मला प्रवासात भेटलेली माणसं..!©️
खूप समंजस व्यक्तिमत्व डॉ. अरुण साळे साहेब..!
===================================
आज दिनांक २३/११/२०२२ रोजी माझी जन्मभूमी पालखेड ता. वैजापूर , जि. छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेव यांची कार्तिकी यात्रा होती. यात्रेला दरवर्षी गेलो की, गावातील काही घरं आहेत ज्याठिकाणी गेल्याशिवाय गावाला भेट दिल्याचे आत्मिक समाधान लाभत नाही. त्यातलं एक घर माझा खूप जिवलग बालमित्र डॉ.संजय राऊत अन् बाळू माळी यांचं..!
आज याच ठिकाणी माझे बालपणीचे कौटुंबिक डॉ. आदरणीय अरुण साळे साहेब यांची भेट झाली. ( माझ्या डाव्या बाजूला उभे असलेले ) लहानपणी मला काहीही आजारपण आले की, आदरणीय डॉ. साळे साहेब माझी तपासणी करायचे अन् हळूच गोड गोड बोलत सुई टोचून द्यायचे. सुई टोचून झाल्यावर समजायचे सुई टोचून झाली म्हणून..! त्यावेळी डॉ. साहेबांचा हात आईच्या हातासारखाच जाणवायचा. माझी धन्वंतरी देवतेला प्रार्थना असेल की, या पृथ्वीवरील समस्त डॉक्टरांच्या हातात डॉ. साळे साहेबाच्या हातातील सुई टोचण्याचे आईपण येवो हीच प्रार्थना..! अर्थात यात माझा थोरला मुलगा चि. नमन देखील आला,कारण त्यालाही भविष्यात येणाऱ्या रुगांना सुई टोचायची आहे.
आमच्या घरी कुणी आजारी पडले की, घरातला कुणीतरी सदस्य आदरणीय डॉ.साळे साहेबांच्या घरी निरोप द्यायला जायचा. डॉ. साळे साहेब त्यांची जी पेटी होती ती एकतर स्वतः घेऊन यायचे किंवा घरातील सदस्य ती पेटी घरी घेऊन यायचे.घरी आल्यावर त्यांच्या पेटीतील सुई बाहेर काढायचे.घरात गरम करायला ठेवलेल्या पाण्यात ती सुई टाकायचे. जेणेकरून ती सुई निर्जंतुक व्हावी..! कधी कधी डॉ. साळे साहेब त्यांच्या घरूनच सुई निर्जंतुक करून आणायचे. खूप प्रामाणिक व्यक्तिमत्व..!
डॉ. साळे साहेब अतिशय शांत स्वभावाचे अन् आजच्या आमच्या वयोगटात आमच्याच वैचारिक बैठकीतील आहेत. अगदी भिन्न भिन्न रंगाच्या गप्पांचा फड यांच्याशी आम्हा काही बालमित्रांचा रंगतो.त्यात आम्ही आमच्या वयोगटाच्या पेकटात लाथ घालतो अन् निख्खळ मैत्रीचा आनंद लुटतो. खूप मॅच्युरिटी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. साळे साहेब..!
मी आमच्या पालखेड गावातील काही व्यक्तींच्या अजातशत्रू असणाऱ्या स्वभावाच्या निख्खळ प्रेमात आहे. त्यात मला जाणवलेले खूपच शांत अन् अजातशत्रू व्यक्तिमत्वे म्हणजे तीर्थस्वरुप पारसनाथ पाटील मुलमुले साहेब, डॉ.साळे साहेब अन् स्वर्गीय सादेक चाचा बागवान होय.यातील स्व. सादेक चाचा बागवान यांचं व्यक्तीमत्व खूपच शांत श्रेणीतील नव्हते, तर खूप हसरे अन् खेळकर स्वभाव त्यांचा होता. अजातशत्रू मात्र नक्कीच होते.
आदरणीय डॉ. साळे साहेब यांच्याकडे बजाज M 80 दुचाकी गाडी होती. इतक्या कमी वेगात अन् आयुष्यात कधीही न चुकलेली ड्रायव्हिंग केली ती डॉ. साळे साहेब यांचीच..! मर्यादित वेग अन् संयमित ड्रायव्हिंग हे डॉ.साळे साहेबांचं वैशिष्टय होते.यावरूनच त्यांच्या स्वभावाचा अंदाज येतो. त्याकाळी ग्रामीण भागात डॉ. व्यवसायात फार काही आर्थिक स्थैर्य नसायचे. आहे त्या आर्थिक परिस्थितीत आदरणीय डॉ. साळे साहेब यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना अमोल अन् महेश यांना योग्य ते नैतिक अन् औपचारिक शिक्षण दिले.आज त्यांची मुलं आपापल्या आयुष्यात स्थिरावलेली आहेत.
कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या देहबोलीतून अन् सार्वजनिक आयुष्यातील वर्तनावरून सहज लक्षात येतो असे मला वाटते. आदरणीय डॉ. साळे साहेब यांचा स्वभाव हा त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील वर्तनातून आम्हाला सहजपणे लक्षात येते असायचा. एखाद्या पुरुषाच्या सर्वांनी प्रेमात पडावं असं प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉ. अरुण साळे साहेब होय..!
काही वर्षांपूर्वी आदरणीय डॉ. साळे साहेब प्रभू श्रीरामाचे मंदिर असलेल्या श्रीरामपूर येथे स्थायिक झाले आहेत.विशेष म्हणजे त्यांचं तिथं स्थायिक होणं वैयक्तिक माझ्यासाठी खूप हृदयस्पर्शी आहे,कारण याच श्रीरामपूर गावात साठच्या दशकात माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी मराठा बोर्डिंग मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा व शिका ब्रीद अंतर्गत स्वतः ला आयुष्यात सिद्ध केले होते. घरून काहीही आर्थिक पाठिंबा नसताना जमेल ती कामे करून माझ्या स्व. वडिलांनी जी साक्षरता प्राप्त केली होती त्या मागे याच श्रीरामपूर गावाचे कळत नकळतपणे योगदान होते. या भावूक संदर्भाने आदरणीय डॉ. साळे साहेबांचं माझ्या आयुष्यात माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांच्या सारखे श्रद्धेचे स्थान आहे..!🙏🏻
असो, आदरणीय डॉ. अरुण साळे साहेब आज तुमची भेट झाली अन् माझ्या आयुष्यातील गतकाळातील अनेक भावूक क्षणांना हिंदोळा मिळाला.शेवटी माणसाचे मन तरी काय असते हो..?
फक्त आणि फक्त गतकाळातील आठवणींना उजाळा देऊन आजच्या वर्तमानकाळात जगून भविष्याची नांदी सुरू करणारे आयुष्यच..! दुसरं काहीही नाही..!
वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : २३/११/२०२२, बुधवार, कार्तिकी अमावस्या

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा