शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

" सोप्या भाषेचे महान लेखक आण्णाभाऊ साठे ..! "




चिंतन

" सोप्या भाषेचे महान लेखक आण्णाभाऊ साठे ..! "

====================================

सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत,सर्वसामान्यांचे नायक उभे करून महान साहित्य संपदा निर्माण करण्याचे कसब व असे साहित्य निर्माण करणारे लेखक माझ्या मते एकमेव ...आण्णाभाऊ साठे हेच असावे..!

आण्णांच्या प्रत्येक साहित्य संपदा मध्ये जे..जे नायक उभे केल्या गेले आहेत ते सर्व तळागाळातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत..!मग फकिरा या साहित्यातील फकिरा असो किंवा वारणेचा वाघ मधील नायक असो..!सगळे वंचित घटकातील लोकांचे नायक म्हणून तेही वास्तवाला सामोरे जाऊन उभे केल्या गेले आहेत.अन् ते उभे करण्याचे कसब कुणी केले तर ...फक्त एक ते दीड दिवस शाळेत गेलेल्या एका सर्वसामान्य माणसातील असामान्य लेखकाने..!आपल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी..!

कसं शक्य झाले हे...?
आपण पाहतो, पूर्वीही अन् आताही कित्येक लोकांनी अनेक औपचारिक शिक्षणाच्या पदव्या संपादन केल्या..!कुणी आपल्या समाजाच्या पाठिंब्याने..तर कुणी आपल्या जवळील धन संपत्तीच्या मदतीने..तर कुणी कवडीची अक्कल नसताना फक्त त्या शैक्षणिक संस्थेच्या वर्तुळातील नातेवाईकांचा जवळचा असल्याने..!या व्यतिरिक्त जे कुणी विद्वान ठरले ते नक्कीच वंदनीय ठरले होते,आहेत..अन् राहतील सुध्दा..!

पण... आण्णांच्या आयुष्यात तर असे काहीही नव्हते..!बालपण निव्वळ कोरडे वाळवंट. !असे वाळवंट..ज्यात मैलोदुर नुसता..अंधार होता..!
कशाचा अंधार..होता..?
दारिद्र्याचा अंधार..!
निरक्षर आयुष्याचा अंधार..!
निसर्गाच्या सुंदर अशा मानवाच्या जीवनात भेदाभेदीचा अंधार..!
उद्याच्या जेवणाच्या भ्रांतीचा अंधार..!
मूलभूत गरजांचा अंधार..!
आण्णांना व कुटुंबीयांना जाणवलेला भयानक जातीय विषमतेचा अंधार..!

अशा सगळ्या अंधार पसरविणाऱ्या काळया मनाच्या दृष्ट प्रवृत्तींना लढा देऊन..आण्णांनी आपले स्वतंत्र असे भावविश्व उभारले..!ही गोष्ट वाटते तेवढी सोपी अजिबात नव्हती..!अंधकारातून उषःकालाकडे वाटचाल केली ती एका अती सर्व सामान्य मुलाने..तरुणाने..पुरुषाने..! एक असामान्य माणूस होऊन..!

मी मागे मुंबईला सहपरिवार गेलो होतो.त्यावेळी तेथील आजच्या मराठीची..मराठी माणसाची जी वर्दळ दिसते..तिला जे लोकनायक निमित्त ठरले. त्यात प्र.के.अत्रे, शाहीर अमर शेख,स्व.बाळासाहेब ठाकरे ,आण्णाभाऊ साठे... इ. मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी आण्णांनी त्यांच्या आवडीच्या कलाक्षेत्रातील जनजागृती करून तत्कालीन मोरारजी देसाई यांना भंडावून सोडले होते.ते कला क्षेत्र होते..तमाशा..!याच तमाशातील विविध वगनाट्याद्वारे तत्कालीन यंत्रणेवर आसूड ओढले ते आण्णांच्या सिद्धहस्त लेखणीतून..!आण्णांनी असे काही तमाशातील वगनाट्य लिहिली की..अखेर मोरारजी देसाईंनी तमाशा या लोककलेवर बंदी आणली.पण भितील ते आण्णाभाऊ कसले..!आण्णांनी तमाशाचे नामांतर केले........
" लोकनाट्य " अन् उतरले पुन्हा मैदानात..!

आपल्या देशात एक फार मोठे दुर्दैव आहे की,जर एखाद्या असामान्य माणसाने जर यश मिळवले तर त्याला आपल्या बाजूने ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो.असा प्रयत्न पूर्वीही होता..अन् आताही..!आता सुज्ञ माणसांच्या लक्षात आले असेलच अशी ओढणारी पंचवार्षिक मंडळी कोण ती...?
वास्तविक अशी अनेक असामान्य माणसं ही कधीच कोणत्या विशिष्ट पंथाची,धर्माची,जातीची प्रतिनिधित्व करणारी नव्हती..!
ती त्यांच्या अंगी असलेल्या स्वतंत्र विचारसरणीच्या ,वंचित घटकातील लोकांसाठी लढणाऱ्या माणसांचे प्रतिनिधित्व करणारी महान मंडळी होती..!त्यात आण्णाभाऊ देखील आले..!

मी माझी जन्मभूमी पालखेड येथील माध्यमिक शालेय जीवनात असताना स्व.दौलत काका कुमावत हे त्यावेळी व्हिडिओ द्वारे चित्रपट दाखवायचे. त्यावेळी काकांकडे " वारणेचा वाघ " हा अती सुंदर मराठी चित्रपट पाहिला होता.त्यावेळी तो चित्रपट खूप आवडला होता.आण्णा भाऊ साठे यांच्या कथेवर आधारित तो चित्रपट होता..!प्रत्येकाने एकदा तरी हा चित्रपट पाहावाच..इतकी सुंदर व रोमांच उभे करणारी कथा या चित्रपटाची आहे..!
असो, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विषयी खूप काही व्यक्त करता येईल..पण थांबतो..!

आज थोर लेखक,शाहीर, आण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अतुलनीय कार्याला माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून विनम्र अभिवादन..!

वंदे मातरम्..!

ता.क.: कलेवर निस्सीम प्रेम करणारी माणसं एका विशिष्ट गटाची कधीच नसतात.तर..ती..त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माणसांची असतात..!
जसे आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे..!

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:१ ऑगस्ट २०१८

" कोवळ्या पानांची आर्त विनंती..! "










" चिंतन..!  "

" कोवळ्या पानांची आर्त विनंती..! "

=====================================
                                                       
 आज दिनांक १ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी लासूर स्टेशन ते लासूरगाव रस्त्याने नित्य नियमाच्या प्रभात फेरीहून येत असताना मागील वर्षी आम्ही लावलेल्या पिंपळाच्या झाडाचे एक देठ ,त्याच्या घरातून बाहेर डोकावत असलेले आढळले..!जसे एखादे लहान मुल अवखळ असते अगदी तसंच..! ते लहान मुल सतत घरातून मनसोक्त खेळण्यासाठी बाहेरच्या जगात डोकावत असते...!अगदी तसेच ते कोवळे पान त्याच्या घरातून बाहेर आलेले होते..!

 ते पान कोवळे,लुसलुशीत दिसत होते..!आजकाल कोवळ्याश्या अनेक सजीवांवर मोठमोठाली गिधाडे झडप घालून अत्याचार करतात..!त्या कोवळ्या सजीवांची पूर्ण वाढ देखील झालेली नसते..!पण ही गिधाडे,केवळ त्यांच्या हव्यासापोटी असल्या पिंपळाच्या पानासारख्या कोवळ्या वयातील सजीवांची लक्तरे चव्हाट्यावर टांगतात..!

आम्ही लावलेल्या या पिंपळाच्या झाडाच्या कोवळ्या पानांवर कुणी,एख्याद्या गिधाडासारखे तुटून पडू नये म्हणून ते कोवळे पान मला अार्त विनंती करत असलेले मला जाणवले..ते म्हणत असावे की....
" नंदन, अरे..मला पटकन संरक्षण दे..! मला लवकर माझ्या घरात सुरक्षितपणे पाठवून दे..!नसता या जगातील ,कोवळ्या पानांवर तुटून पडणारी गिधाडे माझे लचके तोटून,माझे आयुष्य उध्वस्त करतील..! मला आजकाल फार असुरक्षित वाटत आहे रे..!

कुणी माझी विक्री करील..याची भीती..!
कुणी माझ्या कोवळ्या रूपाला कुस्करून टाकील याची भीती..!
कुणी धन दांडगा येऊन माझी बोली लावील याची भीती..!
कुणी जाती,धर्माच्या आड लपून माझ्यावर अत्याचार करेल याची भीती..!
काही जणांना " कोवळा " हवा असतो,त्या हव्यासापोटी "कोवळी "  संपवण्याची भीती..!

माझ्या कुळातील मोठ्या लुसलुशीत पानांना देखील,फक्त प्रेमळ भावनेची गरज असते,पण त्यांचाही बऱ्याचदा भ्रम निरास होऊन ती मोठी लुसलुशीत पानं, रूदन करत असतात...एकांतात...! "

 मला कोवळ्या पानाची ही आर्त विनंती मनोमन जाणवली..!मी, लगेच घरी गेलो व ते कोवळे पान,कपड्याला छेडून जिथून बाहेर आले होते,तेथे कैचीने ,त्या पानाला घरात जाण्यासाठी छोटासा मार्ग तयार केला.. व त्या कोवळ्या पिंपळाच्या पानाला त्याच्या घरात सुरक्षितपणे पोहोच केले..!शेवटी त्या पिंपळाच्या झाडाच्या घराचे दरवाजे तारीच्या मदतीने बंद केले..!

ते कोवळे पान ,मला मंद स्मित देऊन
 " धन्यवाद, नंदन...! " असे भावनिक भाव व्यक्त करत असलेले जाणवले...! 
                         
ता.क.कोवळ्या पानांची काळजी घ्या..! मग ती आपली पण आलीच..!!
 
वंदे मातरम्.. !
                   
 लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

  https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
                                                           
 दि. १ ऑगस्ट २०१७,

" सोज्वळ मित्र - संदीप जगधने..! "













मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" सोज्वळ मित्र - संदीप जगधने..! "

=================================

मला आयुष्यातील प्रत्येक वळणावर अनेक मित्र भेटत गेले. मला भेटलेला प्रत्येक मित्र मला काहीतरी शिकवत गेला..! मग त्या भेटलेल्या मित्राचे ,मला शिकविणे कधी हितकारक होते तर कधी कधी अहितकारक..! मी जेंव्हा औरंगाबाद येथे स्थायिक झालो तेंव्हा इथे माझे अनेक बालमित्र स्थायिक होते.त्यामुळं अनौपचारिक नात्यातील मैत्री इथे होती की, ज्यांच्या जवळ ऐसपैस वागता येईल अशी...! याच काळात मी जन सहयोग सामाजिक संस्था औरंगाबाद बरोबर जोडल्या गेलो अन् औरंगाबाद शहराला वृक्षांनी सुशोभित करण्याचा दृढ संकल्प करणारी एक नाही तर...सर्वच समविचारी मित्र यात लाभली..! अर्थात त्या मैत्रीतील शिरोबिंदू होते प्रिय मित्र प्रशांत गिरे..! याच प्रशांत भाऊ गिरे यांची पडछाया ज्यांना म्हणता येईल असा एक खूप समजूतदार मित्र येथे लाभला..! त्या समजूतदार मित्राचे नाव संदीप भाऊ जगधने..!

लासूर स्टेशन येथे राहत असताना वृक्ष चळवळीशी निगडित होतो,त्यामुळं त्याच हौसे पोटी औरंगाबाद येथील जन सहयोग परिवार औरंगाबादशी जोडल्या गेलो.जन सहयोग परिवार मधील सर्व सदस्य मला अगदी निगर्वी अन् कोणताही अभिमान न बाळगणारी जाणवली त्यामुळं त्यांच्याशी नुकतेच सुरू झालेले औपचारिक नाते कधी अनौपचारिक नात्यात परावर्तित झाले हे समजलेच नाही..!

संदीप जगधने..!

अतिशय चपळ अन् जन सहयोग परिवारातील कोणत्याही कामाच्या बाबतीत नेहमी पुढे असणारा मित्र..! गोलवाडी फाटा सैनिकी क्षेत्र, छावणी डंपिंग ग्राऊंडवर आज जी जवळ जवळ दहा हजार देशी वृक्षांची वनराई मोठ्या डौलाने डोलत आहे, त्या बहारदार कामाच्या मेहनतीत संदीप भाऊंचे खूप मोठे योगदान आहे..! आम्ही जन सहयोग परिवार औरंगाबाद अंतर्गत सदस्यांनी शेळी मेंढी प्रक्षेत्र पडेगाव दौलताबाद रोड औरंगाबाद येथील तब्बल वीस एकर परिसरातील जवळजवळ पंधरा हजार देशी वृक्षांचे रोपण करून त्यांचे योग्यरीत्या संवर्धन करत आहोत.त्याही ठिकाणी संदीप भाऊंचे खूप मोठे योगदान आहे..!

संदीप भाऊंचा स्वभाव काहीसा मृदू मुलायम..!अर्थात समोरचा मित्र जर बहरात आला तर तोच मृदू मुलायम स्वभाव खेळकर अन् प्रेमळ खोडकर देखील होतो..! आम्ही काही महिन्यापूर्वी कन्नड तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात गौताळा अभयारण्यात जिवंत असलेल्या आयुष्याचा आनंद घ्यायला गेलो होतो. तिथं संदीप भाऊंनी अशी काही उडी मारली की, त्या उडीची अप्रतिम क्लिक त्यांच्याकडे निव्वळ संग्रही आहे..! जो जिता वही सिकंदर या चित्रपटात अमिरखान या अभिनेत्याने अशीच अफलातून उडी मारलेली आहे..!😊

मी ज्यावेळी यांच्या सोबत असतो त्यावेळी प्रशांत गिरे अन् संदीप जगधने यांच्यातील निस्सीम मैत्रीला पाहून खूप सुखावून जातो..! यांच्यातील ही मैत्री पाहून मला माझ्या बालमित्रांची  प्रकर्षाने आठवण येते..! ज्यावेळी प्रशांत भाऊ यांच्या तीर्थरूप वडिलांचे निधन झाले त्यावेळी शरीराने अन् अंतर्मणाने खूप धावपळ करणारा प्रशांत भाऊंचा जिवलग बालमित्र मी पहिला तो संदीप भाऊ..! आपण ज्या ज्या वेळी संदीप भाऊ यांच्याशी बोलतो त्या त्यावेळी त्यांच्या मुखातून निघालेला " अच्छा..!" हा शब्द त्यांच्या बोलण्याची ओळख देऊन जातो..! 

ज्या ज्यावेळी आम्ही छावणी येथे कधी कधी रात्री निवांत भेटत असतो त्या त्यावेळी एकमेकांच्या आयुष्यातील सर्व भाव भावनांना मनमोकळे व्यक्त करत असतो..! ज्यावेळी आपण एखाद्या मित्राच्या जवळ आयुष्यातील सर्व भाव भावनांना वाट मोकळी करून देतो तेंव्हा समजून घ्या की, तुमची मैत्री ही, भली प्रौढ वयात एकमेकांना भेटली असेल,पण त्याच प्रौढ वयात भेटलेल्या मैत्रीच्या मुळाशी बालमैत्रीचा सुगंध दरवळत असतो..! जसा संदीप  जगधने आणि प्रशांत गिरे यांच्यातील नात्यात अन् त्यांच्या जवळ आपण व्यक्त होतो त्या नात्यात...!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक : ३१/७/२०२०, शुक्रवार

गुरुवार, ३० जुलै, २०२०

" मनमोकळा प्रिय मित्र आमचा विजू...! "☺





" मला प्रवासात भेटलेली माणसं..!"

" मनमोकळा प्रिय मित्र आमचा विजू...! "☺

==================================

माझा अतिशय मनमोकळ्या स्वभावाचा डी.एड. चा जिवलग मित्र विजय कालभिले पाटील. मूळ राहणार,नाटवी,ता.सिल्लोड, ह.मू.औरंगाबाद

विजू ने व मी आमच्यातील पौगंडावस्थेतील मित्राला व मैत्रीला अजिबात मरू दिलेले नाही..! आमच्या प्रत्यक्ष भेटीतील किंवा वैयक्तिक ऑनलाईन संपर्कात आमची तीच पौगंडावस्थेतील मैत्री नेहमी जिवंत होत असते..!आमच्यातील भेटीने आमचे काही मित्रही आनंदीत होत असतात..आमच्या आनंदात तेही हिस्सेदारी मिळवत असतात..!पण तेही मोजकेच आहेत बरं का..!😂
कारण बऱ्याच जणांना बहुदा असे वाटते की, आम्ही आता प्रौढ झालो आहोत,आपण शिक्षक आहोत वगैरे..इत्यादी मानसिकतेतून अजूनही बाहेर पडलेले नाही..!

माझे तर प्रांजळ मत आहे की,प्रत्येक माणसाने  त्याच्या विशिष्ट चाकोरीबद्ध आयुष्यात असे काही जिवलग मित्र नक्कीच मिळवायला हवेत...जिथे आपण अंतर्मनातील भाव व्यक्त करू शकतो..! अनौपचारिकपणे वर्तन करू शकतो..! मात्र असे वर्तन समाजाला अहित पोहोचविणारे कदापि नसावे..!त्यावेळी तिथे फक्त आणि फक्त ती निरागस मैत्री व त्यात सहभागी ते मनमोकळे मित्रच असतील..!

उठसुठ नेहमी..नेहमी..तेच..ते..चाकोरीबद्ध जीवन..त्यातील भेटलेले "औपचारिक वर्तन करणारे " मित्र व त्यांची मैत्री..यामुळे माणूस मनोरुग्ण होऊ शकतो..व त्याचे अख्खे आयुष्य औपचारिक बनून जाते..!

अर्थात आमच्या सारखी अशी मैत्री मिळवायला ती खूप जुनी व एकमेकांचा इतिहास ,भूगोल माहीत असेल तरच अशा मैत्रीला बहर येतो..! उगीचच अचानक भेटलेल्या मित्रात अशी मैत्री बहरू शकत नाही..!यदा कदाचित जरी बहरली तरी..त्यात गैरसमज देखील होऊ शकतात..! अशा अचानक भेटलेल्या मित्रात अशीच आघळ.. पघळ, अनौपचारिक मैत्री निर्माण व्हायला काही कालावधी जाऊ द्यावा लागतो तेंव्हाच त्या नात्यात समज निर्माण होतो..!

म्हणून आमच्या सारखी अशी मैत्री करताना जरा जपून..!

वंदे मातरम्..!

मनमोकळ्या विजुचा मित्र : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

छायाचित्र दिनांक: ११ जून २०१८
आणि माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक : २/७/२०१८
स्थळ :औरंगाबाद

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

चिंतन " जिवंत उग्र अभिनय कला..! "




चिंतन

" जिवंत  उग्र अभिनय कला..! "

===================================

फक्त भांडणाची ही उग्र कला लुप्त होत चालली आहे..! आजकाल डायरेक्ट ढीश्यूम..ढीश्यूम ही उग्र जिवंत अभिनय कला पाहण्यास मिळते..!😊   बऱ्याच ठिकाणी  कोणे एकेकाळी ह्या कला विशेषकरून  एकाच समलिंगी किंवा भिन्नलिंगी समूहात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत असे..!😊 या लुप्त होत चाललेल्या किंवा झालेल्या किंवा होणाऱ्या कलेत    " मराठी गावरान शिवी वाड्मयीन " क्षेत्रातील अनेक परिचित,अपरिचित अनेक अर्थाकारिता एकच समर्पक शब्दांचा वापर केला जात असे..! अशावेळी अभिनयातील विविध हावभाव जिवंत स्वरूपात पाहायला मिळत असे..! या कलेत सहभागी खरोखरचे कलाकार,जीव तोडून अभिनय करून,माझ्यासारख्या दुरून नयनरम्य आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकाचे  खूप मनोरंजन करत असे..! म्हणतात ना..." तीन पैशात फुकटात तमाशा..!" अगदी असाच आनंद , शांतप्रेमी प्रेक्षक मोफत लुटत असे..!😂

अशा प्रकारचे भांडण करणाऱ्यांच्या अंगात चिंगारी किंवा वीरश्री संचारलेली असल्याने अशी माणसं भांडणाच्या वेळी जगातील सर्वात बलवान व्यक्तीच्या आविर्भावात असतात. भले अशी माणसं काडीमोडीचे समलिंगी किंवा भिन्नलिंगी प्राणी का असेनात..!😊 आजही काही ठिकाणी भांडणाची ही दुर्मिळ कला पहावयास मिळते..!
विशेष करून सार्वजनिक पाणवठ्यावर..!

बऱ्याचदा काही समंजस गृहस्थ ह्या कलेत, म्हणजेच या भांडण कलेत विघ्न निर्माण करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करत असतात..! अर्थात हे विघ्न म्हणजे संबंधितांचे भांडण सोडविण्यासाठी जात असतात. त्यावेळी बऱ्याचदा अशा समंजस माणसांना यश मिळेलच याची हमी देता येत नाही..! कधी कधी तर अशाच समंजस माणसांना फुकटचा प्रसाद यथेच्छ धुलाई करून मिळाल्याची भूतकाळात अनेक उदाहरणे होऊन गेलेली आहेत..!😊 अशा भांडण सोडविणाऱ्या समंजस लोकांना अशा प्रत्यक्ष घडलेल्या काही प्रसंगांना लेखकाने ,प्रत्यक्ष दुरून पाहिलेले असल्याने तेंव्हापासून सदरील लेखक अशा भांडण कलेला न थांबवता दुरून नयनरम्य आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकाच्या भूमिकेत असतो..!

या लुप्त होत चाललेल्या कलेतील कलाकार,अभिनय करतांना , करपल्लवी, नेत्रपल्लवी, शिरपल्लवी, इ.अनेक पल्लवींद्वारे माझ्या सारख्या  दुरून नयनरम्य आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांचे   मस्तपैकी मनोरंजन करत असतो..! या कलेत मौन अभिनयाला बंदी असते..!  😊 कधी..कधी या लुप्त होत चाललेल्या कलेतील कलाकारांमध्ये कृतीयुक्त अभिनय होऊन त्याचे रूपांतर  ढीश्यूम..ढीश्यूम  या प्रत्यक्ष स्पर्शेच्या अभिनयातून अफलातून अदाकारीने दिसून येत असतो..!😂

आजच्या अगदी अलीकडच्या नवीन पिढीला  हे " मराठी गावरान शिवी वाड्मयीन साहित्य " तसे अपरिचित ..! इतिहासात बऱ्याच चांगल्या-वाईट गोष्टी दडलेल्या आहेत..!कधी..कधी त्या दिसतात,तर कधी..कधी अशा प्रकारे आंतरजालावर उपलब्ध असतात..! त्याचा आनंद तर नाही पण भूतकाळात पाहिलेल्या या अती दुर्मिळ " मराठी गावरान शिवी वाड्मयीन साहित्याच्या " स्मृती जाग्या होऊन होतात..! 

ता.क. : कुणीही,कुणालाही,कोणत्याही असभ्य शिव्या देऊ नये अन् असभ्य भांडणेही करू नये..! सगळं कसं सभ्यपणे आटोपून घ्यावे..! 😊🙏
वरील लेख प्रपंच फक्त जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अहिंसावादी भूमिकेतून लिहिला आहे..!😄🙏

वंदे मातरम्..!

भांडण सोडविणाऱ्या समंजस लोकांना  झालेल्या नाहक त्रासामुळे वरील भांडण कलेचे दुरून नयनरम्य आस्वाद घेणारा लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक : २४ जुलै २०२०, शुक्रवार,

रविवार, १९ जुलै, २०२०

" सर,चहा घ्या ना..!"



मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" सर,चहा घ्या ना..!"
======================================

आज दिनांक २० जुलै २०१९ रोजी सकाळी एक शिक्षक,काही महत्त्वाच्या कामासाठी गावात गेले होते.त्यांचे काम करण्यासाठी ते शिक्षक,खूप माणसांची वर्दळ असलेल्या एका चहाच्या दुकानात जाऊन बसले..! सदरील शिक्षक चहा पीत नाही पण, कामानिमित्त तिथं जावं लागलं होतं..!

तिथं, त्याच शिक्षकाच्या माध्यमिक शाळेतील, प्राथमिक वर्गातील एक विद्यार्थी चहा पीत होता.सदरील शिक्षकाचे त्या मुलाकडे लक्ष गेले.तो मस्तपैकी एकटाच चहा पीत होता.इतक्यात त्या प्राथमिक वर्गातील मुलाचे लक्ष सदरील शिक्षकाकडे गेले.तो मुलगा लगेच म्हणाला...
" सर,चहा घ्या ना..!"
शिक्षक: " का..रे..शाळा सोडून,तू इकडे चहा पीत बसला आहेस..! शाळेत जा..!"
तो मुलगा  सहजपणे म्हणाला : " हा...सर...लगीच जातो..! तुम्ही नाही घेत मग चहा..?"
ते शिक्षक ," शिक्षणाचा मूलभूत  हक्क कायदा अंतर्गत मुलांना अजिबात शिक्षा करू नये या कलमामूळे " , त्या मुलाकडे  फक्त शून्य नजरेनं पाहू लागले.त्या मुलाला  सदरील शिक्षकाच्या शून्य नजरेचा अंदाज आला.तो लगेच पटपट चहा पिऊन निघून गेला.

सदरील शिक्षक तेंव्हापासून ते.... त्या मुलाच्या पालकाची भेट होई पर्यंत याच विचारात पडले आहे की,
" एवढ्या लहान वयात  मुलांनी ,हॉटेल मध्ये जाऊन चहा पिणे योग्य आहे का..?
अशा मुलांना पैसे कोण देतं..? किंवा अशा मुलांजवळ पैसे कसे काय येतात..?अशाने मौजमजा करण्याच्या सवयी लवकर लागत तर नाही ना..? इ. अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत..!

ता.क.; येत्या सोमवारी सदरील शिक्षक, त्या मुलाच्या पालकाची प्रत्यक्ष भेट घेऊन यावर प्रेमळ वातावरणात अनौपचारिक चर्चा करून  उद्बोधन करणार आहे..! तसेच शाळेत देखील काही वर्गात यावर प्रेमळ वातावरणात अनौपचारिक वातावरणात त्या मुलाचा अजिबात उल्लेख न करता उद्बोधन करणार आहेत..!

वंदे मातरम्..!

लेखक: सदरील शिक्षक..!

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २० जुलै २०१९, शनिवार.

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

चिंतन " थोर साहित्यिक आण्णाभाऊ साठे..! "




चिंतन
                                                   
" थोर साहित्यिक आण्णाभाऊ साठे..! "

====================================

ज्ञान ,बुद्धिमत्ता याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ..!नाममात्र शिक्षण,परंतु दुनियादारीनेअसे काही  शिक्षण दिले की,अण्णाभाऊ थोर साहित्यिक या बिरुदावलीने समग्र साहित्य विश्वात आजही  आदराने ओळखले जातात..! संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले..!आपल्या डफावरील थापेने मुंबई महाराष्ट्रात राहू देण्यात अण्णाभाऊंचे योगदान महाराष्ट्र कदापि विसरणार नाही..!

त्यांचे साहित्य म्हणजे सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्त्व करणारे व अंतर्मनाला भिडणारे..!त्यांची "फकिरा" व " वारणेचा वाघ"या कादंबऱ्या तर वाचकाच्या भावविश्वाला हिंदळून टाकतात..!

मी वारणेचा वाघ या कादंबरीवरीर चित्रपट  माध्यमिक शाळेत असतानाच पालखेड येथे स्व.दौलतकाका कुमावत यांच्या व्हिडिओ थियेटर मध्ये पाहिला आहे.
कथा,कादंबरी,पोवाडे,प्रवासवर्णने इ.साहित्य विश्वातील सर्व क्षेत्रात भाऊंनी मुसाफिरी केली..अन् साहित्य रसिकांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतले..!

कदाचित औपचारिक शिक्षणामुळे माणूस पूर्णपणे दुनियादारीचे शिक्षण नाही घेऊ शकत.मात्र  परिस्थिती अन् परिसर माणसाला सर्वात जास्त साक्षर करून दुनियादारीच्या शिक्षणात साक्षर करत असतो..! दुनियादारीच्या शिक्षणातून माणसाच्या आयुष्यात जी साक्षरता येते,ती आयुष्याला योग्य दिशा दाखवते अन् त्यातूनच मनातील भावना बऱ्याचदा व्यक्त होत असतात.याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे होय..! आण्णाभाऊंनी जे जे आपल्या साहित्यात लिहिलं, ते ते त्यांच्या अंतर्मनातील वेदना व्यक्त होत होत्या..! ते त्यांनी अनुभवलेलं होतं..! मुंबईसारख्या ठिकाणी अतिशय सर्व सामान्य परिसरात,परिस्थितीत आण्णाभाऊंनी ज्या ज्या वेदना सोसल्या,त्याच त्यांनी आपल्या बहुतांशी साहित्यातून ,त्यातील व्यक्तिरेखांच्या माध्यमातून व्यक्त केल्या..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रचंड प्रभाव होता. दोन्ही वंदनीय व्यक्तींच्या सामाजिक संवेदना सारख्याच होत्या ते त्यांच्यातील एकासुत्रतेचे कारण होते.वंचित समाजातील समाजमनाच्या व्यथा या दोन्ही वंदनीय राष्ट्रपुरुषांनी आपापल्या साहित्यातून व्यक्त केल्या.आण्णाभाऊ साठे यांची ' फकिरा ' कादंबरी तर ,आण्णाभाऊंच्या अंतर्मनातील धगधग व्यक्त करते.त्यातील फकिरा ही व्यक्तिरेखा , वंचित समाजातील व्यक्तिरेखेचे प्रतिनिधित्व करणारी आहे.फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे..!

दुनियादारीने शिक्षित केलेले थोर  साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त (दि.१८ जूलै १९६९)त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन..!🙏

वंदे मातरम्...!
               
अभिवादक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक : १८ जुलै २०१७

गुरुवार, १६ जुलै, २०२०

" दीप अमावस्या..! गटारी अमावस्या नव्हे..!!"



चिंतन

" दीप अमावस्या..! गटारी अमावस्या नव्हे..!!"

===================================

दीप (दिवे धुन्याच्या) अमावस्येला काही विकृत लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहे...! मुळात गटारी फिटारी असा काही सण,उत्सव  आपल्या हिंदू धर्मात नाहीये...!

गटारी अमावस्या हे नामकरण दारुड्या टवाळांनी केले आहे...!
दीप अमावस्या या दिवशी घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात. प्रकाश,हा सर्व जाती धर्मातील लोकांच्या आयुष्यातील अंधार दूर करत असतो.त्याच  प्रकाशाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उत्सव, दिप अमावस्या..! त्यामुळे ह्या दिवसाला दीप अमावस्याच (दिवे धुन्याची)   म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका..!🙏

कोणीही ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात...!वेळी च सावध व्हा.. उद्या हे विकृत दारुडे म्हणतील की हिंदू धर्मच आम्हाला गटारी अमावस्या साजरी करायला लावतो, अन् सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावे...!

तेव्हा हिंदू बांधवांनी ह्या दीप अमावस्या विषयी लोकांमध्ये जागृती करून ह्या प्रकाशाच्या उत्सवाला जे विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती...!🙏

तसेच आपल्या हिंदू धर्माच्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या परंपरेचा मान राखून दीप अमावास्येला गटारी अमावस्या न म्हणता दीप अमावस्या असेच म्हणावे व आपल्या भारतीय कृतज्ञता व्यक्त करण्याच्या परंपरेचा, सणांचा व संस्कृतीचा मान राखावा..!

वंदे मातरम्...!!

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १७ जूलै २०१७

बुधवार, १ जुलै, २०२०

" असा खेळाडू ग्रामीण भागात होणे नाही..! " ' शिवाजी भाऊ जाधव '





आमचे गाव, आमची माणसं..!

             " असा खेळाडू ग्रामीण भागात होणे नाही..! "
                            ' शिवाजी भाऊ जाधव '
=====================================

दिनांक .. १६ मार्च २०१८ रोजी.. वेळ होती.. ऐन दुपारची..!लासूर स्टेशन येथील मुख्य चौकात मी चिरंजीव नमन ला परिक्षेहून आल्यानंतर घ्यायला आलो होतो.नमन आला,त्याला गाडीवर बसविणार इतक्यात बाजूला आमचे कौटुंबिक स्नेही आदरणीय शिवाजी भाऊ  जाधव पाटील हे दिसले. मी लगेच नमन ला त्यांच्याकडे घेऊन गेलो अन् माझ्या मुलाला शिवाजी भाऊ बरोबर परिचय करून दिला...आणि त्यांचे दर्शन घ्यायला लावले.भाऊंनी नम्रपणे नकार दिला पण..माझा आग्रह भाऊ टाळू शकले नाही अन् त्या पायांवर माझा मुलगा नतमस्तक झाला होता. ज्या व्यक्तीने आमच्या पालखेड गावात क्रिकेट खेळ वाढवला..जोपासला..बाळसं धरू पाहणाऱ्या या खेळाला आमच्या गावात तरुण...धडधाकट केले.. तो माणूस समोर उभा होता..! चिरंजीव नमनच्या नतमस्तक होण्याच्या या कृतीला आजूबाजूचे लोकही कुतूहलाने पाहत होती..!

ज्या गोष्टी पूर्वी सर्वसामान्य होत्या..त्या आज अशा दिसायला लागल्या की कुतूहलच्या वाटतात..! विशेषकरून आजच्या नवतरूणानां..!

घरी येण्याचा खूप आग्रह केला पण कामामुळे भाऊ नाही आले.मी घरी आल्यानंतर माझ्या मुलांना आदरणीय शिवाजी भाऊ व त्यांचे क्रिकेट प्रती असलेली निष्ठा सांगितली..!मुलांना यावर विश्र्वासच बसत नव्हता की अशी ग्रेट माणसं आपल्या पालखेड गावात आहेत म्हणून..!

ज्यावेळी आम्ही बाल्यावस्थेत होतो..त्यावेळी आमच्या जन्मगावी पालखेड ता.वैजापूर येथे क्रिकेट हा खेळ बाळसं धरू पाहत होते.त्या खेळावर जीव ओवाळून टाकणारी पिढी तयार होत होती.अर्थात त्या पिढीला तयार करण्याचे काम आमच्या गावचे  तत्कालीन  ग्रामसेवक आदरणीय गायकवाड काका हे करत होते..! त्यांनीच आमच्या पालखेड गावात क्रिकेटचे रोपटे लावले..!आम्ही बालपणी मोठ्या कुतूहलाने त्या रोपट्याकडे पहायचो..!
पण..........
कोणतेही रोपटे लावले म्हणजे काम संपत नसते.तर...त्या पुढील काम फार महत्त्वाचे असते.त्याच रोपट्याची जोपासना.. होणे अत्यंत आवश्यक असते.आमच्या गावात क्रिकेटचे रोपटे ऐंशी च्या दशकात काकांच्या हस्ते लावल्या गेले.पण त्याच क्रिकेटच्या बालरुपी रोपट्याला जर कुणी आमच्या पालखेड गावात तरुण केले असेल तर ते आदरणीय शिवाजीराव बाबुराव पाटील जाधव यांनीच..!

शिवाजी भाऊ...!

एकदम हौशी माणूस..! क्रिकेट या माणसासाठी जीव की प्राण..! गावातील तत्कालीन गायकवाड ग्रामसेवक काकांनी लावलेलं क्रिकेटचे रोपटे वाढविण्याची,त्या रोपट्याला तरुण करण्याचे कार्य याच शिवाजी भाऊंनी तन मन धन स्विकारले..!
ज्यावेळी शिवाजी भाऊ गावातील तरुणांना क्रिकेट करिता प्रवृत्त करायचे,त्यावेळी आम्ही प्राथमिक शाळेत होतो.मोठ्या कुतूहलाने आम्ही त्यांची या खेळाप्रती असलेली निष्ठा...आज असे जाणवते की..त्यात रमाकांत आचरेकर सरांनी ज्याप्रमाणे ओतली तीच...निष्ठा माझ्याही गावात झिरपत होती..!

आमचे पालखेड गाव बऱ्यापैकी मोठे.अंदाजे पाच ते सहा हजार लोकसंख्या असलेलं कलेवर,कलाकारांवर,खेळावर,धार्मिक उत्सवांमध्ये रममाण होणारे गाव..! याच आमच्या गावात आज जे खेळाचे स्वरूप दिसते आहे,त्याचे आधारवड आमचे शिवाजी भाऊ हेच आहेत..हे कुणीही मान्य करेल..!

आमच्या गावच्या आसपास विविध गावांना शिवाजी भाऊ,स्वतः पुढाकार घेऊन आपला संघ घेऊन जायचे.अन् त्यात बहुतांशी वेळा जिंकूनच यायचे..! तेही कॉर्क चेंडू किंवा लेदर चेंडूवर खेळून..! फार कठीण असतात हे चेंडू...पण..मुळात रक्तात वेड असावं लागतं..!त्या वेडापाई शिवाजी भाऊ व त्यांचा संघ जिंकण्याची कामगिरी फत्ते करू यायचेच..!

स्वतः शिवाजी भाऊ गोलंदाजी ,फलंदाजी करायचे.तसेच क्षेत्ररक्षण स्लीप किंवा शॉर्ट लेग किंवा फलंदाजांच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षण..! मोठी हिम्मत असावी लागते याला..! तेही अश्या काळात ज्यावेळी हेल्मेट तेही ग्रामीण भागात मुलांसाठी दुरापास्त होते त्यावेळी..! खरचं ग्रेट होती तुमची ती हिम्मत..शिवाजी भाऊ..!

मला चांगलं आठवते.. तो बहुदा काळ होता..१९८७ चा..! त्यावेळी वाहेगाव,ता.गंगापूर येथे  तेथील नागरिकांनी क्रिकेट ट्रॉफी आयोजित केली होती.लेदर बॉल वर...! जवळ जवळ..पंधरा ते वीस संघांनी भाग घेतलेला होता.माझे मोठे बंधू सुनील भाऊ जाधव हे सुध्दा त्या संघाचा हिस्सा होते.दररोज...कधी दिवसाआड पालखेड..ते वाहेगाव असा अंदाजे वीस किलोमीटर प्रवास सर्व खेळाडू सायकलवर करायचे..! खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला गावातील बरीच माणसं देखील जायचे..! मी त्यावेळी इ. सहावीला होतो.सुट्टीच्या दिवशी माझे वडील सायकलवर मलाही इतक्या दूर अंदाजे वीस किलोमीटर सायकलच्या पुढील नळीवर टॉवेल गुंडाळून त्यावर बसवून न्यायचे..!

प्रत्येक सामना, शिवाजी भाऊ यांचा संघ जिंकत होता.आणि एक दिवस.. लेदर बॉल विकत घेण्यासाठी या मुलांकडे पैसेच नव्हते. सर्व मुले नाराज झाली होती. सराव करणे तर फार आवश्यक होते
शिवाजी भाऊंचा संघ अर्ध्याच्यावर सामने  जिंकून सर्वोच्च स्थानी होता.पण..सर्वजण जेमतेम परिस्थितीतील असल्याने बॉल कसा घ्यावा याच विवंचनेत पडले..! हे जेंव्हा माझ्या वडिलांना माहीत झाले. तेंव्हा माझ्या वडिलांनी शिवाजी भाऊ व त्यांच्या संघाला नवीन लेदर  बॉल विकत घेऊन दिला..! खूप..खूप आनंदीत झाले होते सर्वजण..!
ज्यावेळी आमच्या गावचा क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहचला..त्यावेळी सर्वांनी आमचाच संघ जिंकेल असे वाटतं होते
पण.........एका ग्रामीण भागातील संघाचे असे नेत्रदीपक यश कुणाला तरी पाहावल्या गेले नाही.अन् आमच्या गावच्या संघाविरुद्ध चुकीचे निर्णय पंचांनी दिले.शिवाजी भाऊ व त्यांचा सर्व संघ स्वाभिमानी होता.ते चुकीचे निर्णय अमान्य करून त्या सामन्यातून पाय काढता घेतला..निषेध नोंदवून..!

आजही आमच्या गावात दरवर्षी आमच्या गावाचे ग्रामदैवत श्री.पारेश्वर महादेव यात्रा कार्तिक अमावास्येला भरते..!त्यावेळी यात्रेनिमित्त क्रिकेट ट्रॉफी चे आयोजन केल्या जाते.त्यात बाहेरील जिल्ह्यातील संघ सहभागी होतात.त्यावेळी आदरणीय शिवाजी भाऊ जाधव यांचे हमखास मार्गदर्शन आजची तरुण मुलं घेतात..!शिवाजी भाऊंच्या तालमीत तयार झालेल्या आमच्या गावातील अनेक खेळाडूंनी पंचक्रोशीत नाव कमावले आहे.

जर याच खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा,योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळाले असते..तर..माझ्या पालखेड गावातील कित्येक तरुणांनी उच्च पातळीवर क्रिकेट मध्ये नाव रोशन केले असते..!
पण.............!

आदरणीय शिवाजी भाऊ, एका पायाने दिव्यांग आहे.तरी त्यांनी त्या उणीवेला आपली कमजोरी कधीच होऊ दिली नाही. याही परिस्थितीत शिवाजी भाऊंची खेळातील प्रचंड मेहनत,निष्ठा ,समर्पण वृत्ती इ.अनेक बाबी खरोखर ग्रेट आहेत..!

सादर वंदन तुमच्या याच खेळावरील निष्ठेला,  समर्पण वृत्तीला, आणि सर्वात महत्वाचे आपल्या पालखेड गावात क्रिकेटला एक व्यापक रूप देण्याला...! ग्रामसेवक गायकवाड काकांनी लावलेल्या क्रिक्रेट रुपी रोपट्याला ऐन तारुण्यात सजवले..वाढवले..त्या खिलाडूवृत्तीला...!

ता.क.: पालखेड मधील क्रिकेट खेळावर तुमचे खूप उपकार आहेत..शिवाजी भाऊ..!आज जी पिढी हा खेळ आपल्या गावात खेळत आहेत,त्यांच्या खेळाला वारसा हा तुमचाच आहे शिवाजी भाऊ..!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:१९ ऑगस्ट २०१८