" आमचे गाव आमची माणसं "©️
" उडी मारली रे मारली की, लाईट गेलीच समजा..!"
=============================
गर्लफ्रेण्डला भेटण्यासाठी संपूर्ण गावची लाईट घालवायचा इलेक्ट्रीशियन; गावकऱ्यांच्या हाती लागला अन्....अशी बातमी मी वाचली अन् अशाच लाईट जाणाऱ्या प्रसंगाची आठवण मला आली..!
असो,
वरील बातमीचा अन् आमच्या पालखेड गावचा काय संबंध असा प्रश्न बऱ्याच मित्रांना पडला असेल..! वरील बातमी सारखं अगदी सेम टू सेम नव्हतं पण, लाईट मात्र नेमकी टायमावर जायची हे मात्र खरं..! 😊
ऐंशीच्या दशकात आमच्या पालखेड गावात ' राक्षसी लालसा ' हे नाटक अजरामर होऊन गेलेलं आहे.या नाटकाची लोकप्रियता गावात एवढी होती की, यातील संवाद आमच्या सारख्या काही प्रेक्षकांच्या तोंडपाठ झाले होते.त्यांचं कारण बऱ्याचदा दरवर्षी हेच नाटक अन् तीच नाटक पार्टी सादर करायची.
रात्री साधारणतः नऊ वाजता हे नाटक सुरू झाल्यावर सिंहासनावर बसलेला राजा शशांक याने सिंहासनावरून उडी मारली रे मारली की, लगेच लाईट जायची अन् नाटक जो पर्यंत लाईट येत नाही तो पर्यंत बंद व्हायचे. त्यावेळी गावासाठी एकच लाईट डीपी होती अन् ती वेशीच्या बाहेर असणाऱ्या शेतात ज्याला अख्खं गाव तक्क्या म्हणायचे तिथं होती. लाईट गेल्यावर राक्षसी लालसा या नाटकाच्या पार्टीचे समर्थक हातात बत्ती ( थोडक्यात मोठ्ठा कंदील ) घेऊन त्या डिपी कडे जायचे अन् फ्यूज दुरुस्ती करायचे. त्याकाळी आमच्या पालखेड गावात एकदोन जणांकडेच बत्ती होती.त्यांना त्याकाळी विशेष महत्त्व असायचे..!😊
लाईट आल्यावर पुन्हा राजा शशांक आपल्या सिंहासनावर विराजमान व्हायचा अन् पुन्हा सिंहासनावरून उडी मारत मारत पुढील संवाद म्हणायचा..
" प्रतिभा ,प्रतिभा तुझ्या या राक्षसी लालसेने माझ्या अंगाची लाही लाही होत आहे..!"
हा संवाद पूर्ण होत नाही तोच पुन्हा लाईट जायची.सुरुवातीला एकदोन वर्ष प्रयोग सादर करणाऱ्या पार्टीला असे वाटले की, लाईट तिच्यात होणाऱ्या काही नादुरुस्तीमूळे जात असेल,पण नंतर दरवर्षी नेमका राजा शशांक आपल्या सिंहासनावरून उडी मारल्या मारल्याच कशी काय लाईट जाती याचा संशय या नाटकातील कलाकारांना आला. साधारणतः तिसऱ्या वर्षापासून एकजण वेशीबाहेर असणाऱ्या लाईट डिपी जवळ राखण बसायला लागला अन् मग तेव्हांपासून नाटक सुरू झाल्यावर अन् नाटक सुरू असताना कधीच लाईट गेली नाही.
मात्र तो प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे की, राक्षसी लालसा हे नाटक सुरू झाल्यावर अख्ख्या गावची लाईट कोण बंद करत होते..?😊🙏🏻
या नाटकाची लोकप्रियता अन् कदाचित त्यामुळं गावातील दुसऱ्या नाटक पार्टीला होणारी असूया यामुळं असे करणारे कुणीतरी असावेत असा त्याकाळी अनेकांना अंदाज आला होता,पण भक्कम पुरावा हाती न लागल्याने आरोपी कधीच सापडू शकला नाही..!😊
बाकी काहीही असो, राजा शशांक आपल्या सिंहासनावरून उडी मारल्या मारल्या लाईट जाणार हा अंदाज आम्हा काही प्रेक्षकांना अगोदरच असायचा,कारण लाईट जाण्याचं अन् राजा शशांक यांच्या उडीचं अचूक टायमिंग त्याकाळी साधलं जायचं..! आम्ही काही बालमित्र नाटकाच्या ओट्याच्या सर्वात जवळ बसलेलो असायचो.लाईट जरी गेली तरी राजा शशांक यांचा अपूर्ण संवाद आम्ही काही बालमित्र प्रेक्षक गॅलरीत बसुन म्हणजेच जमिनीवर अंथरलेल्या बारदाण्यावर बसून म्हणायचो..!
मात्र तो प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे की, राक्षसी लालसा हे नाटक सुरू झाल्यावर अख्ख्या गावची लाईट कोण बंद करत होते..?😊 आता गावातील काही तरुण संशोधन क्षेत्रात आहेत, निदान त्यांनी तरी याचा शोध घ्यावा ही राजा शशांकावर प्रेम करणाऱ्या व त्याकाळी जमिनीवर अंथरलेल्या बारदाण्यावर बसलेल्या प्रेक्षकांकडून कलासक्त अपेक्षा आहे..!🙏🏻😊
ता.क. - गर्लफ्रेण्डला भेटण्यासाठी संपूर्ण गावची लाईट घालवायचा इलेक्ट्रीशियन; गावकऱ्यांच्या हाती लागला या बातमीची लिंक -
https://www.loksatta.com/trending/bihar-electrician-cuts-power-supply-of-village-to-meet-girlfriend-in-dark-marries-her-after-being-caught-red-handed-scsg-91-2924690/
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - १६ मे २०२२, सोमवार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा