मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" एका इसमाचा उपाशी -तापाशी प्रवास..!"
=================================
५ जून १९९८ रोजी एक भोळा भाबडा इसम मडगाव गोव्याहून रेल्वेत ,मुंबईला येण्यासाठी बसला होता.
रेल्वे रत्नागिरी येथे आल्यावर त्या इसमाच्या खिशातील पैसे कुणीतरी चोट्ट्याने चोरले असे त्याच इसमाच्या लक्षात आले होते.फक्त आतल्या खिशात असलेले फक्त ८०₹ तेवढेच शिल्लक राहिले होते.
गोव्याहून निघतानाच हा इसम भुकेला होता.
त्याला वाटले होते,नंतर रेल्वेत जेवण करू..!
मात्र पैसेच कुणीतरी चोरल्याने उपाशी तापाशी भल्या पहाटे हा इसम दिनांक ६ जून १९९८ रोजी मुंबई रेल्वस्थानकावर उतरला होता.
तिथं चौकशी केली असता ,औरंगाबाद येथे जाण्यासाठी रात्री ९ वाजता देवगिरी एक्स्प्रेस आहे ,असे समजले होते.
जवळ आतल्या खिशात शाबूत राहिलेले फक्त ८०₹ शिल्लक राहिले होते.
पोटात सगळेच प्राणी ओरडत होते.
त्या भोळ्या भाबड्या इसमाने तिकीट काउंटरवर जाऊन चौकशी केली की,
" इथून लासूर स्टेशनचे देवगिरी एक्स्प्रेसचे तिकीट भाडे किती ₹ आहे..?"
तेंव्हा तिकीट काऊंटरवाल्या मामांनी....
" ७७₹ भाडे आहे ..! " असे सांगितले होते.
त्या इसमाच्या जवळ फक्त ८०₹ होते अन् भाडे लागणार होते ७७ ₹..!
म्हणजेच शिल्लक फक्त ३₹ राहणार होते.
ते ८०₹ दिवसभर जवळ तसेच ठेवले होते,इमरजन्सीत काही गरज पडली तर उपयोगात आणायला..!
त्या भोळ्या भाबड्या इसमाने असे ठरवले होते की,दिवसभर ८०₹ जवळ ठेवू अन् संध्याकाळी तिकीट काढू..!
अख्खा दिवस उपाशी-तापाशी तत्कालीन नाव व्हीटी रेल्वे स्टेशनवर इकडून तिकडे अन् तिकडून इकडे फिरण्यात दिवस घालवला होता.
अधून मधून भूक लागली की,तो भोळा भाबडा इसम,त्याच रेल्वे स्टेशनवर इतर जे जे प्रवासी चटकमटक खात होते,त्यांच्याकडे एकटक पाहत आपली दुरून भूक भागुन घेत होता. अखेर संध्याकाळी १८:१६ म्हणजेच संध्याकाळचे ६:१८ वाजता त्या भोळ्या भाबड्या इसमाने मुंबई ते लासूर स्टेशन तिकीट काढले होते.
( तिकिटावर वेळ अन् दिनांक आहे )
आता शिल्लक राहिलेल्या फक्त ३ ₹ चे खारे शेंगदाणे विकत घेऊन पोटभर खाल्ले होते.
अखेर रात्रीचे नऊ वाजता देवगिरी एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म वर आल्यावर तो, एक रात्र व एक दिनमान उपाशी -तापाशी असलेला भोळा भाबडा इसम रेल्वेच्या जनरल डब्यात गर्दीत वाट करून बसला होता.
रात्रभर रेल्वेत इतर प्रवाशांच्या विविध खाद्य पदार्थांचे खाद्य सेवन पाहून तो भोळा भाबडा इसम,स्वतची दुरून पाहून भूक भागवून घेत होता.
अखेर दिनांक ७ जून १९९८ रोजी पहाटे ४ वाजता तो भोळा भाबडा इसम उपाशी - तापाशी लासूर स्टेशन रेल्वे स्थानकात उतरला. आता प्रश्न पडला होता की,इथून पालखेड येथे जाण्यासाठी भाड्याचे पैसे कुणाकडून घेऊ..? याच भोळ्या भाबड्या इसमाचे लासूरगाव शाळेचे माजी मुख्याध्यापक तिर्थस्वरूप अभंग सर,इथेच लासूर स्टेशन येथे राहत होते. तो इसम सकाळी अभंग सरांच्या घरी गेला.सरांना सगळी हकीकत सांगितली.आदरणीय अभंग सरांनी लगेच १००₹ दिले अन् आता घरी जा..! असे सांगितले होते.
त्या भोळ्या भाबड्या इसमाने आदरणीय अभंग सरांचे दर्शन घेऊन जीपने पालखेडकडे प्रस्थान केले..!
ता.क.- आज भारतीय रेल्वेचा जन्मदिन आहे,म्हणून ही आठवण आली बाकी काही नाही..!😊🙏 आणि हो,ते तिकीट आजही संग्रही आहे..!
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक : १६/४/२०२०, गुरुवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा