मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" आमची पाराई..! "
___________________________________________
मी जेंव्हा..जेंव्हा सासुरवाडीला जातो, तेंव्हा..तेंव्हा माझी पाराई आपल्या जावयाला उठत..बसत नक्की भेटायला येतेच..! माझी भेट झाल्यावर माझ्या गालावरून मायेने हात फिरवून तिच्या कानावरील भागावर तिच्या दोन्ही हातांची बोटं मोडणारी माझी पाराई..! ती बोटं मोडल्यावर माझ्या आयुष्याचे कृतार्थ झाल्याची भावना माझ्या मनात येते..! मातेला व मायेला कोणतीही " जात " बंदिस्त करूच शकत नाही..! प्रत्येक वेळी माझी पाराई, मला म्हणते ....
" जावई, कव्हा आले..? अन् माझी शारदा कुठं हाय..? पोरं दोन्ही आणले की एकच..? म्हाताऱ्याची तब्येत बरी हाय का..?"
एकाच दमातील ही मायेची विचारपूस सुखावून जाते..!
पाराईने खूप खूप कष्ट सोसले आहेत.ते कष्ट सोसतांना माझ्या सासू, सासऱ्यावर ,त्यांच्या लेकरांवर जीवापाड प्रेम करत राहिली..!गेल्या १८ वर्षापासून माझी सासुरवाडीला एकही अशी भेट झाली नसेल की,ज्यावेळी पाराईची अन् माझी भेट झाली नसेल..! जर कदाचित थकव्यामुळे पाराई नाही आली,तर मी तिच्या भेटीला जातो..!मात्र जातो नक्कीच..! अख्खे आयुष्य झोपडीत गेलेली पाराई,तिच्या नातवाच्या शिक्षणामुळे ,नोकरीमुळे आज आरामदायी सुखी जीवन व्यतीत करत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रध्दा असलेली माझी पाराई..!
वास्तविक माझी पाराई माझी रक्ताच्या व जगाच्या दृष्टीने असलेल्या तथाकथित जातीच्या नात्याने माझी आई आजी नाही..! पण त्याही पलीकडे असलेल्या भावनिक माणसांच्या नात्यातील माझ्या मनाला भावलेली खूप मायाळू आई आहे..! असे नाते जे जातीच्या श्रृंखला तोडून टाकते..!
मी खरंच खूप नशीबवान आहे,माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात मला मातेच्या रुपात इतिहासातील अनेक माता भेटल्या,ज्यांनी मला आजच्या काळातील वर्तमानात त्यांना शोधण्यास व त्यांचे आजचे अस्तित्व आजही आहे हे मान्य करायला लावले..!
माझ्या पत्नीवर,आमच्या पाराईचे विशेष प्रेम..! जेंव्हा जेंव्हा मी माझ्या सासुरवाडीला जातो तेंव्हा तेंव्हा एकतर माझ्या पत्नीला ,आमच्या पाराईला भेटण्याची आतुरता असायची किंवा पाराईला,माझ्या पत्नीला भेटण्याची आतुरता असायची..! कोणत्याही नात्यात आतुरता तेंव्हाच निर्माण होते जेंव्हा त्या नात्यातील प्रेमाची खोली,खूप खोलवर रुजलेली असते..! नात्यातील प्रेमाची खोली, या दोघींच्या नात्यात नक्कीच मला नेहमी जाणवत असायची..!
आजही माझ्या पत्नीला त्यांच्या अतिशय कठीण परिस्थितीतील दिवस आठवतात तेंव्हा याच पाराईने माझ्या पत्नीला,तिच्या भावंडांना लावलेला जो जीव आहे,त्याचे स्मरण झाल्यावर खूप खूप गहिवरून येते..!कुणालाही,कठीण परिस्थितीत जी माणसं जीव लावतात तीच माणसं,अशा माणसांना आयुष्यभर देव माणसांसारखी जाणवत राहतात..! अगदी असंच निर्भेळ प्रेमाचं अन् मायेचं नातं पाराई अन् माझ्या सासुरवाडी कडील माणसांमध्ये होते..!
कोण म्हणतं थोर राष्ट्रपुरुष पुनर्जन्म घेत नाहीत..? ते सर्व थोर राष्टपूरूष आपल्या अवतभोवतीच असतात..! फक्त त्यांना शोधण्याचे व जाणण्याचे भावनिक मन असावे लागते..! ते मन जर घाणेरडे राजकीय किंवा जातीयवादाचा पुरस्कार करणाऱ्या विचारधारेचे असेल तर...हे राष्ट्रपुरुष कधीच सापडणार नाहीत..!
विनम्र वंदन पाराई उपाख्य पार्वताबाई बन्सी गोरे या माझ्या आईला...त्यांच्या लाडक्या जावयाकडून..!
वंदे मातरम्
लेखक व पाराईचा लाडका जावई: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव, पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १३ मार्च २०१८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा