शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

आली माझ्या घरी ही दिवाळी


 

आमचे गाव आमची माणसं..!


" आली माझ्या घरी ही दिवाळी..! "


=================================


काही गाणी , अजरामर होऊन जातात, ती त्यांच्यातील गोडव्यामुळे..! लाडू,करंजी, बत्तासे इत्यादी अनेकानेक स्वादिष्ट पदार्थांची चव त्यात नक्कीच असते, कित्येक पिढ्यानपिढ्या..!


जसे की, " आली माझ्या घरी ही दिवाळी..!"

 हे अष्टविनायक चित्रपटातील गीत माझ्या बालपणापासून ऐकत आलेलो आहे.दरवर्षी दिवाळीच्या दिवशी हे गीत , कुणा मराठी रसिक माणसाने ऐकले नसेल असा शोधूनही सापडणार नाही..! एकवेळ ' मराठी रसिक ' माणूस दिवाळीचे फराळ करणार नाही,पण " आली माझ्या घरी ही दिवाळी..!" हे अतिशय सुमधुर गीत ऐकतोच..! 🎼


हे सुमधुर गीत मी आयुष्यात पहिल्यांदा लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी ऐकले होते, ज्यावेळी मी पालखेड, ता.वैजापूर येथे इयत्ता चौथी मध्ये होतो. तो प्रसंग देखील माझ्या लक्षात आहे. माझ्या वडिलांची जूनी सायकल पंक्चर झालेली होती आणि थोडीफार दुरुस्ती करायची होती.सायकलचे पंक्चर काढण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी मी हाफ सदरा अन् हाफ चड्डीवर , सायकल लोटत लोटत आमच्याच गल्लीतील थोडेसे दूर असलेले बाळू काका गायकवाड मिस्तरी यांच्याकडे घेऊन गेलो होतो. माझ्या वडिलांनी मला दिवाळीच्या सणानिमित्त नवीन हाफ सदरा अन् हाफ चड्डी, आमच्याच गल्लीतील पारस भाऊ जैन टेलर यांच्याकडून शिवून घेतले होते. मी जरी सायकल लोटत लोटत चाललो होतो तरी देखील अंगात नवीन कपडे घातलेले असल्याने एखाद्या मिरवणुकीतील सन्माननीय माणसासारखा चाललो होतो..! आमच्या बालपणी, मुलांचा हाफ चड्डी अन् हाफ सदरा अगदी आवडीचा पोशाख होता.सायकलची दुरूस्ती आणि पंक्चर काढून झाले इतक्यात बाळू काकांच्या घराच्या जवळच असणाऱ्या अतिशय उंचावरील ग्रामपंचायत इमारतीतून , रेडिओ वर सुरू असलेले " आली माझ्या घरी ही दिवाळी..! " हे गीत ऐकू येऊ लागले होते..! मी तिथंच थांबलो,अन् पूर्ण गीत ऐकले अन् मग घरी गेलो होतो..! त्याकाळी करमणुकीचे सर्वात प्रभावी साधन रेडिओच होता..! तेंव्हा पासून या गीताच्या प्रेमात जे पडलो ते आजतागायत..!


आज त्या सुमधुर आठवणीतील प्रसंगाला जवळ जवळ पस्तीस वर्षे उलटून गेली,पण या गाण्याची आठवण अन् त्यातील गोडवा आजही लक्षात आहे..! आजही जेंव्हा जेंव्हा हे गीत ऐकू येते तेंव्हा तेंव्हा या सुमधुर गाण्याच्या पहिल्या आठवणीतील प्रसंगाची आठवण नक्कीच येते..! जन्मभूमीची अन् तिथल्या आठवणीतील प्रसंगाची ,माणसांची आठवण निदान मला तरी सदैव टवटवीत करत असतात..! आठवणी ह्या, सतत आपल्या भोवती पिंगा घालत असतात,फक्त आपण त्या आठवणी किती अन् कशा जपून ठेवतो यावर त्या आठवणींचे आयुष्य अवलंबून असते..! त्यातल्या त्यात आयुष्यातील कोणतीही पहिली आठवण ,भावूक माणसाच्या हृदयात कायम संजीवन असते..!😊🙏


असो, सर्व भारतीयांना दिवाळी लक्ष्मीपूजन निमित्त मनःपूर्वक सुमधुर शुभेच्छा..!🌹🙏


वंदे मातरम्..!


एक रसिक मराठी माणूस - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक- १४/११/२०२०, लक्ष्मीपूजन, शनिवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा