" हे ऋण कसे फेडू...? "
__________________________________________
" सर,तुम्ही आज माझे ऐकायचे..सांगून ठेवतो..! आज आमच्या गावाची जत्रा आहे, मी तुम्हाला ऊसाचा रस पाजतो..!" हा इयत्ता तिसरीचा चिमुकला..मला म्हणाला..! मी या चिमुकल्याला नेहमी " गायकवाड " या नावाने प्रेमाने हाक मारायचो..!
निमित्त होते,एकलहेरा , ता.गंगापूर येथील लक्ष्मीदेवी यात्रेचे..!
आज दिनांक २ एप्रिल २०१८ रोजी मी शाळेत गेल्यावर एकलहेरा येथील लक्ष्मी आईच्या मंदिरात दर्शन करिता चाललो होतो,तर या पठ्ठ्याने मला अक्षरशः हाताला धरून रसवंती गृहात नेले.एकटा नको म्हणून मी अजुन दोन..तीन जण सोबत घेऊन गेलो..!आम्ही
" अंगत पंगत सारखं " ऊसाचा रस वाटून पिलो..! शेवटी मी पैसे द्यायला लागलो तर...या चिमुकल्यांनी नाही देऊ दिले..! असंच काहीसं या माझ्या मुलींनी मला आज आग्रहाने गरमागरम जिलेबी खायला आणली..! तोच अवखळपणा, तोच बालहट्ट...मात्र येथे बालहट्ट होता... आग्रह करून खाऊ घालण्याचा..!😊
या अशा अनेक आतापर्यंत भेटलेल्या चिमुकल्यांचे हे ऋण कसे फेडू..?
बहुदा अशी काही ऋण आपल्याला खूप भावूक करतात..! भावनिक दृष्ट्या खूप समृद्ध करतात..! काही ऋणात आयुष्यभर राहिलेलेच चांगले असते..!
" असतील तुमच्याकडे खूप पैसे, आम्हाला काय त्याचे कौतुक...! आमच्याकडील प्रेमाची देणी आम्ही तुम्हाला देऊ..गुपचूप खा..! घेत जा...! " असाच भाव या बालमनांचा असतो..!हीच समृद्ध बालमने भविष्यात यशस्वी होऊन,माझ्या सारख्या असंख्य शिक्षकांच्या आयुष्यात नंदनवन फुलवितात...समाधानाचे..! एकलहेरा येथील आई लक्ष्मी मातेच्या जात्राच्या दिवशी बरेच विद्यार्थी , जत्रातून खाऊ घेऊन यायचे..! तो खाऊ खाणे म्हणजेच आई लक्ष्मी मातेचा प्रसाद खाल्याचा पवित्र आत्मानंद मिळायचा..!
खूप खूप धन्यवाद माझ्या मुलामुलींनो...! तुमच्या याच आठवणी माझ्या वार्धक्यात मला खूप सुखावून जातील..! तुमच्या या पवित्र सहवासाने, माझे वार्धक्य तारुण्यालाही लाजवेल असे असेल..! त्या वार्धक्यात शारीरिक दुर्बलता असेल..ती दुर्बलता प्रत्येक सजीवाला विधात्याकडून मिळालेला प्रसाद आहे..! मात्र त्या दुर्बलतेत माझ्या या चिमुकल्यांच्या या व अशा पूर्वीच्या अनेक आठवणी मला भविष्यातील वार्धक्यात मनाने निश्चितच तरुण करतील यात अजिबात शंका नाहीच...!
एकलहेरा येथील जत्राच्या दिवशी सगळे विद्यार्थी एकदम आनंदात असायचे. तिथली जत्रा व्यावहारिकदृष्ट्या फार काही मोठी नसायची,मात्र आनंद शोधायला अन् तो व्यक्त करायला आमच्या सारख्यांना कोणत्याही मोठेपणाची कधीही गरज पडली नाही अन् मरेपर्यंत पडणार देखील नाही..!
मी ज्यावेळी जून २०११ मध्ये एकलहेरा येथे शिक्षक म्हणून उपस्थित झालो तेंव्हा तिथल्या दक्षिणेकडील अंदाजे अर्धा किलोमीटर दूर असलेल्या परिसराला मुलं नेहमी
" झोपडपट्टी " या नावाने उल्लेखित करायचे.अर्थात त्यात त्यांचा दोष नव्हता.मोठ्यांचे शब्द , लहाने ऐकतात अन् तेच शब्द लहाण्यांचे अंगवळणी पडतात..! जी मुलं ,त्या
" झोपडपट्टी " परिसरातून शाळेत यायची, तिथं मी, प्रिय कल्याणराव डमाळे सर, प्रिय नंदलाल सलामपूरे सर जून २०११ नंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाला गेलो.तर तिथं मला हनुमान मंदिर आढळून आले. मी शाळेत आल्यावर प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना सांगितले की,
" झोपडपट्टी " असं म्हणायचं नाही,तर " हनुमाननगर " असं म्हणायचं..! बघा तुम्हाला पटलं तर म्हणा..!! "
तेंव्हापासून शाळेतील सर्व मुले त्या परिसराचा
" हनुमाननगर " म्हणूनच उल्लेख करायला लागली.
काही शब्द आपल्या जाणिवांना जागृत करतात,तर काही शब्द आपल्या जाणिवांना भूतकाळातील जाणीवा स्मरणात आणतात..!
वंदे मातरम्..!
ता.क.( ताजा कलम) : माझ्या सर्व आजी माजी मुलामुलींना समर्पित आठवण..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव, पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
फेसबुकवर लिखाण दिनांक : २ एप्रिल २०१८
स्थळ: एकलहेरा,ता.गंगापूर, जिल्हा.औरंगाबाद येथील जत्रेतील आम्ही भक्त..!







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा