रविवार, २७ ऑगस्ट, २०२३
देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक २)
मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३
काळाची गरज..!
मला प्रवासात भेटलेली माणसं.©️
काळाची गरज..!
====================================
आज दिनांक २२/८/२०२३, मंगळवार रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथील मुख्य बस स्थानकातून मी बसने प्रवासाला निघालो होतो.बस मध्ये बसते वेळीच बस फुल्ल झालेली होती. पाठीमागे एक जागा शिल्लक दिसली. जी एकच जागा शिल्लक होती त्या सीट कडे गेलो.तिथं खिडकीच्या बाजूला साधारणतः वीस ते पंचवीस वर्षाची एक विवाहित स्री बसलेली होती. मी त्या महिलेला त्यांच्या बाजूच्या जागेवर कुणी बसणार आहे का याविषयी विचारले.त्या महिलेने नकारार्थी उत्तर दिले.मग मी त्या महिलेला पुन्हा विचारले की , मी इथे बसू का..? त्या महिलेने होकारार्थी उत्तर दिले.मी त्या महिलेच्या बाजूच्या जागेवर बसलो.
आमची बस हर्सूल टी पॉइंट वर आली होती.आता बसमध्ये बसणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.बसमध्ये साधारणतः सत्तर टक्के महिलाच होत्या. बस मधल्या ओपन स्पेस मध्ये इथुन तिथून महिलाच महिला उभ्या होत्या. आमची बस चौका घाटात आली होती. माझ्या सीटच्या पुढे एक पन्नाशीच्या आसपास असलेली एक महिला उभी होती.चौका घाट पार पडल्यावर आमची बस सुसाट सुटली होती.ती पन्नाशीच्या आसपास असलेली महिला तिच्या आजूबाजूला असलेल्या महिलांना धक्के देत देत माझ्याकडे आली. आल्या आल्या मला ती महिला म्हणाली..
" भाऊ, थोडं तिकडं सरका ना, मला बसू द्या..!"
मी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.थोड्या वेळाने ती महिला पुन्हा मला म्हणाली..
" ओ.. भाऊ थोडं तिकडं सरका ना, मला बसू द्या ना..!"
आता मात्र मी त्या पन्नाशीच्या आसपास असलेल्या महिलेला म्हणालो..
" हे बघा ताई, माझ्या बाजूलाच अगोदर एक महिला बसलेली आहे. त्यात पुन्हा तुम्ही माझ्या बाजूला बसलात तर माझ्या बाजूच्या या ताईंना माझा धक्का लागू शकतो.त्यामुळं मी तुम्हाला बसवून घेऊ शकत नाही.माफ करा..!"🙏🏻
मी असे म्हंटल्यावर ती महिला काही वेळ शांत बसली. फुलंब्रीच्या अलीकडे काही अंतरावर आमची बस आली होती.आता ती पन्नाशीच्या आसपास असलेली महिला पुन्हा मला म्हणाली..
" ओ भाऊ , सरका ना पण थोड तिकडं, बाई माणूस हाये, थोडी जागा दिली तर काय बिघडतं..?"
त्या महिलेने तिचे शेवटचे सहानुभूतीचे शस्त्र बाहेर काढल्यामुळे आता मात्र मला मूळ मुद्द्यावर बोलणे आवश्यक झाले होते.
मी त्या पन्नाशीच्या आसपास असलेल्या महिलेला अन् तिच्या आसपास उभ्या असलेल्या महिलांकडे बघून म्हणालो..
" हे बघा ताई, मला तुम्हाला माझ्या बाजूला बसून घ्यायला काहीच हरकत नाही, मात्र मी मघाशीच तुम्हाला सांगितले की,माझ्या बाजूच्या या ताईंना माझा धक्का लागू शकतो. त्यामुळं मी तुम्हाला बसवून घेऊ शकत नाही. रस्त्याने प्रवासात चुकून हुकुन , बसच्या असंतुलित वेगामुळे जर माझ्या बाजूच्या महिलेला माझा नकळतपणे चुकीचा धक्का लागलाच तर पुन्हा याचं ताई माझ्यावर चुकीचा आक्षेप घेतील. शेवटी कायदा तुमच्या बाजूने आहे. त्यात माझं नाहक मरण होईल.."
बसमध्ये बाजूला उभ्या असलेल्या अनेक महिला अन् माझ्या बाजूला बसलेली महिला हे सर्व शांतपणे ऐकून घेत होती. शेवटी मी त्या पन्नाशीच्या आसपास असलेल्या महिलेला म्हणालो की, " ताई, तुम्हाला बसायचेच असेल तर, तुम्हीच माझ्या बाजूला बसलेल्या या ताईंना विचारा की, दाटीवाटी झाली तर चालेल का..? तुमचा काही आक्षेप तर नाही ना..? त्यावर जर या ताईंना काहीच हरकत नसेल तर खुशाल बसा..! आणि हो..तुम्ही सर्व जण देखील हे बघत आहात अन् ऐकत आहात..!" असे मी आजूबाजूला उभ्या असलेल्या महिलांना म्हणालो.
अखेर त्या महिलेने माझ्या बाजूला बसलेल्या महिलेला विचारले. माझ्या बाजूला बसलेली महिला म्हणाली की, " माझी काही हरकत नाही,बसा..!"
मग मी त्या पन्नाशीच्या आसपास असलेल्या महिलेला म्हणालो.. " आता बसा..! कसं आहे ताई, तुम्ही राग मानू नका,पण काळाची गरज आहे म्हणून मी थोडं स्पष्टपणे बोललो..!
दोन महिलांच्या मध्ये बसून मी पुढील प्रवास पूर्ण केला अन् माझ्या इच्छित स्थळी बस पोचल्यावर बसधील उभ्या असलेल्या गर्दीतून वाट काढत काढत खाली उतरलो.
वंदे मातरम्
एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
लेख शीर्षक श्रेय माझी धर्मपत्नी - सौ. शारदा नंदन जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
लाल परी बस फोटो स्रोत - गुगल
दिनांक - २२/८/२०२३, मंगळवार, शुभ रात्री.
रविवार, २० ऑगस्ट, २०२३
देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक १)
मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️
देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक १)
===================================
माझ्या बालपणी आमच्या घराच्या समोरील बाजूस असणाऱ्या श्री. पारेश्वर महादेवाच्या मंदिरात नेहमी दर्शनाला जाणे होत असायचे. त्यावेळी आज सध्या तिथं जे संत जनार्दन स्वामी महाराज यांचे मंदिर आहे तिथं एक कुटिया होती. त्यावेळी दत्तागिरी महाराज मठाधिपती होते.त्या कुटियात एक कागदी जाड पुठ्ठ्यावर बारा ज्योतिर्लिंगांचा फोटो, त्याखाली त्यांचे नाव अन् सर्वात खाली बारा ज्योतिर्लिंग मंत्र लिहिलेला होता. बाबाजींच्या पादुकांचे दर्शन झाले की, मी तो बारा ज्योतिर्लिंग मंत्र वाचत असे. त्या फोटोतील बारा ज्योतिर्लिंगांचे क्रमवार दर्शन घेत असे.त्याच फोटोतील बर्फाच्या पर्वतात वेढलेल्या बाबा केदारनाथाचे पण दर्शन व्हायचे. बर्फाच्या पर्वतात वेढलेल्या बाबा केदारनाथ मंदिराला बघून एक इच्छा व्हायची की, आपणही आयुष्यात कधी तरी याचं ठिकाणी जाऊ अन् काही वेळ तिथं व्यतीत करू..!ते एक श्रद्धेय स्वप्न उराशी बाळगून वयाने मोठा होत गेलो.मात्र वय वाढत होते,पण बालपणी उराशी बाळगून असलेलं बाबा केदारनाथ येथे जाण्याचे स्वप्न मनात सतत तारुण्याची कास धरून होते.
जेंव्हा इ.स. १९९७ -९८ मध्ये वेरूळ येथे महादेवाच्या सानिध्यात अनुष्ठान केले होते, तेंव्हा याच दर्शनाच्या ओढीला, श्रद्धेने उराशी बाळगून मनाशी अजून ठाम निर्णय होत गेला..आयुष्यात कधी तरी सह परिवार केदारनाथ बाबाच्या चरणी पायी चालत चालत जाऊन लीन होईल..! आपल्या इष्टावर मग ते इष्ट जिवंत स्वरूपातील असो अथवा त्याच जिवंत स्वरूपाला जिवंत ठेवणारे अदृश्य शक्तीचे असो त्यावर जर श्रद्धा असली की, त्याला नक्कीच फळ लागते यावर माझा प्रचंड विश्वास होता. अर्थात आजही आहे अन् तहहयात राहील. गौरी कुंड ते केदारनाथ बाबाच्या चरणी पायी चालत चालत जाऊन लीन होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवसामागून दिवस जात होते,पण सगळं काही जमून येत नव्हते. आपल्या अंतर्मनाततील असलेला श्रद्धेय , जेंव्हा आपल्याला अंतर्मनातून आपल्याला हाक देतो, तेंव्हा श्रद्धा अन् त्यावर निष्ठा असणाऱ्या भावूक मनांचे श्रद्धेय मिलन नक्कीच होते हा माझा स्वानुभव आहे.
अखेर माझ्या बालपणी अंतर्मनात बघितलेले बाबा केदारनाथाचे निवांत अन् पायी चालत जाऊन दर्शन घेण्याचे स्वप्न प्रौढ आयुष्याच्या टप्प्यावर पूर्ण झाले. माणसाच्या आयुष्यातील काही स्वप्न नक्कीच पूर्ण होतात, फक्त ती स्वप्न महादेवाला मान्य असणारी असावीत. थोडक्यात कुणाच्याही मनाला न दुखवता अन् दुसऱ्याच्या अंतर्मनातील मुक्या शिव्या शाप न घेता उराशी बाळगलेली स्वप्न असावीत. ती स्वप्न पूर्ण करताना समोरच्याच्या अंतर्मनातील मुक्या शिव्या शाप घेऊन पूर्ण झाली तर मिळालेलं सौख्य भले सुखी दिसत असेल, मात्र खोलवर कुठेतरी हाय लागलेली असते. असो, महादेवाच्या दरबारात जाण्याचे स्वप्न अखेर मे २०२३ मध्ये पूर्ण होणार होते.
मे २०२३ या महिन्यात केदारनाथ बद्रीनाथ येथे वैयक्तिक कुटुंबाच्या सोबतच जाण्याचे मी नियोजित केले होते.मी आता पर्यंत भारतातील अनेक स्थळे सह परिवारच पर्यटन अन् श्रद्धेने बघितली होती. त्या सर्व प्रवासांचे नियोजन करायला सोपे गेले होते.कारण ती स्थळे मैदानी प्रदेशातील होती.निसर्गाचा असमतोल भाग तिथं नव्हता.मात्र माझ्या आज पर्यंतच्या भटकंतीच्या प्रवासातील नियोजनाचा कस केदारनाथ बद्रीनाथ प्रवासात लागणार होता.एकतर तिथली अतिशय खडतर पर्वतीय भौगोलिक परिस्थिती, कुटुंब सोबत अन् जिथं जाणार होतो, तिथलं बदलतं हवामान..!यामुळं निघण्याच्या पूर्व तयारी मध्ये सारखं तिथल्या भौगोलिक अन् बदलत्या नैसर्गिक हवामानाचा अंदाज घेऊन सगळं नियोजन करणं आवश्यक होते. त्यातल्या त्यात जिथं जाणार होतो तिथल्या प्रवासाचे कितीही काटेकोर नियोजन करा, शेवटी सगळं काही निसर्गाच्या रौद्र रूपी लहरीवर अवलंबून राहणार होते.
असं म्हणतात की, केदारनाथ बद्रीनाथ प्रवास हा हिंदू धर्मातील अतिशय खडतर, जोखमीच्या मात्र तितक्याच अतिशय पवित्र श्रद्धेचा प्रवास..! आता थेट गौरी कुंड पर्यंत वाहने जात असल्यामूळे तितकासा नाही, मात्र तिथून पुढील प्रवास विशेषतः पायी फार खडतर असं ऐकून होतो. तरी देखील ऋषिकेश ते सोनप्रयाग हा अंगावर येणारा घाटांचा प्रवास ऐकून होतो .जोखमीचा प्रवास असल्यामूळे मी माझी बंद पडलेली LIC policy सुरू करण्याचे ठरवले. LIC policy म्हंटल्यावर मृत्यू अन् त्या पश्चात मिळणारे आर्थिक फायदे हे जणू समीकरणच झालेले आहे अन् ते खरं देखील आहे. त्याच समीकरणाच्या अर्थाने मी माझी बंद पडलेली LIC policy सुरू करण्याचे ठरवले. शाश्वत सत्य असलेल्या मृत्यूचा विचार करून अन् येणाऱ्या अन् होणाऱ्या परिणामांचा वास्तववादी विचार करून प्रवास करण्याचे मी माझ्या कुटुंबातील दोन्ही मुले अन् धर्मपत्नी या सर्व सदस्यांना सांगितले होते. जर तुमची तयारी असेल तरच चला नसता मी असाही एकटा जाणारच आहे.यावर त्यांचा प्रामाणिक होकार आल होता.दिनांक १२/५/२०२३ रोजी छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील LIC कार्यालयात आमचे जन सहयोग सामाजिक संस्थेतील अतिशय प्रेमळ अन् पोक्त विचारांचे व्यक्तिमत्व आदरणीय प्रदीप भैय्या यादव यांच्याकडे चौकशी केली.तिथं योग्य ते मार्गदर्शन मिळाले अन् वैजापूर येथील LIC कार्यालयात बंद पडलेल्या policy ची रक्कम जमा करण्याचे ठरवले.सर्व सोपस्कार पार पाडून माझा खूप जिवलग बालमित्र डॉ.संजय राऊत ( परसोडा, ता. वैजापूर) याने पुढील प्रक्रिया राबवली.
तत्पूर्वी म्हणजेच मे २०२३ पूर्वी माझे असे पक्के नियोजन होते की, जसे दरवर्षी मी फक्त माझ्याच कुटुंबाच्या सोबत कुठे ना कुठे तरी भटकंती करत असतो, त्याच नियोजित हेतूने याही वर्षी भटकंतीला जाण्याचे नक्की केले होते. केदारनाथ बद्रीनाथ तीर्थयात्रेला जाणार असे नक्की केले होते.मात्र मागे एकदा माझे जिवलग शिक्षक मित्र नंदलाल रामलाल सलामपूरे सर मला म्हणाले होते की, " सर , तुम्ही प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे तरी सह परिवार प्रवासाला जातातच.यावेळी मलाही सोबत न्या..!" त्या वाक्याची मला आठवण आली अन् मी सलामपूरे सरांना एक कॉल केला.त्यांना मी सह परिवार जाणार असणाऱ्या प्रवासाच्या बाबतीत सांगितले.तुम्ही येणार का..? तुम्ही मागे म्हंटले होते की, मला एक शब्द विचारा म्हणून..!" यावर सलामपूरे सरांनी त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करून कळवतो असे सांगितले अन् मला सलामपूरे सरांचा होकार आला. मी पुन्हा एकदा विचार करून कळवा, कारण प्रवास अतिशय खडतर राहणार आहे.विचार करायला एक दिवस अजून दिला.अखेर सरांचा खात्रीशीर होकार आला. दूरच्या प्रवासात सम विचारी अन् आहे त्या परिस्थितीत प्रवास , वास्तव्य करणारे असले तरच प्रवास सुखकर होतो. इथे तर कस लागणार होता.सलामपूरे सर समजूतदार अन् शांत स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्यामुळे मी त्या बाबतीत निश्चिंत होतो.
वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻
एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - २१ऑगस्ट २०२३, श्रावण मास, सोमवार.
क्रमशः
रविवार, ६ ऑगस्ट, २०२३
" मित्र अन् मित्रांची मैत्री "
चिंतन ©️
"मित्र अन् मित्रांची मैत्री "
====================================
भारतीय संस्कृतीत फार पूर्वी पासून निसर्गाशी संबंधित ,मानवी नात्यांच्या संबंधित विविध सण,उत्सव,दिनविशेष साजरी करण्याची महान परंपरा होती व आहे. पण आपले बरेचशे शोध, संशोधन ,उपक्रम पाश्चात राष्ट्रांनी उचलले. हेच आपले शोध,ज्ञान,दिनविशेष उपक्रम यांना पाश्चात देशांनी संकरित स्वरूपात जगासमोर सादर केले. त्याचे उदाहरण आजचा दिनविशेष मैत्री दिन..! त्याचे इंग्रजी संस्करण Friendship Day..!
या दिना संदर्भात आपल्या भारतीय संस्कृतीत भगवान श्रीकृष्ण व सुदामा यांचे उदाहरण फार पुरातन आहे. फक्त त्यांच्या भेटीच्या दिनांकाला मैत्री दिन साजरा होत नाही इतकंच..! बहुधा ती दिनांक ज्ञात नसावी..!अशीच निखळ मैत्रीची अनेक उदा.आहेत.फक्त या अनेक मैत्रीच्या उदाहरणांना ,शोधांना,संशोधनांना आजच्या भाषेत " Marketing " आपल्याला जमले नाही..आणि या बाबतीत पाश्चात देश पटाईत होते व आहेत. मैत्री दिन खरा आपला..पण, marketing केले पाश्चिमात्यांनी..!
आता हा मैत्री दिन याचे संकरित रूप जरी पाश्चात देशातून आलेले असले,तरी त्यातील मूल्ये मुळात आपली भारतीय व नैतिकतेच्या मापदंडावर आधारलेलीआहेत. पाश्चात देशांनी आपल्या या मूल्यांना कसे सादर केले पाहू...
फ्रेंडशिप डे चा औपचारिक प्रारंभ सन 1919 मध्ये झाला. पहिल्या महायुध्दानंतर जनतेला एकमेकांविषयी भिती, अविश्वास निर्माण झाला होता.या बाबी नाहीश्या करण्यासाठी अमेरिकी सरकारने ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा मैत्री दिन साजरा करण्याचे ठरविले आणि तो आजतागायत सुरू आहे. मुळात एक लक्षात जर घेतले तर कोणत्याही नात्यातील पवित्र बंधनाला कोणताही एखादा दिवस बंधिस्त करू शकत नाही. समाज कोणत्याही नात्यातील भाव व्यक्त करण्यासाठी एका विशिष्ट दिवसाची निवड करतो अन् आपण तो त्या त्या दिवशी साजरा करतो इतकेच..! त्यात गैर काही नाही. तो दिन विशेषचा भाव सदैव अंतर्मनात राहिला तरच त्या कोणत्याही एका विशिष्ट दिवसाची महत्ता टिकून राहते.नसता तो फक्त भडक ' इव्हेंट ' होतो.
मित्र अन् जिवलग मित्र यात पुसटशी रेषा असते, जी या दोन्ही नात्यातील सूक्ष्म अंतर राखून असते. जिवलग मित्रांच्या सहवासात आपण आपलं सगळं दुःख , वेदना अन् हालाखी व्यक्त करू शकतो. मित्रांच्या सहवासात या गोष्टी सहसा होत नाहीत.त्याचं कारण जिवलग मित्रांना एकमेकांचा इतिहास, भूगोल माहीत असतो.अन् माझ्या मते ज्या माणसांना एकमेकांचा इतिहास - भूगोल माहीत असतो अशी माणसं एकमेकांच नागरिकशास्त्र चांगलं जाणून असतात.यालाच मैत्रीच्या विश्वात जिवलग मित्र असे म्हणतात. याचा अर्थ असाही होत नाही की, आयुष्यात जिवलग मित्रांपेक्षा मित्रांचे अस्तित्व नसते. जेवढं स्थान जिवलग मित्रांचे स्थान आयुष्यात असते किंबहुना त्यापेक्षा काकणभर कमी किंवा त्यापेक्षा कमी मित्रांचे स्थान आयुष्यात असते. ते स्थान काकणभर कमी असण्याचे कारण एकमेकांच्या आयुष्यातील सामाजिक शास्त्रांच्या घटकांची माहिती नसणे. जेंव्हा मित्रांमध्ये एकमेकांच्या आयुष्यातील सामाजिक शास्त्रांच्या घटकाची माहिती, जाणीव एकमेकांना होत जाते, होते तेंव्हा त्याच मैत्रीचे रुपांतर जिवलग मित्रांमध्ये होत जाते हे मात्र खरं..! एकमेकांच सामाजिक शास्त्र जे जाणून असतात तेच मानसिकदृष्ट्या एकमेकांचे जिवलग मित्र होऊ शकतात.जर असे झाले नाही तर आपल्या भोवती असणाऱ्या ' मित्रांचा फक्त गराडा ' असतो बाकी काही नाही. तो गराडा ना आत्मिक समाधान मिळवून देतो ना भावनिक भूक भागवतो..! तिथं फक्त आणि फक्त असतो व्यवहार, स्पर्धा , असूया, तडजोड, जात पात धर्म बघून वर्तन ठरवणे इत्यादी..! या सर्व बाबी मैत्रीची बीजे अंकुरण्यासाठी पोषक नसतात यातून फक्त मैत्रीचे निरुपयोगी गाजर गवत वाढू लागते. अशा ठिकाणी जिवलग मैत्रीचा गुलाब पुष्पांचा बहर येत नाही. जिवलग मित्र असा नामोल्लेख अथवा लेखन केले म्हंटले कुणी जिवलग मित्र होत नसतो, जिवलग मित्र होण्यासाठी , असण्यासाठी मनातून जिवलग भाव महत्त्वाचा असतो हे सर्वात महत्त्वाचे असते..!
बालपणातील मैत्री अल्लडपणा शिकवते तर पौगंडावस्थेतील मैत्री ही मित्रांना भुरळ घालते. प्रत्येक वयोगटातील आपला स्वभाव अशा मैत्रीला भुरळ घालतो.आपले अजातशत्रूपण मैत्रीला भुरळ घालते.एकमेकांवर असलेले निरपेक्ष प्रेम अशा मैत्रीला भुरळ घालते.एकमेकांचे भौगोलकदृष्ट्या कितीही अंतर असले तरी, एकमेकांची भावनिक ओढ मैत्रीला भुरळ घालते.
माझ्या आयुष्यातील सर्वात पहिला जिवलग मित्र स्व.आप्पा धोंडीबा सुराशे याच्या करिता मी , विजू गायकवाड, सोमनाथ गायकवाड अन् रमेश गायकवाड आमच्या पालखेड येथील घरापासून अंदाजे ३ ते ४ कि.मी.अंतरावर असलेल्या आप्पाच्या शेतात फक्त मैत्री खातर पायी जायचो.तो वयोगट होता प्राथमिक शाळेतील..! कधी आप्पा सुराशे सोबत तर कधी त्याला भेटायला तर कधी पित्राचे जेवण करायला उन्हा तान्हात..! माझ्या आयुष्यातील मैत्रीचा प्रारंभ आप्पा सुराशे हाच होता. त्यानंतर कित्येक जिवलग मित्र माझ्या आयुष्यातील वेलीवर बहरले.त्या सर्वांचे स्थान आई वडिलांच्या नंतरचे नक्कीच श्रद्धेय अन् पवित्र आहे यात तिळमात्र शंका नाही.
आम्ही ज्यावेळी इ.९ वी ला असतांना आमचा जिवलग बालमित्र आप्पा सूराशे स्वर्गवासी झाला,त्यावेळी आप्पाचे वयोवृध्द वडील स्व.धोंडीबा दादा सुराशे पा.माझ्याजवळ लहान लेकरासारखे रडले होते..! ते त्यांचे व माझे अश्रू आजही मला माझ्यातील मित्राला मरू देत नाही आणि कधीच मरू देणार नाही..! तीच माझ्या जिवलग बालमित्राला,स्व.आप्पा सूराशे ला आयुष्यभर अर्पण करत असलेली श्रध्दांजली आहे..!
काळाच्या ओघात माझ्या वैयक्तिक आयुष्यातील आजच्या मैत्रीचे विश्व वाढत गेले. अनेक मित्रांचे प्रत्यक्ष भेटीचे अंतर वाढलेही असेल पण एकच गोष्ट माझ्याकडुन ठाम आहे आणि ती म्हणजे " मैत्रीची भावनिक ओढ अन् त्या जिवलग मित्रां विषयी असलेली समर्पित प्रेमळ भावना..! उदाहरण दाखल द्यायचे झाल्यास आजही माझे जे काही जिवलग मित्र आहेत, त्यांच्याशी कित्येक महिने, वर्ष प्रत्यक्ष भेट, फोनवर बोलणे , व्हॉट्स ॲपवर वर संपर्क देखील होत नाही.मात्र जेंव्हा कधी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन संपर्क होतो तेंव्हा निदान आम्हा काही जिवलग मित्रांमध्ये ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष भेटीची न होणारी तक्रार अजिबात नसते. त्याचं कारण मैत्रीत असणारी खोली अन् प्रगल्भता..! माझ्या मते मैत्रीत प्रेम असायला, दररोज किंवा बऱ्याचदा प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन संपर्क असायलाच हवा असेही नसते, मात्र ती मैत्री जेंव्हा कधी भेटेल तेंव्हा त्यात श्रीकृष्णाच्या अवखळ भक्तीचा सहवास नक्कीच असायला हवा..! जो की आम्हा काही जिवलग मित्रांमध्ये आढळून येतो.
जिवलग मित्रांच्या गप्पात सगळं कसं उघड नागडं असतं.तिथं. तुम्ही लपून राहूच शकत नाही.जिवलग मित्र अन् त्यांचा सहवास हा एकमेकांना सर्व विषयांवर मुक्तपणे व्यक्त होण्याचे सर्वात हक्काचे ठिकाण असते.तुम्ही कोण अन् कुठले हा आविर्भाव जिवलग मैत्रीच्या नात्यात अजिबात नसतो.तिथं फक्त आणि फक्त मैत्रीच्या विश्वातील अनौपचारिक वर्तनाचा संचार असतो. आपल्या अंतर्मनातील खदखद, आनंद, दुःख, व्यथा इत्यादी सर्व भाव भावनांचे बांध याचं जिवलग मित्रांच्या जवळ बसून व्यक्त केले जातात.
मैत्री हेच एकमेव नाते असे आहे की,यात कोणताच रंग नसतो.असतो फक्त स्वच्छ पाण्यासारखा नितळ पारदर्शी भाव..! अगदी स्वच्छ आई गंगेच्या पवित्र पाण्यासारखा नितळ रंग असतो. तरीपण जर यदा कदाचित मैत्रीला रंग जर द्यायचा झाल्यास तो गुलाबी अन् निळ्याशार आकाशा सारखा द्यायला मला आवडेल. गुलाबी रंग प्रेमाचं प्रतिक दर्शवतो. तसेच निळा रंग, आकाशाच्या विस्तीर्ण , प्रगल्भ अन् डोक्यावर माझा सतत हात आहे नियतीच्या याच अस्तित्वाची जाणीव सतत आपल्या मनाला सुखद अनुभव करून देत असतो. विशेष म्हणजे माझा सर्वात आवडता रंग निळा , आकाशीच आहे, जो मनाला नेहमी आकाशाच्या विस्तीर्ण, प्रगल्भ अन् डोक्यावर माझा सतत हात आहे ही जाणीव मला करून देत असतो. अर्थातच त्यामागे मैत्रीचा प्रेमळ रंग देखील आलाच..!
मित्र अन् मैत्री यावर खूप काही व्यक्त करता येईल,पण तूर्तास थांबतो. कोणताही भेदभाव न ठेवता मित्रांच्या मैत्री फुलल्या तरच मैत्रीला मित्रत्वाचा प्रेमभाव स्पर्श करतो. तुमच्या आमच्यात देखील मैत्रीच्या नात्यात गुळाच्या शिऱ्या सारखा गोडवा वृध्दींगत होत राहो हीच प्रेमळ अपेक्षा..!🌹🙏🏻😊
वंदे मातरम्..!
मित्र अन् मैत्रीवर निस्सीम प्रेम करणारा लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक:६ ऑगस्ट २०२३, रविवार






