आमचे गाव आमची माणसं..!
"आमचा एक असाही कर्णधार, बबन जाधव.!" 😊
===========================
इ. स.१९९४-९५ चा कालखंड होता.आमच्या पालखेड ता.वैजापूर गावात तेंव्हा आम्हा सर्व मित्रांच्या अंगात क्रिकेटचा ज्वर जरा जास्तच फणफण करत होता. तसे पाहिले तर त्यापूर्वीही अन् आताही आमचे गाव, नाट्यकला अन् क्रिकेट यात नेहमी अग्रेसर होतेच अन् आहे..! याच दोन्ही कलागुणांचा ज्वर आम्ही आमच्या पिढीत देखील याची देही याचि डोळा पाहिला अन् अनुभवलेला सुध्दा आहे..!
वरील उल्लेखित कालखंडात आम्ही मित्र शिक्षण घेऊन गावाच्या वरील उल्लेखित कलागुणांना अधून मधून जशी जमेल तशी वाव देत असायचो..! यापैकीच एक ज्वर आमच्या सर्वांगात लई फणफण करत असायचा,अन् तो म्हणजे क्रिकेट...! आम्हाला क्रिकेट खेळायची लई मोक्कार हौस..! त्या हौशेपाई आम्ही,पेशवेकालीन जे अतिशय पडझड झालेले वाडे आमच्या गल्लीत होते,तेथील लाकडी फळ्या सभ्य भाषेत सांगायचे म्हणजे काढून आणायचो अन् असभ्य भाषेत सांगायचे म्हणजे चोरुन आणायचो अन् त्याच्यापासून बँट तयार करायचो..!आम्ही करत असलेली ही कृती शुद्ध चोरी असायची पण..हौस कांदे अन् लसूण खाते म्हंटल्यावर..तिथं बाकी कशाचाही वास येत नसतो.. असच काहीतरी होतं..! त्यातल्या त्यात आमच्या आयुष्याचा पौगंडास्थेतील उत्तरार्ध सुरू असल्याने या गोष्टी खेळाच्या नावाखाली सुरू होत्या..! 😊 आमच्या क्रिकेट संघातील सर्वजण सर्व सामान्य परिवारातील होते.त्यावेळी आमच्या क्रिकेट संघाचा कर्णधार होता बाळु माळी..! आज तो जिल्हा परिषद जालना अंतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.आमच्या सर्व क्रिकेट खेळाडू मध्ये बाळु माळी याच्या अंगात क्रिकेटचा ज्वर जरा जास्तच चढलेला असायचा..!
त्याकाळी आमच्या पालखेड गावाच्या परिसरात १० ते १५ कि.मी.अंतरावर असलेल्या लासुरगाव, ता.वैजापूर येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.ती बातमी बाळु माळीच्या कानावर आली.बाळु माळी लगेच कामाला लागला.गावातील त्याचा विखुरलेला संघ गोळा करायला त्याने सुरुवात केली.सर्व खेळाडू पारेश्वर् मंदिर गल्लीत एकत्र जमलो, तिथं जमल्यावर बाळु माळीने आम्हाला लासूरगाव येथील क्रिकेट स्पर्धेविषयी सांगितले अन् आपण त्यात कोणत्याही परिस्थितीत सहभागी व्हायचे असे सांगितले..!
त्याकाळी पालखेड,दहेगाव मार्गे लासूरगाव रस्ता अतिशय खराब होता.बाळु माळी याने क्रिकेट स्पर्धेत सहभागी व्हायचे नक्की केले होते.पण ,पालखेडहुन लासुरगावला जाण्याची समस्या निर्माण झाली.जायचे तर नक्की,पण...एवढ्या सगळ्यांनी जायचे कसे..? हा प्रश्न उभा राहिला.त्याकाळी आम्ही घरच्यांना पैसे मागायची हिम्मत करत नव्हतो.आज माझी मुलं किंवा माझ्या समकालीन मित्रांची मुलं आमच्याकडून सहज पैसे मिळवून घेतात तो भाग वेगळा..! याचे कारण बहुदा आजच्या पिढीला त्यांच्या बापाच्या पैश्याची जाणीव नसेल कदाचित..!
असो,आमच्या पुढे लासुरगावला एवढ्यांनी कसं जायचं हा लई गंभीर प्रश्न उभा राहिला,पण आम्ही पर्याय काढायला लई पटाईत होतो.
त्याकाळी आमच्या पालखेड गावात बबन जाधव याचे लाँड्रीचे दुकान बऱ्यापैकी प्रगतीपथावर होते.हा बबन कपडे धुवून, इस्री करून प्रत्येकाच्या घरपोच सेवा पुरविण्याचे काम खूप चांगल्या प्रकारे करायचा.या व्यवसायामुळे त्याच्या हाती दररोज खेळता पैसा असायचा.बबन जाधव याला क्रिकेट खेळायची लई हौस..! पण त्याच्या वयाच्या कारणामुळे त्याच्यात पाहिजे तेवढी चपळता नव्हती अन् मुळात खरं सांगायचं झालं तर तो पाहिजे तेवढा चांगला खेळत पण नव्हता..! मात्र खेळायची हौस लई होती.आम्ही सर्व मित्रांनी बबन च्या या हौशेचा " उपयोग " करून घेण्याचे ठरवले,कारण आमच्याकडे लासुरगावला जाण्यासाठी जी जीप भाड्याने लावायची होती,तिच्या भाड्याचे पैसे आमच्याकडे नव्हते अन् बबन जाधव कडे पैसे असल्याने अन् त्याला क्रिकेट खेळायची मोक्कार हौस असल्याने ,त्याच्या त्या हौशेचा फायदा करून घ्यायचे ठरवले अन् आम्ही त्याची भेट घ्यायची ठरवले.
आम्ही बबन जाधव कडे जाण्यापूर्वी सर्वानुमते असे ठरवले की,आपण सर्वांनी आपल्या गरजेपोटी याला आपल्या क्रिकेट संघात घायचे अन् एकदा का आपण लासुरगावला पोहोचलो की,बबनलाच ऐनवेळी संघातून बाहेर काढायचे..! म्हणजे डायरेक्ट कॅप्टनलाच टिममधून काढायचे ठरवले..! 😊 अर्थात बबनला ऐनवेळी संघातून काढल्यावर तो काय आमची आरती करणार नव्हता..! तो सामना संपल्यावर येताना ,त्यानं भाडे दिलेल्या जीप मध्ये आम्हाला लासुरगावाहुन पालखेडला येऊ देणार नव्हता..! म्हणून आम्ही दुसरा ' प्लॅन बी ' तयार केला होता तो असा की,मॅच संपल्यावर लासूर स्टेशन येथे पायी जायचे अन् तिथून रेल्वेने बिन तिकटी प्रवास करून परसोड्याला उतरून तिथून पायी घरी पालखेडला यायचे..! असा आमचा येतानाचा प्लॅन बी तयार केला होता.
सर्वानुमते ठरल्यावर आम्ही बबन जाधव याच्या लाँड्री दुकानात गेलो. हे त्याचं दुकान विजू गायकवाडच्या घराच्या शेजारीच होते. तिथं बबन कपड्यांना इस्त्री करतच होता.आमच्या वतीने आमचा खरा कर्णधार बाळु माळी हाच बबन जाधव याच्याशी बोलणार होता,आम्ही बाकीचे फक्त री ओढणार होतो.आम्ही तिथं गेल्यावर बाळु माळीने बबन जाधवला , लासुरगाव येथील क्रिकेट स्पर्धेविषयी अन् तिथं जाण्याच्या समस्येविषयी सविस्तर सांगितले.शेवटी बाळु माळी हा बबन जाधव याला म्हणाला की,
" बबन ,आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की,आमच्या क्रिकेट संघाचा तुला कँप्टन करायचे अन् लासूरगावला क्रिकेट मॅच खेळायला जायचे आहे..! तुला काय वाटतं...सांग बरं..?"
मुळात बबनला क्रिकेट खेळायची लई हौस अन् त्यात डायरेक्ट कँप्टन म्हणल्यावर बबन जाधव याने कपड्यांना इस्त्री करत असलेले काम बाजूला ठेवले अन् तो आमच्यात येऊन उभा राहिला..!😊थोडक्यात बबन आता निव्वळ हवेत गेला होता..!😊 सगळं कसं आमच्या नियोजनाप्रमाणे होत होते..!
बबन एकदम आनंदीत होऊन एखाद्या कर्णधारासारखं कमरेवर हात ठेवून पोज घेऊन म्हणाला -
" बरं..! माझी काहीच हरकत नाही, चला तर मग बाळाईत जाऊन प्रँक्टीस करू..!"
( आमच्या गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या मोकळ्या मैदानाला बाळाबाई म्हणतात...!)
बबन ची तयारी पाहून बाळू माळीला अजून उत्साह आला. बाळु त्याला म्हणाला-
" हे पहा बबन,आमच्याकडे लासुरगावला जाण्यासाठी जी, जीप भाड्याने लावायची आहे ना,तिच्या भाड्याचे पैसे आमच्याकडे नाही..! तू सगळं भाडं भरलं तरच तिथं जायला जमेल..! कारण आमच्याकडे जीपच्या भाड्या एवढे पैसे नाहीत...!"
बबनला एकतर खेळायची लई हौस अन् त्यात अजून डायरेक्ट कॅप्टन झाल्यामुळे तो लई मुड मध्ये आला होता.
यावर बबन जाधव लगेच म्हणाला-
" भाड्याचं तुम्ही बिलकुल टेंशन घेऊ नका..! मी हाये ना..! मी भरतो सगळं जीपचे भाडे..!"
सगळं आमच्या प्लॅन नुसार घडत होते,मात्र माझ्या मनात लासूरगावला पोहोचल्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांचे सचित्र बोलपट नजरेसमोर अगोदरच येत होता..!😊 रघु मामांची जीप भाड्याने लावली. जीपचे भाड्याचे पैसे अगोदरच बबन कडून रघु मामांना दिले,कारण नंतर पैसे मिळण्याची शक्यता अजिबात नव्हती..!😊 आम्ही लासूरगाव येथे पोहोचलो.आमची मॅच ,आज जिथं जिल्हा परिषद हायस्कूल ची इमारत आहे,त्याच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानावर होणार होती.आम्ही तिथं पोहोचलो.आता सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या कामा पुरत्या कर्णधाराला कसं सांगायचं की, " तुलाच टीममधून काढायचे आहे..!"
अखेर आमचा जो खरा कर्णधार होता, बाळु माळी,हाच बबनला बाजूला घेऊन गेला अन् त्याला म्हणाला....
" बबन,ही टीम लई तगडी आहे,तू एवढा काही खास खेळत नाही.त्यामुळं तुला टीम मध्ये घेता येणार नाही..!"
हे ऐकल्या बरोबर, बबन रागाने लालबुंद झाला अन् घाईघाईत आम्हा सगळ्यांकडे येऊन विविध प्राण्यांचा उध्दार करून मोठमोठ्याने आवाज करून उध्दार करायला सुरुवात केली..!मात्र आम्ही त्याला काहीच प्रत्युत्तर द्यायचे नाही असेच ठरले असल्याने आम्ही सर्वजण मौन पाळून राहिलो.आमच्यावर ,बबन ओरड..ओरड..ओरडला..! प्रिय बबन याला कर्णधार करायचे ऐनवेळी रद्द केल्याने आता तो आमच्या विरूद्ध टीमच्या बाजूने घोषणा देण्यासाठी त्यांच्या उघड्यावरील पव्हेलियन मध्ये गेला होता..!
आमच्या क्रिकेट संघातील ही भानगड विरुद्ध संघातील खेळाडूंना माहीत नव्हती. आमच्या क्रिकेट संघात कृष्णा रोठे , भानू मामा जगदाळे इत्यादी होते. मॅच सुरू झाली होती.लासूरगाव क्रिकेट संघात प्रवीण सोनवणे, सचिन आब्बड सारखे तगडे खेळाडू होते.पाहिली फलंदाजी लासूरगाव संघाची होती.बबन लासूरगावच्या समर्थकांच्या मध्ये जाऊन बसला होता.जेंव्हा जेंव्हा लासूरगाव क्रिकेट संघातील खेळाडू चौका,छक्का, एक, दोन, तीन रन काढायचे तेंव्हा तेंव्हा बबन त्यांच्या बाजूने ओरडायचा अन् आमच्या नावाने हुर्रे करायचा..!😊 असंच जेंव्हा आमची फलंदाजी सुरू झाली तेंव्हा, आमचा एखादा जरी फलंदाज बाद झाला की, बबन आनंदाने नुसत्या उड्या मारायचा..!
अखेर आम्ही मॅच हरलो..! बबनला अजून चेव आला अन् आमच्या समोर येऊन अजून नाचायला लागला. आम्हा सर्वांचे चेहरे पडले होते. आम्हाला आमच्या चुकीच्या नियोजनाचे ,चुकीच्या मार्गाने फळ मिळाले होते..! आम्ही सर्वजण एका बाजूला जाऊन खूप दुःखी होऊन बसलो होतो. बबन आमच्याकडे पाहतच होता.
अखेर खूप वेळा नंतर प्रिय बबनलाच आमची दया आली अन् आमच्याकडे येऊन म्हणाला...
" जाऊ द्या, जे झालं ते झालं..! आपण एकाच गावातले असल्याने मी तुम्हाला माफ करतो..! पण इथून पुढं तरी असं करू नका राव..!"
प्रिय बबनचा हा बदललेला पवित्रा पाहून आमच्याही सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता..! आम्ही सर्वांनी त्याची माफी मागितली..! आमच्या चुकीच्या वागण्याचं प्रायचित्त आम्हाला मिळाले होते,आम्ही सामना हरलो होतो..!आम्ही सर्वजण रघु मामाच्या जीप मध्ये बसून पालखेड येथे पोहोचलो..!
आम्ही दुसऱ्या गावी जाऊन , जो सामना खेळला होता,तो केवळ आमच्या चुकीच्या नियोजन कर्मामुळे जगातील एकमेव नियोजन केलेला क्रिकेट सामना होता..! अशा प्रकारे क्रिकेट विश्वात, कुणीही , कोणत्याही सामन्यासाठी नियोजन केले नसेल हे मात्र नक्की..!😊
आजही जेंव्हा जेंव्हा आमचा सदा सर्वदा महान कर्णधार बाळु माळी अन् प्रिय बबन जाधव याची भेट होते,त्यावेळी बबनच्या त्यावेळच्या तात्पुरत्या कॅप्टनशीप चा विषय आवर्जून निघतो..!😊 गतकाळातील त्या आठवणी आज आठवून मन टवटवीत होते..! आज बबन, बाळु , मी ,आम्ही पालखेड येथे राहत नाही,पण गावच्या यात्रेच्या वेळी जेंव्हा कधी भेट होते,तेंव्हा गतकाळातील या आठवणींना नक्कीच पुन्हा पुन्हा उजाळा नक्कीच मिळत असतो..!
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक : ११ जून २०२०, गुरुवार.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा