गुरुवार, १२ मार्च, २०२०

पोक्त विचारांचे धनी , सर्जेराव काका पाटील..!






#मला प्रवासात भेटलेली माणसं..!

 " पोक्त विचारांचे धनी , सर्जेराव काका पाटील..! "

==================================

आदरणीय सर्जेराव काका औसरमल पाटील,
वंदे मातरम्..! 🙏🏻
प्रथमतः तुम्हाला जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹

आपण ,आम्ही जो पर्यंत एकलहेरा,ता. गंगापूर, जि. औरंगाबाद या गावात शिक्षक म्हणून सेवा करत होतो तो पर्यंत एक शिक्षण प्रेमी नागरिक म्हणून आणि परिपक्व विचारांचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिले.आम्ही जो पर्यंत तिथे नोकरी करत होतो तो पर्यंत तुम्ही म्हणजे आम्हा सर्व शिक्षकांसाठी एक वडील या नात्याने प्रेमाने वागत राहिलात. शाळेत कोणतीही समस्या आली तर तुम्ही अन् आदरणीय दादासाहेब पाटील गांगर्डे सदैव तत्पर असायचे. शाळेतील चांगल्या गोष्टींना, चांगल्या शिक्षकांना कसे प्रेरित करायचे याचे कौशल्य तुमच्या अंगी आहे.

मला चांगले आठवते.. जानकीदेवी बजाज अंतर्गत आपल्या शाळेला एक लाखाचे स्वच्छतागृह मंजूर झाले होते.पण काही रक्कम अगोदर जमा करायची होती. आम्ही ही अडचण तुमच्या अन् दादा पाटील गांगर्डे यांच्या कानावर ही समस्या सांगितली.तुम्ही क्षणाचाही विलंब न करता गावातील देवळाची जमा असलेली शिल्लक रक्कम शाळेच्या स्वच्छतागृहासाठी जमा करायला दिली होती.खूप मोठे कार्य होते ते...लेकरांसाठी..!

एक समजुतदार अन् योग्य व्यक्तीचे मूल्यमापन करणारे तुमचे गुणवैशिष्ट्ये माझ्या मनाला खूप भावले. एखादा शिक्षक जर अगदी नगण्य बाबतीत चुकत असेल तर त्याला प्रेमाने समजावून सांगून अन् त्याला अजुन प्रोत्साहित करून त्याच्याकडून खूप चांगले काम तुम्ही करून घेत राहिले.

आम्ही जो पर्यंत एकलहेरा,ता.गंगापूर शाळेत कार्यरत होतो तो पर्यंत तुम्ही सदैव चांगल्या शिक्षकाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात याची आठवण माझ्या हृदयात कायमची कोरलेली राहील. असे पोक्त विचारांचे आणि योग्य ते समजून घेणारी माणसं एखाद्याला प्रेरित करायला खूप महत्त्वाची ठरतात. तुम्ही जेंव्हा जेंव्हा शाळेत आलात तेंव्हा तेंव्हा निदान मला तरी माझ्याच घरातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व घरी आल्यासारखे वाटत होते. त्याचे कारण तुमच्या अंगी असलेले खरे पाटीलपण..! एखाद्या पाटलाचे पाटीलपण कसे असावे ते तुमच्याकडे पाहून मला पटत गेले. पाटील हे पद होते , गाव पातळीवरील जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीचे..! पाटील या जबाबदारीयुक्त पदाच्या सोबत विनम्रता, समजूतदारपणाची सुसंकृत भाषा, सर्वांना सामावून घेण्याची न्यायिक प्रवृत्ती इत्यादी नैतिक मूल्ये ओघाने आलीच. हीच पाटील पदाची खरी ओळख आहे अन् राहील. पाटील या पदाला शिवकालीन इतिहास आहे. काळाच्या ओघात पाटील या पदाचा उपयोग सर्रास कुणीही करू लागला तो भाग वेगळा..! आम्ही जो पर्यंत एकलहेरा येथे कार्यरत होतो, तो आदरणीय सर्जेराव पाटील काका अन् दादा पाटील गांगर्डे यांनी शाळेसाठी जो काही भक्कम आधार दिला होता तो कधीही न विसरण्या जोगता आहे. आदरणीय सर्जेराव काका औसरमल यांचे पाटीलपण आमच्या पाठीशी होते याचा आजही आम्ही तत्कालिक सर्व शिक्षकांना सार्थ अभिमान वाटतो.

तुमचे एक वाक्य मला नेहमी आवडायचे..अन् ते म्हणजे..
" शाळेत गावातील कुणा ही नागरिकाला यायचे असेल तर..पायातील राजकारणाचे जोडे बाजूला काढा..मगच या..!"
खूप मोठा अर्थ त्यात होता..! 

आम्ही जो पर्यंत एकलहेरा शाळेत कार्यरत होतो तो पर्यंत तुम्ही अन् दादासाहेब पाटील गांगर्डे यांनी सदैव आम्हाला खूप खूप सहकार्य केले ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.शेवटी चांगल्या माणसांची आठवण सदैव हृदयात असते,माझ्या सारख्या सर्व सामान्य शिक्षकाच्या अंतर्मनात..!

आदरणीय सर्जेराव औसरमल पाटील काका, आज दिनांक १२ मार्च २०१९ रोजी तुमचा जन्मदिन आहे..!
त्याबद्दल आपणास जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹

ता.क. - प्रत्येक गावात, विविध क्षेत्रात कुणीतरी राजकीय पक्षाशी संबंधित असतो किंवा एखाद्या संघटनेशी संबंधित असतो. मला वैयक्तिक आयुष्यात भावलेल्या अन् त्यांच्यातील मला वैयक्तिक अनुभवास आलेल्या सद्गुणांचा, चांगुलपणाचा मी चाहता असतो. याचा अर्थ मी, अशांच्या राजकीय पक्षाशी अथवा संघटनेशी संबंधित आहे, असा अर्थ सुज्ञ वाचकांनी काढू नये ही नम्र अपेक्षा..!🙏

" मला प्रवासात भेटलेली माणसं..!" 
हे सदर लेखन निरपेक्ष भावनेने वाचन करावे ही नम्र विनंती..!🙏

एकलहेरा शाळेतील एक माजी गुरुजी : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

वंदे मातरम्..!

दिनांक:१२ मार्च २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा