मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
"केश कर्तनात माहीर आदरणीय राजू भाऊ तुपे..!"
==================================
सप्टेंबर २००० पासून ते आजतागायत,म्हणजेच तब्बल २० वर्षात लासूर स्टेशन सोडून इतरत्र कोणत्याही ठिकाणी माझ्या डोक्याचं केश कर्तन कुठं केलं नाही.
त्यातल्या त्यात आदरणीय राजू भाऊ तुपे यांच्या प्रेमळ हातावर लई विश्वास..! विजू भाऊ वाघ पण आहेच..!
( दोघेही लासूर स्टेशनकर )
औरंगाबाद येथे राहायला येऊन जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होत आली आहेत,पण वरील बाबतीत लासूर स्टेशनशी अगदी प्रामाणिक आहे. डोक्याचं केस कर्तन करायचं तर राजू भाऊ यांच्याकडेच..! ही माणसचं लई भारी आहेत..! जेंव्हा कधी केस कर्तन करायचं असेल तेंव्हा औरंगाबाद हुन लासूर स्टेशन येथे राजू भाऊ तुपे यांना सुट्टीच्या दिवशी फोन करतो अन् मग जातो. मात्र जातो थेट औरंगाबादहून लासूर स्टेशन येथील राजू भाऊंच्या हेयर कटिंग सलून मध्येच..! माझे वयोवृध्द तीर्थरूप वडील (वय वर्ष ८३) देखील औरंगाबाद हुन खास कटिंग साठी लासूर स्टेशन येथील आदरणीय राजू भाऊ तुपे यांच्याकडेच जातात. मी औरंगाबाद येथे राहायला आल्यावर, एकदाच असं वाटलं की, औरंगाबाद शहरातील एखाद्या भारी चकपक असलेल्या सलून मध्ये जाऊन कटिंग करून यावं असं ठरवलं. एकदम पाँश हेयर कटिंग सलून मध्ये गेलो,पण राजू भाऊ यांची सर काही आलीच नाही.लगेच येणाऱ्या रविवारी लासूर स्टेशन येथे गेलो अन् राजू भाऊ यांच्या कडून पुन्हा कटिंग करून घेतली. आदरणीय राजू भाऊ तुपे यांच्यात वैचारिक प्रगल्भता आहे.त्यांच्या बरोबर सामाजिक,राजकीय इ.विषयांवर चर्चा करण्यात आम्हा दोघांनाही खूप मनस्वी आनंद वाटतो.खूप प्रेमळ माणूस..!
आमच्या तीर्थरूप वडिलांचा स्वभाव प्रचंड तत्वनिष्ठ..! अतिशय करारी व्यक्तिमत्व..! त्यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या मोजक्याच माणसांची योग्य व्यक्ती म्हणून निवड केली ती खरंच योग्य होती. मी लासूर स्टेशन येथे इ. स.२००२ साली स्थायिक झालो. तेंव्हापासून ते आजतागायत माझ्या वडिलांनी आदरणीय राजू भाऊ तुपे यांच्या हातातील केस कर्तन कौशल्यावर खूप विश्वास ठेवला. मी जेंव्हा कधी लासूर स्टेशन येथे जातो तेंव्हा माझ्या वडिलांच्या तब्येतीची नक्कीच विचारपूस करतात.
राजू भाऊ, यांच्या केस कर्तन कौशल्याचं मला वैयक्तिक खूप आवडलेलं कौशल्य म्हणजे..डोक्याची मालिश अन् हळूच मान फिरवून देणे. निव्वळ अप्रतिम..! या बाबतीत आदरणीय राजू भाऊ यांचे कौशल्य अद्वितीय आहे. आमच्या वडिलांची चप्पल दुरुस्ती करणारे जे काका आहेत, ते रविवारी लासूर स्टेशन येथील बाजारात येतात,त्यांच्याच कडे चप्पल दुरुस्ती करायचे काम करतात..तेही तब्बल साठ वर्षापासून...! आता त्या काकांची दुसरी पिढी या सेवत आहे,पण माझे वडील आजही चप्पलचे काहीही काम असो,औरंगाबाद हुन रविवारच्या बाजाराच्या दिवशी त्यांच्याकडेच जातात.
मी एकदाच माझ्या वडिलांना म्हणालो होतो की,
" येथून ,औरंगाबाद शहरातून चप्पल दुरुस्ती करून आणतो..!"
तर यावर माझ्या वडिलांनी दिलेले उत्तर मनाला खूप भावले होते. माझे वडील म्हणाले होते की,
" कोणत्याही एकाच चांगल्या ठिकाणी विश्वास ठेवावा. माणसानं जिथं विचार जुळतात तिथं कायम एकनिष्ठ राहावं.उगीचच इकडं तिकडं हिंडण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळं प्रेम वाढतं..!"
त्यांचं म्हणणं माझ्या दृष्टीने योग्य होते.
माझं तेच खरं अन् तुमचं ते खोटं अशी संकुचित विचारधारा राजू भाऊंची नाही.राजू भाऊंशी कोणत्याही विषयावर चर्चा करत असताना वैचारिक प्रगल्भतेचा निख्खळ आनंद घेता येतो.समर्पक शब्दात अन् जाणीवा जागृत ठेवून चर्चा करण्याचा बौद्धिक आनंद वेगळाच असतो.याचा अनुभव राजू भाऊ सोबत नेहमी येतो. राजू भाऊंनी बालपणाच्या वयोगटात असल्यापासून परंपरागत व्यवसाय करायला सुरुवात केली. बऱ्याच जणांच आयुष्य सामाजिक, आर्थिक परिस्थितीमुळे , कौटुंबिक जबाबदारीमूळे आपलं बालपण, पौगंडावस्थेतील आयुष्य कौटुंबिक जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जातं. आदरणीय राजू भाऊंचे देखील असेच झाले. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत राजू भाऊ आज रोजी आपल्या आयुष्यात समाधानी आहेत. राजू भाऊ सारखी माणसं माझ्यासाठी कुटुंबातील जेष्ठ मार्गदर्शक आहेत. त्याचं कारण, त्यांच्या सोबत आयुष्याच्या मार्गावरून जात असतानाची अनुभवाची शिदोरी आहे.
सध्या कोरोना आजारामूळे सगळं मार्केट बंद पडलेले आहे.माझ्या डोक्याचं नुसतं ओझं झालं आहे. लासूर स्टेशन येथे जाणे देखील शक्य नाही.
करावं तर काय करावं..? हा एकच सवाल आहे..! का घरच्या घरी डोकं घ्यावं भादरून,अन् लाचार होऊन पहावं स्वतःच स्वतःच्या थोबाडाला आरशात..! जगातल्या पुरुषी सौंदर्याला फेकून द्यावं त्या काळ्याशार डोहात..! अन् एकटक पाहत रहावं स्वतःला आरशात....शून्य नजरेने..! हे विधात्या तू इतका निष्ठूर कसा रे असू शकतो..? माझ्या सारख्या असंख्य एकनिष्ठ असणाऱ्यांना तू ही शिक्षा का म्हणून देत आहेस..? आम्ही आमची निष्ठा ,मग ती कोणत्याही बाबतीत असू दे, ती कधीही बदलली नाही..! आम्ही आमच्या निष्ठेशी कधीही प्रतारणा केली नाही..! मग हे दयाघना...! तू कधी यातून मार्ग काढशील ..?
असो,
जेंव्हा कोरोना आजारामुळे लागू असलेले लॉक डाऊन संपेल तेंव्हा पाहिलं,आदरणीय राजू भाऊ तुपे यांच्या प्रेमळ हाताच्या कौशल्याची अनुभूती घ्यायला लासूर स्टेशन येथे नक्की जाईल. तो पर्यंत घरच्या घरीच कधी थोरला मुलगा चि.नमनकडून तर कधी पत्नीकडून केशकर्तन करून घेत आहे.😊🙏
ता.क. - आदरणीय राजू भाऊ तुपे व माझा सदरील फोटो राजू भाऊ यांच्या लासूर स्टेशन येथील केशकर्तन दुकानातील आहे.
वंदे मातरम्...!
राजू भाऊंच्या कौशल्यावर फिदा असलेला लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: ५ एप्रिल २०२०,रविवार.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा