मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" अब मार भला... ! "😊🙄
=====================================
काळ होता.. इ.स.१९९३ चा..!
ऋतु होता..पावसाळ्याचा..ऑगस्ट मधील..!मला नेमकी दिनांक आठवत नाही.आम्ही मोजके डी. एड.चे वर्गमित्र ता.कन्नड शहर,जि.औरंगाबाद येथील समर्थनगर मधील जगातील तत्कालीन काळातील बहुदा अस्वच्छतेत पहिल्या पाच मध्ये असणाऱ्या वसतिगृहात राहत होतो..! 😊 बाकीचे माझे मित्र डी. एड कॉलेज ला गेले होते.मी काही वेळानंतर जाणार होतो.त्याचे कारण माझ्या बाजरीच्या भाकरी थापायाच्या राहिल्या होत्या..! मी दोन बाजरीच्या भाकरी थापल्या अन् आवरासावर करून कॉलेजला जाण्यासाठी निघालो..!
माझ्या मनात सहज विचार आला की,बस स्थानकावर असणाऱ्या मीर साहेब यांच्या चहाच्या हॉटेलवर जाऊन मस्तपैकी एक कप दूध प्यावे अन् मग नंतर कॉलेजला जावे असे वाटले. मी तेंव्हाही अन् आताही चहा पित नसल्याने चहाची तहान दुधावर भागवायची ठरवले होते..! आमच्या सुंदर..? अशा वस्तीगृहाच्या थोड्याच अंतरावर बस स्थानक होते..!मी पटकन तिथे पोहचलो.
मीर साहेब यांचे हॉटेल त्याकाळी कन्नड मध्ये खूप प्रसिद्ध होते.त्याचे कारणं तीन होते..! पाहिले कारण म्हणजे त्यांनी बनविलेल्या चहाची चव अगदी मस्तपैकी होती.. असं माझे मित्र म्हणायचे..!😂अर्थात मलाही चहाच्या वासाची अलर्जी वगैरे नव्हती..! मी आपली चहाची भूक फक्त तिच्या वासावर भागवून घ्यायचो..! ते हॉटेल प्रसिद्ध असण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे..तिथे एक कप चहा फक्त १ ₹ ला मिळत असे..! त्यामुळे तिथे चहा पिवय्यांचा नेहमी सुळसुळाट असायचा..!😂 तिसरे कारण म्हणजे मिर साहेब यांचा स्वभाव खूप मायाळू होता..!
मी एक कप दुधाची ऑर्डर दिली. मस्तपैकी दूध पीत होतो..इतक्यात..जिथून बस ,बस स्थानकात शिरतात तिथं दोन माणसात भांडण सुरू झाले..असे त्यांच्या ध्वनी प्रदूषणामुळे मला व इतरांना कळले.. ! मी पटपट दूध पिले अन् तो मारधाड लाईव्ह चित्रपट पाहायला गेलो..!
पाहतो तर काय...त्या दोन माणसांपैकी एकजण एकदम हडकुळा तर दुसरा दणकट तब्येतीचा होता..! त्यांच्यातील संवाद व कृती पुढील प्रमाणे होती...
त्या दणकट माणसाने त्या लुकड्या माणसाला एक जोराची थापड कानाखाली ठेवून दिल्या बरोबर...तो लुकडा माणूस जामिनावर पडला..अन् म्हणाला...
लूकडा माणूस - " ऐ...मुझे मारनेका नही भला क्या..!"
असं म्हणल्या बरोबर त्या दणकट माणसाने पुन्हा एक जोराची थापड कानाखाली लावली. त्यावर तो लुकडा माणूस पुन्हा म्हणाला :
" मैं..तेरेको समझाता हु...मेरेको.. मार मत...बहुत महंगा पडेगा तेरे को...!"
पुन्हा त्याच्या कानाखाली आवाज झाला.पुन्हा तो लुकडा माणूस म्हणाला : " तू अब मार भला..तेरे को मैं.. दिखाता हुं..!"
पुन्हा त्याच्या कानाखाली आवाज झाला..!
त्यावर तो लुकडा माणूस म्हणाला...
" तू अब सिर्फ मुझे हाथ लगाके दिखा..!"
पुन्हा त्याच्या कानाखाली आवाज झाला..!
पुन्हा शेवटी तो लुकडा माणूस म्हणाला...
" मैं..तेरे को अभी छोडता हुं...तुझे मैं..बाद में देखुंगा..!"
असं म्हणून तो लुकडा माणूस तिथून पळून गेला..! मला तेंव्हा पासून ते आज संध्याकाळ पर्यंत एक प्रश्न पडला होता की,
" त्या लुकड्या माणसाने,त्या दणकट माणसाचा एवढा मार खावूनही ,तो लुकडा माणूस असं का बरं म्हणाला होता..की,
" मैं, तेरे को अभी छोडता हुं..तुझे मैं..बाद में देखूंगा..!"
आणि आज संध्याकाळी त्याचे मला दुसऱ्या एका कृतीने उत्तर मिळाले..! ते उत्तर असे की,
" अरे, त्या लूकड्या माणसात तर अजिबात दम नव्हता...तो फक्त पोकळ धमक्या देत होता..!"
ता.क.: मी पाहिलेल्या वरील प्रसंगाचा अन् भारत व पाकिस्तान मध्ये नेहमी होणारे भांडण, यात सांधर्म्य आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..!😊
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २८ फेब्रुवारी २०२०, शुक्रवार







