शनिवार, २० एप्रिल, २०२४

हौशी मोबाईल रुग्ण

 


मला प्रवासात भेटलेले माणसं


हौशी  मोबाईल रुग्ण


==================================


आज दिनांक २०/४/२०२४ शनिवार रोजी  संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद कॉलेज समोरील शनी मंदिरात मी अन् माझी पत्नी दर्शनाला गेलो होतो. दर्शन आटोपले अन्  सोसाट्याचा वारा अन् विजांचा गडगडाटासह पाऊस सुरू झाला. आम्ही कित्येक भाविक मंदिरातच अडकलो.


साधारणतः रात्री ७:४५ आसपास पाऊस उघडला. आम्ही मंदिरातून घराकडे निघण्याचे ठरवले. आमच्या जवळचा  मोबाईल डाटा बंद करून मोबाईल एका cary बॅग मध्ये ठेवून खिशात ठेवला अन् आम्ही घराकडे निघालो. सर्वत्र लाईट गेलेली होती. आम्ही महावीर चौक ( बाबा पेट्रोल पंप ) येथे आलो अन् पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला.त्यामुळं आम्ही तिथं पुलाच्या खाली थांबलो. आमच्या सोबत कित्येकजण तिथं थांबलेले होते. ट्रॅफिक जाम झाली होती.रस्त्यावरील लाईट बंद होती.सिटी पोलीस मामा हातवारे करून वाहनांना मार्ग दाखवत होते. इतक्यात एका दुचाकीवर एक जोडपे आमच्या बाजूला येऊन थांबले. त्या दुचाकीवर मागे बसलेली  ती स्री गाडीवरून खाली काही उतरली नाही.तिच्या पुढे बसलेला पुरुष अन् पाठीमागे बसलेली ती स्री ओलाचिंब झालेले  होते. त्याही अवस्थेत त्या स्रीने तिच्या पर्स मधून मोबाईल काढला अन् त्यावर काहीतरी हाताळू लागली.  दुचाकीवर तिच्या पुढे अवघडलेल्या अवस्थेत बसलेल्या पुरुषाला त्या महिलेच्या हालचालीमुळे उभ्या असलेल्या दुचाकीचा बॅलन्स सांभाळणे कठीण होत होते.मी माझ्या पत्नीला म्हणालो...

" बघ, किती हौशी आहे. पुढे बसलेला पठ्ठ्या ओलाचिंब झालेला आहे. ट्रॅफिक जाम आहे.अंधार आहे.पाऊस सुरू आहे.अन् ही माया एवढ्या परिस्थितीत मोबाईलवर काहीतरी पाहण्याची हौस भागवून घेत आहे..!"


कमी प्रमाणत.रिमझिम पाऊस सुरूच होता. आम्ही थोडेफार ओलेचिंब झालेलो होतोच. असेही ओले झालेलो आहोतच म्हणून घराकडे निघण्याचा निर्णय घेतला. बाबा पेट्रोल पंप चौकात जास्त वेळ न थांबता घराकडे निघालो.आम्ही नगर नाक्याच्या पुढे निघालो. पाऊस सुरूच होता.रस्त्यावरील लाईट बंद होते. अंधार होता. इतक्याच आमच्या पुढे एक दुचाकीस्वार नजरेस पडला. तो पठ्ठ्या ओल्याचिंब अवस्थेत दुचाकी चालवत होता.दुचाकी चालवत असताना तो  पठ्ठ्या  एका हातात किराणा दुकानात मिळते त्या पारदर्शक cary बॅगमध्ये मोबाईल ठेवून त्या मोबाईल वर डाव्या हाताने काहीतरी हाताळत होता.  वरून रिमझिम पाऊस सुरू होता.रस्त्यावरील लाईट बंद होते. मोबाईल बघण्याची हौस तो पठ्ठ्या भागवूनच घेत होता. मी ते दृश्य माझ्या पत्नीला दाखवले.

" बघ, किती हौशी आहे हा पठ्ठ्या. रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र हौस पूर्ण करण्यासाठी याने मोबाईल भिजू नये म्हणून वरतून cary बॅग लावली अन् मोबाईल पाहण्याची हौस पूर्णच करू राहिला. याच्या हौसेला सलाम..!"


अखेर आम्ही त्याला क्रॉस करून पुढे निघून घरी पोहोचलो. आपण निवांत किंवा योग्य अवस्थेत  असलो की, मोबाईल हाताळणे योग्य .मात्र आज जे दोघेजण दिसले त्यांची अवस्था अन् त्या अवस्थेत त्यांनी हाताळलेले मोबाईल त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना संकटात ढकलत असतात.


काय म्हणावं याला..?

मोबाईल हौशी रुग्ण की, अजून काही..?


वंदे मातरम् 


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव. ©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक -२०/४/२०२४, शनिवार.

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

समाजसेवकांचे पितामह - महर्षि धोंडो केशव कर्वे


 


चिंतन ©️


समाजसेवकांचे पितामह - महर्षि धोंडो केशव कर्वे


=====================================


माझ्या मते, आपल्या संपूर्ण भारतात, सर्व समाजसेवकांमध्ये सर्वात दीर्घ आयुष्य लाभलेले एकमेव वंदनीय व्यक्तिमत्व म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे होय.


थोडक्यात सर्व समाजसेवकांचे पितामह म्हंटले तर वावगे ठरणार नाही.असे दीर्घकाळ समाजसेवेचे व्रत घेतलेले वंदनीय व्यक्तिमत्व संपूर्ण विश्वात देखील महर्षी धोंडो केशव यांच्या व्यतिरिक्त इतर कुणी नसेल याची खात्री वाटते.


उंबरठा हा मराठी चित्रपट, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याला एक प्रकारे विनम्र अभिवादनच होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी तहहयात विधवा , परितक्त्या इत्यादी वंचित महिलांच्या सामाजिक तथा शैक्षणिक विकासासाठी कार्य केले होते.


उंबरठा चित्रपटात विधवा, परितक्त्या इत्यादी वंचित महिलांच्या अनेक प्रश्नांवर उहापोह करण्यात आला होता.स्व.स्मिता पाटील यांनी उंबरठा चित्रपटात खूप छान भूमिका केली आहे. विधवा ,परीतक्त्या इत्यादी वंचित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सुलभा ( स्मिता पाटील ) तिच्या परीने प्रयत्न करते. परखड लेखक विजय तेंडुलकर सर यांनी खूप उत्कृष्ट प्रकारे उंबरठा चित्रपटाची पटकथा कथा लिहिली आहे.ग्रेट मराठी चित्रपट दिग्दर्शक आदरणीय जब्बार पटेल सरांनी उंबरठा चित्रपटाचे उत्कृष्ट दिग्दर्शन केलेले आहे. विजय तेंडुलकर सर हे साहित्य क्षेत्रातील किती मोठ्या उंचीचे व्यक्तिमत्त्व होते हे उंबरठा चित्रपट बघताना प्रत्येक क्षणी जाणवते. अतिशय उत्तम कथा- पटकथा अन् त्याला आकार दिला तो जब्बार पटेल सर सारख्या सर्वोत्तम दिग्दर्शकाने. उंबरठा चित्रपट बघताना  महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे थोर सामाजिक कार्य वेळोवेळी जाणवते. मी माध्यमिक वयोगटात असताना पालखेड येथे स्व.तीर्थस्वरूप दौलत काका कुमावत यांच्या घरी VCR व्हिडिओ वर उंबरठा चित्रपट बघितला होता.तेंव्हा उंबरठा चित्रपटातील विषय अन् त्याचं गांभीर्य समजले नव्हते. मात्र जेंव्हा समज आली तेंव्हा उंबरठा चित्रपट बघितला अन् क्षणोक्षणी जाणवले की, वंदनीय महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे कार्य त्याकाळी किती जोखमीचे , धाडसाचे होते. उंबरठा चित्रपट माझ्या मते वंदनीय महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या सामाजिक कार्याला वाहिलेली सर्वोत्तम कलाकृती आहे. 


महर्षी धोंडो कर्वे यांनी आपलं दीर्घ आयुष्य अविरतपणे सामाजिक कार्य विशेषतः महिलांचा सामाजिक उद्धार करण्यासाठी करण्यासाठी वेचलं. त्यात प्रामुख्याने विधवा विवाह प्रतिबंध मंडळ, अनाथ बालिका आश्रम, महिला विद्यालय, ग्रामीण शिक्षणासाठी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ, जातीभेद ,अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी समता संघाची स्थापना इत्यादी संस्थेच्या मार्फत महान सामाजिक कार्य महर्षी धोंडो कर्वे यांनी केले.


समाज जेंव्हा पुरोगामी अन् त्यांचे पुरोगामित्व यांच्या चर्चा करतो, तेंव्हा वंदनीय महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या नावाला आजही बहुतांशी वेळा का टाळत असतो..? पुरोगामी व्यक्तिमत्त्व म्हंटले की, काही विशिष्टच वंदनीय नावे काहींच्या मुखी असतात. अशी विशिष्ट वंदनीय नावे अशांच्या मुखी असायला काहीच हरकत नाही, ते सर्वजण वंदनीय आहेतच. मात्र स्वातंत्र्यपूर्व अन् स्वातंत्र्योत्तर काळात अनाथ, विधवा , परित्यक्ता महिलांसाठी अतिशय नाजूक सामाजिक विषय अन् त्या अंतर्गत सामाजिक कार्य ज्या थोर व्यक्तीने केले. आपलं अख्खं दीर्घ आयुष्य स्वातंत्र्यपूर्व काळात अन् स्वातंत्र्योत्तर काळात त्याच सामाजिक कार्यासाठी वेचलं त्यांच्या नावाचा आजचे तथाकथित पुरोगामी सहसा उच्चारताना आढळून येत नाही. 

हा सुध्दा जातीयवाद किंवा भेदभाव आहे का..?

असा वैयक्तिक प्रश्न मला पडतो.


असो, आज थोर समाजसेवक महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जयंती आहे. त्यांच्या अतुलनीय समाज कार्याला जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!🙏

( जन्मदिनांक - १८/४/१८५८ अन् मृत्यू दिनांक - ९/११/१९६२ )


वंदे मातरम्


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक - १८/४/२०२२, सोमवार