आमचे गाव आमची माणसं ©️
अलबेला शाम - भाग क्रमांक: ५
" बकरीचे खरपूस दूध..!"
===============================
आम्ही माध्यमिक शाळेतील वयोगटात जो काही पराक्रम केला होता त्याचा कुठूनही संबंध जुळला तर तो या ना त्या कारणाने अभ्यासाशीच येऊन जुळत होता.आज आमच्या तत्कालीन माध्यमिक शाळेतील वयोगटातील कोणताही मित्र असा छातीठोकपणे सांगू शकणार नाही की, आम्ही म्हणजे फार काही सभ्य होतो म्हणून..! खेड्यात ज्या काही खोड्या करायच्या त्या आम्ही सर्व बालमित्र अन् वर्गमित्रांनी केल्या होत्या.अर्थात आम्ही हे करत असताना आमच्या चारित्र्यावर कुणाचा संशय निर्माण होईल किंवा आमचं नैतिक अधःपतन होईल असं काहीही गैरकृत्य केले नव्हते या विषयी आम्ही वर्गमित्र पुरेपूर काळजी बाळगून होतो.
आम्हा तत्कालीन सर्व वर्गमित्रांच्या आयुष्याच्या वर्तुळाचा परीघ जर बघितला तर त्या परिघाच्या प्रत्येक वळणावर आमचा खूप जिवलग बालमित्र तथा वर्गमित्र शामकांत मुरलीधर शेळके हा नक्कीच भेटतो. त्याचं भेटणं आमच्यातील मित्रत्वाचा अंश पुन्हा पुन्हा आम्हाला नवसंजीवनी देत असायचा.शामचे आम्हा वर्गमित्रांना माध्यमिक शाळेतील वयोगटात भेटणं आमच्यात असणाऱ्या पौगडावस्थेतील वयोगटाला अजुन ऊर्जा देऊन जायचे.
आम्ही इ. स. मे १९८९ ते इ. स. मार्च १९९२ पर्यंत मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आपापल्या अभ्यासिका मध्ये अभ्यास करायला एकत्र जमा व्हायचो. मी स्वतः, गणेश वाणी, विजू गायकवाड, बाळू कचरु घोडके , बाळू माळी, आण्णासाहेब कारभारी म्हस्के , शाम शेळके, पारसनाथ भोईटे, ज्ञानेश्वर मोकाटे, अजय काळे, शेख फारुख इत्यादी मित्रांनी आपापल्या अभ्यासिका मध्ये दररोज रात्री न चुकता एकत्र यायचो अन् अभ्यास करायचो.
आम्ही वर्गमित्र रात्री खूप उशिरा पर्यंत अभ्यास करायचो.ज्या दिवशी रात्री खूप उशिरा पर्यंत अभ्यास करायचा म्हंटल्यावर झोपेची समस्या निर्माण होणारच, त्याला आम्हीही अपवाद नसायचो. माणसाच्या झोपेला पळवून लावायला माणूस तऱ्हेतऱ्हेचे उपाय उपयोगात आणतो.आम्हीही रात्री उशिरा पर्यंत जागी असायचो त्यामुळं आम्हीही यावर उपाय शोधला होता अन् तो म्हणजे चहा..! अर्थात मी त्याही वेळी चहा पीत नसल्यामुळे माझ्यासाठी दूध असायचे..! अभ्यासिका मध्ये अभ्यास करणाऱ्या मित्रांपैकी गणेश वाणी याच्या घरी बकऱ्या होत्या.त्यावेळी गणेश वाणी याचे घर आमच्या पालखेड गावातील आमचे घर ज्या गल्लीत होते त्या गल्लीच्या दक्षिणेला शेळके पाटील यांची जी पडझड झालेली गढी होती तिच्याच बाजूला होते.प्रिय बालमित्र गणेश वाणी याच्या घराच्या समोरच बकऱ्या बांधलेल्या असायच्या.
आम्ही इयत्ता दहावीत असताना आण्णासाहेब म्हस्के याच्या अभ्यासाच्या खोलीत मी, आण्णासाहेब म्हस्के, शाम शेळके इत्यादी वर्गमित्र जमा झालो होतो.रात्री उशिरा पर्यंत अभ्यास करायचा असल्याने झोप येऊ नये म्हणून मध्यरात्री चहा प्यायची आम्ही ठरवली. चहासाठी दुधाची सोय करावी लागणार होती.आम्ही सर्वानुमते असे नक्की केले की, गणेश वाणी याच्या घराच्या समोरील बाजूस ज्या बकऱ्या बांधलेल्या असतात त्यातील काही बकऱ्या नुकत्याच जणलेल्या होत्या.त्याच जणलेल्या बकऱ्यांचे दूध मध्यरात्री सगळीकडे सामसूम झाली की, दूध काढून आणायचे नक्की केले.अर्थात हे नियोजन करताना आमचा प्रिय बालमित्र गणेश वाणी तिथं उपस्थित नव्हता. त्यावेळी गणेश आमच्या अभ्यासाच्या खोलीत अभ्यास करायला बसलेला होता. आम्ही नियोजन केल्यावर आमचा वर्गमित्र नंदकिशोर भाऊसाहेब जाधव याच्या माडीकडे गेलो,कारण त्याला विश्वासात घेतल्याशिवाय ही मोहीम फत्ते होणार नव्हती. त्यांचं मुख्य कारण, नंदकिशोर जाधव याचं घर जिथून बकरीचे दूध काढून ( चोरून ) आणायचे होते त्यापासून साधारणतः शंभर फुटापर्यंत होते. आणि नंदकिशोर जाधवला या नियोजनाची कल्पना द्यायचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या घराच्या पुढील बैठकीत लाईटवर असणारी शेगडी होती.जी आम्हाला चहा करायला उपयोगी येणार होती.आम्ही रात्री नंदकिशोर जाधव यांच्या घरी गेलो. माडीच्या पुढील बैठकीत कापूस एका बाजूला होता अन् त्याच्या बाजूला नंदू काहीतरी लिहायचे काम करत होता.आम्ही दरवाजा वाजवला ,नंदूने दरवाजा उघडला अन् म्हणाला..
" काय रे, नंदन काय झालं, तुम्ही समदेजण लई उशीरा आले,काय झालं..?"
आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघत होतो.इतक्यात शाम शेळके नंदू जाधवला म्हणाला..
" हे, पहाय, आज आम्हाला लई उशिरा पर्यंत अभ्यास करायचा आहे.झोप येऊ नये म्हणून मध्यरात्री चहा करायचा आहे. तुझ्याकडे शेगडी असल्याने इथच चहा करू..!"
नंदकिशोर जाधव म्हणाला - " अरे, यात इचारायचे काय, करा ना मंग..!"
आम्ही पुन्हा एकामेकांच्या तोंडाकडे बघू लागलो.मला राहवलं नाही.मी लगेच त्याला म्हणालो..
" अरे, नंदू, चहा साठी जे दूध पाहिजे आहे, ते गणेश वाणी याच्या घराच्या समोरील बाजूस ज्या बकऱ्या बांधलेल्या आहेत त्यांचं ऐन मध्यरात्री गुपचूप काढून आणायचं आहे..!"
यावर नंदकिशोर जाधव पटकन म्हणाला - " अरे,मग काढू ना..! समदी सामसूम झाली की, दूध काढू अन् मस्तपैकी शेगडीवर चहा करू, तुला पण एक ग्लास भरून दूध गरम करून घेऊ अन् गणेशला दूध काढून आणल्यावर डायरेक्ट इथच बोलून घेऊन..!"
झालं , सगळं नियोजन ठरलं होतं.नंदकिशोर जाधव त्याच्या घराच्या कोपऱ्यावर उभा राहणार होता, कुणी तिकडून येतं की काय पाहायला. आण्णासाहेब म्हस्के, बाळू माळी हे, पोपटराव गुरू ऋषीपाठक यांच्या घराच्या कोपऱ्यावर उभा राहणार होते.मी अन् शाम शेळके बकरी दूध मोहिमेवर असणार होतो.आम्ही आपापल्या अभ्यासाच्या खोल्यांकडे निघून गेलो.मी माझ्या अभ्यासाच्या खोलीत आल्यावर बघितले तर गणेश वाणी अभ्यास करत होता. माझ्या मनात विचार येत होता की, आज गणेशच्याच बकऱ्यांचे दूध, त्याला न विचारता त्यालाच आम्ही पाजणार होतो.ही उघड उघड पांढरी शुभ्र चोरीच होती.
मध्यरात्र झाली होती. मी गणेश वाणी याला म्हणालो.." यार, गणेश मला लई बोर होऊ राहिले ,मी म्हस्केच्या खोलीकडे एक चक्कर मारून येतो..!"
गणेश म्हणाला - " ये जाऊन,मी पण झोपतो आता..!" गणेशला काय माहित, आम्ही त्याच्याच बकरीचे दूध चोरून आणायला जाणार आहोत म्हणून..! ठरल्या प्रमाणे आम्ही नंदकिशोर जाधव याच्या घरी ऐन मध्यरात्री जमलो होतो.नंदकिशोर जाधव याच्या घरून मोठी चरवी ( पितळी भांडे ) शाम शेळके याने जवळ घेतली. नंदकिशोर जाधव म्हणाला ..
" थांब रे, मीच काढतो दूध, या बकऱ्या माझ्या गल्लीतल्या ओळखीच्या आहेत..!"
असं म्हणून नंदू जाधव दूध काढायला बकरिकडे गेला. मी अन् शाम शेळके त्याच्या घराच्या कोपऱ्यावर उभे राहिलो.नंदकिशोर जाधव याने एका बकरीचा एक पाय आपल्या गुडघ्याच्या खाली दाबला अन् बकरीच्या सडातून दूध काढायला लागला,पण ती बकरी त्याला काही दूध काढून देईना.अखेर नंदू जाधव आमच्याकडे परत आला.शाम शेळके याने चरवी हातात घेतली अन् तो बकरी दूध मोहिमेवर निघाला.नंदू जाधव त्याच्या घराच्या कोपऱ्यावर उभा राहिला.
शाम शेळके याने एका बकरीचा एक पाय आपल्या गुडघ्याच्या खाली दाबला अन् बकरीच्या सडातून दूध काढायला लागला. मी शाम शेळके याच्या बाजूला उभा राहिलो होतो. बकरी चिडीचूपपणे दूध काढून द्यायला लागली होती. मात्र दूध काढून घेत असताना दूध चरवीत पडत असताना चुर..चुर असा आवाज यायला लागला होता. शाम शेळके याने त्यावर एक युक्ती केली.ज्या डाव्या हातात चरवी धरली होती, त्या हाताचे चार बोटे करंगळी, अनामिका, मध्यमा अन् तर्जनी या बोटाना चरवीच्या आतील बाजूस घेऊन चरवी हातात धरली होती. उजव्या हाताच्या करंगळी, अनामिका, मध्यमा अन् तर्जनी या बोटांच्या मध्ये बकरीचे सड धरले अन् एका बाजूने अंगठ्याचा दाब देऊन दूध काढू लागला होता.दूध चरवीत पडताना चुर चुर असा आवाज येऊ नये म्हणून दुधाची धार चरवीच्या आतील बाजूस असलेल्या डाव्या हाताच्या बोटांवर दुधाची धार मारू लागला होता.आता दुधाचा चुर चुर आवाज येत नव्हता. मी नुसता शाम शेळके याच्या या अदभुत युक्तिकडे बघतच राहिलो होतो.दोन - तीन बकऱ्यांचे दूध काढून झाल्यावर चरवी भरली होती.आम्ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार नुकतेच काढलेले बकरीचे दूध नंदकिशोर जाधव याच्या घरी सुरक्षित ठेवले.
आम्ही सर्वजण आपापल्या अभ्यासाची खोलीकडे निघून गेलो. थोड्या वेळाने नंदकिशोर जाधव याच्या खोलीत सर्वांनी एकत्र जमायचे असे ठरले होते.चहासाठी साखर , चहा पत्ती नंदकिशोर जाधव त्याच्या घरचे तो देणार होता.मी माझ्या अभ्यासाच्या खोलीत आलो तर गणेश गाढ झोपी गेला होता.मी त्याला झोपेतून जागं केलं अन् त्याला म्हणालो..
" गणेश, चल आपल्याला नंदुच्या घरी चहा प्यायला जायचे आहे..!"
गणेश म्हणाला - " अरे,पण चहाला दूध कुठंय..?"
मी म्हणालो - " तू फक्त चल रे..!"
असं म्हणून गणेश वाणी व मी नंदकिशोर जाधव याच्या घरी आलो.तिकडून आण्णासाहेब म्हस्के,शाम शेळके, बाळू घोडके, बाळू माळी अगोदरच नंदू जाधवच्या घरी आलेले होते.
नंदकिशोर जाधव याने शेगडी सुरू केली होती.पातेल्यात खरपूस दुधाचा चहा उकळायला ठेवला होता.चहा उकळून झाल्यावर माझ्यासाठी मस्तपैकी एक ग्लास दूध गरम करणार होते. चहा तयार झाली होती. माझ्यासाठी दूध देखील गरम केले होते.चहा पिताना आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघत बघत पित होतो.हसू येत होतं पण आम्ही प्रचंड संयम बाळगून होतो.इतक्यात गणेश वाणी याच्या तोडांतून वाक्य बाहेर पडले...
" चहा लईच भारी झाली रे..! एवढी खरपूस चहा मी पहिल्यांदाच पिऊ राहिलो..! "
आता मात्र आमच्या संयमाचा बांध फुटला होता.आम्ही हसायला लागलो होतो.गणेश वाणी आमच्याकडे पाहू लागला अन् म्हणाला...
" का,रे तुम्ही कम्हून हसू राहिले..?"
शेवटी नंदकिशोर जाधव गणेशला म्हणालाच..
" अरे, गणेश चहा खरपूस होणारच,कारण आम्ही चहासाठी दूध तुझ्याच बकऱ्यांचे चोरून आणले आहे..!"
हे वाक्य गणेशच्या कानी पडे पर्यंत त्याचा चहा पिऊन झाला होता.गणेश ताडकन खवळून उठला अन् त्याच्या सभ्य भाषेत आम्हा सर्वांना अनेक शब्दांचा प्रसाद दिला.माझ्याच बकरीचे दूध मला न विचारता चोरून आणून मलाच पाजू राहिले अशा अनेक वाक्यांनी गणेशने आपला राग व्यक्त केला होता.गणेशने खूप तनफन केली, पण आम्ही त्याला एकाही अक्षराने प्रत्युत्तर दिले नाही. कसे प्रत्युत्तर देणार..? शेवटी आम्ही त्याच्या बकऱ्यांचे दूध पिलो होतो.भले ते चोरून पिलो पण पिलो होतो.पिलेल्या दुधाला जगणारी मित्रमंडळी होतो आम्ही..!😊 अखेर गणेश वाणी शांत झाला अन् म्हणाला..
" जाऊ, द्या , पण इथून पुढं माझ्या बकऱ्यांचे दूध चोरू नका..!" आम्ही स्मित हास्य करून सहमती दर्शवली.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिय वर्गमित्र गणेश वाणी याच्या मातोश्री ज्यांना आम्ही आदराने बाई म्हणायचो त्या उठल्या अन् त्यांनी बकऱ्यांचे दूध काढायला सुरुवात केली.तर एकाही बकरीला दररोजच्या इतके दूध निघेना.त्यांनी संशय व्यक्त केला की, आमच्या बकऱ्यांचे दूध रात्री कुणी तरी चोट्यांनी काढले म्हणून..! तीर्थस्वरुप बाईंच्या बाजूलाच गणेश वाणी उभा होता. तो बाईंची तक्रार निमूटपणे ऐकत होता. तिकडून नंदकिशोर जाधव हा देखील त्याच्या घराच्या ओट्यावर उभा राहून निमूटपणे ऐकत होता. आम्हा मित्रांना नंदकिशोर जाधव याने थोड्या वेळाने हा सगळा प्रकार सांगितला होता.आम्ही सर्व बालमित्र या प्रसंगावर खळखळून हसलो होतो.
आम्ही वयाने मोठे होऊन आपापल्या आयुष्यात स्थिर झाल्यावर जेंव्हा कधी मी स्वतः, नंदकिशोर जाधव,गणेश वाणी, आण्णासाहेब म्हस्के अन् शाम शेळके भेटायचो तेंव्हा तेंव्हा बकरीच्या खरपूस दुधाचा विषय नक्कीच निघायचा. त्या गतकाळातील आठवणी आठवून आम्हा मित्रात हास्याचा स्फोट नक्कीच व्हायचा.अर्थात आजही तो प्रसंग आम्हाला खळखळून हसायला भाग पाडतो.
दिनांक ३ जुलै २०२२, रविवार रोजी ज्यावेळी खूपच अत्यवस्थ अवस्थेत तब्येत असलेल्या आमच्या जिवलग बालमित्राला शाम शेळके याला ज्यावेळी मी, आण्णासाहेब म्हस्के अन् आमचे जेष्ठ बंधुतूल्य आदरणीय नारायणराव कुमावत सर ( शिक्षण विस्तार अधिकारी जालना )भेटायला गेलो होतो, त्यावेळी देखील गप्पांच्या ओघात शाम शेळके याने गणेश वाणी याच्या बकरीचे दूध कसे काढले होते हे हाताच्या बोटांचे प्रात्यक्षिक करून दाखवले होते.त्यावर शाम शेळके सह आम्ही सर्वजण खळखळून हसलो होतो.
माणसाच्या आयुष्यात त्याच्या गतकाळातील आठवणी मग त्या खोडकर असो की, रंगीत त्या सर्व आठवणी आठवल्या की माणसाला खळखळून हसायला बाध्य करतात हेच खरं..! माणूस वार्धक्यात असो अथवा अंथरुणावर खिळून असो, गतकाळातील रम्य आठवणी दुःखावर काही वेळासाठी नक्कीच पांघरून घालायचं काम करतात. हा अनुभव मी, आमचा खूप जिवलग बालमित्र शाम शेळके याच्या दिनांक ३ जुलै २०२२ रोजीच्या भेटीच्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवला होता. अखेर याच आम्हा बालमित्रांच्या सुखद आठवणी माझ्या सोबत , आण्णासाहेब म्हस्के सोबत गप्पांच्या फडात रंगवून आमचा प्रिय बालमित्र शाम शेळके दिनांक ८ जुलै २०२२ ,शुक्रवार रोजी आमच्यातून कायमचा निघून गेला.😔
विधात्याच्या घरी आमचा प्रिय बालमित्र शाम शेळके आमच्या गतकाळातील आठवणी नक्कीच तिथं कुणा एखाद्या नंदनला सांगत असणार अन् खळखळून हसत असणार..!
वंदे मातरम्
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ७ ऑगस्ट २०२२, श्रावण मास, रविवार
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा