चिंतन ©️
तिमिरातून तेजाकडे - सत्यशोधक
=================================
आज सह परिवार सत्यशोधक चित्रपट बघितला. वंचित समाजासाठी आपलं अख्खं आयुष्य व्यतीत करणाऱ्या दांपत्याची तिमिरातून तेजाकडे जाणाऱ्या प्रवासाची कथा सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून बघितली. एक स्री आपलं विवाहा नंतरचं अख्खं आयुष्य आपल्या पतीच्या सोबत सावली सारखे व्यतीत करते ते बघून आई सावित्रीबाई फुले यांच्या कार्यापुढे आम्ही कुटुंबीय नतमस्तक झालो. महात्मा ज्योतिबा फुले अन् आई सावित्री बाई फुले यांच्या भूमिका क्रमान्वये संदीप कुलकर्णी अन् राजश्री देशपांडे अक्षरशः जगले आहेत.
आई सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत राजश्री देशपांडे यांनी आपल्या अभिनय क्षमतेला सर्वोत्तम प्रकारे प्रस्तुत केले आहे.चित्रपटात ज्या ज्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले अन् आई सावित्रीबाई फुले सोबत दाखवलेले आहेत, त्या प्रत्येक वेळी आई सावित्रीबाईच्या वैचारिक अन् मानसिक भावना राजश्री देशपांडे यांनी अप्रतिमरित्या व्यक्त केल्या आहेत. कधी संवादाच्या रूपातून तर कधी चेहऱ्यावर भाव व्यक्त करून..! विशेषतः उभय दाम्पत्याचे आयुष्य जेंव्हा वार्धक्याच्या प्रवासाला लागते, त्यावेळी राजश्री देशपांडे यांनी आई सावित्रीबाई फुले यांच्या भावना , विचार आपल्या सर्वोत्तम अभिनयातून व्यक्त केल्या आहेत. जेंव्हा महात्मा ज्योतिबा फुले वार्धक्यात आपलं आयुष्य व्यतीत करत असतात तेंव्हा एक अतिशय समंजस अन् भारतीय संस्कृतीतील नैतिक मूल्यांची जोपासना करणारी स्री याचा उत्तम पाठ आई सावित्रीबाई फुले यांचा अगदी वास्तववादी जाणवणारा अभिनय राजश्री देशपांडे यांनी सादर केला आहे.आपल्या पतीचा तत्वनिष्ठ स्वभाव सांभाळत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्य करताना अनेक प्रसंगांतून आई सावित्रीबाई फुले यांच्या तत्कालीन वैचारिक, भावनिक अन् मानसिक अवस्थेला राजश्री देशपांडे यांनी अप्रतिम अभिनयाने रसिकांच्या समोर प्रस्तुत केले आहे. राजश्री देशपांडे यांनी प्रत्येक प्रसंगात संयमित संवादातून अभिनय सादर केला आहे. एक स्री , त्यातल्या त्यात अठराव्या शतकातील स्त्री कशी धीरोदात्तपणे आपल्या पतीच्या सेवाभावी वृत्तीला सोबत देते, ते अनेक प्रसंग बघताना बऱ्याचदा आपल्या डोळ्याच्या कडा ओल्या होतात. विशेषत: जेंव्हा समाजातील अनौरस संततीचे पालनपोषण करताना आई सावित्रीबाई फुले यांच्यातील मातृत्व बघून आपोआप आपले हात जोडल्या जातात. त्या वंदनीय मातृत्वाला हृदयातून प्रेमपूर्वक वंदन केल्या जाते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याकाळी समाजातील अनौरस संततीचे पालनपोषण करण्याचा विडा उचलला होता हे बघून ते काळाच्या किती पुढे असणारे थोर समाजसेवक होते याची अनुभूती येते. अंगावर शहारे येतात.
महात्मा ज्योतिबा फुले अन् आई सावित्रीबाई फुले यांना जातीयवादाचे, भेदाभेदीचे चटके जसे उच्च वर्गातील मानवी घटकांकडून सोसावे लागले, तसेच चटके आप्त स्वकीयांकडून देखील सोसावे लागले.अगदी आप्त स्वकीयांकडून उभय दाम्पत्याला, त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यापर्यंत मजल गेली.सत्यशोधक या चित्रपटात असे प्रसंग बघून जातीयवादी फक्त एका विशिष्ट जातीतीलच असतात असे नव्हे ,तर आपल्याच जातीतील , अवती भोवती वावरणारे देखील असतात हे प्रकर्षाने जाणवते.नव्हे नव्हे असे झालेले आहे अन् आजही समाजात अशी परिस्थिती बऱ्याचदा बघायला मिळते. जातीयवाद ही प्रवृत्ती आहे. ती उच्च वर्णीय, शूद्र , अती शूद्र इत्यादी ठिकाणी बघायला मिळते.ज्यांना आपण उच्च वर्णीय समजतो त्यांनी देखील महात्मा ज्योतिबा फुले अन् आई सावित्रीबाई फुले यांच्या महान अशा सामाजिक कार्यात हातभार लावला होता अन् याचं समाजसेवी उच्च वर्णीय मानवी घटकांना त्यांच्याच स्वतः ला श्रेष्ठ समजणाऱ्या उच्च वर्णीय लोकांनी अतोनात त्रास दिला याचे अनेक प्रसंग सत्यशोधक चित्रपटात बघायला मिळतात. दिग्दर्शक लेखक निलेश रावसाहेब जळमकर यांनी असे प्रसंग उत्तमरित्या सादर केले आहेत.
मुंबई येथील कोळीवाडा येथे सत्कार समारंभात आपले मनोगत व्यक्त करतांना संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुले यांना अक्षरशः जिवंत उभे केले आहे. त्या सत्कार समारंभात " मी नास्तिक नाही..!" इत्यादी बाबतचे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, दीर्घ संवाद ,अभिनय संदीप कुलकर्णी अक्षरशः जगले आहेत. तिथला सत्कार समारंभ आटोपल्यावर जेंव्हा महात्मा फुले अन् आई सावित्री बाई आगगाडीने परत पुण्याला निघतात ,तेंव्हा नारायण लोखंडे यांचा निरोप घेतानाचे महात्मा ज्योतिबा फुले संदीप कुलकर्णी यांनी मुक अभिनयाने अप्रतिमरित्या सादर केले आहेत.
लहुजी वस्ताद यांची भूमिका सुरेश विश्वकर्मा यांनी छान सादर केली आहे. गाणी देखील खूप अर्थपूर्ण अन् श्रवणीय आहेत.
एकंदरीत सामाजिक जाणिवा जागृत करणारा एक समृद्ध चित्रपट सत्यशोधक - तिमिरातून तेजाकडे बघण्याचा अनुभव आला.
वंदे मातरम्
एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - १४/१/२०२४, रविवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा