मला प्रवासात भेटलेले माणसं
हौशी मोबाईल रुग्ण
==================================
आज दिनांक २०/४/२०२४ शनिवार रोजी संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद कॉलेज समोरील शनी मंदिरात मी अन् माझी पत्नी दर्शनाला गेलो होतो. दर्शन आटोपले अन् सोसाट्याचा वारा अन् विजांचा गडगडाटासह पाऊस सुरू झाला. आम्ही कित्येक भाविक मंदिरातच अडकलो.
साधारणतः रात्री ७:४५ आसपास पाऊस उघडला. आम्ही मंदिरातून घराकडे निघण्याचे ठरवले. आमच्या जवळचा मोबाईल डाटा बंद करून मोबाईल एका cary बॅग मध्ये ठेवून खिशात ठेवला अन् आम्ही घराकडे निघालो. सर्वत्र लाईट गेलेली होती. आम्ही महावीर चौक ( बाबा पेट्रोल पंप ) येथे आलो अन् पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला.त्यामुळं आम्ही तिथं पुलाच्या खाली थांबलो. आमच्या सोबत कित्येकजण तिथं थांबलेले होते. ट्रॅफिक जाम झाली होती.रस्त्यावरील लाईट बंद होती.सिटी पोलीस मामा हातवारे करून वाहनांना मार्ग दाखवत होते. इतक्यात एका दुचाकीवर एक जोडपे आमच्या बाजूला येऊन थांबले. त्या दुचाकीवर मागे बसलेली ती स्री गाडीवरून खाली काही उतरली नाही.तिच्या पुढे बसलेला पुरुष अन् पाठीमागे बसलेली ती स्री ओलाचिंब झालेले होते. त्याही अवस्थेत त्या स्रीने तिच्या पर्स मधून मोबाईल काढला अन् त्यावर काहीतरी हाताळू लागली. दुचाकीवर तिच्या पुढे अवघडलेल्या अवस्थेत बसलेल्या पुरुषाला त्या महिलेच्या हालचालीमुळे उभ्या असलेल्या दुचाकीचा बॅलन्स सांभाळणे कठीण होत होते.मी माझ्या पत्नीला म्हणालो...
" बघ, किती हौशी आहे. पुढे बसलेला पठ्ठ्या ओलाचिंब झालेला आहे. ट्रॅफिक जाम आहे.अंधार आहे.पाऊस सुरू आहे.अन् ही माया एवढ्या परिस्थितीत मोबाईलवर काहीतरी पाहण्याची हौस भागवून घेत आहे..!"
कमी प्रमाणत.रिमझिम पाऊस सुरूच होता. आम्ही थोडेफार ओलेचिंब झालेलो होतोच. असेही ओले झालेलो आहोतच म्हणून घराकडे निघण्याचा निर्णय घेतला. बाबा पेट्रोल पंप चौकात जास्त वेळ न थांबता घराकडे निघालो.आम्ही नगर नाक्याच्या पुढे निघालो. पाऊस सुरूच होता.रस्त्यावरील लाईट बंद होते. अंधार होता. इतक्याच आमच्या पुढे एक दुचाकीस्वार नजरेस पडला. तो पठ्ठ्या ओल्याचिंब अवस्थेत दुचाकी चालवत होता.दुचाकी चालवत असताना तो पठ्ठ्या एका हातात किराणा दुकानात मिळते त्या पारदर्शक cary बॅगमध्ये मोबाईल ठेवून त्या मोबाईल वर डाव्या हाताने काहीतरी हाताळत होता. वरून रिमझिम पाऊस सुरू होता.रस्त्यावरील लाईट बंद होते. मोबाईल बघण्याची हौस तो पठ्ठ्या भागवूनच घेत होता. मी ते दृश्य माझ्या पत्नीला दाखवले.
" बघ, किती हौशी आहे हा पठ्ठ्या. रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र हौस पूर्ण करण्यासाठी याने मोबाईल भिजू नये म्हणून वरतून cary बॅग लावली अन् मोबाईल पाहण्याची हौस पूर्णच करू राहिला. याच्या हौसेला सलाम..!"
अखेर आम्ही त्याला क्रॉस करून पुढे निघून घरी पोहोचलो. आपण निवांत किंवा योग्य अवस्थेत असलो की, मोबाईल हाताळणे योग्य .मात्र आज जे दोघेजण दिसले त्यांची अवस्था अन् त्या अवस्थेत त्यांनी हाताळलेले मोबाईल त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना संकटात ढकलत असतात.
काय म्हणावं याला..?
मोबाईल हौशी रुग्ण की, अजून काही..?
वंदे मातरम्
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव. ©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक -२०/४/२०२४, शनिवार.

