मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️
देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक ७ )
===================================
दिनांक २० मे २०२३ शनिवार रोजी हिमालयातील केदारनाथ पर्वत रांगेतील केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या खडतर प्रवास रस्त्याच्या चढाई असलेल्या शेवटच्या टप्प्यात आम्ही आता चढाई करू लागलो होतो. काही वेळापूर्वी दुपारी दीड वाजता राजस्थान मधील भेटलेल्या आजीच्या रुपात एक ऊर्जेचा स्रोत भेटला होता. त्यामुळं शरीर जरी थकले असे जाणवत होते,मात्र मन ऊर्जेच्या प्रवाहात पुढे पुढे जा असे म्हणू लागले होते. आयुष्यात भेटलेल्या अशा अनेक ऊर्जेच्या स्रोतांचा आपल्या आयुष्यात प्रेरक शक्ती म्हणून उपयोग होऊन पुढे मार्गक्रमण करण्यास उपयोग होतो हे जाणवायला लागले होते.वरतून येणाऱ्या खेचर घोड्यांची वर्दळ प्रचंड वाढली होती. त्या प्रचंड वर्दळीचा मोबाईल मध्ये फोटो काढावा असे वाटले,पण मोबाईल हातात धरून फोटो क्लिक करायला जागा उपलब्ध होत नव्हती. जरी यदा कदाचित फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला असता, तर मोबाईल त्या गर्दीत कुणाचा तरी धक्का लागून खाली पडण्याची पुरेपूर खात्री होती. खिशातला मोबाईल हातात घ्यायला गेलेला हात पुन्हा हातातल्या काठीवर आला होता.
आता काहीसा सपाट जमिनीचा भूभाग लागला होता.आम्हा सर्वांना खूपच दम लागला होता.मात्र घाम येत नव्हता.घाम येणार तरी कसा..? अतिशय कडाक्याची थंडी जाणवायला लागली होती.पहाटे पाच वाजता गौरी कुंड येथून निघाल्या नंतर पहिल्यांदाच सपाट जमिनीचा भूभाग दिसू लागला होता.समोर खेचर घोड्यांची खूप गर्दी दिसू लागली होती. खेचर घोडे अन् त्यांना सोबत घेऊन ने आण करणारे माणसं यांनी तिथला परिसर फुलून गेला होता.घोडा पडाव नजरेच्या समोर होता. हुश्श..! म्हणून आम्ही काही क्षण तिथं उभे राहिलो. जास्त वेळ तिथं थांबून जमणार नव्हते.नियोजित स्थळी लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक होते.आता दुपारचे दोन वाजून दहा मिनिटे झाली होती.मागील थांब्याच्या ठिकाणाहून साधारणतः दुपारी पावणे दोन वाजता सुरू केलेला पायी प्रवास घोडा पडाव पर्यंतचा खूपच चढणीचा दुपारच्या दोन वाजून दहा मिनिटांपर्यंत अखंड सुरू होता.गौरी कुंड येथून पहाटे पाच वाजता सुरू केलेल्या प्रवासापासून ते घोडा पडाव पर्यंतच्या वेगवेगळ्या टप्प्यात केलेल्या प्रवासांपैकी शेवटचा टप्पा जास्त वेगात पार पडला होता.आम्ही नंदी बेस कँप येथे पोहोचलो होतो.ज्या स्थळी मुक्कामी थांबायचे होते तिथं चौकशी केल्यानंतर आम्हाला आमच्या नियोजित तंबूच्या ठिकाणी तिथल्या कर्मचाऱ्यांनी पोहोचून दिले. नंदी बेस कँप मधील तंबूत पोहोचल्या बरोबर आम्ही चौघांनी आपापल्या जागा ताब्यात घेतल्या. तिथल्या विभागातर्फे तंबूत एकूण दहा जणांच्या मुक्कामाची सोय होती. कडक स्पंज असलेली गादी अन् अंगावर घ्यायला उबदार वाटणारी, मात्र प्रत्यक्षात प्रचंड थंडगार असलेली पिशवी प्रत्येकाला मिळालेली होती. या अंथरूण पांघरूणाने आपल्याला उब मिळेल यावर माझा विश्वास बसेना.त्याचं कारण असलेली कडाक्याची थंडी अन् अतिशय थंडगार पडलेले अंथरूण पांघरूणाचे कपडे..! रात्र थंडीच्या वैऱ्याची होणार याची जाणीव झाली होती.अंगावर जे घ्यायचे होते,ती एक प्रकारची पिशवीच होती. आपले पाय अगोदर त्यात टाकायचे, मग शरीराचा उर्वरीत भाग हळूहळू त्यात ढकलायचा अन् मग आपल्या चेहऱ्याच्या जवळ येणाऱ्या त्या पिशवीच्या चैनीने पूर्ण डोक्या पर्यंत ती पिशवी बंद करायची.अशी एकंदरीत पांघरुण घेऊन झोपायची सोय झालेली होती. अतिशय थंड प्रदेशात आपल्या भारतीय सैनिकांना या अशाच पांघरूण घेणाऱ्या कपडयांची सोय केलेली असते असे तिथल्या व्यक्तीने सांगितले. आम्ही नंदी बेस कँप मधील तंबूत बरोबर दुपारच्या 2:28 वाजता पोहोचलो होतो. पहाटे पाच वाजता गौरी कुंड येथून सुरू केलेला पायी प्रवास दुपारच्या दोन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत झाला होता. म्हणजेच नऊ तास अठ्ठावीस मिनिटं एवढा एकूण वेळ आम्ही हिमालयातील पर्वत रांगा चढत चढत नंदी बेस कँप पर्यंत आलो होतो. मी माझ्या मोबाईल मधील स्टेप्स counting म्हणजेच आपण किती पावलं चाललो आहोत याची सेटिंग गौरी कुंड येथून निघतानाच सुरु केलेली होती. पाऊल क्रमांक एक पासून सुरू झालेला पायी प्रवास केदारनाथ मंदिर परिसरातील नंदी बेस कँप पर्यंत 33,667 एवढ्या पावलांचा झाला होता. गौरी कुंड ते नंदी बेस कँप पर्यंत एकूण अंतर जवळ जवळ वीस किलोमिटर आहे. नंदी बेस कँप पासून बाबा केदारनाथ मंदिर अजून दोन किलोमिटर अंतरावर होते.
थोरला चिरंजीव नमन याने तंबूत पोहोचल्या पोहोचल्या त्याच्या पाठीवर असलेली वजनदार सॅक बॅग पहिली खाली टाकली.आम्हा चौघात सर्वात जास्त त्रास त्याला झाला होता,पण त्याने तो व्यक्त केला नव्हता.आता मात्र त्याने त्याच्या पाठीवरचे ओझे उतरवून तो त्याच्या गादीवर बसला होता. धाकटा चिरंजीव नयन मात्र फारसा थकल्याचे दिसत नव्हता.मी अन् माझी पत्नी मात्र खूप थकलो होतो.मी सर्वांना सांगितले की, " आपण एक तास आराम करणार आहोत. आराम झाल्यानंतर एक तासानंतर बाबा केदारनाथ महादेवाच्या दर्शनाला जाणारा आहोत.आता पटकन झोपून घ्या..!" माझ्या सांगण्याकडे फारसे कुणीच गांभीर्याने बघत नव्हते.मी सर्वांची मानसिकता ओळखली होती.सर्वांच्या मानसिकतेत मला एकच उत्तर जाणवले होते की, " आता कुठं आम्ही पोहोचलो आहोत अन् यांचं झालं पुन्हा सुरू पुढील प्रवासाचे..! " मात्र मला पुढील नियोजित नियोजन सांगणे आवश्यक होते अन् ते मी माझे काम केले होते. त्याचं कारण केदारनाथ मंदिर परिसरातील हवामान कधी बदलेल याचा काहीच नेम नव्हता.त्यामुळं जेंव्हा सुरळीत हवामान मिळेल तेंव्हा बाबा केदारनाथाचे दर्शन घेणे अत्यावश्यक होते. वेळ, परिसर अन् परिस्थिती बघून काही निर्णय घ्यावे लागतात याची जाणीव असल्याने माझे कर्तव्य मी केले होते. काही वेळातच दोन्ही मुलं थंडगार असलेल्या उबदार पिशवीत शिरून झोपी गेली होती. खूपच कडाक्याची थंडी पडलेली होती. पहाटे साडे तीन वाजता आम्ही उठलेलो होतो. डोळ्यावर आता झापड यायला लागली होती. कधी डोळा लागला कळलेच नाही.
दुपारी तीन वाजता आम्ही झोपी गेलो.शांत झोप कशाची येते..? खूपच कडाक्याच्या थंडीमुळे अधून मधून जाग येत होती.अखेर दुपारी चार वाजता मी सर्व प्रथम झोपेतून उठलो.क्रमवार इतरांना उठवले. साडे चार वाजता आम्ही नंदी बेस कँप परिसर मधून बाहेर पडलो होतो.बाहेर आल्या बरोबर अतिशय थंडगार वारा अंगाला स्पर्श करून शरीर थिजून टाकू लागला होता.बाहेर आल्यावर पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घेतली.थोडेसे कोमट असलेले पाणी संबंधित दुकानदारांकडून खरेदी केले होते.८०₹ ला एक लिटर पाण्याची बाटली होती.त्याच दुकानात आमच्या बाजूला उभा असलेला एक पुरुष संबंधित दुकानदाराशी गरम पाण्याच्या भावावरून हुज्जत घालू लागला होता.त्या दुकानदाराने थेट सोनप्रयागहुन इथपर्यंत अतिशय उंच पहाड चढून विविध वस्तू आणण्याच्या त्रासाबाबत अन् भाडे बाबत संबंधित वाद घालणाऱ्या व्यक्तीला परिस्थिती समजावून सांगितली होती.तरी देखील तो व्यक्ती वाद घालतच होता.मला त्या वाद घालणाऱ्या व्यक्तीचा खूप राग आला होता. या दुकानदारांना कोणत्या परिस्थितीत, किती खडतर प्रवास करून तेही कुणाच्यातरी किंवा स्वतः च्या अंगाखांद्यावर विविध वस्तू दुकानात विक्री करायला ठेवाव्या लागत होत्या. सोनप्रयाग किंवा उत्तर काशी येथून खूप उंचावर असलेल्या केदारनाथ मंदिर परिसरात विविध वस्तू दुकानात विक्रीला ठेवणे याचा प्रवासाचा खर्च खूप होता.तो खर्च संबंधित दुकानदार काढून घेणारच होता. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एवढ्या उंचीवरील भौगोलिक प्रदेशात आपल्याला काही जीवनावश्यक वस्तू मिळत होत्या हे खूप महत्त्वाचे होते. समोरचा दुकानदार कोणत्या परिस्थितीत आपली सेवा करत आहे किंवा आपल्याला सुविधा पुरवत आहे याची जाणीव निदान केदारनाथ यात्रेतील सर्व प्रवाश्यांनी तरी ठेवायला हवी असे मला वाटते. माझ्या मते केदारनाथ यात्रेला येणाऱ्या सर्वांनी आपलं व्यावहारिक ज्ञान किंवा आपली व्यावहारिक अक्कल मैदानी प्रदेश अन् तिथं सहज उपलब्ध होणाऱ्या बाजारपेठाच्या ठिकाणी पाजाळायला हवी..! या इथे अतिशय बिकट भौगोलिक प्रदेशात आपली व्यावहारिक अक्कल गुप गुमान ठेवायला हवी. असा विचार मी माझ्या पत्नीला अन् मुलांना सांगितला अन् आम्ही पुढे केदारनाथ बाबाच्या दर्शनाला संध्याकाळच्या वेळी मार्गस्थ झालो होतो.
वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻
एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ८ ऑक्टोंबर २०२३, रविवार.
क्रमशः



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा