शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

तीर्थरूप वडिलांच्या आठवणीतील प.पू.भगवान बाबा


 

चिंतन ©️


तीर्थरूप वडिलांच्या आठवणीतील प.पू.भगवान बाबा 


=================================


माझे स्व.तीर्थरूप वडील त्यांच्या थोरल्या बहिणीच्या सासरच्या गावी बालमटाकळी, ता. शेवगाव, जि. अहिल्यादेवी देवी नगर  (अहमदनगर ) येथे प्राथमिक शाळेत शिकायला होते. तो कालखंड होता साधारणतः इ.स. १९४० ते इ.स. १९५० दरम्यानचा..! त्यावेळी दरवर्षी बालमटाकळी येथे हिंदू धर्मातील धार्मिक सप्ताह आयोजन तेथील गावकऱ्यांच्या द्वारे आयोजित केल्या जात असे. त्या सप्ताह निमित्त मुख्य धार्मिक गुरुवर्य प्रवचनकार / कीर्तनकार  म्हणून आदर्श समाज सुधारक राष्ट्रसंत श्री. भगवान बाबा महाराज असायचे. 


थोर राष्ट्रसंत श्री. भगवान बाबा महाराज यांचा मुक्काम तत्कालीन बालमटाकळी गावातील शाळेतील वर्ग खोल्यात असायचा. परम पूज्य श्री.भगवान बाबा महाराज यांच्या मुकामाच्या वेळी त्यांची सेवा करण्याचे भाग्य माझे स्व.तीर्थरूप वडील अन् त्यांच्या काही बालमित्रांना त्यावेळी लाभले होते. त्यावेळी मुक्कामाच्या ठिकाणी दिवाबत्ती करणे, परम पूज्य श्री. भगवान बाबा महाराज यांचे  पाय दाबून देणे, भोजन आटोपल्यावर ताट तांब्या उचलून धुवून ठेवणे, परम पूज्य श्री. भगवान बाबा महाराज यांच्या प्रवासातील घोड्यांची निगा राखणे इत्यादी कामे माझ्या स्व. तीर्थरूप वडिलांनी अन् तत्कालीन बालमटाकळी स्थित काही बालमित्रांच्या भाग्यात होते. परम पूज्य श्री. भगवान बाबा यांची देहयष्टी उंचीपुरी काटक होती. आवाज उंच अन् कडक होता. बालमटाकळी येथील धार्मिक सप्ताह सुरू झाला की, दररोज परम पूज्य श्री. भगवान बाबा यांचे प्रवचन / कीर्तन सेवा असायची. बालमटाकळी येथील समस्त नागरिक परम पूज्य श्री.भगवान बाबा महाराज यांच्या अमृतवाणीत गुंग होऊन जायचे. 


वरील सर्व आठवणी माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी मला , माझ्या पत्नीला अन् माझ्या दोन्ही मुलांना बऱ्याचदा सांगितलेल्या होत्या. घरातील ज्येष्ठ माणसं ही आपल्या सोबत त्यांच्या आयुष्यातील कित्येक आठवणींचा खजिना घरातील बालकं , तरुण अन् प्रौढांकडे रिक्त करत असतात.फक्त ज्येष्ठांना मायेनं समजून उमजून घेणारे स्री अन् पुरुषांना मन असावं लागत, दुसरं काहीच नाही..! आपल्या सोबत घरातील ज्येष्ठ असण्यापेक्षा , ज्येष्ठांच्या सोबत आपण असायला हवे हे अत्यंत महत्त्वाचे ठरले. 


२८ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही माझ्या स्व. तीर्थरूप वडिलांच्या सोबत सहपरिवार तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे माऊली विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला  गेलो होतो. त्यावेळी पंढरपूर येथील मुक्काम माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांच्या आग्रहाखातर परम पूज्य श्री. भगवान बाबा महाराज यांच्या मठात केला होता. वास्तविक मी पंढरपूर येथील मुक्काम गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या मठात अगोदरच नियोजित केलेला होता.पण पंढरपूर येथे संध्याकाळी माझ्या वडिलांच्या वाचण्यात ' भगवान बाबा मठ ' असे वाचण्यात आले अन् माझ्या वडिलांनी मला आदेश दिला की, " आपण परम पूज्य श्री. भगवान बाबा महाराज यांच्याच मठात मुक्कामी जायचे. दुसरे कुठेच नाही "  मी वडिलांचे ऐकले अन् परम पूज्य श्री.भगवान बाबा महाराज यांच्या मठात आम्ही सह परिवार मुक्कामी थांबलो होतो. वास्तविक मलाही त्या क्षणापर्यंत माहीत नव्हते की, पंढरपूर येथे परम पूज्य श्री भगवान बाबा महाराज यांचा मठ आहे म्हणून..! त्या मुक्कामाच्या रात्री परम पूज्य श्री भगवान बाबा महाराज मठ पंढरपूर येथे कोणत्या तरी एका महाराजांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आलेली होती. आमचे जेवणं झाल्यावर आम्ही त्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहिलो होतो.


आम्ही ज्यावेळी पंढरपूर येथील श्री. भगवान बाबा महाराज यांच्या मठात मुक्कामी थांबलो होतो त्यावेळी माझे स्व.तीर्थरूप वडील पुन्हा एकदा त्यांच्या बालपणातील , प्राथमिक वयोगटातील आठवणीत रमून गेले होते. 


आजही  श्री. भगवान बाबा महाराज यांच्या मठात २८ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही  मुक्कामी थांबलो होतो त्यावेळच्या तेथील पावत्या आम्ही जपून ठेवलेल्या आहेत. आपल्या पूर्वजांच्या, श्रद्धेयांच्या आठवणी जाग्या झाल्या की, त्याच गतकाळातील त्यांच्या स्पर्शाने , सहवासाने पूनित झालेल्या वस्तू आपल्याला त्याच श्रद्धेय आठवणीत घेऊन जात असतात. जसे की,  श्री. भगवान बाबा महाराज यांच्या पंढरपूर स्थित मठात तीर्थरूप वडिलांच्या सोबत आम्ही मुक्कामी थांबलो होतो त्यावेळच्या पावत्या..! काहींच्या दृष्टीने ही बाब क्षुल्लक असेल, पण ज्यांना भावना अन् मन त्यातल्या त्यात ते श्रद्धेय असेल त्यांच्या दृष्टीकोनातून या बाबी नक्कीच परम वंदनीय ठरतात.


ता.क. - श्रद्धेय आठवणी ह्या जपून ठेवल्या की, श्रद्धेय स्वर्गवासी माणसं देखील सतत आपल्या अवती भोवतीच आहेत याची सतत जाणीव होत असते.


असो, आज परम पूज्य श्री भगवान बाबा महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याला माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून श्रद्धापूर्वक विनम्र वंदन..!🙏🏻


जय भगवान बाबा 

वंदे मातरम् 


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २४ ऑगस्ट २०२४, शनिवार

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

हरवलेलं पाकीट


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


हरवलेलं पाकीट


===================================


हरवलेली वस्तू कुणाची का असेना ती त्याला मनाने अस्वस्थ करत असते. मनाची अस्वस्थता आपल्या सोबत आपल्या अवतीभोवती असणाऱ्या जीवांना देखील अस्वस्थ करत असते. त्यातल्या त्यात ज्यांची जी वस्तू हरवलेली आहे ते मन जर सर्व सामान्य मानवी समूहातील असेल तर त्या जीवाची होणारी अस्वस्थता फार वेदनादायी असते. 


काल दिनांक ९/८/२०२४, शुक्रवार रोजी नेहमी प्रमाणे मी अन् माझी धर्मपत्नी रात्री साधारणतः ९:३० वाजेच्या आसपास फेरफटका मारायला घराचे बाहेर पडलो होतो.मुख्य रस्त्याने जात असताना रस्त्यावर एक पाकीट पडलेले माझ्या पत्नीच्या  नजरेत आले. माझ्या पत्नीने अन् मी आजूबाजूला कुणी आहे का याची खातरजमा केली.जेणेकरून रस्त्यावर पडलेल्या पाकिटाच्या बाबतीत चौकशी करता येईल.मात्र आजूबाजूला कुणीच नव्हते. पाकीट काहीसे वजनदार होते. त्यात बघितले तर बरीच रक्कम होती अन् काही कार्ड होते. आजूबाजूला कुणीही दिसत नसल्यामुळे मी अन् माझी धर्मपत्नी पाकीट घेऊन घरी आलो. रात्रीचे साधारणतः दहा वाजले होते. घरी आल्यावर पाकीट उघडून त्यात काय काय आहे हे आम्ही बघितले. त्यात नोटांच्या अन् नाण्यांच्या स्वरूपात रक्कम होती. पाकिटाच्या  दुसऱ्या कप्प्यात आधार कार्ड्स, पॅन कार्ड,बँकेचे एटीएम कार्ड होते. त्यातील एक आधार कार्ड छोट्या मुलीचे होते. त्या पकिटावरून ते एका सर्व सामान्य नागरिकाचे वाटत होते. संबंधित पाकिटात असलेल्या आधार कार्ड , पॅन कार्ड आणि एटीएम कार्डवर ' सुरेश किसन मासोळे ' असे नाव होते.संबंधित व्यक्तीचे एकाच क्रमांकाचे दोन आधार कार्ड अन् त्यावर दोन भिन्न भिन्न पत्ते होते. एक पत्ता वडगाव कोल्हाटी ( बजाजनगर छ. संभाजीनगर ) येथील तर दुसरा पत्ता खवडा डोंगर, रमाई नगर तिसगाव ( छ. संभाजीनगर ) येथील पत्ता होता. संबंधित व्यक्तीला संपर्क होईल असे मोबाईल नंबर त्या पाकिटात आढळून आले नाहीत. आता रात्रीचे १०:३० वाजले होते. वडगाव कोल्हाटी पत्ता वाचल्यावर मी त्याचवेळी माझा खूप जिवलग बालमित्र आण्णासाहेब कारभारी म्हस्के ( बजाजनगर ) यास कॉल केला अन् सर्व प्रकार सांगितला.तसेच उपरोक्त नावाच्या व्यक्ती बाबत काही खातरजमा होईल का याबाबत चर्चा केली.आण्णासाहेबने सांगितले की, त्या परिसरातील काही कामगार अन् काही व्यक्तींना याबाबत आपण उद्या चौकशी करूया असे मला सांगितले.


आता रात्रीचे अकरा वाजले होते. इतर मार्गाने संबंधित व्यक्तीचा संपर्क होऊ शकतो का या विचारचक्रात मी होतो.अखेर संबंधित व्यक्तीच्या नावाचे फेसबुक अकाऊंट सर्च  करण्याचे ठरवले. ' सुरेश  मासोळे ' नावाचे अनेक फेसबुक अकाऊंट फेसबुक वर दिसू लागले होते. आता यापैकी नेमके कोणते हे शोधण्यासाठी मी , संबंधित व्यक्तीच्या आधार कार्ड वरील फोटोचा आधार घ्यायचे ठरवले. संबंधित व्यक्तीच्या नावाच्या फेसबुक अकाऊंट वरील प्रोफाईल फोटो अन् माझ्याकडे उपलब्ध असलेल्या आधार , पॅन कार्ड वरील फोटो मॅचींग होईना. अखेर संबंधित नावाच्या भिन्न भिन्न फेसबुक अकाऊंट चेक करू लागलो. अखेर एक फेसबुक अकाऊंट अन् त्यावर अपलोड केलेल्या फोटोत, एका छोट्या दीदीचा , संबंधित व्यक्तीचा फोटो अन् पाकिटात आढळून आलेल्या आधार कार्ड वरील छोट्या दीदीच्या अन् संबंधित व्यक्तीच्या फोटोत एक समानता आढळून आली. मला खात्री पटली होती की, हेच फेसबुक अकाऊंट आम्हाला सापडलेल्या पाकीट मालकाचे आहे. मात्र सदरील फेसबुक अकाऊंटवर शेवटची पोस्ट बरीच जुनी असल्याने सदरील फेसबुक अकाऊंट सुरू आहे की बंद आहे याची मला शंका आली. तरीपण संबंधित व्यक्तीला संपर्क करण्याच्या हेतूने मी त्यांच्या फेसबुक मेसेंजर वर मेसेज पोस्ट केला.मात्र कुठलाच संपर्क झाला नाही. अखेर संबंधित व्यक्तीच्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मध्ये त्याच आडनावाचे फेसबुक अकाऊंट चेक केले.त्यावर कुणाच्या फेसबुक अकाऊंटवर मोबाईल नंबर दिसतो का याची तपासणी केली.मात्र एकाच्याही फेसबुक अकाऊंटवर मोबाईल नंबर आढळून आला नाही.आता मध्यरात्रीचे बारा वाजले होते. मी माझ्या पत्नीला म्हणालो - " उद्या सकाळी लवकर आपण संबंधित व्यक्तीच्या आधार कार्ड वरील खवडा डोंगर, रमाई नगर तिसगाव ( छ. संभाजीनगर ) येथे जाऊ.त्या परिसरात संबधित व्यक्तीच्या नावाची चौकशी करू अन् जर योग्य त्या पुराव्यानिशी कुणी सापडले तर त्या व्यक्तीला आपल्याला सापडलेले पाकीट देऊन टाकू.यावर माझी पत्नी मला म्हणाली - " जर या नावाची व्यक्ती तिथं आढळून आली नाही तर..!"

मी लगेच म्हणालो - " शेवटचा पर्याय म्हणून ज्या मुलास त्याच्या बालपणी  अभ्यासाची  प्रेरणा दिली आहे तो आपल्याच गावचा अन् आपल्याच गल्लीतील एक होतकरू तरुण मुक्तेश्वर लाड याच आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.त्यास सकाळी कॉल करून पुढील मार्गदर्शन घेऊ. " 


आज दिनांक १०/८/२०२४, शनिवार रोजी भल्या सकाळी मी अन् माझी पत्नी खवडा डोंगर, रमाई नगर तिसगाव ( छ. संभाजीनगर ) येथील परिसरात पोहोचलो.त्या परिसरातील रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला थांबवून  ' सुरेश किसन मासोळे ' नावाची कुणी व्यक्ती या परिसरात राहते का ? विचारले. त्या दुचाकीस्वाराने होकार दिला अन् कोणत्या रस्त्याने जायचे अन् कुठं नेमकं त्यांचे घर आहे हे आम्हाला सांगितले. आम्ही आता निश्चिंत झालो होतो. ज्याचं ते पाकीट होते ते त्या व्यक्तीच्या ताब्यात दिले जाणार याचा मनस्वी आनंद झाला होता. चिखलाच्या अन् ओबडधोबड रस्त्याने जात आम्ही माहीत झालेल्या पत्यावर पोहोचलो होतो. पत्र्याचे शेड असलेल्या घराच्या समोर एवढ्या भल्या सकाळी कुणीतरी आलेलं बघून तिथली एक भगिनी जरा गडबडून गेली. मी त्यांना विचारले की,  " सुरेश किसन मासोळे येथेच राहतात का ? " 

त्या माऊलीने जरा भीतभीतच मला प्रत्युत्तर दाखल विचारले  " हा , काय झालं..?" 

मी म्हणालो - " घाबरु नका ताई. त्यांचे पाकीट आम्हाला काल रात्री सापडले आहे.ते त्यांना परत करायला आलो आहे. "

हे ऐकल्याबरोबर त्या माऊलीने सुस्कारा सोडला अन् म्हणाली.. " मला वाटलं का, माझ्या पोराने काही केलं की काय. त्यामुळं मी घाबरून गेली होती. काल तो भद्रा मारुतीच्या दर्शनाला खुलताबादला गेला होता. झोपलेला आहे अजून. उठवते त्याला. "


आईची माया आपल्या कोणत्याही वयोगटातील लेकराविषयी सदैव सावध अन् काळजीच्या भावनेत असते याचं मूर्तिमंत उदाहरण आमच्या समोर त्या क्षणाला आम्हाला जाणवले होते.


थोड्या वेळानं संबंधित व्यक्ती डोळे चोळत चोळत आनंदित मुद्रेने आमच्या समोर आली. मी जो फोटो आधार कार्डवर बघितला होता तिच व्यक्ती आमच्या समोर होती. आपलं हरवलेलं पाकीट आपल्याला मिळतंय या भावनेने ती व्यक्ती सकाळच्या राम पहारी खूपच आनंदून गेलेली जाणवू लागली होती. आनंद होणारच..! सर्व सामान्य लोकांना आपल्या अंग मेहनतीचे पैसे जर कुठे हरवले तर अशी माणसं सर्वाधिक चिंतातुर होत असतात. दिवसभराचे कष्टंच हरवले या जाणिवेतून अशी उदास होऊन जात असतात.कष्टाने कमावलेली रक्कम भले ती किती असू द्या, तिचं मूल्य , त्या सर्व सामान्य परिस्थितीतील माणसाच्या आयुष्यात अमूल्य असते. आमच्या समोर उभे असलेल्या व्यक्तीला आकाश ठेंगणं झालं होतं. त्यांनी सलगपणे बोलत आम्हाला सांगितले की, " काल दिवसभर गॅस टाक्या वाहण्याचे काम केले होते.रात्री घरी यायला उशीर झाला होता. घरी आलो तर माझ्या खिशात माझे पाकीटच नव्हते. पैसे पण त्यातच होते. माझ्या मुलीचे आधार कार्ड पण त्यातच होते.माझ्या मुलीच्या शाळेत शिक्षकांना मुलीच्या आधार कार्डची झेरॉक्स द्यायची होती, त्यासाठी पाकिटात आधार कार्ड होते. साहेब तुम्ही लई देवासारखे आलात. " असं म्हणून त्या व्यक्तीने दोन्ही हात जोडले. त्यावेळी माझ्या अंतर्मनात थोर हिंदी साहित्यिक प्रेमचंद मुंशी आणि थोर मराठी कवी नारायण सुर्वे यांनी आपापल्या साहित्यात व्यक्त केलेल्या अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील माणसाच्या किंवा मेहनती कामगारांच्या रूपातील एक वास्तवातील प्रतिनिधी माझ्या समोर उपस्थित आहे याची जाणीव झाली होती. आपल्या भारतातील बहुतांशी लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तिरेखा थोर साहित्यिक प्रेमचंद मूंशी अन् नारायण सुर्वे यांनी आपापल्या साहित्यात व्यक्त केल्या आहेत. त्या आजही आपल्या आसपास आहेत याची जिवंत जाणीव मला झाली होती, होत होती. 


माझे विचारचक्र थांबवून मी  सुरेश किसन मासोळे  यांचे हात माझ्या हातात घेऊन त्यांच्या पाठीवर हात ठेवला होता. एखाद्याचे मन भरून येणं काय असतं हे त्या क्षणी मला जाणवलं होतं. माझ्या जवळ असलेलं पाकीट , सुरेश किसन मासोळे यांच्या हातात सोपवले अन् त्यांना म्हणालो..

" सुरेश भाऊ, पाकिटात जे काही आहे ते नीट तपासून घ्या. रक्कम पण तपासून घ्या. "

इतक्यात बाजूला असलेल्या त्यांच्या माऊली म्हणाल्या..

" अहो, भाऊ तुम्ही एवढ्या काळजीने आलात.पाकीट तपासून आम्ही काय करणार. आजकाल कुणी काही सोडत नाही. तुम्ही तर आमची ओळख ना पाळख तरी पण आम्हाला शोधत शोधत आलात. "

तरीपण मी त्यांना म्हणालो - " ताई तसे नाही. आम्ही तुमचे पाकीट तुमच्या हवाली केलं हे आमचं काम आम्ही केलं. मात्र पाकिटात असलेल्या सर्व वस्तू अन् रक्कम कृपया आमच्या समोर तपासून घ्या.म्हणजे आम्ही निश्चिंत होऊ. "

माझ्या खूप आग्रहाने  सुरेश भाऊंनी पाकिटातील सर्व वस्तू अन् रक्कम तपासून घेतली. बरोबर असल्याची खात्री झाल्यावर मी त्यांना एक सल्ला दिला. 

" इथून पुढे पाकिटात स्वतः चा किंवा कुटुंबातील एखाद्याचा मोबाईल नंबर कागदावर लिहून ठेवत जा. अशी परिस्थिती उद्भवली की, मग त्या मोबाईल नंबरच्या आधारे संपर्क करणे सोपे होते. "

असे म्हणून मी त्यांना " राम राम, वंदे मातरम् " म्हणालो अन् आम्ही पती पत्नीने त्यांचा निरोप घेतला.


अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील माणसाच्या आयुष्यात कष्टाचे पाकीट सदैव सोबत असते. फक्त कधी कधी दिवसभराच्या कामाच्या व्यापातून ते पाकीट कधीतरी निसटून जाते. मग उरते फक्त आणि फक्त दिवसभराच्या कष्टाच्या घामाच्या प्रत्येक थेंबाची व्यथा..! ती मनाची व्यथा दिवसभराच्या कष्टाच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा जाब स्वतः विचारत असते, कारण त्या पाकिटातील पै अन् पै दिवसभराच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाचे प्रतिनिधित्व करत असते. दिवसभर कष्टकऱ्यांची ही व्यथा अन् तगमग कुणाचे तरी ओरबाडून खाणाऱ्यांना कधीही समजणार नाही.


वंदे मातरम्

लेखक - नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1 


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)  

                                    

दिनांक - १० ऑगस्ट २०२४, शनिवार