शनिवार, २९ जून, २०२४

सेम टू सेम अन् विश्वास


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


' सेम टू सेम अन् विश्वास '


=================================


आज संध्याकाळी हेल्मेट खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील एका दुकानात मी अन् माझी धर्मपत्नी गेलो होतो. तिथं गेल्या गेल्या जे सद्गृहस्थ दुकान मालक म्हणून बसलेले होते त्यांना बघितल्या बघितल्या मला भारताचे महान वैज्ञानिक/ अंतरीक्ष शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांची आठवण आली. सदरील सद्गृहस्थ अगदी सेम टू सेम थोर शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांच्या सारखेच दिसत होते. असं म्हणतात की, या भूतलावर एकाच व्यक्ती सारखे दिसणारे किमान पाच जण असतात.त्याचा प्रत्यय मला तर याचि देही याचि डोळा आज पुन्हा एकदा आला होता. मला असाच सेम टू सेम दिसण्याचा अनुभव मागील वर्षी दिल्ली प्रवासात फिरताना आला होता. त्यावेळी ती व्यक्ती पालखेड गावातील पण हल्ली छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या मित्रासारखी दिसून आली होती.


आकार अन् रंग निवडून हेल्मेट पसंद केले. आमची स्कूटी दुचाकी काहीशी दूरवर पार्किंग मध्ये लावली होती. डिकीत हेल्मेट बसते की नाही याची खात्री करण्यासाठी मी हेल्मेट घेऊन जाऊ शकतो का ? असे विचारले. संबंधित ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने " त्यात काय विचारता , घेऊन जा..!" असे म्हंटले. त्यांनी जरी माझ्यावर विश्वास दाखवला होता तरी देखील मी माझा महागडा मोबाईल त्यांच्या जवळ दिला अन् म्हणालो..

" माझा मोबाईल तुमच्या जवळ असू द्या. "

यावर ते सद्गृहस्थ म्हणाले - " अहो, मोबाईल कशाला देता " 

मी म्हणालो - " काका, तुमची अन् माझी अजिबात ओळख नाही.तुम्ही विश्वासाने महागडे हेल्मेट माझ्याजवळ दिले आहे. माझी स्कूटी दूरवर लावली आहे. मी तिकडून तिकडेच निघून गेलो तर..!"

त्यावर ते ज्येष्ठ सद्गृहस्थ हसून म्हणाले - " मी माणसं ओळखतो. "

तरीपण मी म्हणालो - " काका, तसे नाही, जग फार विचित्र आहे. कुणाचा भरवसा नाही. कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका. त्यात तुम्ही अन् मी तर अजिबात ओळखीचे नाही. आमची स्कूटी पण दूरवर पार्किंग केली आहे. माझा मोबाईल तुमच्या जवळ असू द्या. मी हेल्मेट स्कूटीच्या डिकीत बसते की नाही याची खात्री करतो अन् पुन्हा परत येतो."


अखेर मी माझा महागडा मोबाईल संबंधित व्यक्तीच्या काउंटरवर ठेवला अन् हेल्मेट घेऊन गेलो. हेल्मेट डिकीत बसते की नाही याची खात्री झाली अन् पुन्हा परत दुकानात आलो. माझा मोबाईल ताब्यात घेतला. संबंधित ज्येष्ठ व्यक्तीने माझ्याशी मग कित्येक वेळ अनौपचारिक गप्पा मारल्या.त्यात अजून वैचारिक खोली अन् त्याद्वारे मंथन झाले.


विश्वास असे मूल्य आहे जे एकदा गेले की, पुन्हा कधीच परत येत नाही. सेम टू सेम माणसं अन् विश्वास खूपच कमी प्रमाणात बघायला मिळतात.


वंदे मातरम् 


नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: २९ जून २०२४, शनिवार.

सोमवार, १० जून, २०२४

रयतेचा स्वातंत्र्यदिन - शिवराज्याभिषेक दिन


रयतेचा स्वातंत्र्यदिन - शिवराज्याभिषेक दिन







 I







चिंतन ©️

रयतेचा स्वातंत्र्यदिन - शिवराज्याभिषेक दिन

==================================

वैयक्तीक अथवा सामूहिक मानवी मन स्वतंत्र असणं हे त्या त्या मानवी मनाच्या अवतीभोवती असणाऱ्या मानवी स्वातंत्र्याच्या सामाजिक वातावरणावर अवलंबून असते. जर वैयक्तिक अथवा सामूहिक मानवी मनाला कुणीतरी शारीरिक , भावनिक किंवा मानसिकरीत्या बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला तर तिथली मानवी मने एकतर पारतंत्र्यात जातात किंवा मनाने खचून जातात. प्राचीन भारताच्या कालखंडात जर बघितले तर महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या रूपाने राजकीय स्थैर्य अन्  त्या पाठोपाठ राज्य निर्माण करणाऱ्या अन् तिथल्या खचलेल्या समाजमनाचे नेतृत्व म्हणून त्या नेतृत्वाचा उदय होतो. चंद्रगुप्त मौर्य आपल्या नेतृत्वगुणांनी मोठे मौर्य साम्राज्य निर्माण करतो. 

इतिहास हे त्या त्या कालखंडाचे अपत्य असते. इतिहास असे अपत्य आहे जे की, त्या त्या कालखंडाचे प्रतिनिधित्व करत असते. प्रत्येक कालखंडाचा इतिहास मग त्यातली व्यक्तिमत्वे देखील आलीत ती सर्व कर्माने एकसारखीच असतील असे नसते. प्रत्येकाचे कार्य , कार्य करण्याची पद्धती कालपरत्वे बदलत जाते. एकमात्र नक्की त्या त्या कालखंडाला पोषक असणाऱ्या सामाजिक परिस्थितीनुसार राज्यकर्ते अन् त्यांनी निर्माण केलेल्या राजव्यवस्था निर्माण होत गेल्या अन् त्यातून समाजमनाला आपलंसं वाटणारे नेतृत्व त्या त्या कालखंडात उदयाला येत गेले. हा इतिहास आहे , हेच वर्तमान आहे अन् हेच भविष्य देखील असेल यात तिळमात्र शंका नाही. याला कोणताही कालखंड अपवाद नाही. फरक फक्त इतकाच की, त्या त्या कालखंडातील सामाजिक परिस्थिती नुसार त्या त्या कालखंडातील समाजमनाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते निर्माण होतात हा इतिहास ,हेच वर्तमान आहे अन् हेच भविष्य देखील आहे.

मध्ययुगीन भारताच्या कालखंडात जर डोकावून बघितले तर माझ्या मते आपल्या भारतवर्षात दोन असे महान राज्यकर्ते झाले ज्यांना सर्व सामान्य , तळागाळातील समाजमनाने अगदी हृदयातून स्वीकारले अन् साथ दिली. त्यांना अशा समाजमनाने अगदी हृदयातून स्विकरणायचे कारण होते त्या महान राज्यकर्त्यांचे आपल्या रयतेशी , त्यातल्या त्यात सर्व सामान्य रयतेशी असलेलं अत्यंत प्रेमळ प्रामाणिक नाते होय. त्याच सर्व सामान्य लोकांनी या दोन्ही राष्ट्र पुरुषांवर जीवापाड प्रेम केले अन् कृतीतून साथ देखील दिली.  मध्ययुगीन भारताच्या कालखंडातील ते दोन महान राज्यकर्ते होते महाराणा प्रतापसिंह महाराज अन् छत्रपती शिवाजी महाराज..! 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन केले. येथे ' रयत ' हा फक्त तीन अक्षरी  शब्द नसून त्यामागे खूप मोठा सामाजिक अर्थ अभिप्रेत आहे. तत्कालीन काळात  आपलं स्वार्थी हित जोपासणारे, गोर गरिबांवर अत्याचार , अन्याय करणारे या सर्वांना फाट्यावर मारून अगदी तळागाळातील सर्व सामान्य लोकांना सोबत घेऊन आपलंसं करून राजसत्ता स्थापित कुणी केली  असेल तर ती सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी..! त्यामुळं ' रयत ' हा फक्त तीन अक्षरी शब्द नसून त्या मागे छत्रपती शिव प्रभूंनी निर्माण केलेली अन् स्थापित केलेली संस्कृती आहे. अशी संस्कृती जिथं आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास हाय प्रोफाईल लोकांपेक्षा समर्पण वृत्ती अन् जाणीव असणाऱ्या सर्व माणसाला केंद्र बिंदू मानून ' रयतेचे राज्य ' प्रारंभ झाले. आणि याचे सर्वोतोपरी श्रेय जाते त्या महान व्यक्तिमत्त्वाला ज्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराज या पवित्र नामोल्लेखाने पुजतो.

मानवी आयुष्याला सर्वात प्रिय काय असेल तर तर स्वातंत्र्य असते. समस्त जणांच्या मनात स्वातंत्र्याची चेतना प्रज्वलित करण्यात ज्या पवित्र अन् श्रद्धेय मनाने आपल्या कृतीतून सिद्ध केले ते सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज होते. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेला जो स्वातंत्र्याचा आशावाद दाखवला होता तो त्यांनी रयतेचे राज्य स्थापित करून पूर्णत्वास नेला. तो मंगलमय पवित्र दिवस होता ६ जून १६७४. याच दिवशी गोर गरीब, वंचित, दीन दुबळ्या , सर्व सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक किल्ले रायगड येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला होता. ही घटना तिथून पुढच्या समस्त भारतीय समाजमनावर दीर्घकालीन परिणाम करणारी ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपन्न झालेला शिवराज्याभिषेक सोहळा हा तिथून पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत गेला. शून्यातून , स्वकर्तृत्वाने, श्रद्धा अन् जाणीव असणाऱ्या लोकांना सोबत घेऊन अंधारलेल्या मार्गातून पुढे जाऊन रयतेचे राज्य निर्माण केल्या जाऊ शकते याची प्रचिती आली. शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा त्या समस्त सर्व सामान्य लोकांचा होता, ज्यांना असे जाणवले होते की,कुणीतरी आपला माणूस राजसत्तेत सिंहासनावर आरूढ झाला आहे याची प्रचिती आली होती. सर्व सामान्य लोकांची हीच प्रेरणा आपल्या भारतात लोकशाहीची पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी निमित्त ठरली. प्राचीन भारताच्या कालखंडात महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या रूपाने लोकशाहीची पाळेमुळे रोवण्यासाठी जो प्रारंभ झाला होता, त्याचा वेलू गगनावरी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने उंचच उंच गेला. शिवराज्याभिषेक सोहळा रयतेतील शेवटच्या मानवी घटकाला सुखावून गेला होता. ज्यावेळी एखाद्या राज्यकर्त्यांची एखादी कृती रयतेतील शेवटच्या मानवी घटकाला सुखावून जाते तेंव्हा तिथं खऱ्या अर्थानं रयतेचे राज्य स्थापन झाल्याचा सामाजिक अर्थ वास्तवात उतरत असतो. हे भाग्य छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वकर्तृत्वाने, कर्म अन् धर्माने प्राप्त केले होते. त्यामुळं समस्त लोकांच्या हृदयात शिवराज्याभिषेक सोहळा ही घटना स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारी क्रांतिकारी घटना होती.

दिनांक ६ जून २०२४ , गुरुवार रोजी सकाळी छत्रपती शिवरायांचे मूळ गाव तीर्थक्षेत्र वेरूळ येथील स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले गढी परिसर - जि. छत्रपती संभाजीनगर येथे अतिशय नेत्रदीपक ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मी अन् माझी धर्मपत्नी पहाटेच तीर्थक्षेत्र वेरूळ येथे उपस्थित झालो होतो. आमचं नशीब, या पुण्यवान अन् अभिमानास्पद प्रसंगात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. माझा जिवलग मित्र, जाणीव असणारे व्यक्तिमत्त्व तथा गुरू बंधू मनोहर गावडे ( जि.प. शिक्षक ) तसेच राजेंद्र भाऊ पवार आणि त्यांचे इतर सर्व  सहकारी यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अभिषेक सोहळ्याचे खूपच छान नेत्रदीपक नियोजन केले होते. पहाटेच संपूर्ण परिसराला फुलांनी, आसन व्यवस्था इत्यादी आकर्षक पद्धतीने सजवले होते. १२५ जोडप्यांच्या शुभहस्ते , प्रत्येक जोडप्याच्या समोर असलेल्या शिवप्रभूंच्या मूर्तीवर वेद शास्त्र संपन्न ब्रम्हवृंदाच्या मुखातून निघणाऱ्या पवित्र मंत्रांच्या उच्चारात पूजन सोहळा श्रध्देने संपन्न झाला. सदरील कार्यक्रमाचे अतिशय नियोजपूर्वक आयोजन करण्यात आले होते. कुठेही नियोजन चुकणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती. शिव प्रभूंचा पूजन सोहळा श्रध्देने संपन्न झाल्यानंतर जे पती पत्नी पूजन सोहळ्याला बसले होते त्यांना , त्यांनी अभिषेक करून पूजन केलेली छत्रपती शिवरायांची मूर्ती आयोजकांकडून श्रद्धापूर्वक सप्रेम भेट दिली.  एक श्रद्धेय अन् उत्कृष्ट नियोजन अन् आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे हृदयातून मनःपूर्वक कौतुक..!

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून जगण्याला प्रेरणा देणारा मूलमंत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज या नावावर कित्येकांना प्रेरणा मिळाली.कित्येक पिढ्या जगल्या जिवंत राहिल्या आहेत अन् राहणार आहेत. प्रत्येकाचे  जगणं भिन्न भिन्न होते, आहे अन् राहील इतकेच..!

लेखाच्या शेवटी डॉ. सदाशिवराव शिवदे लिखित असलेल्या काव्यातील काही ओळी व्यक्त करून सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवरायांना विनम्र वंदन करून थांबतो.( काव्य ओळी स्रोत -  यू ट्यूब )

शककर्त्यांचा मेरुमनी तू , राजश्रींचा राजा 
युगंधराचा योगी अन् तू सामर्थ्याचा सर्जा 

महान मंदिर महाराष्ट्राचे , सुफलीत संचित संह्याद्रीचे
संजीवन हो जनामनांचे रयतेच्या रे तारणहारा , पावित्र्याच्या तेजा 
युगंधराचा योगी अन् तू सामर्थ्याचा सर्जा  || १ ||

छत्रपती शिवाजी महाराज की जय..!
हर हर महादेव 
वंदे मातरम्

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव. ©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

लेखन दिनांक - १० जून २०२४, सोमवार.


शनिवार, १ जून, २०२४

hi , पापा


 


चिंतन ©️


' hi , पापा '


================================


खूप दिवसांनी अतिशय भावप्रधान असलेला '.मूळचा दक्षिण भारतीय चित्रपट '   हाय पापा ' हा चित्रपट बघितला.


आता पर्यंत बहुतांशी चित्रपटात अपत्यांच्या आयुष्यात असलेले आईचे गोडवे गायले गेलेले बघितले , मात्र माझ्या पाहण्यात पहिल्यांदा ' हाय पापा ' या चित्रपटात एका बापाची आपल्या चिमुकल्या लेकी विषयी अतिशय सुंदर भावप्रधान कथा बघण्यात आली. आपलं करियर अन् त्याच्या महत्वकांक्षेपोटी एका तरुण आईने चिमुकलीचा केलेला त्याग, लग्न झालेल्या मुलीच्या आईने आपल्या लेकीच्या वैवाहिक आयुष्यात खूप खोलवर डोकावल्यावर , हस्तक्षेप केल्यावर मुलीच्या संसाराची कशी धूळधाण होते त्याचं संयत पद्धतीने छान सादरीकरण करण्यात आले आहे. बऱ्याचदा विवाहित मुलींच्या वैवाहिक आयुष्यात तिचीच आई खल प्रवृत्तीचे काम करत असते. त्याचा परिपाक असा होतो की, नैतिक दबावामुळे किंवा कुसंगतीने मुलगी ऐकत जाते अन् स्वतः चे सुखी  वैवाहिक आयुष्य दुःखी करून बसते. उपवर असणाऱ्या मुलीच्या आई वडिलांचे उडणारे खटके त्यातून उपवर मुलीच्या वडिलांची अन् मुलीची होणारी घुसमट , वडील अन् मुलगी असणाऱ्या व्यक्तिरेखेने छान सादर केली आहे. समाजात एक स्री म्हणून विवाहित मुलीच्या आईला सामाजिक सहानुभूती मिळते.मात्र बऱ्याचदा याचं मुलीच्या आई आपल्या स्वभावानं आपल्या लेकीच्या वैवाहिक जीवनात दुःख निर्माण करू लागतात. ही एक काळीकुट्ट सामाजिक बाजू हाय पापा या चित्रपटात संयत पद्धतीने सादर केलेली आहे. 


एक पुरुष आपलं वैवाहिक आयुष्यातील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी किती संयमी वागतो , एका चिमुकल्या लेकीला जेंव्हा समजते की, आपल्या जन्मदात्या आईने आपला  त्याग केला यावेळी त्या चिमुकल्या लेकीने आपल्या बापाच्या गळ्यात पडून हाय मोकलून रडणं हे असे कित्येक प्रसंग माणसांच्या नात्यातील विविध रंग प्रदर्शित करतो. एक सासरा आपल्या नातीसाठी अन् जवयासाठी त्यांना भावनिक आधार देण्यासाठी पत्नी ऐवजी जावई बापू सोबत राहणे पसंद करतो हे बघून पुरुषाच्या भावनिक नात्याचा एक भावनिक पदर बघून मन भरून येते.


अभिनय, अतिशय संयत पटकथा आणि सर्वात उजवी बाजू म्हणजे समर्पक बॅक ग्राउंड संगीत खूपच छान सादर केल्या गेले आहे. चित्रपटाचे बॅक ग्राउंड संगीत ऐकूण बऱ्याचदा गहिवरून येते. सुंदर लोकेशन, हळुवार गाणी यामुळं हाय पापा हा चित्रपट हृदयात घर करतो. जयराम अन् मृणाल ठाकूर अन् त्यांची चिमुकली कन्या  यांनी आपल्यातील भाव भावनांचा गहिवर या चित्रपटात पुरेपूर ओतला आहे.विशेषत तरुण पतीच्या भूमिकेत जयराम यांनी कित्येक भावनिक प्रसंगांना आपल्या अभिनयाने खूप उंचीवर नेऊन ठेवले आहे.त्यांना तितकीच तोलामोलाची साथ दिली आहे ती त्यांच्या चिमुकल्या लेकीच्या निरागस अभिनयाने..!


चित्रपट खूप संथ गतीने पुढे जातो.त्यामुळं उतावीळ प्रेक्षकांना अन् ढिश्युम ढिश्युमची आवड असणाऱ्यांना ' हाय पापा ' हा चित्रपट बहुदा आवडणार नाही.


ता.क. - दक्षिण भारतातील चित्रपट क्षेत्रातील सर्व कलावंत बॉलिवूडला प्रत्येक क्षेत्रात फाट्यावर मारतात.

ग्रेट आहेत.


वंदे मातरम् 


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १/६/२०२४, शनिवार.