आमचे गाव आमची माणसं ©️
' हसमुख विलास..!'
================================
भूतकाळात स्वतः ला शोधणे फार सोपे असते, फक्त त्यात आपण कुठं होतो याचा शोध ज्याला त्याला घेता यायला हवा.
मग तो शोधक भूतकाळ स्वतःचा असो की, आपल्याच भूतकाळाला समांतर आयुष्य जगलेल्या काहींचा..! आपल्या गतकाळातील आठवणींच्या भूतकाळाला अन् त्यातील व्यक्तीरेखांना भेटल्यावर किंवा भेटताना आपल्यातील तथाकथित अहंकाराच्या अन् भेदाभेदीच्या भिंती पाडाव्या लागतात. तरच भूतकाळाच्या आयुष्यातील नितांत सुंदर भाव विश्वाचा पसारा उलगडला जातो. त्या पसाऱ्यात फक्त आणि फक्त निरागस हास्य अन् निरागस प्रेम असते. त्यात ना कुणाच्या पदाचा अहंकार असतो ना कुणाच्या आर्थिक क्षमतेचा बेगडी फुगवटा ना जातीचा तकलादू अहंकार अथवा न्युनगंड..! ज्यावेळी निरागस हास्य अन् निरागस प्रेम भेटतं तेंव्हा तिथं अस्तित्व असते ते त्या निरागस नात्याचे..!
तिथं अस्तित्व असते ते विधात्याने सुंदररित्या बनविलेल्या मानवी मूल्यांचे..!
तिथं अस्तित्व असते ते अहंकार विरहित अन् न्यूनगंड विरहित जगलेल्या क्षणांचे..!
तिथं अस्तित्व असते ते एकमेकांच्या इतिहास , भूगोल अन् नागरिकशास्त्राचे ..!
तिथं अस्तित्व असते ते त्याच गतकाळातील गल्ली बोळातील भेटलेल्या निरागस अन् अवखळ नात्याचे..!
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिथं अस्तित्व असते ते विधात्याने निर्माण केलेल्या रक्तविरहित नात्यातील सर्वोत्तम नात्याचे..! ज्याला मित्र असं म्हणून विधात्याच्या अनौपचारिक नात्यातील अदृष्य शक्तीला आपण प्रेमाने पुजत असतो.
दिनांक ८/११/२०२४ रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर स्थित अन् मूळचे पालखेड येथील आमच्याच आळीतील एक मातृतुल्य वयाने खूप ज्येष्ठ असलेले तथा माझ्या स्व.आईच्या जिवलग मैत्रिण ज्यांना आम्ही मायेने आबाई म्हणतो त्यांना भेटायला मी अन् माझी धर्मपत्नी गेलो होतो. तीर्थस्वरूप आबाई यांना आम्ही श्रद्धेने भेटलो. तीर्थस्वरूप आबाई ह्या माझा बालमित्र सुनील शांतीलाल शेठ जैन याच्या मातोश्री आहेत. ( त्यावर एक स्वतंत्र लेख नंतर लिहिण्याचा मनोदय आहे.) त्या भेटीच्या नंतर प्रिय बालमित्र विलास उत्तम निकम भेटला. अर्थात तो भेटला नाही, तर मीच त्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेलात एखाद्याने धाड टाकावी तशा आविर्भावात तोंडाला रुमाल बांधून गेलो होतो. मात्र जिथं एकमेकांची ओळख खूप खोलवर अन् उघडी नागडी असते तिथं तुम्ही स्वतः ला कोणत्याही ढोंगी रुपात सादर करूच शकत नाही. अगदी तसेच झाले. माझ्या देहबोलीतून विलासने मला ओळखले अन् म्हणाला...
" नंदू, नको शहाजूकपणा करू रे..!"
मी मूळ रुपात आलो. सोबत माझी पत्नी होती.तिला प्रिय बालमित्र विलासचा परिचय करून दिला. या मित्राला अगदी ऐसपैस भेटलो ज्याच्यावर मी अन् माझा जिवलग बालमित्र विजय गायकवाड नितांत प्रेम करत आलेलो आहोत. प्रिय बालमित्र विलासच्या तीर्थस्वरुप सासुबाई , माझ्या स्व. तीर्थरूप वडीलांच्या माजी विद्यार्थिनी आहेत. छत्रपती संभाजीनगर येथेच वास्तव्यात असणाऱ्याला विलासच्या सासुबाईंची देखील आम्ही उभयतांनी दर्शन घेऊन भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी माझ्या वडिलांच्या शिक्षक म्हणून असलेल्या कित्येक आठवणींना उजाळा दिला.
विलास निकम..!
अगदी साधं सरळ सुंदर आयुष्य व्यतीत करणारं व्यक्तिमत्व..! स्वतच्या आयुष्याचा ना बडेजाव ना इतर कुणाला दूखावण्याची मनोवृत्ती. लेखक व.पु. काळे, शंकर पाटील अन् अगदी अलीकडे सी. प्रेमकुमार यांनी लिहिलेल्या सर्व सामान्य व्यक्तीरेखांचे प्रतिनिधित्व करणारे जे कुणी आहेत त्यापैकी एक आमचा प्रिय बालमित्र विलास निकम..!दरवर्षी गावच्या यात्रेला गेल्यावर सगळ्या गावाला भेट दिली, मात्र काहींना गावात भेट दिली नाही तर यात्रेला गेल्याचे आत्मिक समाधान लाभत नाही.त्या मोजक्या निरपेक्ष व्यक्तिमत्त्वांपैकी विलास निकम एक आहे. विशेषतः ही कृतीयुक्त भावना माझा बालमित्र विजय गायकवाड अन् मी जपलेली आहे. वास्तविक विलास पालखेड येथे स्थायिक नाही. मात्र यात्रेला गेल्यावर गावात कुणाला ऐसपैस भेटावं असं प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे विलास निकम आहे. पालखेड येथे माझ्या सहासात जी काही मोजकी अजातशत्रू माणसं आली, त्यात प्रिय बालमित्र विलास हा एक होय. विलास निकम तसा माझा वर्गमित्र नाही. माझ्या माध्यमिक वयोगटात पुढील दोन वर्षांनी पुढे असणारा मित्र.! आमची पालखेड येथील एकमेकांची गल्ली इंग्रजी अक्षर C मध्ये असणारी. ग्रामदैवत श्री. पारेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य गल्लीत विलासचे घर अन् त्याच घराच्या पुढील घरातच हॉटेल होते. आमच्या बालपणी आमच्या पालखेड गावात मुख्य बाजारपेठ याचं गल्लीत होती. काळाच्या ओघात गावाचा फुगवटा वाढला अन् बाजारपेठ तिकडं फुगवट्यात स्थलांतरित झाली.
विशेष म्हणजे आमच्या बालपणी आमच्या पालखेड गावात सर्वसाधारणपणे शेव, चिवडा अन् डाळीचे लाडू मिळण्याचे एकमेव हॉटेल होते ते विलासचे वडील स्व.उत्तम काका निकम यांचेच होते. मी अन् माझी समकालीन पिढी पालखेड गावात जगत असताना आपल्या आयुष्याकडून अत्यंत माफक अपेक्षा ठेवून जगली. त्या काळातील आमच्या दररोजच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांचे केंद्रबिंदू विलासचे हॉटेलच असायचे. महिना , पंधरा दिवसाला आमच्या घरच्यांकडून खाऊ खाण्यासाठी दोन - पाच रुपये मिळायचे.त्या पैशातून खाऊ , त्यातल्या त्यात डाळीचे लाडू विकत घ्यायचे. विकत घेतलेले डाळीचे लाडू बाजूलाच असलेल्या मारोती मंदिरात निवांत बसून खात असायचो.लाडू खाण्याचा जास्त वेळ आनंद मिळावा या गोड हेतूने लाडूचा इवलासा इवलासा तुकडा करून खायचो.त्याकाळी लाडूचा इवलासा तुकडा करून खाण्यात जो आनंद होता, तो आज किमान किलोभर खरेदी केलेल्या लाडूत येत नाही. ही जाणवणारी जाणीव गतकाळातील आठवणींच्या हिंदोळ्यावर मनाला काहीसे दुःखी करते. प्रिय बालमित्र विलासचे वडील तीर्थस्वरुप उत्तम काका निकम यांनी स्वतः बनविलेल्या डाळीच्या लाडूची चव आयुष्यात पुन्हा कधी इतर ठिकाणच्या अनेकानेक मिष्टान्न पदार्थात आलीच नाही. बहुदा गावचं गावपण असलेली अन् जपलेली पिढी संपत चालली आहे यामुळं असं वाटतं की काय , माहीत नाही..!
प्रिय बालमित्र विलासचे आमच्या बालपणी असलेले पालखेड येथील हॉटेल आमच्या दररोजच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांचे केंद्रबिंदू होतेच, त्याच बरोबर आम्हा काही बालमित्रांच्या भाव विश्वात, कलेच्या विश्वात एक रसिक म्हणून जगण्याचे ठिकाण होते. लेखक हरिभाऊ वडगावकर लिखित वगनाट्य ' गाढवाचं लग्न ' ऐकण्याचे कर्णमधुर भाग्य याचं प्रिय बालमित्राच्या हॉटेल मध्ये असलेल्या टेप रेकॉर्डरवर आम्हा काही बालमित्रांना लाभले. त्यातल्या त्यात दादू इंदुरीकर यांनी साकारलेले सावळ्या कुंभाराचे पात्र अन् त्यांची बोलण्याची एक विशिष्ट पद्धत एक रसिक म्हणून मनाला प्रफुल्लित करत असायची. याच वगनाट्यातील गंगीची भूमिका निभावली होती ती प्रभाताई शिवणेकर यांनी. गंगीचं बोलणं अन् त्याला वाक्यागणिक सावळ्या कुंभाराने हाणलेली कोपरखळी गाढवाचं लग्न या वगनाट्याला रसिकांच्या हृदयात अजरामर करून गेली आहे. काळाच्या ओघात गाढवाचं लग्न हे वगनाट्य इतर अनेक कलाकारांनी सादर केले,पण दादू इंदुरीकर अन् प्रभाताई शिवणेकर यांनी सादर केलेल्या सावळ्या कुंभाराची अन् गंगीची सर कुणालाच गाठता आली नाही. प्रिय बालमित्र विलास आम्हा मित्रांसाठी अन् स्वतः साठी देखील गाढवाचं लग्न या वगनाट्याला पुन्हा पुन्हा टेप रेकॉर्डरवर सुरू करायचा.दादू इंदुरीकर अन् प्रभाताई शिवणेकर यांनी सादर केलेल्या सावळा कुंभार अन् गंगीने सादर केलेल्या अभिनयाच्या जुगलबंदीला ऐकण्याचे कर्णमधुर भाग्य याचं मित्राच्या हॉटेल मध्ये आमच्या माध्यमिक वयोगटात पालखेड येथे लाभले आहे.
जुन्या मित्रांना भेटलं की, आत्म्याचा शोध घेण्याच्या दिशेने. पाऊल पडते.त्याचं कारण जुन्या मित्रांकडे आपलं खरं मन , खऱ्या अर्थानं मनमोकळे करता येते. तिथं काहीच लपून ठेवता येत नाही. आयुष्यातील वास्तववादी जगणं तिथच सापडते. आयुष्यभर ज्याच्या आकंठ प्रेमात पडावसं वाटतं, वाटतं, नव्हे नव्हे, इ.स. २०१८ पासून ते आजतागायत हे सुरू आहे अन् अंतिम श्वासापर्यंत सुरूच राहील.असं अत्यंत मनमोहक व्यक्तिमत्व म्हणजे सी. प्रेमकुमार..!सी. प्रेमकुमार ज्या पद्धतीने व्यक्तिरेखा लिहितात , चित्रपटाच्या माध्यमातून सादर करतात तोच तर आपल्या आत्म्याचा शोध आहे.
सी.प्रेमकुमार मूळचे तामिळ चित्रपट लेखक तथा दिग्दर्शक आहेत. meiyazhagan..! ( मैयाळगन) चा ढोबळमानाने अर्थ होतो आत्म्याची सुंदरता..! ही आत्मिक सुंदरता त्यांनी '96' अन् meiyazhagan..! ( मैयाळगन / मैयाजगन) या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट प्रकारे भावूकपणे सादर केली आहे. आत्म्याची ही सुंदरता अशीच असते, आमच्या प्रिय मित्र विलास सारखी अन् अजून भेटलेल्या काहीं सारखी..! निरागस, प्रेमळ अन् साधं सरळ आयुष्य जगणारी..!
वंदे मातरम्
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: १३/११/२०२४, बुधवार



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा