मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
रिकाम दप्तर
======================
परवा दिनांक २० जून २०२५ शुक्रवार रोजी शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी वर्गाचा परिपाठ सुरू होता. इतक्यात एक साधारणतः पाच वर्षाचा मुलगा पाठीवर दप्तर घेऊन आला. त्या निरागस मुलाने जुनी जीन्स पँट परिधान केलेली होती, ती पण अर्धवट अवस्थेत परिधान केलेली होती. थोडक्यात ती पँट कमरेच्या खाली यायची अन् तो मुलगा त्या पँटीला पुन्हा वर ओढून घ्यायचा. त्याच्या वर्तनावरून तो मुलगा काहीसा गडबडून गेल्यासारखा जाणवत होता. त्या शाळेतील एक गुरुजी बाजूला उभे होते.तो इवलासा मुलगा त्या गुरुजींना म्हणाला...
" मी इथ बसू का..?
गुरुजी - " बस ना भाऊ "
परिपाठ सुरू होता.ते निरागस मन हात जोडून प्रार्थना म्हणू लागले होते.त्या निरागस जीवाला ही मोठी मूलं काय गातायेत, काय म्हणतायत बहुदा काही समजत नव्हते. आजूबाजूच्या इतर मुलांच्या स्वरात स्वर मिसळून ते निरागस मन आपला फक्त स्वर त्यांच्या स्वरात मिसळून फक्त ताल धरत होते. ते निरागस मन त्याचे डोळे अधूनमधून हळूच उघडून इतरत्र बघून घ्यायचे अन् पुन्हा घट्ट मिटून फक्त तालात काहीतरी बोलत असायचे.त्या निरागस जीवाला शब्दांचा उच्चार येत नव्हता, मात्र त्या निरागस जीवाने उच्चारण केलेले स्वर थेट विद्येच्या देवतेच्या चरणी अर्पण होत होते.
थोड्या वेळानं त्या गुरुजींनी इयत्ता दहावी मधील एका मुलाला परिपाठ अर्धा झाल्यावर उठवले अन् बाजूच्या प्राथमिक शाळेत सोडायला सांगितले.जाता जाता त्या इवल्याश्या मुलाच्या दप्तरात काय आहे हे त्या गुरुजींनी सहज बघितले तर त्यात काहीच नव्हते.निव्वळ रिकामे दप्तर होते.ते गुरुजी त्या निरागस मुलाकडे बघून आपलं बालपण शोधू लागले होते.आपलं बालपण देखील आयुष्याच्या अगदी पहिल्या टप्प्यात असेच गेले होते. फक्त त्या गुरुजींचे दप्तर पाठीवर नव्हते, तर हातात धरायचा पिशवीत गेले होते. तेच बालपण पुन्हा एकदा भेटल्याचा आत्मिक आनंद त्या गुरुजींना झाला होता. त्या गुरुजींना आठवणी आपल्या जिवलग मैत्रिणी असतात याची पुन्हा एकदा अनुभूती आली होती. आपला आठवणीत राहणारा भूतकाळ, वर्तमानात भेटत असतो, फक्त त्या भूतकाळाला ओळखून अन् गच्च मिठी मारून भेटता यायला हवे.
इयत्ता दहावी मधील मुलगा त्या निरागस इवल्याश्या मुलाला बाजूच्या वर्गाकडे घेऊन जाताना त्या इवल्याश्या मुलाची जिन्स पँट कमरेवरून खाली यायची, तो पुन्हा वर ओढायचा. जिन्स पँटच्या आतून अंडर पँट नसल्याने त्या निरागस जीवाचा पार्श्वभाग दिसायचा. हे बघून शरीराने मोठी झालेली मुले त्या निरागस जीवाला बघून कुत्सितपणे हसू लागली.तेवढ्यात ते गुरुजी शरीराने मोठी असणाऱ्या त्या मुलांना म्हणाले...
" बेट्यांनो, लई नका दात इचकू. तुम्ही पण याच अवस्थेत कधीतरी याचं परिसरात आला होता. भूतकाळ नका विसरु, नसता वर्तमानकाळात अहंकार येऊन भविष्यकाळ बिघडत असते. बाकी तुम्हाला विनोद करायला अन् हसायला इतरही ठिकाणं आहेतच ना..! "
तेवढ्या पुरती ती शरीराने मोठी झालेली मुले शांत झाली अन् ते निरागस मन आपल्या आयुष्यातील औपचारिक शिक्षणाच्या पहिल्या पायरीकडे मार्गस्थ झाले होते.
ते गुरुजी विचारात गुंग झाले अन् एका वाक्यावर येऊन थांबले ते वाक्य म्हणजे...
" दप्तर रिकामे होते, पण मन भरलेले होते आणि पँट कमरेच्या खाली खाली येत होती, पण इवल्याशा मनात स्वतःला भविष्यात उंचीवर जाण्याचे धाडस होते. "
वंदे मातरम्
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव. ©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - २२ जून २०२५, रविवार



