मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

" आला का..दर्शनाला दे...आपट्याचे पान..!"☺




आमचे गाव आमची माणसं..!

" आला का..दर्शनाला दे...आपट्याचे पान..!"☺




===================================

अंदाजे आमच्या इ.चौथी पर्यंतच्या वयोगटापर्यंत लहानपणी मी आणि माझे गल्लीतील बालमित्र  पालखेड येथे दसरा या सणाच्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळी दसरा या  सणाच्या दिवशी गल्लीतील सगळ्याच मोठ्या माणसांचे दर्शन घ्यायचो..त्यावेळी खूप गमंती व्हायच्या..!

ही मोठ्या वयाची माणसं ,त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या लहान मंडळी करिता आपले दोन्ही पाय जोडूनच ठेवायचे..!त्यांचे असे जोडलेले पाय कित्येक वेळ तसेच राहायचे..! कारण त्यांना माहीत होते की,येणारे भाविक भक्त खूप खूप आहेत म्हणून..!☺ त्यात मग दर्शनाला येणारा ओळखीचा आहे की नाही याच्याशी त्यांना काहीच देणंघेणं नसायचे..! आला का..दर्शनाला दे...आपट्याचे पान..!आला का..दर्शनाला दे...आपट्याचे पान..!!☺

आमच्या गल्लीतील मोठी माणसं आमच्या ओळखीची असायची..! ती मोठी वयाची माणसं पण आम्हाला ओळखायची..!
पण.........
जेंव्हा आम्ही आमची गल्ली सोडून गावाच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या गल्लीतील मोठ्या माणसांचे  भटकंती करत..करत..दर्शन घ्यायला जायचो तेंव्हा  त्यांची ना...ओळख ना..पाळख...! दिसले पाय टेकव डोकं..! दिसले पाय टेकव डोकं..!! असा क्रम सुरू व्हायचा...!☺
बऱ्याचवेळा तर दर्शन घेणाऱ्या भाविक भक्तांची ट्रॅफिक जॅम होऊन जायची..! दर्शन घेणाऱ्या भाविक भक्तांची सगळ्यात जास्त ट्रॅफिक जॅम आमचा प्रिय बालमित्र शाम शेळके याच्या‌ घराकडील मोठ्या माणसांचे दर्शन घेत असताना व्हायची..! तिथं दगडी जोत्यावर बरीच वयोवृध्द माणसं दोन्ही पाय जोडूनच बसलेली असायची..!

आता काळ बदलला आहे. आजची पिढी सुशिक्षित झाली आहे.आज दसऱ्याच्या दिवशी आमच्या बालपणी दर्शनासाठी होणारी ट्रॅफिक जॅम अजिबात होत नाही..!
कशी होणार ट्रॅफिक जॅम..?
प्रत्येक गावातील तो निरागसपणा हरवला आहे..!
प्रत्येक गावातील माणसांना यंत्र शांत बसू देत नाही..!
प्रत्येक गावातील माणसांना खेड्यात राहून शहरासारखं राहायची सवय लागली आहे..!
या बाबतीत शहरातील आजची परिस्थिती न व्यक्त केलेलीच बरी..! शहरात तर कुणी एखादा खेड्यातलं सारखं मोकळं चाकळं वर्तन करायला गेलाच तर अशा व्यक्तीकडे पाहताना शहरातील माणसं  तुच्छ नजरेने किंवा...." काय गावंढळ माणूस आहे हा..!" अशा
" सुशिक्षित नजरेने " पाहतात..!

असो,
आज विजयादशमी उत्सव आहे..! त्यानिमित्त आम्ही बालमित्रांनी आमच्या बालपणी आमच्या पालखेड गावातील ज्या..ज्या ओळखीच्या आणि सर्वात महत्त्वाचे ज्या..ज्या अनोळखी मोठ्या वयाच्या माणसांचे दर्शन घेतले त्यांची आज खूप खूप आठवण आली..! त्या सर्वांना साष्टांग दंडवत..! तुमचे आशीर्वाद असेच  आमच्या पाठीमागे असू द्या..आमच्यातील एक खेडूत कधीही मृत न होऊ देण्यासाठी..!

वंदे मातरम्..!

 एक खेडूत लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: ८ ऑक्टोंबर २०१९, दसरा..!

४ टिप्पण्या:

  1. खूप छान, मला माझ्या बालपणीची आठवण झाली, मी सुद्धा माझ्या जन्मगावी म्हणजेच वाकल्याला असताना असंच पूर्ण गावात माझ्या मित्रांसोबत दर्शनासाठी जायचो, आम्ही अगदी ओळीने प्रत्येक घरात जायचो, पूर्ण गावातून मोजकीच घरं सुटायची!!!
    विजया दशमीच्या आपणासही खूप खूप शुभेच्छा!!!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. गावातल्या त्यातल्या त्यात आपल्या पिढीतील अन् अजुन जुन्या पिढीतील अशा अनेक रम्य आठवणी खूप सुखावून जातात..!
      असो,विजयादशमी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
      वंदे मातरम् बंधू

      हटवा