चिंतन ©️
तीर्थरूप वडिलांच्या आठवणीतील प.पू.भगवान बाबा
=================================
माझे स्व.तीर्थरूप वडील त्यांच्या थोरल्या बहिणीच्या सासरच्या गावी बालमटाकळी, ता. शेवगाव, जि. अहिल्यादेवी देवी नगर (अहमदनगर ) येथे प्राथमिक शाळेत शिकायला होते. तो कालखंड होता साधारणतः इ.स. १९४० ते इ.स. १९५० दरम्यानचा..! त्यावेळी दरवर्षी बालमटाकळी येथे हिंदू धर्मातील धार्मिक सप्ताह आयोजन तेथील गावकऱ्यांच्या द्वारे आयोजित केल्या जात असे. त्या सप्ताह निमित्त मुख्य धार्मिक गुरुवर्य प्रवचनकार / कीर्तनकार म्हणून आदर्श समाज सुधारक राष्ट्रसंत श्री. भगवान बाबा महाराज असायचे.
थोर राष्ट्रसंत श्री. भगवान बाबा महाराज यांचा मुक्काम तत्कालीन बालमटाकळी गावातील शाळेतील वर्ग खोल्यात असायचा. परम पूज्य श्री.भगवान बाबा महाराज यांच्या मुकामाच्या वेळी त्यांची सेवा करण्याचे भाग्य माझे स्व.तीर्थरूप वडील अन् त्यांच्या काही बालमित्रांना त्यावेळी लाभले होते. त्यावेळी मुक्कामाच्या ठिकाणी दिवाबत्ती करणे, परम पूज्य श्री. भगवान बाबा महाराज यांचे पाय दाबून देणे, भोजन आटोपल्यावर ताट तांब्या उचलून धुवून ठेवणे, परम पूज्य श्री. भगवान बाबा महाराज यांच्या प्रवासातील घोड्यांची निगा राखणे इत्यादी कामे माझ्या स्व. तीर्थरूप वडिलांनी अन् तत्कालीन बालमटाकळी स्थित काही बालमित्रांच्या भाग्यात होते. परम पूज्य श्री. भगवान बाबा यांची देहयष्टी उंचीपुरी काटक होती. आवाज उंच अन् कडक होता. बालमटाकळी येथील धार्मिक सप्ताह सुरू झाला की, दररोज परम पूज्य श्री. भगवान बाबा यांचे प्रवचन / कीर्तन सेवा असायची. बालमटाकळी येथील समस्त नागरिक परम पूज्य श्री.भगवान बाबा महाराज यांच्या अमृतवाणीत गुंग होऊन जायचे.
वरील सर्व आठवणी माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी मला , माझ्या पत्नीला अन् माझ्या दोन्ही मुलांना बऱ्याचदा सांगितलेल्या होत्या. घरातील ज्येष्ठ माणसं ही आपल्या सोबत त्यांच्या आयुष्यातील कित्येक आठवणींचा खजिना घरातील बालकं , तरुण अन् प्रौढांकडे रिक्त करत असतात.फक्त ज्येष्ठांना मायेनं समजून उमजून घेणारे स्री अन् पुरुषांना मन असावं लागत, दुसरं काहीच नाही..! आपल्या सोबत घरातील ज्येष्ठ असण्यापेक्षा , ज्येष्ठांच्या सोबत आपण असायला हवे हे अत्यंत महत्त्वाचे ठरले.
२८ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही माझ्या स्व. तीर्थरूप वडिलांच्या सोबत सहपरिवार तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे माऊली विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला गेलो होतो. त्यावेळी पंढरपूर येथील मुक्काम माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांच्या आग्रहाखातर परम पूज्य श्री. भगवान बाबा महाराज यांच्या मठात केला होता. वास्तविक मी पंढरपूर येथील मुक्काम गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या मठात अगोदरच नियोजित केलेला होता.पण पंढरपूर येथे संध्याकाळी माझ्या वडिलांच्या वाचण्यात ' भगवान बाबा मठ ' असे वाचण्यात आले अन् माझ्या वडिलांनी मला आदेश दिला की, " आपण परम पूज्य श्री. भगवान बाबा महाराज यांच्याच मठात मुक्कामी जायचे. दुसरे कुठेच नाही " मी वडिलांचे ऐकले अन् परम पूज्य श्री.भगवान बाबा महाराज यांच्या मठात आम्ही सह परिवार मुक्कामी थांबलो होतो. वास्तविक मलाही त्या क्षणापर्यंत माहीत नव्हते की, पंढरपूर येथे परम पूज्य श्री भगवान बाबा महाराज यांचा मठ आहे म्हणून..! त्या मुक्कामाच्या रात्री परम पूज्य श्री भगवान बाबा महाराज मठ पंढरपूर येथे कोणत्या तरी एका महाराजांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आलेली होती. आमचे जेवणं झाल्यावर आम्ही त्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहिलो होतो.
आम्ही ज्यावेळी पंढरपूर येथील श्री. भगवान बाबा महाराज यांच्या मठात मुक्कामी थांबलो होतो त्यावेळी माझे स्व.तीर्थरूप वडील पुन्हा एकदा त्यांच्या बालपणातील , प्राथमिक वयोगटातील आठवणीत रमून गेले होते.
आजही श्री. भगवान बाबा महाराज यांच्या मठात २८ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही मुक्कामी थांबलो होतो त्यावेळच्या तेथील पावत्या आम्ही जपून ठेवलेल्या आहेत. आपल्या पूर्वजांच्या, श्रद्धेयांच्या आठवणी जाग्या झाल्या की, त्याच गतकाळातील त्यांच्या स्पर्शाने , सहवासाने पूनित झालेल्या वस्तू आपल्याला त्याच श्रद्धेय आठवणीत घेऊन जात असतात. जसे की, श्री. भगवान बाबा महाराज यांच्या पंढरपूर स्थित मठात तीर्थरूप वडिलांच्या सोबत आम्ही मुक्कामी थांबलो होतो त्यावेळच्या पावत्या..! काहींच्या दृष्टीने ही बाब क्षुल्लक असेल, पण ज्यांना भावना अन् मन त्यातल्या त्यात ते श्रद्धेय असेल त्यांच्या दृष्टीकोनातून या बाबी नक्कीच परम वंदनीय ठरतात.
ता.क. - श्रद्धेय आठवणी ह्या जपून ठेवल्या की, श्रद्धेय स्वर्गवासी माणसं देखील सतत आपल्या अवती भोवतीच आहेत याची सतत जाणीव होत असते.
असो, आज परम पूज्य श्री भगवान बाबा महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याला माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून श्रद्धापूर्वक विनम्र वंदन..!🙏🏻
जय भगवान बाबा
वंदे मातरम्
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : २४ ऑगस्ट २०२४, शनिवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा