शनिवार, २१ जून, २०२५

रिकामं दप्तर


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


रिकाम दप्तर


======================


परवा दिनांक २० जून २०२५ शुक्रवार रोजी शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी वर्गाचा परिपाठ सुरू होता. इतक्यात एक साधारणतः पाच वर्षाचा मुलगा पाठीवर दप्तर घेऊन आला. त्या निरागस मुलाने जुनी जीन्स पँट परिधान केलेली होती, ती पण अर्धवट अवस्थेत परिधान केलेली होती. थोडक्यात ती पँट कमरेच्या खाली यायची अन् तो मुलगा त्या पँटीला पुन्हा वर ओढून घ्यायचा. त्याच्या वर्तनावरून तो मुलगा काहीसा गडबडून गेल्यासारखा जाणवत होता. त्या शाळेतील एक गुरुजी बाजूला उभे होते.तो इवलासा मुलगा त्या गुरुजींना म्हणाला...

" मी इथ बसू का..? 

गुरुजी - " बस ना भाऊ "


परिपाठ सुरू होता.ते निरागस मन हात जोडून प्रार्थना म्हणू लागले होते.त्या निरागस जीवाला ही मोठी मूलं काय गातायेत, काय म्हणतायत बहुदा काही समजत नव्हते. आजूबाजूच्या इतर मुलांच्या स्वरात स्वर मिसळून ते निरागस मन आपला फक्त स्वर त्यांच्या स्वरात मिसळून फक्त ताल धरत होते. ते निरागस मन त्याचे डोळे अधूनमधून हळूच उघडून इतरत्र बघून घ्यायचे अन् पुन्हा घट्ट मिटून फक्त तालात काहीतरी बोलत असायचे.त्या निरागस जीवाला शब्दांचा उच्चार येत नव्हता, मात्र त्या निरागस जीवाने उच्चारण केलेले स्वर थेट विद्येच्या देवतेच्या चरणी अर्पण होत होते. 


थोड्या वेळानं त्या गुरुजींनी इयत्ता दहावी मधील एका मुलाला परिपाठ अर्धा झाल्यावर उठवले अन् बाजूच्या प्राथमिक शाळेत सोडायला सांगितले.जाता जाता त्या इवल्याश्या मुलाच्या दप्तरात काय आहे हे त्या गुरुजींनी सहज बघितले तर त्यात काहीच नव्हते.निव्वळ रिकामे दप्तर होते.ते गुरुजी त्या निरागस मुलाकडे बघून आपलं बालपण शोधू लागले होते.आपलं बालपण देखील आयुष्याच्या अगदी पहिल्या टप्प्यात असेच गेले होते. फक्त त्या गुरुजींचे दप्तर पाठीवर नव्हते, तर हातात धरायचा पिशवीत गेले होते. तेच बालपण पुन्हा एकदा भेटल्याचा आत्मिक आनंद त्या गुरुजींना झाला होता. त्या गुरुजींना आठवणी आपल्या जिवलग मैत्रिणी असतात याची पुन्हा एकदा अनुभूती आली होती. आपला आठवणीत राहणारा भूतकाळ, वर्तमानात भेटत असतो, फक्त त्या भूतकाळाला ओळखून अन् गच्च मिठी मारून भेटता यायला हवे.


इयत्ता दहावी मधील मुलगा त्या निरागस इवल्याश्या मुलाला बाजूच्या वर्गाकडे घेऊन जाताना त्या इवल्याश्या मुलाची जिन्स पँट कमरेवरून खाली यायची, तो पुन्हा वर ओढायचा. जिन्स पँटच्या आतून अंडर पँट नसल्याने त्या निरागस जीवाचा पार्श्वभाग दिसायचा. हे बघून शरीराने मोठी झालेली मुले त्या निरागस जीवाला बघून कुत्सितपणे हसू लागली.तेवढ्यात ते गुरुजी शरीराने मोठी असणाऱ्या त्या मुलांना म्हणाले...

" बेट्यांनो, लई नका दात इचकू. तुम्ही पण याच अवस्थेत कधीतरी याचं परिसरात आला होता. भूतकाळ नका विसरु, नसता वर्तमानकाळात अहंकार येऊन भविष्यकाळ बिघडत असते. बाकी तुम्हाला विनोद करायला अन् हसायला इतरही ठिकाणं आहेतच ना..! "


तेवढ्या पुरती ती शरीराने मोठी झालेली मुले शांत झाली अन् ते निरागस मन आपल्या आयुष्यातील औपचारिक शिक्षणाच्या पहिल्या पायरीकडे मार्गस्थ झाले होते.


ते गुरुजी विचारात गुंग झाले अन् एका वाक्यावर येऊन थांबले ते वाक्य म्हणजे...

" दप्तर रिकामे होते, पण मन भरलेले होते आणि पँट कमरेच्या खाली खाली येत होती, पण इवल्याशा मनात स्वतःला भविष्यात उंचीवर जाण्याचे धाडस होते. "


वंदे मातरम् 


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव. ©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २२ जून २०२५, रविवार

मंगळवार, १७ जून, २०२५

संगीत देव बाभळी..!



 





चिंतन ©️


नतमस्तक - ' संगीत देव बाभळी..! '


======================


प्रस्तुती - भद्रकाली प्रोडक्शन ( स्व. मच्छिंद्रजी कांबळी) प्रसाद कांबळी ,

लेखक दिग्दर्शक -  प्राजक्त देशमुख, 

संगीतकार -  आनंद ओक ,

नाट्य कलाकार - आवली - संत तुकाराम महाराज यांच्या धर्मपत्नी (शुभांगी सदावर्ते ) अन् रखुमाई ( मानसी जोशी ),

आणि नाटक....' संगीत देव बाभळी..! '

द्विपात्री नाटक..!


आवली  अन् रखुमाई यांचं अत्यंत प्रेमळ  नातं अन् त्या भक्तिमय नात्यात न्हावून निघाले असंख्य भक्तगण..! संत तुकोबा आपल्या पत्नीला आवली म्हणत असतं. कित्येक वर्षानी हृदयाला भिडणारे अप्रतिम असे संगीतप्रधान नाटक सह परिवार बघितले.


संपूर्ण नाटक अप्रतिम आहे.देव बाभळी नाटक मध्यांतरानंतर  भावूक होत जाते. प्रत्येक संवाद हृदयाला भिडतो. काही प्रसंगी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्या प्रत्येक  संवादाची फेक  शुभांगीजी सदावर्ते अन् मानसीजी जोशी यांनी अप्रतिम केली आहे. आपापल्या पती विषयी असणारी ओढ अन् त्या ओढीतून स्री जातीची व्यक्त होणारी भावना हृदयाला भिडते. रखुमाई , एका प्रसंगात पुढील आशयाचा संवाद म्हणते की, घर सोडून जायचे वगैरे. त्यावर आवली पुढील आशयाचा संवाद व्यक्त होते..आपण घर सोडून जावं अन् पुन्हा घरी यायची इच्छा झाली तर आपल्या घराणेच जागा सोडली तर..? घर सोडून जायला मी काय रखुमाई हाय व्हयं..!

आवली हा संवाद व्यक्त झाल्या बरोबर रखुमाई एकटकपणे विठ्ठलाच्या मूर्तीकडे शून्य नजरेने बघत राहते. या प्रसंगाच्या वेळी एक प्रेक्षक अन् भक्त म्हणून डोळ्यातून अश्रू आले.आवलीच्या या संवादातून आपल्या घरासाठी, पतीसाठी एका स्री ची असणारी काळजी अन् निस्सीम प्रेम व्यक्त होते. त्याचं वेळी रखुमाई  बाजूला असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे एकटक बघत राहते. त्या बघण्यात रखुमाईचा पश्चात्ताप असतो. माझ्यापेक्षा आवली श्रेष्ठ ठरली हा आत्मिक भाव रखुमाईच्या अंतर्रमनात येतो.आवली आपल्या पतीला कधीही सोडून न जाण्याची भावना व्यक्त करते, त्यावेळी ती भावना हृदयात पूजनीय ठरते. या प्रसंगात शुभांगीजी सदावर्ते ( आवली ) अन् मानसीजी जोशी ( रखुमाई ) यांनी जो काही अभिनय केला आहे त्याला तोड नाही..! नतमस्तक..!🙏


विशेष म्हणजे संगीत देव बाभळी या संगीत प्रधान नाटकातील सर्व नाट्य पदे अभिनय करणाऱ्या उपरोक्त दोन्ही नाट्य कलाकारांनी स्वतः live गायन केलेली आहेत.

मंत्रमुग्ध अन् साष्टांग दंडवत..!🙏


आम्ही उभयतांनी केलेला दंडवत हा शुभांगीजी सदावर्ते अन्  मानसीजी जोशी या नाट्य कलावंतांना नव्हता, तर त्यांनी ज्या आत्मीयतेने तल्लीन होऊन संत तुकाराम महाराज यांच्या धर्मपत्नी आवली जिजाई अन् विठ्ठलाच्या धर्मपत्नी रखुमाई यांना आपल्यात जिवंत स्वरूपात उतरवलं त्यांना होता.असा अभिनय होणे नाही..!


मंत्रमुग्ध अन् दंडवत..!🙏


एखाद्या लोकभाषेला नाट्य कलेच्या माध्यमातून साता समुद्रापार नेण्याची किमया माझ्या मते संपूर्ण मानवी विश्वातील नाट्य क्षेत्रात फक्त आणि फक्त  स्व.मच्छिंद्रजी कांबळी यांनाच साध्य करता आलेली आहे. मालवणी भाषेला साता समुद्रापार नेण्याची किमया थोर नाट्य कलाकार स्व. मच्छिंद्रजी कांबळी यांनीच केली.


वस्त्रहरण नाटक अजरामर केले ते स्व. मच्छिंद्रजी कांबळी यांनीच..! त्यांनी आपल्या अजरामर अभिनयाने खूप मोठ्या उंचीवर नेलेला तात्या सरपंच इतर कुणाला त्या उंचीवर नेता आला नाही.भद्रकाली प्रोडक्शन अन् स्व. मच्छिंद्रजी कांबळी मराठी नाट्य क्षेत्रातील अजरामर नाव आहे. आता त्याच भद्रकाली प्रोडक्शनचा सांस्कृतिक वारसा स्व.मच्छिंद्रजी कांबळी यांचे सुपुत्र प्रसादजी कांबळी पुढे सक्षमपणे नेत आहेत.


संगीत देव बाभळी नाटकाचे निर्माते प्रसादजी कांबळी यांची दिनांक १५/६/२०२५ रोजी छ्त्रपती संभाजीनगर येथे देव बाभळी नाटक संपल्यावर आवर्जून घेतली. संगीत देव बाभळी सारखे अत्यंत छान असे मराठी नाटक रंगभूमीवर आणल्याबद्दल एक मराठी नाट्य रसिक म्हणून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. 🙏


स्थळ - संत एकनाथ नाट्य मंदिर छ्त्रपती संभाजीनगर 


जय हरी माऊली..!

वंदे मातरम् 


भक्त तथा नाट्य रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव आणि परिवार.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


नाट्य प्रयोग दिनांक -१५/६/२०२५, रविवार

गुरुवार, ५ जून, २०२५

होरपळ


 


चिंतन ©️


होरपळ


=====================


श्रीमंतांच्या मिरवणुकीत रस्त्यावर नाचला

आपलं अस्तित्व गहाण ठेवून जीवाला मुकला


श्रीमंतांच्या वरातीत मध्यमवर्गीय तोऱ्यात फुगला

त्याच श्रीमंतांच्या वरातीत गरीब दिवाबत्ती घेऊन उभा राहिला 


भांडवली व्यवस्थेची मिरवणूक वाजत गाजत निघाली 

भांडवली अपत्यांना पाहता पाहता सर्व सामान्य लेकरं देवाघरी गेली 


सरंजामी व्यवस्था अजूनही आहे,

फक्त तिचे रुप पॉलिश देऊन बदलले आहे 


यात होरपळ होत असते त्याच स्री अन् पुरुषाची

ज्यांच्या आयुष्याला झालर नसते कुबेराची


या विश्वात मरतो तो गरीबच असतो

फक्त या विश्वातील गरिबाला सामाजिक आडोसा नसतो 


होरपळ होत असते त्या जीवांची

ज्यांनी गमावली असते कमाई आयुष्याची 


वंदे मातरम् 


पद्य लेखन - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील पद्य  लेखन कॉपीराइट केलेले असून पद्य लेखनाचे संपूर्ण हक्क राखून आहेत.)


दिनांक - ५/६/२०२५, गुरुवार