सोमवार, २८ एप्रिल, २०२५

साजन


 

आमचे गाव आमची माणसं ©️


साजन 


====================


आज दिनांक २८/४/२०२५ सोमवारी दुपार नंतर लॉरेन्स डिसुझा दिग्दर्शित अन् संजय दत्त, सलमान खान, माधुरी दिक्षित अभिनित साजन चित्रपट टीव्हीवर बघितला. हा चित्रपट बघत असताना आठवणींच्या हिंदोळ्यावर मन झुलत गेले.या चित्रपटाविषयी एक आठवण सांगतो.


इ. स. १९९१ मध्ये नुकताच साजन चित्रपट प्रदर्शित झाला होता.आम्ही वर्गमित्र आमच्या पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटाच्या पुढील उंबरठ्यावर उभे होतो. आमच्या काळी पौगंडावस्थेतील हळुवार वयोगट म्हणजेच माध्यमिक शाळेतील वयोगटाला जरा जास्तच धोकादायक असं आजूबाजूचे समजूतदार स्त्री अन् पुरुष सांगत असायचे.सध्याच्या काळात पौगंडावस्थेतील म्हणजेच माध्यमिक शाळेतील वयोगटात हळुवार वयोगट बहुतांशी उच्च प्राथमिक वयोगटात दिसून येत आहे हे दुर्दैव आहे. याला जबाबदार कोण हा स्वतंत्र विषय होऊ शकतो. 


असो, मुख्य लेख विषयाकडे येऊया.तर इ. स. १९९१ मध्ये नुकताच साजन चित्रपट प्रदर्शित झाला होता.आम्ही वर्गमित्र आमच्या पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटाच्या पुढील उंबरठ्यावर उभे होतो. त्यावेळी साजन चित्रपटाची प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती.आम्ही त्यावेळी पालखेड येथील माध्यमिक शाळेत इयत्ता दहावी मध्ये प्रवेशित झालो होतो. आम्हा काही मित्रांना चित्रपटांची जाम आवड होती.एक दिवस मी अन् माझे खूप जिवलग वर्गमित्र तथा बालमित्र आण्णासाहेब म्हस्के अन् विजू गायकवाड आम्ही ठरवले की, वैजापूर येथे साजन चित्रपट बघायला जायचे. आजच्या काळाच्या तुलनेत जर विचार केला तर आमच्या वयोगटात आयुष्याच्या करमणुकीच्या गरजा अत्यंत कमी होत्या, मात्र ज्या होत्या त्या जमेल तशा पद्धतीने अगदी आनंदाने त्या गरजांची पूर्तता करत असायचो.


झालं मग, एका रविवारी आम्ही पालखेड ते वैजापूर धावणाऱ्या कमांडर जीपने वैजापूरला जाण्याचे नक्की केले.विजू गायकवाड, मी अन् आण्णासाहेब म्हस्के आमच्या तिघात आण्णासाहेब म्हस्के जास्त स्टाईलीश होता. पालखेड गावातील पहिली बॅगी पँट याचं आमच्या जिवलग मित्राने सर्वात अगोदर परिधान केली होती. त्यात नुकताच साजन चित्रपट प्रदर्शित झाला होता.त्यात संजय दत्तचे डोक्यावरील केस पार मानीच्या खाली असे वाढलेले होते.तिचं स्टाईल आण्णासाहेब म्हस्के याने अंगिकारली होती. थोडक्यात आम्ही साजन चित्रपट बघायला जाणार होतो, त्यात मुख्य पुढाकार जिवलग बालमित्र आण्णासाहेब म्हस्के याचा जास्त होता.


त्यावेळीं फार कधीमधी शहराच्या ठिकाणी जायला भेटायचे.जेंव्हा असा प्रसंग येत असायचा तेंव्हा जमेल तसे मात्र अप टु डेट होऊन जात असायचो.आपण शहराला चाललो आहे याचं अप्रूप वाटत असायचे. आम्ही अप टु डेट होऊन पालखेड गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या तळ्यापाळी आलो होतो. जिथं जीप स्टँड होते.पालखेड गावाच्या जवळील गोळवाडी येथील रघु मामा यांच्या कमांडर जीप मध्ये पुढे जागा मिळाल्याने आम्ही अत्यंत आनंदित झालो होतो. पुढे जागा मिळणं म्हणजे आपण vip आहोत याची अनुभूती यायची अन् येऊ लागली होती.जीप मधील प्रवाशांच्या दाटीवाटीत बसून आम्ही वैजापूर गाठले होते.खेड्यातले पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटाच्या पुढील उंबरठ्यावर उभे असलेले तीन मूलं शहरात आली होती. अंगावरील धूळ झटकून झाटकून घेतली. मी खिश्यात असलेला स्टाईलीश काळा चष्मा डोळ्यावर चढवला. आण्णासाहेब म्हस्के राहून राहून त्याच्या मानेवर असलेल्या केसांना हाताच्या बोटांनी मागे मागे करत होता. संजय दत्त त्याच्यात पुरता भिनलेला होता.अर्थात केसांपुरता..!


त्यावेळी वैजापूर येथे साजन चित्रपट लक्ष्मी चित्रपटगृहात लागलेला होता. आम्ही शहरातल्या माणसांसारखे रस्ताने चालू लागलो होतो. अखेर रोटेगाव रोडवरील लक्ष्मी चित्रपटगृह आले. दुपारच्या शो चे तिकीटे काढले.काही वेळाने आम्ही चित्रपटगृहात प्रवेशित झालो. जिथं जागा सापडेल तिथं बसायचे असा निकष असल्याने आम्ही आम्हाला जिथं योग्य वाटलं तिथं खुर्चीवर बसलो. चित्रपटगृह प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते. अखेर साजन चित्रपट सुरू झाला. मी एका बाजूला मधोमध अण्णासाहेब म्हस्के अन् दुसऱ्या बाजूला विजू गायकवाड बसला होता.चित्रपट रंगात येऊ लागला होता.मात्र जेंव्हा जेंव्हा संजय दत्त पडद्यावर दिसायचा तेंव्हा तेंव्हा आण्णासाहेब म्हस्के आपल्या डोक्यावरील केसांवर हात फिरून घ्यायचा.मला वाटलं सहज होत असेल. मात्र जेंव्हा जेंव्हा संजय दत्त पडद्यावर आला रे आला,तेंव्हा तेंव्हा आण्णासाहेब म्हस्के आपल्या डोक्यावरील केसांवर हात फिरू लागला होता. माझं अन् विजुचे आण्णासाहेब म्हस्केच्या या कृतीकडे लक्ष जाऊ लागले होते.जिवलग बालमित्र आण्णासाहेब म्हस्केवर संजय दत्तच्या डोक्यावरील केसांचा फिवर भारी चढलेला होता. अख्खा चित्रपट बघताना जिवलग बालमित्र आण्णासाहेब म्हस्केने ना कथा ना गाणी ना इतर बाबी बघितल्या. संपूर्ण साजन चित्रपट बघताना त्याचं लक्ष फक्त आणि फक्त संजय दत्तच्या डोक्यावरील केसांवरच होते.


चित्रपट संपला होता. विजू अन् मी आण्णासाहेब म्हस्केला संजय दत्तच्या डोक्यावरील केसांच्या स्टाईल प्रेमावर चिडवू लागलो होतो. मात्र आण्णासाहेब म्हस्के हा मुळात शांत स्वभावाचा असल्याने सगळं गमतीवर घेऊ लागला होता. आता आम्हाला पालखेडकडे जाण्याचे परतीचे वेध लागले होते. निघण्यापूर्वी वैजापूर मधील प्रसिद्ध अमृत थंडपेय लस्सी दुकानात गेलो अन् मस्तपैकी चाटून पुसून लस्सी पिलो. त्यावेळी वैजापूर शहरातील अमृत दुकानातील लस्सी म्हणजे जगात कुठेही नसेल अन् इतरत्रच्या थंडपेया पेक्षाही श्रेष्ठ वाटत असायची.लस्सी पिऊन झाली होती.पुन्हा कमांडर जीपने पालखेडकडे मार्गस्थ झालो.


आज जेंव्हा मी घरी टीव्हीवर साजन चित्रपट बघत होतो, तेंव्हा जेंव्हा जेंव्हा संजय दत्त दिसायचा तेंव्हा तेंव्हा मी संजय दत्तच्या डोक्यावरील केसांकडेच बघत असायचो. त्या माझ्या बघण्यात मला माझा जिवलग बालमित्र आण्णासाहेब म्हस्केची अनुभूती येऊ लागली होती. चित्रपट संपला अन् लगेच आण्णासाहेब म्हस्के यास कॉल केला. गतकाळातील साजन चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या.आम्ही त्या आठवणींवर भरभरून बोललो. 


जिवलग बालमित्र हे भावूक माणसांच्या आयुष्यातील असं रसायन असतं, जे जिंदा तीलिस्मात या युनानी औषधासारखं काम करत असतं. जसे ते युनानी औषध जिंदा तीलिस्मात सगळ्या रोगांवर रामबाण उपाय ठरते,अगदी तसेच बालमित्र हे माणसाच्या मनाचा ठाव घेण्यास अत्यंत उपयुक्त ठरणारे औषध ठरत असते.हा माझा अन् माझ्या काही जिवलग बालमित्रांचा अनुभव आहे.


माझ्या मनात साजन चित्रपटातील गाण्याच्या ओळी यायला लागल्या होत्या...


" मेरा दिल भी कितना पागल हैं.."


वंदे मातरम् 


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २८/४/२०२५, सोमवार

गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

आत्मीयतेचा गोड गोड शिरखुर्मा..!






मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


आत्मीयतेचा गोड गोड शिरखुर्मा..!


======================


कुणाचं प्रेमळ मन जाणवायला अगदी सोप असतं. वरपांगी ऐवजी हृदयातून व्यक्त केलेली निरागसता ओळखता आली की नाते निर्माण होते.मग असं प्रेमळ मन जाणवायला अगदी सोपे जाते. मात्र हृदयातील प्रेमळपणा ओळखनं ही देखील एक कला आहे , कौशल्य आहे. कधी कधी रक्ताच्या नात्यात प्रेमळ मन अन् निरागसता दिसून येत नाही, जाणवत नाही.तर कधी कधी रक्त विरहित नात्यात प्रेमळ मन अन् निरागसता दिसून येत , जाणवते. मानवाच्या आयुष्याचा हा प्रवास फार गुंतागुंतीचा ठरतो. मात्र हृदयातून व्यक्त केलेली निरागसता ओळखायला आजकालच्या धकाधकीच्या विकृत सामाजिक व्यवस्थेत जरा कठीणच..! विकृती प्रत्येक समाज व्यवस्थेतील काहींमध्ये ठासून भरलेली आहे. बऱ्याचदा अशी काहींची विकृत समाज व्यवस्था ओळखून देखील न व्यक्त केलेली बरी..! त्याचं कारण काही वेळा व्यक्त करणं प्रगल्भ विचाराने घेतल्या जात नाही. प्रगल्भता समजून घेण्या ऐवजी  तिथं काही षडरिपू प्रकर्षाने जाणवतात.


अंधारी ता .सिल्लोड येथे शिक्षक म्हणून सेवेत असताना काही विद्यार्थी असे भेटले ज्यांचं मन अत्यंत प्रेमळ जाणवलं.गेल्या कित्येक दिवसांपासून प्रिय विद्यार्थी कैफ अशपाक शेख  माझ्या मागे लागला होता की, " सर शिरखुर्मा प्यायला आमच्या घरी चला, आमच्या घरी चला..! " आता पर्यंतच्या माझ्या २९ वर्षाच्या शिक्षकी सेवेत माझं नोकरीच्या गावात जाणं येणं तसं मर्यादितच राहिलं आहे.आपण भलं अन् आपली शाळा भली हे आचरण अंगिकारले. हा मर्यादित निकष अंधारी येथेही होता. आता पर्यंतच्या माझ्या शिक्षकी सेवेतील हा  निकष मुद्दामहून नव्हता, आपसूकच झाला होता. माझे हे वैयक्तिक वर्तन  योग्य की अयोग्य हा ज्याच्या त्याच्या आकलन शक्तीचा विषय..! 


असो, कैफ यास मी म्हणालो की, " अरे बेटा कैफ, एकदा घरी आई वडील यांना सांग ,मी नंदन जाधव सर यांना शिरखुर्मा पिण्यासाठी घरी घेऊन येत आहे म्हणून. ऐनवेळी जाणं योग्य नाही. घरच्यांना काही काम असू शकते. माझा मोबाईल घे.घरी कॉल कर अन् सर्वकाही सांग.घरचे घरी असतील तरच चल. उगीचच आपल्यामुळे कुणाचे नियोजन बिघडायला नको. " हे ऐकून कैफने माझ्या मोबाईलवरून त्याच्या घरी कॉल केला.योग्य तो निरोप आला अन् मग मी अन् कैफ त्याच्या घरी पायीच गेलो.


असो, अखेर आज दिनांक २४/४/२०२५ गुरुवार रोजी अंधारी येथे प्रिय विद्यार्थी कैफ अशपाक शेख याच्या अत्यंत प्रेमळ आग्रहाला नकार देऊ शकलो नाही अन् एका निरागस मुलाच्या सोबत शिरखूर्मा पिण्यासाठी जाण्याचा दुग्धशर्करा योग्य जुळून आला.अत्यंत माणुसकी अन् आत्मीयतेने सस्नेह भेट झाली.


विशेष म्हणजे प्रिय विद्यार्थी कैफ यास सोबत घेऊन त्याचे आई अन् वडील गेल्या वर्षी हज यात्रेला गेले होते. कैफच्या मातोश्रीने गेल्या वर्षी हज यात्रेतून आणलेले पवित्र जमजम जल बाटलीबंद अन् तिथली उच्च प्रतीची खजूर मुद्दामहून पॅकिंग करून मला दिली. महादेवाचा प्रसाद समजून श्रद्धेने त्याचा स्वीकार केला.त्यांनी मला ज्यावेळी हज येथील पवित्र जल अन् खजूर दिली त्याचवेळी कैफचे वडील अशपाक भाऊ अन् मातोश्रींना म्हणालो की, " आपण श्रद्धेने मला हज यात्रेहून आणलेले पवित्र जल अन् खजूर दिले आहे.मी ह्या दोन्ही श्रद्धेय वस्तू माझ्या घरी असलेल्या देवघरातील महादेवाच्या पिंडी जवळ श्रद्धेने ठेवील अन् मग महादेवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करील..!" आनंदाने उभयतांनी मला आत्मीयतापूर्ण आदरातिथ्य करून निरोप दिला.


आजच नुकतेच पहाटे तीन वाजता रात्रभर चार चाकी वाहन चालवून कैफचे वडील गुजरात मधील सुरतेहून अंधारी येथे आलेले होते.कापड दुकानदारी व्यवसाय असल्याने त्यांची खरेदी झाली होती.रात्रभर जागरण अन् दगदग झाली होती तरी देखील माननीय अशपाक भाऊ शेख आपल्या मुलाच्या गुरुजीसाठी आदरातिथ्य करत होते. प्रिय विद्यार्थी कैफच्या आग्रहाने अत्यंत आनंदाने रमजान ईद निमित्त असणाऱ्या गोड गोड पदार्थ शिरखुर्मा पिलो अन् मार्गस्थ झालो ,पुढील आयुष्याच्या गोड प्रवासासाठी..!


वंदे मातरम् 

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २४/४/२०२५, गुरुवार

 

रविवार, २० एप्रिल, २०२५

आत्मनिर्भर श्रीहरी..!"








मला प्रवासात भेटलेली माणसं 

" आत्मनिर्भर श्रीहरी..!"

======================

माझ्या शिक्षकी आयुष्यात अनेक विद्यार्थी औपचारिक बुध्दीमान भेटले, ते आर्थिक बाबतीत बऱ्यापैकी सक्षम झालेत.मात्र काहीच काहीजण असेही भेटले जे आयुष्याच्या दुनियादारीचे चटके सोसत आपल्या आयुष्यात मार्गक्रमण करत राहिले. आयुष्याच्या झगमगतेचे ग्लॅमर अशा काहींना लाभलं नाही. 

मानसिक द्वंद्वात असे वाटू लागते की, औपचारिक शिक्षणातील बुध्दीमान योग्य आहेत अन् असतील देखील, मात्र एखादा किंवा एखादी व्यक्ती औपचारिक शिक्षणात बुध्दीमान नसेल  तरी देखील त्या व्यक्तींनी आपल्या जाणिवा जागृत ठेवल्या असतील तर... 

अखेर औपचारिक शिक्षणातील जाणीवा जिवंत असणारे श्रेष्ठ ठरतात असे वाटू लागते. त्याचं कारण जाणीवचं जर जागृत नसेल तर अहंकारी बुध्दी अहंकाराच्या वेशीला टांगलेली असते. जाणीव नसलेल्या बुध्दीची अहंकाराच्या मिरवणुकीत केविलवाणी धिंड निघत असते. बऱ्याचदा औपचारिक शिक्षणातील बौध्दिक व्यक्ती कौतुकी ठरते आणि ते योग्यही आहे.मात्र औपचारिक शिक्षणात काहीसे मागे पडलेले मात्र जाणीव जागृत ठेवलेले विद्यार्थी समाजात तेवढे कौतुकी ठरत नाहीत, जेवढे औपचारिक शिक्षणातील बुध्दिमान विद्यार्थी ठरतात..! कारण अशांच्या आयुष्याला ग्लॅमर लाभलेलं नसते. जाणीव नसलेल्या मानवी मनांच्या अहंकाराच्या मिरवणुकीत आजूबाजूला असतात फक्त आणि फक्त बौध्दिक, भौतिक , आर्थिक, शारीरिक इत्यादी अहंकाराच्या बढाया मारणारे मानवी घटक..! 

श्रीहरी..!

साधारणतः चौदा वर्षापूर्वी इ.स.२०११ च्या नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलहेरा, ता. गंगापूर, जि.‌छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षकी सेवेत काही निरागस मने भेटली. निरागस मन हे मुद्दामहून तयार होत नसते. निरागस मन हे नियतीने मानवाला दिलेला भावनेच्या देव्हाऱ्यातील प्रसाद असतो. याचं शाळेत सेवा करत असताना श्रीहरी भेटला अन् जाणीवा जिवंत असणाऱ्या निरागस मनाने माझ्या वैयक्तिक आयुष्यात स्थान मिळवलं.कोण होता हा श्रीहरी..?

श्रीहरी इप्पर..!

तब्येतीने धडधाकट. औपचारिक शिक्षणात कौटुंबिक जबाबदारीमूळे मागे असलेला श्रीहरी..! आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आयुष्याची भटकंती करत करत श्रीहरीचे आई, वडील, बहीण, भाऊ जालना जिल्ह्यातून एकलहेरा गावात साध्या कुडाच्या झोपडीत स्थायिक झाले होते. काबाडकष्ट करून दररोजच्या आयुष्याचा प्रवास करायचा अन् पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच आयुष्य जगत जगायचे.याचं वर्तुळात श्रीहरीच्या कुटुंबाचा आयुष्याचा प्रवास सुरू होता. ना कुठला प्रबळ आर्थिक आधार ना कुठला भर भक्कम सामाजिक आधार..! सोबतीला होते फक्त आणि फक्त काबाडकष्ट, त्यातून प्राप्त होणारी मिळकत अन् त्या कष्टाच्या मिळकतीतून प्राप्त होणारा सर्वोत्तम आत्मानंद..! 

वर्गात श्रीहरी तब्येतीने जरी धडधाकट होता, तरी देखील त्यानं त्याच्या धडधाकटपणाचा बलशाली रुबाब कुणा इतर शारीरिक दुबळ्या विद्यार्थ्यांवर गाजवला नव्हता. आपली अत्यंत नाजूक कौटुंबिक परिस्थितीची जाणीव ठेवून जगणारा श्रीहरी..! त्याच्या अंतर्मनातील भावना कित्येकदा माझ्याजवळ निवांतवेळी बसून व्यक्त करत असायचा. एकलहेरा येथे शिक्षकी सेवेत असताना शाळेच्या दीर्घ मध्यांतराच्या वेळी मी काहीवेळ एकतर शाळेच्या काहीसे बाजूला असलेल्या लक्ष्मी मातेच्या मंदिरात काहीवेळ निवांत बसत असे, नाहीतर वर्गात..! वर्गात मी एकटा बसलेला दिसलो की, श्रीहरी हळूच पावलांनी यायचा अन् माझ्या बाजूला काहीसे दूर काहीवेळ फक्त बसून असायचा. असे बरेच दिवस झाले. अखेर मला श्रीहरीच्या या अशा दररोजच्या बसण्याचा भावार्थ लक्षात येऊ लागला. बौध्दिक ,भौतिक , शारिरीक , आर्थिक, अन् सामाजिक न्युनगंडतेने ग्रासलेले कोणत्याही वयोगटातील स्त्री अन् पुरुषाचे मन आपली व्यथा कुणाजवळ तरी व्यक्त करू पाहत असते. फक्त असे मन आपल्या बौध्दिक ,भौतिक , आर्थिक, शारीरिक अन् सामाजिक परिस्थितीची कुणी टिंगलटवाळी करणार तर  नाही ना..?  याचं मानसिक भीतीपोटी बऱ्याचदा व्यक्त होत नसते.

श्रीहरी माझ्याजवळ निवांतपणे येऊन बसू लागला होता. त्याला अनौपचारिकपणे बोलते करण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यावेळी त्याच्या शाळेतील काही दिवसांच्या गैरहजेरी बद्दल विचारले. त्यावर श्रीहरी व्यक्त झाला..
" सर, बहिणीचे लग्न करायचे आहे. पैश्याची जुळवाजुळव करायची आहे. त्यामुळं मी लग्नसराईत रात्री लग्न मंडप कामासाठी जात असतो. रात्रभर मंडप उभारण्यासाठी खड्डे खोदणे, बांबू रोवणे, मंडप बांधणे हे सगळे कामं करावे लागतात. त्यामुळं थकून जातो. पुन्हा दिवसा कुठं कधी मधी काम करायला जावं लागतं.जर मी काम नाही केले तर आमच्या दीदीच्या लग्नाकरिता पैश्याची सोय होणार नाही. माझ्या वडिलांची तब्येत आता काहीशी अशक्त झाली आहे, त्यामुळं कुटुंबाची जबाबदारी जास्त करून माझ्यावरच येते. काम केलं तर घरचा प्रपंच चालेल. "

आमच्या दररोजच्या गप्पांच्या बैठकीत मी एकटकपणे श्रीहरी कडे बघत असायचो. याचं शरीर जरी धडधाकट असले तरी याचं वय काय अन् हा किती मोठ्या वयाच्या , जबाबदारीच्या गप्पा करतो. फक्त गप्पाच करत नाहीये. तर त्या गप्पांना प्रत्यक्ष कृतीचा हातभार लावतो आहे. आपल्या कुटुंबाचा भरभक्कम आधार होतो आहे. माणसाला परिस्थिती जबाबदारीने वागायला शिकवते. श्रीहरी सोबत काही वेळी गप्पांच्या बैठकीत  काही प्रसंगी मला माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांची आठवण यायची. परक्या ठिकाणी राहून मेहनत करणे, मिळेल ते काम करणे ही मूल्ये माझ्या स्व. वडिलांच्या गतकाळातील आयुष्याला वर्तमानात बघत असायचो.

बौध्दिक, भौतिक , आर्थिक, शारीरिक अन् सामाजिक परिस्थिती समोरच्या कुणाजवळ तरी व्यक्त करणारी जाणीव असणारी मनं भेटली की अशांच्या मनातील न्युनगंडता काही प्रमाणात नाहीशी होते. याची प्रचिती श्रीहरी अन् माझ्या भेटीच्या वेळी होत असायची.काळाच्या ओघात माझी एकलहेरा येथून बदली झाली. श्रीहरीशी संपर्क राहिला नव्हता. मात्र गेल्या काही वर्षांपूर्वी श्रीहरीने माझा मोबाईल नंबर कुणाकडून तरी मिळवला अन् भरभरून बोलला.श्रीहरी आता जालना जिल्ह्यातील मूळ गावी नवीन घर बांधून स्थाईक झाला आहे.त्याच्या दीदीचे आनंदाने लग्न करून पवित्र जबाबदारी देखील पूर्ण केली आहे. आयुष्यभर काबाडकष्ट करणारे वडील स्वर्गवासी झाले आहेत.त्यामुळं श्रीहरी स्वतःच्या कुटुंबातील आई, धाकटा भाऊ अन् विवाह झालेल्या बहिणींच्या सुखासाठी जगत असतो. श्रीहरी आपल्या आवडीनिवडींना बऱ्याचदा तिलांजली देऊन कुटुंबासाठी आयुष्य व्यतीत करत आहे.अधून मधून मला आवर्जून फोन करून आपल्या भाव भावनांना व्यक्त करत असतो. श्रीहरी स्वतः उत्तम चार चाकी वाहन चालक ( ड्रायव्हर ) झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीहरी निर्व्यसनी आहे. दूरच्या जिल्ह्यांना भाडे ने आण करतो आहे. बँकेकडून कर्ज काढून नवे कोरे करकरीत ट्रॅक्टर विकत घेतले आहे. गावाकडे ट्रॅक्टरने होणारी मशागतीची कामे करून आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर होत आहे.एकंदरीत अत्यंत समाधानी आयुष्य श्रीहरी , श्रीहरी सारखं जगत आहे. कित्येकदा श्रीहरीने मला सह परिवार आग्रहाने बोलावले आहे.पण अद्याप पर्यंत जाणे झाले नाही. जेंव्हा कधी मी श्रीहरीच्या मूळ गावी सह परिवार जाईल तेंव्हा पुन्हा एकदा आयुष्याच्या प्रवासातील भाव भावनांचा देव्हारा मांडून आम्ही एकमेकांच्या जवळ नक्कीच व्यक्त होऊ.

तथाकथित ग्लॅमर नसलेल्या, मात्र शाश्वत जाणीव असलेल्या आयुष्यात प्रिय विद्यार्थी श्रीहरी अगदी मजेत आहे.

ता.क. प्रिय विद्यार्थी श्रीहरी अन् माझा सदरील फोटो इ.स.२०१२ मधील आहे.
स्थळ : जि.प.प्रा.शा. एकलहेरा, ता.गंगापूर

वंदे मातरम् 

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक : २० एप्रिल २०२५, रविवार

बुधवार, २ एप्रिल, २०२५

निरागस मनांची ओढ


 


चिंतन ©️


निरागस मनांची ओढ


=========================


निरागस मनाची सेवा निर्मळ मनाने केली की, निरागस मनाची देवता स्मित हास्य करून आशीर्वाद देत असते. याचि प्रचिती तेंव्हा येते, जेंव्हा असेच एखादे निरागस मन आपल्या आजारपणाला घेऊन वयाने मोठ्या असणाऱ्यांच्या ठिकाणी येते.ते निरागस मन आपल्या जन्मदात्या आईच्या सोबत आलेले असते.आई ही लेकराच्या आयुष्यातील पहिली मैत्रीण असते असं मला माझ्या वैयक्तिक अनुभवावरून वाटते.आई सोबत असल्यामुळे कित्येक वेदना कुठल्या कुठं पळून जातात. असंच काहीसं त्या निरागस जीवाचे झाले होते.मात्र जेंव्हा ते निरागस मन आपल्या आईला काही वेळासाठी बाजूला सोडून मोठ्या माणसांच्या ज्यांना डॉक्टर असे म्हणतात त्यांच्या सानिध्यात रुग्ण कक्षेत जाते तेंव्हा तिथं ते काहीसे गडबडून जाते. तिथं कुणीतरी आपल्या आई सारखं असावं अशी त्याची माफक भावनिक अपेक्षा त्या निरागस मनाची असते. आपली जिवलग मैत्रीण आई, निरागस मनाच्या सोबत असते , पण बाजूला असते.त्या निरागस मनाची धाकधूक सुरू असते..आता माझं कसं होणार..? मी इवलासा आहे.मला डॉक्टर काकांकडून त्रास तर होणार नाही ना..? अशा नानाविध प्रश्नांनी त्या निरागस मनाची घालमेल सुरू असते. त्या निरागस मनाला वेळोवेळी यावे लागणार होते.त्यामुळं वेळोवेळी होणाऱ्या दुखऱ्या वेदनांना कुणीतरी मायेनं फुंकर घालणारं , माझ्या आईच्या मायेचं कुणीतरी या इथे दवाखान्यात भेटेल का ? या नानाविध प्रश्नांचे त्याच्या मनात निरागस विचार सुरू होते. निरागस मनाला त्या रुग्ण कक्षेत भेटतो एक तरुण..!


आजूबाजूला सर्व वयाने मोठी माणसं. त्यात स्री अन् पुरुष दोघेही आलेत. प्रत्येकजण आपापल्या गणवेशात. सगळं कसं नियमात असणारं वागणं..! निरागस मनाला भेटतो एक तरुण..! निरागस मनाला त्या तरुणात आपलेपणा जाणू लागतो. तो तरुण अन् ते निरागस मन एकमेकांचे प्रेमळ मित्र होऊन जातात. निरागस मनाने , निरागस हृदयाला जिंकले की, प्रेमळ मैत्रीचे बंध आपसुक तयार होत जातात.याच भाव सिध्दांताला अनुसरून दोघांमध्ये मैत्रीचे भावबंध निर्माण होतात.अगदी वयाचे बंधनं झुगारुन अरे तुरे करणाऱ्या बालमैत्रीच्या आयुष्याच्या विश्वात ते दोघेही जगत असतात.


रुग्णांच्या कक्षेत प्रवेश केल्या केल्या " तुम्ही कुणीच इथे थांबायचे नाही, फक्त हाच दादा माझे उपचार करील..!" असे प्रेमळ आदेश देऊन उपस्थित इतरांना आदेशित करणारं ते निरागस मन चि.अद्विक अन् त्या निरागस मनाची सेवा करणारा डॉ.नमन..! उपचार सुरू असताना देखील त्या निरागस मनाकडे तिथं उपस्थित असणाऱ्या इतरांना आपल्या तर्जनी अन् मध्यमा या बोटांनी स्वतःच्या डोळ्यांकडून फिरकत नेऊन समोर नेताना असे संकेत करणारा..." तुम्ही माझ्याकडे बघू नका..!" मूलंच ती..! यांचं सगळ काही निरागस अन् निष्पाप असतं.निरागस मन जर आजारी पडलं तर त्यांना आपल्या आई सारखं जीव लावून जपलं की, ती निरागस मनं आपलीशी होऊन जातात याचा अनुभव डॉ.नमन यास आला.


कित्येक भेटी अंती त्या निरागस मनाचा उपचार समाप्त झाला. योग्य उपचार यशस्वी झाल्यानंतर त्या निरागस मनाच्या मातृत्वाचे मन भरून आले.

" डॉ.साहेब, खूप छान उपचार केलेत तुम्ही.आमचा अद्विक खूप बोलका आहे. तुम्ही त्याचं बोलणं सहन केलं.त्याच्यात समरसून गेलात म्हणून हे शक्य झाले."

एका आईचे हे भावनिक वाक्य ऐकून चि.अद्विक एकटक बघत राहिला.त्या निरागस जीवाला काय माहीत.डॉक्टर , त्यांच्या जबाबदाऱ्या , त्याचं कौशल्य. ते निरागस मन फक्त आणि फक्त आपल्या अवतीभोवती कुणीतरी प्रेमळ अन् आपलं जाणवणारं कुणीतरी भेटतं का याचं शोधात असते.जसे की त्या निरागस मनाची म्हणजेच चि.अद्विकची डॉ.नमनशी भेट झाली.पूर्ण उपचार झाल्यावर एकमेकांचे प्रेमळ दोस्त झालेले दोघेही एकमेकांचा निरोप घेऊ लागले.त्या निरागस अन् प्रेमळ जीवाचा निरोप घेताना दोघांमध्ये आपलेपणाची भावना खूप खोलवर रुजल्या गेली होती. आयुष्याच्या प्रवासात पुन्हा कधीतरी भेट नक्कीच होईल हा भावनिक आशावाद दोघांच्या मनात निर्माण झाला होता.


आपल्या आयुष्याच्या प्रवासातील आजचा दिवस त्या निरागस जीवाचा बालहट्ट पुरवून त्या निरागस मनाला कडेवर घेऊन त्या तरुणाने त्या निरागस मनाला निरोप दिला, पुन्हा कधीतरी भेटण्यासाठी..!


स्थळ - CSMSS DENTAL COLLEGE AND HOSPITAL - छत्रपती संभाजीनगर 


वंदे मातरम् 


अनुभव कथन ऐकल्यावर लिखाण करणारा लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २/४/२०२५, बुधवार.