आमचे गाव, आमची माणसं ©️
आम्ही अन् रामायण..!
=================================
ऐंशीच्या दशकात आमच्या पालखेड गावात एकच टिव्ही होता.तोही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होता. गावातील एक ज्येष्ठ नागरिक आदरणीय स्व. संपत शेठ चोपडा यांच्या घरी एकमेव ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही होता. त्या टिव्हीचा ॲन्टेना साधारणतः साठ ते सत्तर फुटापर्यंत उंचीचा होता. वाऱ्या वावधनात तो उंच ॲन्टेना हलला की, टिव्ही वरील दिसणारे कार्यक्रम दिसेनासे व्हायचे. टिव्हीच्या स्क्रीन वर निव्वळ बूनक्या बुनक्या यायच्या. पुन्हा मग कुणीतरी हौशी नागरिक तो ॲन्टेना योग्य अवस्थेत आणण्याचे आटोकाट प्रयत्न करायचा. प्रयत्नांती परमेश्वर या उक्ती प्रमाणे अखेर टिव्ही वरील दिसेनासे झालेले कार्यक्रम पुन्हा दिसू लागायचे.टिव्ही समोर ठाण मांडून बसलेले अबाल वृद्ध महिला पुरुष यांना एकच आनंद व्हायचा.पुन्हा समदे जण त्या ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही वरील कार्यक्रमाला एकचित्त होऊन बघू लागायचे. काळाच्या ओघात स्व. संपत शेठ चोपडा यांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही वरील विविध कार्यक्रम बघण्यासाठी गावातील रसिक प्रेक्षकांची गर्दी वाढू लागली होती.ज्या खोलीत सदरील टिव्ही होता ती बैठक होती. सदरील बैठकीला लाकडी फळ्यांचे मिजगिरी असलेले दरवाजे होते.सगळे दरवाजे बंद करून आत मध्ये जमा झालेले रसिक प्रेक्षक गावकरी टिव्ही वरील विविध कार्यक्रमाचा आनंद घ्यायचे.
ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस टिव्ही वर रामानंद सागर कृत रामायण मालिकेचे प्रसारण सुरू झाले. रामायण मालिकेचे आम्हाला प्रचंड आकर्षण होते. राम हा आपला आराध्य असल्याने गावातील अबाल वृद्ध महिला पुरुष यांना रामायण मालिके विषयी कमलीची उत्सुकता निर्माण झाली होती. दर रविवारी सकाळी टिव्ही वर रामायण मालिकेचे प्रसारण सुरू झाले होते. अगोदरच स्व. संपत शेठ चोपडा यांच्या घरी गावातील रसिक मंडळी टिव्ही वरील विविध कार्यक्रम बघण्यासाठी जमा होत होतेच.आता त्यात अजून श्रद्धेय मनोरंजनाची भर पडली होती. आम्ही बालमित्र त्यावेळी पौगंडावस्थेतील वयोगटातील प्रारंभीच्या आयुष्यात होतो. दर रविवारी गावातील रसिक मंडळी रामायण मालिका बघण्यासाठी स्व. संपत शेठ चोपडा यांच्या घरी जमा होऊ लागली. अबाल वृद्ध महिला पुरुष खूपच दाटीवाटीने बसून ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही वरील रामायण मालिका श्रद्धेने बघू लागली होती . स्व.संपत शेठ चोपडा अतिशय शिस्तप्रिय अन् काटक तब्येतीचे व्यक्तिमत्त्व होते.पिळदार पांढऱ्या मिशा, गोरा वर्ण, पांढरे शुभ्र धोतर, पांढरा शुभ्र मनिला सदरा,डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी असा एकंदरीत पेहराव आदरणीय स्व. संपत शेठ चोपडा यांचा होता. आदरणीय संपत शेठ चोपडा यांना टापटीपपणा खूप आवडायचा.रामायण मालिका बघण्यासाठी त्यांच्या घराची दरवाजे पालखेड गावातील सर्व नागरिकांसाठी खुली केलेली असायची. रामायण मालिका बघत असताना कुणी थोडाफार जरी आवाज केला, तर संपत शेठ चोपडा म्हणायचे...
" अरे, कलमा करू नका रे..!"
असं म्हणल्या म्हणल्या सर्वजण चिडीचूप शांत बसायचे अन् रामायण मालिकेचा आनंद घायचे. स्व. संपत शेठ चोपडा बाजूच्या त्यांच्या छोट्या खोलीत बसून असायचे.
रविवार मागून रविवार जाऊ लागले. रामानंद सागर कृत रामायण मालिका खूप प्रसिद्ध होऊ लागली होती. गावातील काही महिला रामायण मालिका बघण्यासाठी श्रद्धेने हळदी कुंकू करंडा घेऊन येऊ लागल्या होत्या.रामायण मालिका सुरू झाली की हळदी कुंकवाने टीव्हीतल्या पात्रांचे पूजन होऊ लागले होते. राम सर्व सामान्य लोकांच्या किती खोलवर हृदयात रुजलेला आहे याचे ते सर्वोत्तम उदाहरण होते. आम्हाला त्याचे त्यावेळी फारसे महत्त्व माहीत नव्हते. पौगंडावस्थेतील वयोगट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी सहज वाटायच्या. रामायण मालिका सुरू झाली की, ज्यांना बैठकीत बसायला जागा नसायची ते दरवाजाच्या फटीतून शरीर पार वाकडे तिकडे होऊन डोळे बारीक करून रामायण मालिका बघायचे. दर रविवारी स्व. संपत शेठ चोपडा आपली बैठक खोली स्वतः तर कधी इतरांच्या मार्फत झाडून साफ करून ठेवायचे. आता रामायण मालिका पाहण्यासाठी गावातील लोकांची खूप गर्दी वाढू लागली होती. बैठकीतील जागा अपुरी पडू लागली होती.त्यात एका रविवारी जे व्हायचे तेच झाले. रामायण मालिका बघत असताना गावातील काही तरुण अन् पौगंडावस्थेतील मुलांच्या मध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. बाजूच्या खोलीत बसलेले आदरणीय संपत शेठ चोपडा धावत आले अन् त्यांनी मुलांची बाचाबाची सोडवली अन् गरम झालेले वातावरण शांत केले. याचा परिणाम असा झाला की, पुढील रविवार पासून स्व.संपत शेठ चोपडा गावातील तरुणांना अन् पौगंडावस्थेतील मुलांना रामायण मालिका पाहण्यासाठी येऊ देण्यास टाळाटाळ करू लागले. बैठकीत बसून गावातील बहुतांशी रसिक प्रौढ वयातील नागरिक रामायण मालिका बघू लागले होते.
तरुण अन् पौगंडावस्थेतील मुलांना टिव्ही बघायला मज्जाव केल्यामुळे साहजिकच होते की, राम भक्त मुलांना वाईट वाटणारच होते.आदरणीय स्व. संपत शेठ चोपडा यांचीही काही चूक नव्हती. नाहक गोंगाट अन् त्रास झाल्यामुळे त्यांना असा निर्णय घ्यावा लागला होता. एके दिवशी संपत शेठ चोपडा यांच्या वाड्यात एक निनावी चिठ्ठी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फेकून दिली. संपत शेठ चोपडा यांच्या हाती ती निनावी चिठ्ठी लागली. त्यात पुढील आशयाचा ढोबळमानाने मजकूर लिहिलेला होता...
' तुम्ही बऱ्या बोलाणं आम्हाला टिव्ही वरील रामायण मालिका पाहू द्या.नसता येत्या एक दोन दिवसात तुमच्या टिव्हीचा ॲन्टेना बॉम्बने उडवून देण्यात येईल,इत्यादी...इत्यादी..इत्यादी...!' बस्स, त्या निनावी धमकी चिठ्ठीमुळे संपत शेठ चोपडा यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. एकतर त्यांचा स्वभाव अतिशय शिस्तप्रिय त्यात पुन्हा ही धमकी..! संपत शेठ चोपडा यांच्या वाड्यात कुणीतरी ' येत्या एक दोन दिवसात तुमच्या टिव्हीचा ॲन्टेना बॉम्बने उडवून देण्यात येईल ' अशी धमकी असणारी निनावी चिठ्ठी फेकून दिली ही बातमी आम्हा मित्र परिवारात वाऱ्या सारखी पसरली. ज्या खरोखरच्या वाऱ्यामुळे अधून मधून संपत शेठ चोपडा यांच्या टिव्हीचा ॲन्टेना हलायचा, आता तर कुणीतरी निनावी धमकी देऊन अख्खी ॲन्टेनाच उडवून देऊ अशी धमकी दिली होती. आम्ही काहीजण गावात विविध परिसरात अभ्यासाच्या खोलीत अभ्यासासाठी रात्रीच्या वेळी एकत्र असायचो.त्यांच्यातील काहींच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्याचं कारण रात्री अभ्यास करून कंटाळा आला की, आम्ही काही बालमित्र एखाद्या निशाचर प्राण्या सारखे गावभर हिंडत असायचो.त्यात आमच्या निशाचर टोळीचा प्रमुख असायचा आमचा जिवलग बालमित्र स्व.शाम शेळके..! गैरकृत्य करणाऱ्यांच्या सोबतीला रात्र असते अन् ज्यांच्यावर संशय घेतला जातो ते देखील बहुदा निशाचर वर्गातील असतात हा एखादा आळ येणाऱ्या प्रसंगातील पहिला कायदेशीर सिध्दांत आहे. या अलिखित कायदेशीर सिध्दांतात आम्ही काही वर्गमित्र , बालमित्र चपखल बसत होतो. मला भीती वाटू लागली होती.जर यदा कदाचित आदरणीय संपत शेठ चोपडा यांनी मलाही त्यात गोवले तर माझे स्व. तीर्थरूप वडील मला पार मुतूतस्तर मारतील या भीतीने शरीराच्या सगळ्याच भागात गोळे उठायला सुरुवात झाली होती. माझे स्व.वडील अतिशय कडक स्वभावाचे असल्याने खूप भीती वाटू लागली होती.मी मला जाणवणारी भीती माझा जिवलग बालमित्र तथा वर्गमित्र स्व.शाम शेळके यांच्या कानावर घातली.नेहमी प्रमाणे शाम शेळके हा निडर होऊन मला म्हणाला....
" नंद्या, चूप रे..! असं कसं काय कुणी आपलं नाव घेईल. तू तुझ्या दादाला भिऊ नको.मी सोबत आहे. तुझे वडील एवढे कडक स्वभावाचे असून सुध्दा आपण तुझ्याच दारातील बल्प रात्री चोरून आणला होता. तरी देखील दादांना आपल्यावर काहीच संशय आला नव्हता. तुझे वडील तुला काही म्हणले तर मला सांग मी येईल तुझ्या सोबत, दादांना भेटायला..! " शाम शेळके हा निडर तर होताच, पुन्हा माझा जिवलग बालमित्र असल्यामुळे माझ्या स्व. वडिलांच्या मर्जीतील होता.मर्जीतील माणसं , मर्जीतील माणसांना सांभाळून घेत असतात हा देखील मानवी स्वभावाचा अलिखित मानसिक सिध्दांत आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. शामच्या मानसिक आधारामुळे माझी भीती काही प्रमाणात कमी झाली होती.
आदरणीय संपत शेठ चोपडा यांनी दुसऱ्या दिवशी ती निनावी धमकी असणारी चिठ्ठी घेऊन तडक आम्ही पालखेड गावात ज्या शाळेत शिक्षण घेत होतो ते ठिकाण गाठलं. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. बी.एच. चव्हाण सर होते. कमालीचे शिस्तप्रिय होते.दुसरे अतिशय शिस्तप्रिय शिक्षक होते आदरणीय जी.एम. भगत सर..! प्राथमिक शाळेतील आदरणीय गोमलाडू सरांना देखील आम्ही आदरयुक्त घाबरायचो. त्यातल्या त्यात आम्ही जी. एम.भगत सरांना जरा जास्तच आदरयुक्त घाबरायचो. शाम शेळके याने आम्हाला वर्गात येऊन सांगितले की, संपत शेठ चोपडा ती धमकीची चिठ्ठी घेऊन शाळेत आले आहे. हे ऐकल्या बरोबर माझी चड्डी ओल्ली होण्याची वेळ आली होती. मुख्याध्यापक आदरणीय श्री.बी.एच. चव्हाण सर अन् इतर शिक्षक यांच्या सोबत आदरणीय संपत शेठ चोपडा प्रत्येक वर्गात जाऊन प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वह्या बघू लागले होते. प्रत्येकाची वही बघत असताना संपत शेठ चोपडा यांना ॲन्टेना बॉम्बने उडवून देण्या बाबतची धमकी असणारी जी चिठ्ठी मिळालेली होती, त्या चिठ्ठीतील हस्ताक्षर अन् प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींचे हस्ताक्षर कुठे मिळते जुळते आढळते का हे स्वतः संपत शेठ चोपडा अन् शिक्षक फार बारकाईने तपासू लागले होते.अशी तपासणी करत करत संपत शेठ चोपडा अन् मुख्याध्यापक अन् शाळेतील शिक्षक आमच्या वर्गात आले. संपत शेठ चोपडा यांच्या चेहऱ्यावर लालबुंद रंग ओसंडून वाहत आहे असा मला भास होऊ लागला होता. पिळदार , झुपकेदार पांढऱ्या मिशा अजून कडक झाल्या सारख्या दिसू लागल्या होत्या. एकंदरीत आदरणीय संपत शेठ चोपडा हे दुर्वास ऋषी सारखे अतिशय क्रोधित झालेले आहेत असे त्यांच्या एकंदरीत देहबोली वरून दिसत होते. आम्ही काही मित्र बॅक बॅंचर होतो. शाम शेळके माझ्याच पाठीमागे बसलेला होता. तपासणी करत करत माझा नंबर आला. मी अगोदरच माझ्या दप्तरातील सर्व वह्या पुस्तके बाहेर काढली अन् समोर मांडून ठेवली होती. स्वतः संपत शेठ चोपडा अन् शाळेतील शिक्षकांनी माझ्या वाहितील माझे हस्ताक्षर अन् संपत शेठ चोपडा यांना मिळालेल्या धमकी चिठ्ठीतील हस्ताक्षर कुठेतरी मिळते जुळते आहे का हे बघू लागले होते. आज आयुष्यात पहिल्यांदा आदरणीय संपत शेठ चोपडा यांच्या त्या झुपकेदार पांढऱ्या मिशांना इतक्या जवळून बघण्याचा योग आला होता. मिशा बघत बघत माझ्या मनात धाकधूक होती की,' मी तर ती धमकी चिठ्ठी लिहिलेली नव्हती. मात्र योगायोगाने जर एखादे अक्षर यदा कदाचित जुळले तर बेट्या नंद्या , तू कामातून गेलाच समज..! ' माझ्या सर्व वह्या तपासून झाल्या. आदरणीय संपत शेठ चोपडा सोबतच्या शिक्षकांना वेगवान स्वरात म्हणाले..
" याचे अक्षर नाही ते, पुढे बघू..!"
असे ऐकल्या बरोबर मी मनातल्या मनात हुश्श करत निर्धास्त झालो होतो. प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वह्यातील हस्ताक्षर तपासून झाले होते. कुणाचेही हस्ताक्षर , धमकी दिलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षराशी मिळते जुळते आढळते नव्हते.
आदरणीय संपत शेठ चोपडा यांनी गावातील तरुण अन् पौगंडावस्थेतील मुलांच्या खोडसाळपणामूळे आपल्या घरी टिव्ही वरील रामायण मालिका पाहण्यासाठी निर्बंध घातले होते.या निर्बंधांमुळे आम्हा राम भक्तांचे नुकसान झाले होते. एक रविवार आमचे रामायण मालिका पाहण्यासाठी वाया गेला होता. प्रभू श्रीरामाविषयी कमालीची श्रद्धा अन् रामानंद सागर कृत रामायण मालिका पाहण्याची प्रचंड उत्सुकता गावातील तरुण अन् पौगंडावस्थेतील मुलांना शांत काही बसू देईना. अखेर काही तरुणांनी गावातील तत्कालीन लोकप्रिय आदरणीय व्यक्तिमत्वे स्व. बाबू काका मराठे ( सरपंच ), रामकृष्ण पाटील रोठे, आणि सर्वांच्या गळ्यातील ताईत तीर्थस्वरुप भावराव पाटील शेळके यांच्या कानावर ही मागणी घातली की, आम्ही आता संपत शेठ चोपडा यांच्या घरी रामायण मालिका अगदी शांतपणे पाहू. कुणीही कलमा करणार नाही. अखेर गावातील ज्येष्ठ माणसांनी आदरणीय संपत शेठ चोपडा यांची भेट घेतली अन् पोरांना रामायण मालिका पाहू द्या.कुणी काही गडबड केलीच तर आम्हाला सांगा. एकाकाचा आम्ही बेत पाहतो..! संपत शेठ चोपडा अखेर तयार झाले. पुन्हा एकदा गावातील अबाल वृद्ध महिला पुरुष हे अगदी श्रद्धेने प्रभू श्रीरामाला अन् त्यांच्या कार्याला एखाद्या देवळात जातो तसे मोठ्या भक्तीभावाने रामायण मालिकेत बघू लागले होते.
ऐंशीच्या दशकातील चिठ्ठी अन् टिव्हीचा ॲन्टेना बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्रकरणानंतर गावातील तरुण अन् पौगंडावस्थेतील मुलं संपत शेठ चोपडा यांच्या घरी शिस्तीत टिव्ही वरील विविध कार्यक्रमाचा आनंद घेऊ लागली होती. अबाल वृद्ध महिला पुरुष यांना आता संपत शेठ चोपडा यांच्या घरातील बैठकीत बसायला जागा अपूर्ण पडू लागली होती. आदरणीय संपत शेठ चोपडा यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी आता त्यांच्या घरातला ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही दररोज संध्याकाळी त्यांच्याच घराच्या ओट्यावर ठेवू लागले होते. कोल्हे पाटील यांच्या माडीच्या समोरील रस्त्यावर मोकळ्या जागेत दररोज संध्याकाळी गावातील नागरिक बारदाणा पोते अंथरूण रात्री साधारणतः नऊ - दहा वाजे पर्यंत विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम बघू लागले होते. काहीजण तर अजिबात समजत नव्हते तरी टिव्ही वरील इंग्रजी बातम्या देखील बघत असे. ही बाब रसिकतेची परिसीमा होती.
जर यदा कदाचित गावातली लाईटची dp बिघडलेली असली तर आम्ही काही बालमित्र सायकलवर डबल सीट , कधी ट्रिपल सीट पालखेड गावाच्या पूर्वेला असलेल्या महेबुबखेडा येथील भाटिया शेठ यांच्या घरी शिवणा नदी ओलांडून रामायण मालिका पाहण्यासाठी जात असायचो. कधी कधी आमच्या पालखेड गावाच्या लगत असलेल्या काटे पिंपळगाव येथे राजू शेठ यांच्या घरी जाऊन देखील रामायण मालिका बघितलेली आहे. बऱ्याचदा सोबत जिवलग बालमित्र स्व. आप्पासाहेब सुराशे, स्व. शाम शेळके,सोमनाथ गायकवाड, रमेश गायकवाड इत्यादी असायचे. आम्ही आमच्या बालपणी रामायण मालिकेचा प्रत्येक भाग महर्षी वाल्मिकी ऋषींच्या रामायण ग्रंथाला श्रद्धेने वाचल्या सारखा बघितला आहे.
एकमात्र नक्की, आमच्या पालखेड गावातील ज्येष्ठ नागरिक आदरणीय संपत शेठ चोपडा यांच्या मुळे गावातील घराघरात रामानंद सागर कृत रामायण पोहोचले होते. काळाच्या ओघात आदरणीय संपत शेठ चोपडा यांनी पालखेड गावातील श्री. पारेश्वर महादेवाच्या मंदिरात विविध जिर्णोद्धाराची कामे केली. पालखेड गावात आज जे जैन मंदिर आहे ते पूर्णतः आदरणीय संपत शेठ चोपडा यांच्या सढळ हाताने देणगी दिलेल्या देणगीतूनच झालेले आहे. तीर्थस्वरुप स्व. संपत शेठ चोपडा यांनी पालखेड गावातील कित्येक गोर गरीब वंचित लोकांच्या लग्नाला देखील आर्थिक मदत केलेली होती.
आज आदरणीय संपत शेठ चोपडा जरी हयात नसले तरी त्यांच्या स्वर्गीय आत्म्याला नक्कीच आनंद होत असेल , कारण प्रभू श्रीरामाचे भव्य राम मंदिर अयोध्येत होत आहे. संपत शेठ चोपडा यांनी ऐंशीच्या दशकात रामायण मालिकेचे पालखेड गावातील अबाल वृद्ध महिला पुरुष यांना आपल्या घरातील टिव्हीवर दर्शन घडवले होते. तत्कालीन काळातील आदरणीय संपत शेठ चोपडा यांच्या घरी रामायण मालिका ज्या ज्या नागरिकांनी बघितली होती, त्या सर्व नागरिकांच्या वतीने स्व.संपत शेठ चोपडा यांना मनःपूर्वक धन्यवाद..! 🙏🏻🌹
आम्ही अन् रामायण बाबतीत वरील सर्व आठवणी आज जाग्या होण्याचे कारण असे की, उद्या पौष शुक्ल द्वादशी, विक्रमी संवत २०८० सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्येत होणार आहे. त्यानिमित्त समस्त भारतातील समस्त राम भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा..! तसेच प्रभू श्रीरामाला विनम्र वंदन..! 🙏🏻🌺🌹
आणि खूप खूप धन्यवाद स्वर्गीय संपत शेठ चोपडा काका..!🙏🏻 केवळ तुमच्या मुळे ऐंशीच्या दशकात पालखेड गावातील सर्व नागरिकांना रामानंद सागर कृत रामायण मालिका बघता आली. गावातील घराघरात रामानंद सागर कृत रामायण पोहोचले.
( फोटो स्रोत - फेसबुक तसेच आदरणीय स्व. संपतजी चोपडा काका यांचा फोटो, त्यांचे पणतू श्री. योगेशजी चोपडा यांच्या कॉमेंट द्वारे प्राप्त झाला आहे. श्री. योगेशजी चोपडा यांच्या पूर्व परवानगीने मुख्य लेखाच्या सोबत संबधित फोटो पोस्ट केला आहे.))
जय श्रीराम
वंदे मातरम्
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - २१ जानेवारी २०२४, रविवार.