मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
गतकाळातील मैत्रीची एकत्रित भेट..!
===================================
शिक्षक म्हणून लाभलेल्या मैत्रीचं गारूड काय असतं याचा अनुभव याचि देही याची डोळा आम्ही इ. स.१९९५ ते साधारणतः इ. स. २००५ दरम्यान घेतला.त्या आठवणी आम्हा काही त्याकाळातील सोन्यासारख्या लाभलेल्या काही जिवलग मित्रांना मनाने कधीही म्हातारे होऊन देणार नाही याची त्या सर्व मित्रांच्या वतीने मला पक्की खात्री वाटते.
आज दिनांक १८/१२/२०२२, रविवार रोजी आमचा खूप जिवलग शिक्षक मित्र उदय तुळशीराम साळुंखे राहणार नाशिक याच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास आम्ही शिक्षक मित्र नाशिक येथे आवर्जून उपस्थित होतो. लग्न सोहळा आटोपल्या नंतर प्रिय मित्र नितीन पगार सर याच्या नाशिक येथील घरी जावेच लागले कारण तो आमच्या गळ्यातील ताईत होता अन् आहे हेच एकमेव कारण..!
आमच्या शिक्षक म्हणून नेमणुका ज्यावेळी लासुरगाव केंद्रांतर्गत विविध शाळेत झाल्या होत्या, त्याच वेळी मैत्रीची नाती बहरत गेली. माझ्या उजव्या बाजूला बसलेला मित्र नितीन पगार हा भिसेवाडी या शाळेत कार्यरत होता. याच्या शाळेतील पटसंख्या कमी होती. या शाळेत केशवराव तुपे सर अन् नितीन हे दोघेजण कार्यरत होते. पटसंख्या कमी असल्याने प्रिय मित्र नितीन पगार याचा नेहमी केंद्रांतर्गत शाळेत फुटबॉल व्हायचा. त्या काळातील नितीन पगार हा एकमेव असा शिक्षक होता, ज्याची केंद्रांतर्गत सरासरी प्रत्येक शाळेत नेमणूक झालेली होती. या आमच्या जिवलग मित्रावर माझ्या ब्लॉगवर मी एक लेख लिहिलेला आहे.
माझ्या डाव्या बाजूला आमचा प्रिय विद्यार्थी बबन हजारे बसलेला आहे. बबनच्या बाजूला संजय लक्ष्मणराव हुमे ( लासुरगावकर) आहे. संजय हुमे अन् मी हडस पिंपळगाव येथे सोबत कार्यरत होतो. एकमेकांना कौटुंबिक आधार दिलेले आम्ही दोघेजण..! कौटुंबिक जबाबदाऱ्या विशेषतः आई वडिलांच्या बाबतीत त्या सांभाळून कुटुंबासाठी काहीतरी करणे यात संजय हुमे अन् माझ्यात एक समानता होती. याच धाग्यामुळे आमच्यात मैत्रीचा धागा घट्ट होत गेला. माणूस सतत त्याच्या सारखा भावनिक पातळीवर कुणी आढळतो का याच्या शोधात असतो हेच खरं..! खूप परखड स्वभाव असलेला संजय हुमेने त्याच्या मातोश्रीच्या निधनाच्या वेळी माझ्या गळ्यात पडून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. जबाबदारीचा खांदा सापडला की माणूस आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतो हा माणसाचा स्थायी भाव आहे.
प्रिय मित्र संजय हुमेच्या बाजूला जेजुरे सर आहे. प्रिय मित्र जेजूरे याची अन् माझी आज तब्बल २६ वर्षानंतर भेट झाली.हा आमचा प्रिय मित्र त्यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक लासुरगाव येथे कार्यरत होता. सध्याला प्रिय मित्र जेजुरे हा नाशिक येथे स्थायिक झाला आहे. मितभाषी, खूप समंजस स्वभाव अन् गणित विषयावर प्रभुत्व ही या प्रिय मित्राची विशेष ओळख..! प्रिय मित्र जेजुरे अन् उदय साळुंखे हे इ.स.१९९५ नंतर काही वर्ष दोघेजण लासुरगाव येथे रूम पार्टनर होते. मी अन् प्रभाकर पवार अधून मधून यांच्या रूममध्ये मुक्कामी थांबायचो.प्रिय मित्र जेजुरे सर आज खूप दिवसांनी भेटला. त्याच्या घरी मनसोक्त गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात तो माझ्या पालखेड गावचा सोयरा आहे हे समजल्यावर अजुन आत्मीयता निर्माण झाली. अर्थात मैत्रीची आत्मीयता होतीच,पण माझ्या जन्मगावाचा सोयरा म्हंटल्यावर माझाही सोयरा झाला हा आत्मियतेचा भाव निर्माण झाला.
सर्वात कडेला आमचा प्रिय मित्र प्रभाकर पवार हा त्याकाळी शहाजतपूर येथे कार्यरत होता. या प्रिय मित्रावर मी माझ्या ब्लॉगवर एक लेख लिहिलेला आहे. सम विचारांची नाळ जुळलेली असल्याने आमच्या मैत्रीच्या नात्यात तीच विण जुळलेली आहे जी आम्ही त्याकाळी लासुरगाव केंद्रांतर्गत सोबत असताना होती..! मनातलं काहीतरी व्यक्त करावं असं मन प्रिय मित्र प्रभाकर पवार यांच्याजवळ नक्कीच आहे याची मला नेहमी जाणीव होत असते. मनातलं व्यक्त करायला देखील समोरचा विश्वासू असावा लागतो.
आज मैत्रीच्या त्याच काळातील विण आम्ही सर्व मित्रांनी उलगडली. आम्हाला आज एकत्र आणण्याचे श्रेय जाते ते आमच्या सर्वांच्या गळ्यातील ताईत प्रिय मित्र नितीन पगार याला..!
मित्रांनो, आज मन खूप हलकं हलकं झालं. त्याचं त्या औपचारिक आयुष्यात वावरत असताना शरीर अन् मन देखील औपचारिक होऊन जाते. पर्यायाने माणूस देखील त्यांचं वर्तन औपचारिक करू लागतो. औपचारिक वर्तनात माणूस एखाद्या रोबोट सारखाच भासू लागतो. मनात रुक्षता येते अन् आपण सदैव शिक्षक आहोत याच औपचारिक वर्तनात तुमचे अन् माझे वर्तन कळत नकळतपणे होऊ लागते. मात्र जेंव्हा आपल्या एकमेकांसारखी अनौपचारिक शिक्षक मित्र मंडळी भेटते तेंव्हा औपचारिकतेचा बुरखा फाडल्या जाऊन अनौपचारिक मैत्रीचा शालू पांघरल्या सारखं वाटतं. मन कसं प्रसन्न होऊन जाते. जसे की आज वाटले.
वयाच्या चाळीशीनंतर त्याच आपल्या विशीतील मैत्रीची नाती आज भेटली अन् पुन्हा एकदा आपण त्याच आपापल्या त्या शाळेत कार्यरत होऊन पुन्हा तोच आनंद घ्यावा असं मनाने म्हंटले. पण माणसाच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी मनाच्या सल्ल्याने थोडीच होत असतात. वास्तवाचे भान अन् वास्तवातील जबाबदाऱ्या सांभाळत मनाला आपलं कार्य करत आयुष्यात पुढे जावे लागते. मित्रांनो एक मात्र खरं आहे की,आपण जो शिक्षक म्हणून कार्यकाळ एकमेकांच्या सोबत व्यतीत केला तो कार्यकाळ एकमेवच होता. आपल्या त्या काळातील नवतरुण शिक्षकांना स्वतः च्या लेकरा सारखं जपणारे आपले काही जेष्ठ शिक्षक सध्या हयात नाहीत.मात्र त्या सर्व स्वर्गवासी जेष्ठ शिक्षकांचा वडिलकीचा मायेचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत आहे. आपल्या भेटीत त्या जेष्ठ शिक्षकांची आठवण निघत नाही असे कदापि होत नाही अन् होणारही नाही. हीच तर आपल्या काळातील लासुरगाव केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांची खरी कमाई होती अन् आहे..!
प्रिय मित्रानो, भविष्यात पुन्हा एकदा भेटूच..! तेही नाशिकलाच..!! कारण आपला खूप जिवलग मित्र उदयची भेट होणे बाकी राहिली आहे..!🙏🏻
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: १८/१२/२०२२, रविवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा