शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

दोन गोष्टी, दोन पितृतुल्य व्यक्तिमत्वांच्या..! "


 


आमचे गाव आमची माणसं ©️


" दोन गोष्टी, दोन पितृतुल्य व्यक्तिमत्वांच्या..! "


==================================


प्रसंग , साधारणतः नव्वदच्या दशकाच्या अखेरीस घडला होता. मी त्यावेळी पालखेड येथे वास्तव्य करत होतो. मी शिक्षक म्हणून सेवेत गावाच्या जवळील हडस पिंपळगाव, ता. वैजापूर येथे कार्यरत होतो. शाळेतून घरी आल्यावर माझा खूप जिवलग बालमित्र नितीन जैन याच्या कापड दुकानात निवांत जाऊन बसायचो.


तिथं आम्हा दोघा बालमित्रांचे कौटुंबिक स्नेही तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड देखील हमखास भेटायचे. तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड आम्हा दोघा मित्रांना नेहमी वडिलकीच्या दोन गोष्टी नेहमी समजावून सांगत असायचे.ही दोन्ही जेष्ठ व्यक्तिमत्वे आमच्या वडिलांच्या वयाची होती, पण नेहमी नितीन अन् माझ्याशी जिवलग मित्राच्या नात्याच्या सहवासात असायची.


असेच एकदा १ जानेवारी १९९७ रोजी सकाळी मी नित्य नियमाने ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन दररोजच्या नित्यक्रमानुसार नितीनच्या दुकानात काही वेळासाठी आलो होतो. तिथं तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड बसलेले होते. तिघांच्या मस्तपैकी गप्पा सुरू होत्या. नितीनच्या रेडिओ वर सुमधुर गाणी सुरू होती. त्या गाण्याकडे तिघांचेही लक्ष नव्हते. तिघेही गप्पांमध्ये पार रंगून गेले होते. मी तिथं गेल्या गेल्या नितीन जैन यास एक जानेवारी , नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.दुकानाच्या ओट्यावर तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड बसलेले होते. तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड यांना आम्ही काका अन् दादा या प्रेमळ संबोधनाने नेहमी उल्लेखित करायचो. नितीनला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नंतर मी काका अन् दादांना देखील त्यांचा हात माझ्या हातात घेऊन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या..! यावर ती दोघेही पितृतुल्य व्यक्तिमत्वे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागली. मी काही क्षण बुचकळ्यात पडलो.काय झालं तेही कळेना.अखेर तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड अखेर बोलते झाले.


त्यावेळी तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड मला म्हणाले होते - " अरे नंदू , आपून दररोज पहाटे झोपेतून उठतो, तिथून पुढचं आपलं दर्रोज नवीन वर्ष असतं..! अन् काय रे हे जाऊं दे, आपलं नवीन वर्ष तर गुढीपाडव्याला असतं ना..? हे काय काढलं अजुन..?"

मी अन् नितीन फक्त ऐकण्याच्या मनःस्थितीत होतो.नितीनने रेडिओचा आवाज खूप कमी केला होता. लगेच बाजूला बसलेले तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके उपाख्य काका मला म्हणाले ( ते मला नेहमी ' गुरुजी ' म्हणूनच उल्लेखित करायचे ) - " गुरुजी, आपल्या तळ्यापाळी जे घिसाड्याचे माणसं आलेली आहेत.त्यानला कशाचं नवीन वर्ष अन् कशाचं काय..! त्यांच्यासाठी समदी दिवसं सारखीच..!"

( आमच्या पालखेड गावाच्या दक्षिणेला जे मोकळे मैदान होते, त्या परिसराला निदान माझ्या पिढीपर्यंत तळ्यापाळी असं म्हणत असायचो. आता गावाचा फुगवटा झाला आहे त्यामुळं त्या परिसराला आता काय म्हणतात ते माहीत नाही.)


रंगनाथ पाटील काका अन् गिरजीनाथ दादांचे बोलणे ऐकून मी उभयतांना नवीन वर्षाच्या दिलेल्या शुभेच्छा जरा लाजल्या सारख्या झाल्या होत्या. आपण काहीतरी मीस करतोय याची भावना निर्माण झाली होती. पण मी स्वतः ला तथाकथित सुशिक्षित अन् आधुनिक काळातील समजत असल्यामुळे मला एक जानेवारी या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे अप्रुप वाटत होते. तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड यांनी अर्थात मी प्रेमाने दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार माझ्या खांद्यावर हात टाकून प्रेमाने केला होता. यातच या जुन्या पिढीचे मोठेपण होते. स्वीकार केला पण दोन वडिलकीच्या गोष्टी देखील सांगून दिल्या..!


तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड या दोन्ही ज्येष्ठांच्या सहवासातील प्रत्येक क्षण मी माझा जिवलग बालमित्र नितीन जैन ( ह.मु. लासुर स्टेशन ) ,आम्हाला आयुष्यासाठी खूप काही देऊन गेला आहे. मी इ. स. १९८९ मध्ये चहा प्यायची बंद केली ती आजतागायत बंदच आहे.याचे संपूर्णपणे श्रेय जाते ते तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड यांनाच..! दादांनी त्यांच्या अख्ख्या हयातीत एकदाही चहा पिली नव्हती.माझा खूप जिवलग बालमित्र सोमनाथ गायकवाड ( ह.मु. बजाजनगर , औरंगाबाद ) याचे वडील होते गिरजीनाथ दादा..! एकाच आळीत राहत असल्याने कायम एकमेकांच्या घरी उठ बैस असायची.


तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके यांचे अन् आमचे घर देखील एकाच आळीत होते. त्यांचा थोरला मुलगा पोपट शेळके हा कायमस्वरूपी हडस पिंपळगाव येथे स्थायिक झाला होता. अर्थात आजही स्थायिक आहे. मी माझ्या शिक्षकी आयुष्यातील सेवेची जवळ जवळ सात वर्षे याच हडस पिंपळगावात व्यतीत केली. मी त्यावेळी पालखेड येथून 

हडस पिंपळगावात दुचाकीवर येणे जाणे करायचो. आठवड्यातून तीन चार दिवस तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका माझ्या गाडीवर सोबत यायचे.ते ज्या ज्या वेळी यायचे , त्या त्या वेळी दुपारच्या मध्यांतरी शाळेच्या जवळच असणाऱ्या पोपट शेळके यांच्या घराच्या ओट्यावर निवांत त्यांच्याशी गप्पा मारायचो. नातं गावचं होतं, त्यातल्या त्यात आम्ही एकाच गल्लीतील मूळचे रहिवाशी असल्याने खूप आत्मियात होती.तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका यांनी प्रवासात, भेटीत, बैठकीत ज्या ज्या गोष्टी आयुष्यात समजावून सांगितल्या होत्या, त्या आयुष्यभर पुरून उरतील इतका मोठेपणा त्यात दडलेला आहे. 


तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड या दोन्ही ज्येष्ठांना आपल्यातून कायमचे निघून जाऊन कित्येक वर्षे झाली आहेत. आजही या दोन्ही ज्येष्ठांच्या सहवासातील प्रत्येक क्षण अन् क्षण सतत सोबत असतो.आयुष्यात कधी काही प्रसंग आलाच तर ज्या काही ज्येष्ठांची आवर्जून आठवण येते त्यात तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड हे दोघेही त्या आठवणीत नक्कीच असतात. कुणी देहाने भले आपल्या सोबत नसेल, पण जर आपण एखायावर निरपेक्ष प्रेम केलेलं असेल तर अशी स्वर्गवासी माणसं देखील आपल्या सोबत सतत असतात, याचा मला अनुभव आहे. अशावेळी ही स्वर्गवासी माणसं, आपल्या सोबत असल्याची जाणीव तेंव्हाच होत असते,जेंव्हा आपण अशा काही रक्ताच्या अन् बिगर रक्ताच्या जेष्ठ नात्यांना कृतीतून प्रेम दिलेलं असेल. 


असो, आम्ही स्वतः ला  सुशिक्षित अन् आधुनिक काळातील नागरिक समजत असल्यामुळे सर्वांना ख्रिस्त नवीन वर्षाच्या मन:पुर्वक शुभेच्छा..!🌹🙏🏻


वंदे मातरम्..!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १ जानेवारी ,२०२३, रविवार.

रविवार, १८ डिसेंबर, २०२२

गतकाळातील एकत्रित मैत्रीची भेट..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


गतकाळातील मैत्रीची एकत्रित भेट..!


===================================


शिक्षक म्हणून लाभलेल्या मैत्रीचं गारूड काय असतं याचा अनुभव याचि देही याची डोळा आम्ही इ. स.१९९५ ते साधारणतः इ. स. २००५ दरम्यान घेतला.त्या आठवणी आम्हा काही त्याकाळातील सोन्यासारख्या लाभलेल्या काही जिवलग मित्रांना मनाने कधीही म्हातारे होऊन देणार नाही याची त्या सर्व मित्रांच्या वतीने मला पक्की खात्री वाटते.


आज दिनांक १८/१२/२०२२, रविवार रोजी आमचा खूप जिवलग शिक्षक मित्र उदय तुळशीराम साळुंखे राहणार नाशिक याच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास आम्ही शिक्षक मित्र नाशिक येथे आवर्जून उपस्थित होतो. लग्न सोहळा आटोपल्या नंतर प्रिय मित्र नितीन पगार सर याच्या नाशिक येथील घरी जावेच लागले कारण तो आमच्या गळ्यातील ताईत होता अन् आहे हेच एकमेव कारण..!


आमच्या शिक्षक म्हणून नेमणुका ज्यावेळी लासुरगाव केंद्रांतर्गत विविध शाळेत झाल्या होत्या, त्याच वेळी मैत्रीची नाती बहरत गेली. माझ्या उजव्या बाजूला बसलेला मित्र नितीन पगार हा भिसेवाडी या शाळेत कार्यरत होता. याच्या शाळेतील पटसंख्या कमी होती. या शाळेत केशवराव तुपे सर अन् नितीन हे दोघेजण कार्यरत होते. पटसंख्या कमी असल्याने प्रिय मित्र नितीन पगार याचा नेहमी केंद्रांतर्गत शाळेत फुटबॉल व्हायचा. त्या काळातील नितीन पगार हा एकमेव असा शिक्षक होता, ज्याची केंद्रांतर्गत सरासरी प्रत्येक शाळेत नेमणूक झालेली होती. या आमच्या जिवलग मित्रावर माझ्या ब्लॉगवर मी एक लेख लिहिलेला आहे.


माझ्या डाव्या बाजूला आमचा प्रिय विद्यार्थी बबन हजारे बसलेला आहे. बबनच्या बाजूला संजय लक्ष्मणराव हुमे ( लासुरगावकर) आहे. संजय हुमे अन् मी  हडस पिंपळगाव येथे सोबत कार्यरत होतो. एकमेकांना कौटुंबिक आधार दिलेले आम्ही दोघेजण..! कौटुंबिक जबाबदाऱ्या विशेषतः आई वडिलांच्या बाबतीत त्या सांभाळून कुटुंबासाठी काहीतरी करणे यात संजय हुमे अन् माझ्यात एक समानता होती. याच धाग्यामुळे आमच्यात मैत्रीचा धागा घट्ट होत गेला. माणूस सतत त्याच्या सारखा भावनिक पातळीवर कुणी आढळतो का याच्या शोधात असतो हेच खरं..! खूप परखड स्वभाव असलेला संजय हुमेने त्याच्या मातोश्रीच्या निधनाच्या वेळी माझ्या गळ्यात पडून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. जबाबदारीचा खांदा सापडला की माणूस आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतो हा माणसाचा स्थायी भाव आहे. 


प्रिय मित्र संजय हुमेच्या बाजूला जेजुरे सर आहे. प्रिय मित्र जेजूरे याची अन् माझी आज तब्बल २६ वर्षानंतर भेट झाली.हा आमचा प्रिय मित्र त्यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक लासुरगाव येथे कार्यरत होता. सध्याला प्रिय मित्र जेजुरे हा नाशिक येथे स्थायिक झाला आहे. मितभाषी, खूप समंजस स्वभाव अन् गणित विषयावर प्रभुत्व ही या प्रिय मित्राची विशेष ओळख..! प्रिय मित्र जेजुरे अन् उदय साळुंखे हे इ.स.१९९५ नंतर काही वर्ष दोघेजण लासुरगाव येथे रूम पार्टनर होते. मी अन् प्रभाकर पवार अधून मधून यांच्या रूममध्ये मुक्कामी थांबायचो.प्रिय मित्र जेजुरे सर  आज खूप दिवसांनी भेटला. त्याच्या घरी मनसोक्त गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात तो माझ्या पालखेड गावचा सोयरा आहे हे समजल्यावर अजुन आत्मीयता निर्माण झाली. अर्थात मैत्रीची आत्मीयता होतीच,पण माझ्या जन्मगावाचा सोयरा म्हंटल्यावर माझाही सोयरा झाला हा आत्मियतेचा भाव निर्माण झाला.


सर्वात कडेला आमचा प्रिय मित्र प्रभाकर पवार हा त्याकाळी शहाजतपूर येथे कार्यरत होता. या प्रिय मित्रावर मी माझ्या ब्लॉगवर एक लेख लिहिलेला आहे. सम विचारांची नाळ जुळलेली असल्याने आमच्या मैत्रीच्या नात्यात तीच विण जुळलेली आहे जी आम्ही त्याकाळी लासुरगाव केंद्रांतर्गत सोबत असताना होती..! मनातलं काहीतरी व्यक्त करावं असं मन प्रिय मित्र प्रभाकर पवार यांच्याजवळ नक्कीच आहे याची  मला नेहमी जाणीव होत असते. मनातलं व्यक्त करायला देखील समोरचा विश्वासू असावा लागतो.


आज मैत्रीच्या त्याच काळातील विण आम्ही सर्व मित्रांनी उलगडली. आम्हाला आज  एकत्र आणण्याचे श्रेय जाते ते आमच्या सर्वांच्या गळ्यातील ताईत प्रिय मित्र नितीन पगार याला..! 


मित्रांनो, आज मन खूप  हलकं हलकं झालं. त्याचं त्या औपचारिक आयुष्यात वावरत असताना शरीर अन् मन देखील औपचारिक होऊन जाते. पर्यायाने माणूस देखील त्यांचं वर्तन औपचारिक करू लागतो. औपचारिक वर्तनात माणूस एखाद्या रोबोट सारखाच भासू लागतो. मनात रुक्षता येते अन् आपण सदैव शिक्षक आहोत याच औपचारिक वर्तनात तुमचे अन् माझे वर्तन कळत नकळतपणे होऊ लागते. मात्र जेंव्हा आपल्या एकमेकांसारखी अनौपचारिक शिक्षक मित्र मंडळी भेटते तेंव्हा औपचारिकतेचा बुरखा फाडल्या जाऊन अनौपचारिक मैत्रीचा शालू पांघरल्या सारखं वाटतं. मन कसं प्रसन्न होऊन जाते. जसे की आज वाटले.


वयाच्या चाळीशीनंतर त्याच आपल्या विशीतील मैत्रीची नाती आज भेटली अन् पुन्हा एकदा आपण त्याच आपापल्या त्या शाळेत कार्यरत होऊन पुन्हा तोच आनंद घ्यावा असं मनाने म्हंटले. पण माणसाच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी मनाच्या सल्ल्याने थोडीच होत असतात. वास्तवाचे भान अन् वास्तवातील जबाबदाऱ्या सांभाळत मनाला आपलं कार्य करत आयुष्यात पुढे जावे लागते. मित्रांनो एक मात्र खरं आहे की,आपण जो शिक्षक म्हणून कार्यकाळ एकमेकांच्या सोबत व्यतीत केला तो कार्यकाळ एकमेवच होता. आपल्या त्या काळातील नवतरुण शिक्षकांना स्वतः च्या लेकरा सारखं जपणारे आपले काही जेष्ठ शिक्षक सध्या हयात नाहीत.मात्र त्या सर्व स्वर्गवासी जेष्ठ शिक्षकांचा वडिलकीचा मायेचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत आहे. आपल्या भेटीत त्या जेष्ठ शिक्षकांची आठवण निघत नाही असे कदापि होत नाही अन् होणारही नाही. हीच तर आपल्या काळातील लासुरगाव केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांची खरी कमाई होती अन् आहे..!


प्रिय मित्रानो, भविष्यात पुन्हा एकदा भेटूच..! तेही नाशिकलाच..!! कारण आपला खूप जिवलग मित्र उदयची भेट होणे बाकी राहिली आहे..!🙏🏻


वंदे मातरम्..!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १८/१२/२०२२, रविवार.

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

आचार्य रजनीश उपाख्य ओशो


 


चिंतन ©️


" महान तत्ववेत्ता आचार्य रजनीश उपाख्य ओशो..! '


====================================


आज महान तत्ववेत्ता आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांचा  जन्मदिन आहे.( ज. दि. ११/१२/१९३१)

त्यानिमित्त  त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेला प्रथमतः विनम्र अभिवादन..!🙏


संपूर्ण मानवी वैचारिक सिद्धांतात माझ्या मते फक्त तिघेच असे पूर्णार्थाने सक्षम प्रगल्भ तत्त्वचिंतक झालेले आहेत. ते तिघेजण पुढील प्रमाणे होय.


(१) श्रीकृष्ण,

(२) सिद्धार्थ उपाख्य गौतम बुद्ध,

(३) आचार्य रजनीश उपाख्य ओशो..!


विशेष म्हणजे वरील तिघाही तत्ववेत्त्यांची बौद्धिक मिमांसा भिन्न भिन्न आहे, मात्र वास्तववादी आहे.


एखाद्यावर समाज एका विशिष्ट विचारसरणीचा शिक्का मारतो, पण वास्तवात समाजातील काहीजण जसे समजतात त्यापेक्षा एका वेगळ्याच वैचारिक उंचीवरील काही तत्त्वचिंतक असतात. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आचार्य रजनीश उपाख्य ओशो होय.


ओशो यांच्या ' संभोगातून समाधीकडे ' या पुस्तकामुळे त्यांच्यावर  अश्लीलतेचा शिक्का समाजव्यवस्थेने मारला. अर्थात असा शिक्का मारण्यात याच समाजव्यवस्थेतील प्रगल्भ वाचक अन् विचार करणारे नव्हते,तर पिढ्यानपिढ्या एका बंदिस्त अन् चाकोरीबद्ध वैचारिक अन् धार्मिक क्षेत्रातील  मानवी घटक होते. ' संभोगातून समाधीकडे ' असे पुस्तकाचे शीर्षक आहे म्हंटल्यावर त्यात निव्वळ अश्लीलतेचा भरणा असेल अशी चूक समाजातील काही मानवी घटकांनी केली अन् खूप गदारोळ झाला. संपूर्ण विश्वातील मानवाला आपल्याच पूर्वजांनी खजुराहो , कोणार्क येथील अद्वितीय शिल्पकलेच्या द्वारे स्री अन् पुरुष यांच्या भावोत्कट नात्याचा परिचय करून दिला आहे. मी या दोन्ही ठिकाणी भेट दिलेली आहे. खजुराहो अन् कोणार्क येथील अद्वितीय शिल्पकलेला बघितल्यावर लक्षात येते की, आपले पूर्वज किती उच्च कोटीच्या वैचारिक उंचीवरील होते. अर्थात खजुराहो अन् कोणार्क येथील अद्वितीय शिल्पकलेत ज्यांनी फक्त आणि फक्त अश्लीलता बघितली , अशांच्या वैचारिक क्षमतेला मर्यादा आल्या. मात्र ज्यांनी याच शिल्पकलेत आपल्या पूर्वजांची प्रगल्भता बघितली , मग पटते की, त्याकाळी आपल्या पूर्वजांनी किती प्रगल्भतेने एवढे मोठे कार्य आपल्या पिढीसाठी करून ठेवलेले आहे.


इतिहास साक्षीला आहे, जेंव्हा जेंव्हा परंपरागत वैचारिक सिद्धांताला छेद देणारे विचार कुणी व्यक्त करतो किंवा करते त्या त्यावेळी अशा विचारवंतांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागलेले आहे.ओशो ही याला अपवाद ठरले नाही. 


अतिशय कुशाग्र बुद्धीच्या बळावर अन् आपल्यातील अलौकिक वाकचातुर्याच्या सामर्थ्यावर आचार्य रजनीश यांनी समाज व्यवस्थेला हादरवून सोडले होते. ओशो यांची पुस्तकं अन् विविध व्याख्याने माणसाच्या मेंदूला सृजनशील अन् प्रगल्भ नक्कीच बनवतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आचार्य रजनीश यांनी त्याकाळी जे काही विचार व्यक्त केले होते ते त्याकाळच्या प्रत्येक धर्मातील धर्मगुरूंना पटणारे नव्हते. याचा अर्थ असाही होत नाही की, आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांनी जे जे व्यक्त केले आहे ते आपण पूर्णतः मान्यच करावे..! असे जर होत असेल तर मग आपण ओशो यांच्या मूळ सिध्दांताचेच अनुकरण करत नाही असा त्याचा अर्थ होतो. आपल्या तर्कसंगत बुध्दीच्या पटलावर प्रत्येक विचार, सार्वजनिक आयुष्यातील व्यक्तींचे जीवन इत्यादी अनेकानेक बाबींना ज्यावेळी आपण पडताळून आपली मते तयार करतो तेंव्हाच प्रगल्भ समाजाची स्थापना होते. प्रत्येकात गुण आहेत तसे दोषही आहेत.फक्त एकांगी मते व्यक्त करू नये असाच सार आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांच्या बऱ्याच विचारात जाणवतो.


आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांनी जी मते व्यक्त केली, ती पूर्णतः वस्तुनिष्ठ होती. वस्तुनिष्ठ यासाठी म्हणतोय की, ओशो यांनी ज्याच्यात जे योग्य आहे त्याचे समर्थन अन् विवेचन केले,मात्र त्याचवेळी ज्याच्यात जे अयोग्य आहे त्यावर कोणतीही भीडभाड न ठेवता विवेचन केले. प्रत्येकात जशी योग्यता असते, अगदी तशीच प्रत्येकात अयोग्यता देखील असते.याच वस्तुनिष्ठ वैचारिक बैठकीत ओशोंनी आपल्या असामान्य व्यक्तिमत्त्वाला समाजाच्या समोर प्रस्तुत केले.


सार्वजनिक आयुष्यातील व्यक्तींना ओशोंनी संवेदनशील बनवलं नाही. याउलट सार्वजनिक आयुष्यातील व्यक्तींना ओशो यांनी आपल्या प्रगल्भ वैचारिक सिध्दांतांद्वारे श्रोत्यांच्या अन् वाचकांच्या समोर प्रस्तुत केले. मी इ. स. १९९९ मध्ये ओशो यांचं ' गांधीवाद एक व्यथा ' हे पुस्तक वाचले होते.खूपच सैद्धांतिक मांडणी या पुस्तकात ओशो यांनी केलेली आहे. मी मागील आठवड्यात औरंगाबाद शहरातील पुस्तकांच्या विविध दुकानात ' गांधीवाद एक व्यथा ' या पुस्तकाची चौकशी केली,पण कुठेही हे पुस्तक उपलब्ध नव्हते. महात्मा गांधी एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र व्यक्तिमत्व होते,पण त्यांनी अंगिकारलेला गांधीवाद अन् त्यातून निर्माण झालेली समाजव्यवस्थेची व्यथा याचे खूप अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकात ओशो यांनी केलेलं आहे.


असो ओशोवर खूप काही व्यक्त करता येईल,पण आटोपते घेतो, कारण सगळेच वाचक प्रगल्भ वाचक नसतात..!🙏🏻


ता.क.: जून १९९८ पासून ओशो साहित्य संपर्कात आहेच. !


वंदे मातरम्


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: ११/१२/२०२२, रविवार.