काही बालमित्रांना नक्कीच जाणवते. काळाच्या ओघात तो शंकू आकाराचा कापडी मंडप यात्रेच्या निमित्ताने मंदिराच्या समोरील प्रांगणात टाकल्या जाईना.साधा सपाट कापडी मंडप टाकल्या जाऊ लागला.जे सौंदर्य आमच्या बालवयातील काळात गावच्या यात्रेनिमित्त मंदिराच्या समोरील प्रांगणात टाकल्या जाणाऱ्या शंकू आकाराच्या मंडपात उठून दिसत होते,ते त्यानंतर टाकल्या जाणाऱ्या सपाट कापडी मंडपात दिसेना..!
इकडं तिकडं हिंडून झाले की, वडिलांच्या आसपास मुद्दामहून लुडबुड करायची, जेणेकरून त्यांचं आपल्याकडे लक्ष जाईल अन् ते आपल्याला खर्ची देतील.अखेर आपला हेतू साध्य व्हायचा अन् आमच्या वाट्याची पाच ते दहा रुपया पर्यंतची खर्ची मिळायची.मग काय हातात खर्ची पडल्या पडल्या हुंदडत रमेश, सोमनाथ, रमेश, अप्पा अन् विजूच्या घरी जायचो अन् म्हणायचो...
" मला दादांनी खर्ची दिली रे भो..! तुला दिली का..? नसणं दिली तर घे अन् चल लवकर..!"
मित्रांना खर्ची मिळालेली असायची; मग पालखेड गावातील मुख्य पेठेत भरणाऱ्या यात्रेत जायचो.आमच्या बालपणी मंदिराच्या गल्लीतच मुख्य पेठ होती.काळाच्या ओघात गावाचा फुगवटा वाढला अन् गावाची पेठ देखील फुगवट्यात पसरली.मुख्य पेठेत आलेल्या दुकानात जायचो, अर्थात पाहिलं दुकान असायचे खाऊचे..! मस्तपैकी दोन रुपयांची गोडीशेव खायचो. गोडीशेव हा माझा सदा सर्वकाळ आवडता खाऊ असल्याने आम्ही बालमित्र त्यावर अगोदर ताव मारायचो.तो कालखंड होता ऐंशीच्या दशकातील सुरुवातीचा..! खाऊ खाऊन झाला की, आम्ही कटलरी दुकानदाराकडे आमचा मोर्चा वळवायचो. कटलरी दुकानदार दरवर्षी एकच असायचे अन् ते आमच्याच पालखेड गावाच्या शिवावरील गाव असलेल्या काटे पिंपळगाव ता.गंगापूर येथील..! उरलेल्या रुपयात खेळणी घेण्यासाठी दुकानदार सोबत आमची बोलणी सुरू व्हायची.आम्ही पट्टीचे गिऱ्हाईक असल्याने खूप घासाघीस करून पाच रुपयांपर्यंत फक्त मुंडकं असलेलं पत्र्याचे ट्रॅक्टर विकत घायचो.जर काही रुपये शिल्लक राहिले तर इतर कुणी मित्र आल्यानंतर त्यांच्या सोबत अजुन इतर काही खरेदी करायला ज्याला आजकाल ' शॉपिंग ' म्हणतात त्यासाठी राखून ठेवायचो.
आमच्या बालपणी खर्ची कमी मिळायची पण त्यात बरकता असायची.आजकाल खर्ची खूप मिळते पण त्यात बरकता लाभत नाही.बहुदा पैश्यांचे मूल्य घसरले असावे.
असो, आठवणी कुठून कुठे भेटतील याचा नेम नाही.कदाचित याचमुळे आठवणींना आठवणी म्हणत असावं, कारण त्या आठवून आठवून आठवणीत येतात म्हणून..!
ता.क. - प्रत्येकाला त्याचा आपला भूतकाळ नक्कीच भेटतो ,फक्त प्रत्येकाचं आपलं वर्तमान जमिनीवर हवं..! 😊
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक -१७/४/२०२२, रविवार.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा