रविवार, २० ऑगस्ट, २०२३

देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक १)


 


मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️


 देवभूमी..! 🕉️

(भाग क्रमांक १)


===================================


माझ्या बालपणी आमच्या घराच्या समोरील बाजूस असणाऱ्या श्री. पारेश्वर महादेवाच्या मंदिरात नेहमी दर्शनाला जाणे होत असायचे. त्यावेळी आज सध्या तिथं जे संत जनार्दन स्वामी महाराज यांचे मंदिर आहे तिथं एक कुटिया होती. त्यावेळी दत्तागिरी महाराज मठाधिपती होते.त्या कुटियात एक कागदी जाड पुठ्ठ्यावर बारा ज्योतिर्लिंगांचा फोटो, त्याखाली त्यांचे नाव अन् सर्वात खाली बारा ज्योतिर्लिंग मंत्र लिहिलेला होता. बाबाजींच्या पादुकांचे दर्शन झाले की, मी तो बारा ज्योतिर्लिंग मंत्र वाचत असे. त्या फोटोतील बारा ज्योतिर्लिंगांचे क्रमवार दर्शन घेत असे.त्याच फोटोतील बर्फाच्या पर्वतात वेढलेल्या बाबा केदारनाथाचे पण दर्शन व्हायचे. बर्फाच्या पर्वतात वेढलेल्या बाबा केदारनाथ मंदिराला बघून एक इच्छा व्हायची की, आपणही आयुष्यात कधी तरी याचं ठिकाणी जाऊ अन् काही वेळ तिथं व्यतीत करू..!ते एक श्रद्धेय स्वप्न उराशी बाळगून वयाने मोठा होत गेलो.मात्र वय वाढत होते,पण बालपणी उराशी बाळगून असलेलं बाबा केदारनाथ येथे जाण्याचे स्वप्न मनात सतत तारुण्याची कास धरून होते. 


जेंव्हा इ.स. १९९७ -९८ मध्ये वेरूळ येथे महादेवाच्या सानिध्यात अनुष्ठान केले होते, तेंव्हा याच दर्शनाच्या ओढीला, श्रद्धेने उराशी बाळगून मनाशी अजून ठाम निर्णय होत गेला..आयुष्यात कधी तरी सह परिवार केदारनाथ बाबाच्या चरणी पायी चालत चालत जाऊन लीन होईल..! आपल्या इष्टावर मग ते इष्ट जिवंत स्वरूपातील असो अथवा त्याच जिवंत स्वरूपाला जिवंत ठेवणारे अदृश्य शक्तीचे असो त्यावर जर श्रद्धा असली की, त्याला नक्कीच फळ लागते यावर माझा प्रचंड विश्वास होता. अर्थात आजही आहे अन् तहहयात राहील. गौरी कुंड ते केदारनाथ बाबाच्या चरणी पायी चालत चालत जाऊन लीन होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवसामागून दिवस जात होते,पण सगळं काही जमून येत नव्हते. आपल्या अंतर्मनाततील असलेला श्रद्धेय , जेंव्हा आपल्याला अंतर्मनातून आपल्याला हाक देतो, तेंव्हा श्रद्धा अन् त्यावर निष्ठा असणाऱ्या भावूक मनांचे श्रद्धेय मिलन नक्कीच होते हा माझा स्वानुभव आहे.


अखेर माझ्या बालपणी अंतर्मनात बघितलेले बाबा केदारनाथाचे निवांत अन् पायी चालत जाऊन दर्शन घेण्याचे स्वप्न प्रौढ आयुष्याच्या टप्प्यावर पूर्ण झाले. माणसाच्या आयुष्यातील काही स्वप्न नक्कीच पूर्ण होतात, फक्त ती स्वप्न महादेवाला मान्य असणारी असावीत. थोडक्यात कुणाच्याही मनाला न दुखवता अन् दुसऱ्याच्या अंतर्मनातील मुक्या शिव्या शाप न घेता उराशी बाळगलेली स्वप्न असावीत. ती स्वप्न पूर्ण करताना समोरच्याच्या अंतर्मनातील मुक्या शिव्या शाप घेऊन पूर्ण झाली तर मिळालेलं सौख्य भले सुखी दिसत असेल, मात्र खोलवर कुठेतरी हाय लागलेली असते. असो, महादेवाच्या दरबारात जाण्याचे स्वप्न अखेर मे २०२३ मध्ये पूर्ण होणार होते.


मे २०२३ या महिन्यात केदारनाथ बद्रीनाथ येथे वैयक्तिक कुटुंबाच्या सोबतच जाण्याचे मी नियोजित केले होते.मी आता पर्यंत भारतातील अनेक स्थळे सह परिवारच पर्यटन अन् श्रद्धेने बघितली होती. त्या सर्व प्रवासांचे नियोजन करायला सोपे गेले होते.कारण ती स्थळे मैदानी प्रदेशातील होती.निसर्गाचा असमतोल भाग तिथं नव्हता.मात्र माझ्या आज पर्यंतच्या भटकंतीच्या प्रवासातील नियोजनाचा कस केदारनाथ बद्रीनाथ प्रवासात लागणार होता.एकतर तिथली अतिशय खडतर पर्वतीय भौगोलिक परिस्थिती, कुटुंब सोबत अन् जिथं जाणार होतो, तिथलं बदलतं हवामान..!यामुळं निघण्याच्या पूर्व तयारी मध्ये सारखं तिथल्या भौगोलिक अन् बदलत्या नैसर्गिक हवामानाचा अंदाज घेऊन सगळं नियोजन करणं आवश्यक होते. त्यातल्या त्यात जिथं जाणार होतो तिथल्या प्रवासाचे कितीही काटेकोर नियोजन करा, शेवटी सगळं काही निसर्गाच्या रौद्र रूपी लहरीवर अवलंबून राहणार होते.


असं म्हणतात की, केदारनाथ बद्रीनाथ प्रवास हा हिंदू धर्मातील अतिशय खडतर, जोखमीच्या मात्र तितक्याच अतिशय पवित्र श्रद्धेचा प्रवास..! आता थेट गौरी कुंड पर्यंत वाहने जात असल्यामूळे तितकासा नाही, मात्र तिथून पुढील प्रवास विशेषतः पायी फार खडतर असं ऐकून होतो. तरी देखील ऋषिकेश ते सोनप्रयाग हा अंगावर येणारा घाटांचा प्रवास ऐकून होतो .जोखमीचा प्रवास असल्यामूळे मी माझी बंद पडलेली LIC policy सुरू करण्याचे ठरवले. LIC policy म्हंटल्यावर मृत्यू अन् त्या पश्चात मिळणारे आर्थिक फायदे हे जणू समीकरणच झालेले आहे अन् ते खरं देखील आहे. त्याच समीकरणाच्या अर्थाने मी माझी बंद पडलेली LIC policy सुरू करण्याचे ठरवले. शाश्वत सत्य असलेल्या मृत्यूचा विचार करून अन् येणाऱ्या अन् होणाऱ्या परिणामांचा वास्तववादी विचार करून प्रवास करण्याचे मी माझ्या कुटुंबातील दोन्ही मुले अन् धर्मपत्नी या सर्व सदस्यांना सांगितले होते. जर तुमची तयारी असेल तरच चला नसता मी असाही एकटा जाणारच आहे.यावर त्यांचा प्रामाणिक होकार आल होता.दिनांक १२/५/२०२३ रोजी छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील LIC कार्यालयात आमचे जन सहयोग सामाजिक संस्थेतील अतिशय प्रेमळ अन् पोक्त विचारांचे व्यक्तिमत्व आदरणीय प्रदीप भैय्या यादव यांच्याकडे चौकशी केली.तिथं योग्य ते मार्गदर्शन मिळाले अन् वैजापूर येथील LIC कार्यालयात बंद पडलेल्या policy ची रक्कम जमा करण्याचे ठरवले.सर्व सोपस्कार पार पाडून माझा खूप जिवलग बालमित्र डॉ.संजय राऊत ( परसोडा, ता. वैजापूर) याने पुढील प्रक्रिया राबवली.


तत्पूर्वी म्हणजेच मे २०२३ पूर्वी माझे असे पक्के नियोजन होते की, जसे दरवर्षी मी फक्त माझ्याच कुटुंबाच्या सोबत कुठे ना कुठे तरी भटकंती करत असतो, त्याच नियोजित हेतूने याही वर्षी भटकंतीला जाण्याचे नक्की केले होते. केदारनाथ बद्रीनाथ तीर्थयात्रेला जाणार असे नक्की केले होते.मात्र मागे एकदा माझे जिवलग शिक्षक मित्र नंदलाल रामलाल सलामपूरे सर मला म्हणाले होते की, " सर , तुम्ही प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे तरी सह परिवार प्रवासाला जातातच.यावेळी मलाही सोबत न्या..!" त्या वाक्याची मला आठवण आली अन् मी सलामपूरे सरांना एक कॉल केला.त्यांना मी सह परिवार जाणार असणाऱ्या प्रवासाच्या बाबतीत सांगितले.तुम्ही येणार का..? तुम्ही मागे म्हंटले होते की, मला एक शब्द विचारा म्हणून..!" यावर सलामपूरे सरांनी त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करून कळवतो असे सांगितले अन् मला सलामपूरे सरांचा होकार आला. मी पुन्हा एकदा विचार करून कळवा, कारण प्रवास अतिशय खडतर राहणार आहे.विचार करायला एक दिवस अजून दिला.अखेर सरांचा खात्रीशीर होकार आला. दूरच्या प्रवासात सम विचारी अन् आहे त्या परिस्थितीत प्रवास , वास्तव्य करणारे असले तरच प्रवास सुखकर होतो. इथे तर कस लागणार होता.सलामपूरे सर समजूतदार अन् शांत स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्यामुळे मी त्या बाबतीत निश्चिंत होतो.


वंदे मातरम्..!

हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻


एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २१ऑगस्ट २०२३, श्रावण मास, सोमवार.


क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा