मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" मला भारत देश सापडला..! "
===============================
आज दिनांक ८ जानेवारी २०१८ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलहेरा ,ता.गंगापूर या शाळेत मधल्या दीर्घ सुट्टीत , इ.४ थी मधील सागर च्या हाताच्या कोपऱ्याला थोडेसे खरचटले होते.लगेच विजय ,सागरला स्वतच्या घरी घेऊन गेला, सोबत सतीश होता. घरगुती व आयुर्वेदिक उपचार म्हणजे हळद..! सागरच्या थोड्याशा जखमेवर विजयने हळद लावली अन् सोबत एका पुडीत देखील बांधून दिली..!कारण सागर दूर मळ्यात राहतो..!शाळा सुटल्यावर जखमेवर लावायला..! हे सर्व मला त्या वर्गात गेल्यावर समजले..!
वास्तविक मी या वर्गाला शिकवत नाही,पण जेंव्हा,जेंव्हा आसपास अंतर्मुख करायला लावणाऱ्या घटना घडतात,तेंव्हा मी त्यांच्या वर्गशिक्षकांची आदरणीय कल्याणराव डमाळे सर यांची परवानगी घेऊन या चिमुकल्यांच्या वर्गात जातो..! अंतर्मुख होऊन,आपला भारत खरा कसा आहे हे शोधायला..! हा वर्ग मला खूप खूप आवडतो..!मी दिवसातून एकदा तरी या इ.४ च्या वर्गात हमखास जातोच..आयुष्यातील बरेच काही शोधायला..आणि मला या वर्गात अंतर्मनातील आनंद नक्की सापडतो..!
मग या ठिकाणी मला आपला भारत देश प्रत्येकवेळी नक्कीच सापडतो..!
आणि विश्वास पटतो, तो बऱ्याच थोर राष्ट्रपुरुषांच्या अस्तित्वांचा..!
विश्वास पटतो त्यांच्या असण्याचा..!
विश्वास पटतो,तो त्या राष्ट्रपुरुषांनी न बघितलेल्या एकमेकांच्या जातींचा..!
विश्वास पटतो, तो माझे मी अनुभवलेले बालपण अजूनही शिल्लक आहे,या मुलांमध्ये याचा..!
आणि सर्वात विश्वास पटतो तो अजुनही या भारतात बरेचजण भारतीय आहेत याचा..!
मी हा प्रसंग पाहून व ऐकून खूप अंतर्मुख झालो..!
किती छोटी छोटी मुले ही,यांना फक्त आणि फक्त प्रेम,जिव्हाळा माहीत..!यांच्या भावविश्वात " जात " हा रोग अजुन शिवलेला नाही..!त्यांना ना जातीचा अहंकार शिवलेला ना न्यूनगंड आलेला..!ते मस्तपैकी जगत आहेत..एका सुंदर व गोड भावविश्वात..! कारण ती लहान आहेत म्हणून..! माणूस जसजसा मोठा होत जातो,तसतसा तो प्रत्येकात बरेच काही शोधून मग मदत करायची की नाही हे ठरवत पुढील मुल्यहिन आयुष्य व्यतीत करत जातो..! ही मुले ,ज्या भावविश्वात सध्या मैत्रीपूर्ण जगत आहेत,त्यात त्यांना खूप आनंद मिळतोय,तो घेऊ द्या त्यांना..! हाच आपला भारत देश आहे, सर्व राष्ट्रपुरुषांच्या अंतर्मनातील..!
ता.क.: मी या मुलांची आडनावे मुद्दामहून लिहिली नाहीत..!कारण बरीच मोठी माणसं आडनावावरून जात शोधण्याचा किळसवाणा प्रकार करतात..!
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
फेसबुकवर लिखाण दिनांक :८/१/२०१८ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: ८/१/२०२०, बुधवार







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा