शनिवार, २९ मे, २०२१

" न्यायप्रिय तीर्थस्वरुप अंबादास भाऊ पाटील शेळके..! "


 







आमचे गाव, आमची माणसं..!

" न्यायप्रिय तीर्थस्वरुप अंबादास भाऊ पाटील शेळके..! "

==============================

काही माणसांचे आयुष्य हे अगदी नियमबद्ध पध्दतीने मार्गक्रमण करीत आपल्या आयुष्यात तत्वनिष्ठांचे मापदंड संपूर्ण समाजाच्या समोर प्रस्तुत करत असते. जन्माला तर सगळीच माणसं आलेली असतात,पण याच इहलोकात आपल्या तत्वनिष्ठांचे मापदंड जी माणसं संपूर्ण समाजाच्या समोर आपल्या कृतीतून प्रस्तुत करतात,अशी माणसं नेहमी वंदनीयच असतात.आपल्या न्यायप्रिय अन् आदर्शवादी तत्वांच्या समोर, आप्त, सगे सोयरे गौण असतात, अन् जे योग्य अन् खरं आहे त्यासाठी आपलं आयुष्य वेचत ,आयुष्याचा रथ मार्गक्रमण करत असतात.

आमच्या पालखेड गावात वरील विवेचन केलेल्या दीर्घ व्याख्यात बसणारी दोनच  थोर पालखेडकरांनी सर्वोच्च स्थान प्राप्त केलेले आहे असे मला वाटते.त्यापैकी एकजण होते माझे स्वर्गीय वडील तीर्थरूप विष्णूपंत चंपतराव जाधव अन् दुसरे थोर व्यक्तिमत्व आहे, न्यायप्रिय तीर्थस्वरुप अंबादास भाऊ पाटील शेळके..!

' पाटील ' ही गावच्या प्रमुखाला दिलेलं सन्मानाच पद..! पाटील हे पद फक्त जातीवर आधारित आडनाव नसायचे तर, त्यामागे खूप मोठी सामाजिक जबाबदारी असलेली जाणीव अन् त्याच जाणिवेतून गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्यायप्रिय वागणूक देऊन, सामाजिक सलोखा राखण्याची त्यामागील नैतिक भूमिका होती. याच नैतिक मूल्यांना अभिप्रेत असलेल्या   व्यक्ती प्रत्येक गावात ,सर्व जाती धर्माच्या लोकांना वंदनीय होत्या,आहे अन् सदैव राहतील, कारण त्यामागे सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेला नैतिक वारस होता अन् आहे..! याच सन्मानाच्या  ' पाटील ' पदाला आपल्या न्यायप्रिय अन् तत्वनिष्ठ सात्विक वृत्तीने आमच्या पालखेड गावात अन् गावाच्या पंचक्रोशीत सन्मानाचे स्थान प्राप्त केलेले आहे,न्यायप्रिय तीर्थस्वरुप अंबादास भाऊ पाटील शेळके यांनी..!🙏🏻

न्यायप्रिय तीर्थस्वरुप अंबादासभाऊ  पाटील शेळके..! वय वर्ष ८४

आम्ही ज्यावेळी लहान होतो,त्यावेळी गावातील नाटकाच्या ओट्याच्या बाजूला असलेल्या अंबादास भाऊ पाटील यांच्या घरी नेहमी गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांची वर्दळ पाहत असायचो.त्यावेळी त्या नेहमीच्या वर्दळीच्या मागील कारणं काहीही माहीत नसायची.मात्र जसजसे आमचे वय वाढत गेले तसतसे त्याच परिसरात राहणाऱ्या बालमित्रांच्या घरी जाणं येणं होत असताना समजलं की, अंबादास भाऊ पाटील यांच्या घरी नेहमी गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांची वर्दळ ही सहज नसायची..! तर त्या माणसांच्या वर्दळीचा ,त्या माणसांच्या वर्दळीतील प्रत्येक माणसाचा न्यायनिवाडा करायचे अतिशय न्यायसंगत कार्य अंबादास भाऊ पाटील करायचे..! अंबादास भाऊ यांच्याकडे आपल्या घरगुती कौटुंबिक समस्या, जमीन- जायदाद यांच्या समस्या ,इतर समस्या सोडविण्यासाठी गावातील सर्व जाती धर्मातील महिला, पुरुष यायचे..! अर्थात आजही येतात हे सूर्य प्रकाशा एवढे सत्य आहे. तीर्थस्वरुप अंबादास भाऊ आपल्या परीने न्याय निवाडा करायचे अन् आजही करतात.पण एखादा मानवी घटक जर त्यांच्या प्रामाणिक न्याय निवाड्याने समाधानी झाला नाहीच,तर तीर्थस्वरुप अंबादास भाऊ अशांना सरकारी न्याय प्रक्रियेत जाण्यासाठी मोकळीक देतात.मात्र तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जाणाऱ्या बहुतांशी लोकांचे समाधान आज पर्यंत झालेले आहे हेही सत्य आहे..!

कोणत्याही एखाद्या व्यक्तीवर सर्व जाती धर्माच्या माणसांची निष्ठा अन् विश्वास कसा काय असू शकतो..?
तर यासाठी असे कार्य करणारी कोणतीही व्यक्ती असू द्या, ती स्वतः प्रामाणिक अन्  आपल्या आदर्शवादी तत्वांविषयी प्रामाणिक असायला हवी तरच असे होते.नसता कदापि शक्य नाही. अंबादास भाऊंनी ती योग्यता आपल्या कृतियुक्त आदर्शवादी तत्वांतून कमावलेली असल्याने आजही आमच्या पालखेड गावात तीर्थस्वरुप अंबादास भाऊंना खूप आदराचे स्थान प्राप्त आहे.

तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांचा जन्म १९३७ च्या आसपासचा..! तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांनी त्याकाळच्या मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. घरी शेती पन्नास - साठ एकर अन् भाऊ एकुलते एक अन् तीन बहिणी असा परिवार होता.
तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांनी त्यांचं काही शिक्षण धुळे येथे नातेवाईकांकडे काही काळ घेतले आहे.माझ्या तीर्थरूप वडिलांची सासुरवाडी देखील धुळे असल्याने कळत नकळतपणे दोघांमध्ये एकमेकांच्या सन्मानाच्या मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं..! अर्थात त्यामागे दोघांच्या आदर्शवादी तत्वांचा धागा देखील होताच..! पालखेड येथे असताना दरवर्षी तीर्थस्वरुप अंबादास भाऊ दसरा, मकरसंक्रांत दिवशी हमखास माझ्या तीर्थरूप वडिलांची भेट घ्यायला यायचेच.रात्री उशीर जरी झाला तरी यायचे..! ती भेट आमच्या पालखेड गावातील दोन आदर्शवादी तत्वनिष्ठ व्यक्तींची असायची.आपल्या महाराष्ट्राने संपूर्ण विश्वाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून लहान थोर , जातपात हा भेद न करता योग्यतेची दर्शन घेण्याची पवित्र कृती देणगी म्हणून दिलेली आहे, ती पवित्र कृती दोघेही करायचे..! हे पाहून मला प्रश्न नक्कीच पडायचा की, आमची तथाकथित आधुनिक पिढी कुठे तरी  चुकत आहे का..? आमच्या पिढीत या दोन जेष्ठांसारखी  प्रगल्भता नाही का..? 

तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांनी आता पर्यंत गावातील कित्येकांच्या  शेताच्या खरेदीखत साठी ,इतर कामासाठी एक जबाबदार व्यक्ती म्हणून तालुक्याच्या ठिकाणी, इतर ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे,तेही स्वखर्चाने हे विशेष..! आजकाल कुणी कुणासाठी आपला स्वार्थ असल्याशिवाय मदतीला येत नाही,पण भाऊ या सर्वांना अपवाद आहेत..! ना कुणाकडून चहा ना नाश्त्याची ना जेवणाची ना आर्थिक अपेक्षा..! तीर्थस्वरुप अंबादास भाऊ पूर्वीपासून ते आजतागायत चहा पित नाहीत.पहाटेच्या वेळी उठून थंड पाण्याने स्नान करतात.आपल्या आहारात शाकाहारी अन्न त्यात ज्वारीची भाकरी आवर्जून असते.पूर्वीपासून ते आजतागायत हिंदू धर्मातील विविध धार्मिक ग्रंथांचे  वाचन तीर्थस्वरुप अंबादास भाऊ आपल्या घरी करतात.त्यांचं धार्मिक ग्रंथांचे वाचन ऐकण्यासाठी काही माणसं श्रद्धेने हमखास उपस्थित असतात.फावल्या वेळात रामनामाचा जप किंवा स्वतच्या हस्तक्षारत रामनाम लिहिण्याचे श्रद्धेय कार्य  देखील भाऊ करतात..! भाऊंची जी, बैठक खोली आहे, तिथं सकाळपासून  ते रात्रीपर्यंत कमीतकमी एक तरी माणूस हमखास बसलेला असतोच. त्याचं कारण, भाऊंचा सहवास किंवा कुणी ना कुणी आपल्या समस्यांना भाऊंच्या समोर प्रस्तुत करायला आलेला असतो.

मागे एकदा मी अन् माझी पत्नी अन् मोठा मुलगा पालखेड येथुन मोटार सायकल वर दहेगाव शेड फाटा रस्त्याने लासूर स्टेशन कडे निघालो होतो. रस्त्यात काही अंतरावर तीर्थस्वरुप अंबादास भाऊ  एकटेच पायी पालखेड कडे येत होते.मी दुरूनच भाऊंना ओळखले. माझी दुचाकी थांबवली अन् भाऊंकडे गेलो. भाऊंनी ओळखले होते.मी दर्शन घ्यायला लागलो तर भाऊं नम्रपणे नकार देऊ लागले होते.मला तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांचा तत्वनिष्ठ स्वभाव माहीत होता.मी भाऊंना म्हणालो..
" भाऊ, आपल्या पालखेड गावात तुमच्या समकालीन पिढीत मी ,तुमचा अन् माझ्या वडिलांचा खूप आदराने सन्मान करतो,कारण तुम्ही दोघेही आपल्या मोडेन पण वाकणार नाही या तत्वासाठी ठाम  होता अन् आहात. तुम्हीच जर दर्शन घेऊन द्यायला नकार दिला तर मग अशी तत्वनिष्ठ माणसं, शोधून देखील सापडणार नाहीत.कृपया नकार देऊ नका..! माझे वडील अन् तुम्ही आपल्या पालखेड गावातील बहुदा शेवटचेच अशी दोन माणसं आहात, ज्यांनी आपल्या तत्वांशी ,मूल्यांशी कधीही तडजोड केलीच नाही..!"
हे ऐकून तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांनी माझा गाल धरला अन् आम्हाला स्मित हास्य करून दर्शन घेऊन दिले होते.पालखेडला गेलो की, तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांचा शक्य होईल तेंव्हा आशीर्वाद नक्कीच घेऊन येतो,कारण अशी माणसं,आमच्या तथाकथित आधुनिक पिढीत दुर्मिळ होत चालली आहे..!

तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांनी पूर्वी आमच्या पालखेड गावचे सरपंच पद भूषविलेले आहे.तसेच विनायक सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद देखील नव्वदच्या दशकात भूषविलेले आहे.साधी राहणी उच्च विचारसरणी, निर्व्यसनी आचरण, धार्मिक आचरण, न्यायप्रिय अन् तत्वनिष्ठ वागणं यामुळं तीर्थस्वरुप अंबादास भाऊ आमच्या पालखेड गावात अन् पंचक्रोशीत सन्माननीय थोर व्यक्तिमत्व नक्कीच आहे..! 

तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांचे धाकटे चिरंजीव आदरणीय नीलकंठ शेळके सर ( माध्यमिक शिक्षक ) देखील खूप विनम्र अन् बुद्धिवान आहेत. माझ्या अनेक अडी अडचणींच्या वेळी नीलकंठ सरांचे मार्गदर्शन मी घेतलेले आहे अन् सदैव घेत राहणार यात तिळमात्र शंका नाही. आदरणीय निळू भाऊ सरांचे सानिध्य जेंव्हा जेंव्हा शक्य होईल तेंव्हा मिळविण्याचा प्रयत्न नक्की करतो.एक समंजस, प्रगल्भ अन् शिक्षणाची जाण असणारा अनुभव नक्कीच येतो...!🙏

माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून  तीर्थस्वरुप अंबादास भाऊंच्या नैतिक वर्तनाला अन् कार्याला विनम्र वंदन ..!🙏🏻

वंदे मातरम्..!

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक - ३०/५/२०२१, रविवार.




गुरुवार, २७ मे, २०२१

साॉक्रेटीस...!📙📘📗



चिंतन


साॉक्रेटीस...!📙📘📗


==================================


" नवविचारांचे निर्माते - साॉक्रेटीस, प्लेटो, लेनिन "

लेखिका : मेधा ना.मराठे


सदरील पुस्तक ,मी लासूर स्टेशन येथे राहत असताना एका पुस्तक प्रदर्शनात दिनांक १३/१२/२०१७ रोजी विकत घेतले होते.आज पुस्तकं चाळताना नजरेत पडले..!


साॉक्रेटीस तब्बल २५०० वर्षापूर्वी ग्रीस मध्ये इ. स.पूर्व ४६९ मध्ये जन्माला आला.महान तत्त्ववेत्ता..! साॉक्रेटीस यांचे एक वाक्य जगप्रसिद्ध आहे अन् ते म्हणजे...

" माझ्या बाबतीत म्हणाल तर मला एवढंच माहीत आहे की,मला काहीच माहीत नाही..!"


साॉक्रेटीस खऱ्या अर्थानं सुज्ञ होता,कारण त्याला त्याच अज्ञान माहीत होते.उगीचच माझेच खरे या फंद्यात तो कधीही पडला नाही.संपूर्ण ब्रम्हांडाचे नियमन करणाऱ्या अंतिम शक्तीवर साॉक्रेटीसचा विश्वास होता.ईश्वराची सर्वश्रेष्ठ कृती मानव आहे असं साॉक्रेटीस मानतो.


साॉक्रेटीस हे पूर्णपणे मान्य करतो की,शरीराचा त्याग केल्यावरही आत्म्याचे अस्तित्व असतं..! अशा तऱ्हेने तो पुनर्रजन्माचा सिध्दांत मान्य करतो.एका अर्थाने साॉक्रेटीस हा भगवान श्री कृष्ण यांच्या विचारांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो.


माझ्या मते, संपूर्ण मानवी संस्कृती मध्ये भगवान श्री कृष्ण यांच्याच विचारांना , श्री कृष्ण यांच्या नंतर अनेकानेक तत्ववेत्त्यांनी, भिन्न भिन्न धर्माचे धर्म संस्थापक, धर्मगुरू इत्यादींनी पुढे नेले आहे..! प्रत्येकाने भगवान श्री कृष्ण यांच्या विचारांना आपापल्या परीने समाजाला आपापल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला..! भगवान श्री कृष्ण यांच्या नंतर ज्यांनी ज्यांनी आपापल्या धर्माचे विचार व्यक्त केले,त्या सर्वांचा प्रारंभ बिंदू श्री कृष्ण हाच एकमेव होता..! भगवान श्री कृष्ण यांच्या कडे फक्त एक देव म्हणून न पाहता समाजातील सगळ्या अवैचारिक रोगांवरचे ,सर्वात प्रगल्भ वैचारिक प्रगल्भता असलेलं विद्वत्तापूर्ण मानवी औषध म्हणून पाहिले तर सुज्ञ नागरिकांना नक्कीच पटेल..!


साॉक्रेटीसचे विचार तत्कालीन राजव्यवस्थेला मान्य झाले नाही,अन् त्याच राजव्यवस्थेने साॉक्रेटीसला विषाचा प्याला देऊन ठार केले..! काही काळानंतर साॉक्रेटीसचे महत्त्व समजले, तेंव्हा साॉक्रेटीस जिवंत नव्हता..!😔


वंदे मातरम्...!🙏🇮🇳🙏


✍️ नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक : २७ मे २०२०, बुधवार.
 

बुधवार, २६ मे, २०२१

सम्राट हर्षवर्धन




चिंतन ©️


" महान सम्राट हर्षवर्धन "

( इ. स. ६०६ ते ६४७ )


====================================


प्राचीन भारताच्या इतिहासात अनेकानेक राजे, सम्राट असे होऊन गेले आहेत की, ज्यांच्या आदर्शवादी तत्वनिष्ठ अन् सामर्थ्यवान कार्यकाळात आपल्या देशाचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेला आहे. प्राचीन भारताच्या नंतरच्या पुढील इतिहासाच्या कालखंडातील त्या त्या काळातील अनेक थोर भारतीय राजांचे आदर्श हेच प्राचीन भारताच्या इतिहासातील थोर राजे,सम्राट होते.प्राचीन भारताच्या इतिहासात ज्यांचा प्रामुख्याने सन्मानाने उल्लेख करता येईल असे सम्राट हर्षवर्धन होय..!


प्राचीन भारताच्या इतिहासात गुप्त घराणे प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेले घराणे होय.याच गुप्त घराण्यातील दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त ( इ.स.३३५ ते ३७५) यांची कारकीर्द खूप दैदिप्यमान होती. तो स्वतः कुशाग्र बुद्धीचा अन् शास्त्राचा ज्ञानी होता.अलाहाबाद ( प्रयागराज ) येथील अशोकस्तंभावर दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त यांच्या दिग्विजयाचे वर्णन केलेले आहे.


सम्राट हर्षवर्धन हा, सम्राट समुद्र्गुप्त आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा अन् आचरणाचा सुयोग्य मिश्रण होता. सम्राट हर्षवर्धन यांनी बौद्ध धर्मातील महायान पंथाचा स्वीकार केला होता, त्याचवेळी तो गौतम बुद्धाचा, सूर्याचा अन् शिवाचा देखील भक्त होता. दर पाच वर्षांनी प्रयाग येथे गंगा यमुना नदीच्या तीरावर ७५ दिवस चालणारी महामोक्ष परिषद सम्राट हर्षवर्धन भरवत असे. हिंदू, बौद्ध अन् जैन अनाथ व गोरगरीब जनता तेथे उपस्थित असे. आपल्या राजकोषातील पाच वर्षाची शिल्लक रक्कम,दानधर्मात वाटप करत असे.शेवटी तर आपल्या अंगावरील वस्त्रांचे व दागदागिने देखील दान करत असे.आपली बहीण राजश्रीकडून जुने वस्र मागवून ते परिधान करत असे.सर्वांना, सम्राट हर्षवर्धन सर्वस्वाचे दान करणारा हा जगाच्या इतिहासातील एकमेव सम्राट होता.


माणसाच्या आयुष्यात सर्वात जास्त कशाला महत्त्व असेल तर ते फक्त आणि फक्त शिक्षणाला..! इतिहास साक्षीला आहे,ज्या ज्या गावाने,राज्याने, राष्ट्राने विद्वानांना दुर्लक्षित केले, ते गाव,राज्य अन् राष्ट्र भौतिक सुविधेत भले संपन्न झाले असेल,पण तिथले विद्वान बहिष्कृत झाल्याने असे राज्य असून नसल्यासारखे झालेले होते अन् आहे..!.याच गतकाळातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, विष्णूगुप्त उपाख्य आचार्य चाणक्य अन् तक्षशिला होय. आचार्य चाणक्य सारख्या अतिशय विद्वान व्यक्तीचं मोल त्यांची मूळ भूमी तक्षशिलेतील राजसत्तेला ओळखता आले नाही.तिथून आचार्य चाणक्य यांना तिथल्या राजसत्तेमुळे परागंदा व्हावे लागले.पुढचा इतिहास सर्वांना ज्ञात आहेच.त्याच तक्षशिलेला अलेक्झांडर ने सहज आपल्या कवेत घेतले. अखेर त्याच आचार्य चाणक्य यांनी आपल्या बौद्धिक क्षमतेच्या बळावर अन् सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या शौर्याच्या बळावर मौर्य साम्राज्याचा पाया रचला..! म्हणून, जिथं विद्वत्ता असते मग ती कोणत्याही जातीची असो, तिथं राजसत्ता आपोआप निर्माण होत जाते. फक्त त्याचं काळाच्या ओघात स्वरूप भिन्न भिन्न आहे इतकंच..!


सम्राट हर्षवर्धन यांच्या कार्यकाळात शिक्षणाला प्राचीन भारताच्या इतिहासात सर्वात जास्त महत्त्व दिल्या गेलेले आहे.जगद्विख्यात नालंदा विद्यापीठ हे याच महान सम्राट हर्षवर्धन यांच्या कार्यकाळातील परमोच्च बिंदू होते. हिंदू, जैन अन् बौद्ध धर्मातील विविध तत्वज्ञान इथेच बहरात आले. सर्वार्थाने परिपूर्ण शैक्षणिक सुख सुविधा याच नालंदा विद्यापीठ परिसरात सम्राट हर्षवर्धन यांच्या कार्यकाळात होत्या. सम्राट हर्षवर्धन यांच्या कामगिरीचा जरी विसर पडला,तरी एकटे नालंदा विद्यापीठ त्यांच्या कीर्तीची अन् वैभवशाली राजवटीची साक्ष देण्यास समर्थ आहे.


स्वतः सम्राट हर्षवर्धन हा साहित्यप्रेमी होता.सम्राट हर्षवर्धन हा साहित्यावर म्हणजेच शास्त्रावर अन् शस्त्रावर विश्वास असणाऱ्यांपैकी एक महान सम्राट होता. सम्राट हर्षवर्धन यांनी स्वतः रत्नावली, प्रियदर्शिका आणि नागानंद ही नाटकं लिहिली आहेत. कोणत्याही राजाला फक्त शस्त्र किंवा फक्त शास्त्र अंगिकारून चालत नाही.तर शास्त्र अन् शस्त्र या दोन्हींचा सुयोग्य असा मिलाप ज्यांनी ज्यांनी केला त्यांचे राज्य सर्वार्थाने सुरक्षित राहिलेले आहे. 


ज्या राजांनी फक्त शास्त्र , धर्म , धर्माच्या अंगाने येणारी कमालीची अहिंसा अंगिकारली होती, त्यांचे राज्य इतर बलदंडांनी गिळंकृत केले हा देखील प्राचीन भारताचा इतिहास आहे. महान सम्राट हर्षवर्धन याला अपवाद होता.एका हातात धर्म पताका अन् दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन सम्राट हर्षवर्धन हा खऱ्या अर्थाने प्राचीन भारताच्या इतिहासातील एक महान तेजस्वी व्यक्तिमत्व होता.


सम्राट हर्षवर्धन यांनी बौद्ध धर्मातील महायान पंथाचा स्वीकार केला होता.तरी देखील सम्राट हर्षवर्धन यांनी राजधर्म सोडला नाही.वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सत्तेवर आलेल्या कोवळ्या वयाच्या हर्षाचे ,सम्राट हर्षवर्धन मध्ये आपल्या कर्तृत्वाच्या अन् बौद्धिक क्षमतेच्या बळावर रूपांतर झाले..!

प्राचीन भारताच्या कालखंडात सम्राट हर्षवर्धन हा भारताचा खऱ्या अर्थानं एकमेव धर्मनिरपेक्ष सम्राट होय.!


वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

संदर्भ स्रोत - प्राचीन भारत , लेखक - डॉ.धनंजय आचार्य


दिनांक - २६ मे २०२१, बुधवार, बुध्द पौर्णिमा

गुरुवार, १३ मे, २०२१

संघर्षातून तयार झालेला अधिकारी - आदरणीय नारायणराव कुमावत सर..!"



आमचे गाव, आमची माणसं..!


" संघर्षातून तयार झालेला अधिकारी - आदरणीय नारायणराव कुमावत सर..!"


==============================


संघर्ष..! हा  शब्द  फक्त साडे तीन अक्षरचाच आहे, पण याच साडे तीन अक्षराच्या शब्दातून तयार झालेली अनेक माणसं,समाजातील इतर सर्व मानवी घटकांच्या करिता प्रेरणादायी झालेली आहेत.अर्थात  तो संघर्ष स्वतच्या किंवा इतर मानवी घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक अन् आर्थिक हितासाठी केलेला असेल तरच..! नसता उगीचच संघर्ष करायचा अन् त्यातून जर स्वतच्या किंवा समाजहिताच्या दृष्टीने सकारात्मक फलनिष्पत्ती निघत नसेल तर असा संघर्ष हा पूर्वीही,आताही अन् भविष्यातही असा संघर्ष करणाऱ्यांना स्वतः ला  किंवा समाजाला त्रासदायकच ठरलेला आहे..! आमच्या पालखेड गावात असेही काही ग्रेट पालखेडकर होऊन गेलेले आहेत अन् आहेत,ज्यांचा संघर्ष हा त्यांच्या स्वतच्या किंवा समाजहिताच्या दृष्टीने सकारात्मक फलनिष्पत्ती देऊन गेलेला आहे..! यातील काही ग्रेट पालखेडकर, माझ्या समकालीन पिढीतील, पण वयाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ असणारी होती अन् सध्या आहेत.यात अभिमानाने अन् कौतुकाने ज्यांचा उल्लेख करावा असे आमचे कौटुंबिक स्नेही आदरणीय नारायणराव कुमावत सर..! (  शिक्षण विस्तार अधिकारी )


आदरणीय नारायणराव कुमावत सर..! 

(  शिक्षण विस्तार अधिकारी, जि.प. जालना )


आदरणीय नारायणराव कुमावत सर यांची घरची परिस्थिती बेताचीच होती,त्यामुळं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अन् महाविद्यालयीन आयुष्यात जो, त्याकाळी इतर सधन कुटुंबातील मुलांचा कसा का असेना जो शान शौक असायचा तो यांच्या वाट्याला आला नाही.मात्र एक होतं, मनाला आनंदीत करून जाईल तो  शान शौक करायला पैसा अन् आर्थिक श्रीमंतीच लागते असे काहीही नाही..! तर माझ्या मते आपल्या आयुष्यातील आनंदी शान शौक करायला आपल्या अवतीभोवती सामाजिक भान अन् माणसांची जाण असलेली  मित्रमंडळी असली की, आयुष्याचा आनंद उत्सव साजरा करणारा शान शौक नक्कीच पूर्ण होतो..! तो आनंद उत्सव, आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन मित्रांच्या सहवासात आदरणीय नारायणराव कुमावत सरांनी साजरा केला..!


श्री.पारेश्वर विद्यालय पालखेड येथून आदरणीय नारायणराव कुमावत सरांनी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. स्वतः ची अतिशय किरकोळ तब्येत अन् गावातील काही इतर मित्रांच्या सहवासात विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता.खिशात जेमतेम पैसे अन् सोबतीला त्याच परिस्थितीशी जुळवून घेणारे मित्रमंडळ..! आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत घेत याच महाविद्यालयात बी.ए. शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर इ. स.१९९३ -९४ मध्ये एम. ए. ( मराठी ) पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण तर पूर्ण झाले होते,पण आता पुढं काय..?

हा प्रश्न आ वासून उभा राहिला होता.


आदरणीय नारायणराव कुमावत यांचे वडील स्व. तीर्थस्वरुप गीताराम काका कुमावत, गावात, आसपासच्या परिसरात गवंडी काम करायचे. माझे सख्खे मोठे चुलते स्व. कचरू आण्णा चंपतराव जाधव यांनी मला एकदा सांगितले होते की,

" आपल्या गावातील गीताराम कुमावत अन् मी एकाच दिवशी जन्माला आलेलो आहोत, अशी माझी आई मला म्हणायची..!"


स्व. कचरू आण्णा अन् स्व. तीर्थस्वरुप गीताराम काका कुमावत  यांची खूप चांगली मैत्री देखील होती.बऱ्याचदा या दोघांना आमच्या गल्लीतील ओट्यावर बसून गप्पांचा फड रंगवताना मी पाहिलेलं होते. स्व. कचरू आण्णा जाधव अन् स्व. तीर्थस्वरुप गीताराम काका कुमावत  यांची खूप चांगली मैत्री असण्याचे ,माझ्या मते दोन कारणं होती.त्यापैकी एक , दोघांचा जन्मदिन एकच होता अन् दुसरे कारण म्हणजे दोघेही रसिक अन् कलेवर निस्सीम प्रेम करणारी माणसं होती. माझे चुलते संवादिनी ( हार्मोनियम ) वाजविण्यात तरबेज होते,तर तीर्थस्वरुप गीताराम काका कुमावत तबला , मृदुंग वाजविण्यात तरबेज..! त्यामुळं यांची मैत्री विशेष होती.


आदरणीय नारायणराव कुमावत यांचे एम.ए.शिक्षण पूर्ण झाले होते.वर उल्लेख केल्याप्रमाणे आता पुढं काय..?हा प्रश्न आ वासून उभा राहिला होता. तीर्थस्वरुप गीताराम काका कुमावत गवंडी काम करायचे.आदरणीय नारायणराव कुमावत सर, आपल्या वडिलांच्या हाताखाली गवंडी काम करायला जाऊ लागले होते. गावातील एक उच्च शिक्षित तरुण कधी मजुरी तर कधी गवंडी काम करू लागला होता.आपल्या वडिलांना मदत करू लागला होता.


अखेर इ. स.१९९६ मध्ये विभागीय मंडळ मार्फत बी.एड करिता भरती प्रक्रिया सुरू झाली होती. वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इमारतीत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार होती.आदरणीय नारायणराव कुमावत यांनी सदरील प्रवेश प्रक्रिया मध्ये सहभागी होण्यासाठी जाण्याचे ठरविले.जर सरकारी कोट्यातून नंबर नाहीच लागला तर,खाजगी कोट्यातून फी होती १२,५००₹..! आता प्रश्न उभा राहिला होता पैशाचा..! जर यदा कदाचित सरकारी कोट्यातून नंबर नाहीच लागला तर म्हणून १२,५००₹ सोबत घ्यायचे होते,पण एवढे पैसे आई वडीलांकडे अजिबात नव्हते. अखेर आदरणीय नारायणराव कुमावत यांचे स्नेही मित्रमंडळ अन् आमच्या पालखेड गावातील अतिशय शांत सुस्वभावी स्व.रामकृष्ण भाऊ पाटील रोठे, काशिनाथ जाधव इत्यादींनी पैश्यांची जमवाजमव केली अन् आदरणीय नारायणराव कुमावत वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात सकाळीच ९ वाजता दाखल झाले. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. संपूर्ण दिवसभर आलेल्या तरुणांचा बी.एड करिता नंबर कोणत्या ना कोणत्या कॉलेजला लागत होता.अखेर संध्याकाळी ६:३० वाजता सरकारी कोट्यातून बी.एड करिता नंबर लागल्याची ऑर्डर ताब्यात मिळाली. रामकृष्ण परमहंस बी.एड कॉलेज उस्मानाबाद येथे नंबर लागला होता.


आदरणीय नारायणराव कुमावत यांनी इ. स.१९९६-९७ मध्ये बी.एड चे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले होते.इ.स. १९९८ मध्ये निवड मंडळाची, माध्यमिक शिक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. दिनांक २९/६/१९९८ रोजी माध्यमिक शिक्षक पदासाठी तोंडी परीक्षा दिली.अखेर दिनांक २२/१२/१९९८ रोजी जिल्हा परिषद मध्यामिक शिक्षक म्हणून राणी उंचेगाव ,ता. घनसावंगी, जि.जालना येथे प्रथम नेमणूक मिळाली.

आदरणीय नारायणराव कुमावत यांच्या आई वडिलांना खूप खूप आनंद झाला होता.आपल्या मुलाने कठीण परिस्थिततून घेतलेल्या शिक्षणाचे सार्थक झाल्याचे आत्मिक समाधान त्यांना मिळाले होते.


काळाच्या ओघात आदरणीय नारायणराव कुमावत सरांना  जानेवारी २००३ मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पंचायत समिती अंबड येथे पदोन्नतीने नेमणूक मिळाली.अंबड,भोकरदन, बदनापूर पंचायत समिती मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली,तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली..! सध्या आदरणीय नारायणराव कुमावत सर, जिल्हा परिषद जालना येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.


आज आम्ही काही मित्र जे की आदरणीय नारायणराव कुमावत सरांच्या पेक्षा वयाने लहान आहोत ते अन् काही कुमावत सरांच्या आसपास वयातील मित्र भूतकाळ आठवतो तेंव्हा गतकाळातील आदरणीय नारायणराव कुमावत सरांचा संघर्ष आठवून आज त्याचं फळ त्यांना मिळाल्याचं आत्मिक समाधान नक्कीच मिळते.जेंव्हा तोच गतकाळ आठवतो तेंव्हा त्यातील काही गमतीशीर आठवणी देखील आनंदीत करून जातात. त्यांचं एक उदाहरण सांगतो. जेंव्हा आदरणीय नारायणराव कुमावत सरांना नोकरी लागलेली नव्हती तेंव्हाची गोष्ट आहे.नारायणराव कुमावत त्याकाळी अतिशय किरकोळ तब्येतीचे होते.आमच्या पालखेड गावातील स्व.पुंडलिक सुराशे यांच्या घरासमोर नारायणराव कुमावत अन् विजू गायकवाड या दोघांमध्ये कशावरून तरी कुरबुर झाली होती. मी त्यावेळी बाजूलाच उभा होतो. विजू गायकवाड अन् नारायणराव कुमावत दोघांच्याही शारीरिक तब्येत त्याकाळी आमच्या पालखेड गावात अतिशय किरकोळ तब्येतींपैकी एक होत्या..! शाब्दिक चकमक वाढत गेली होती. स्व.पुंडलिक सूराशे यांच्या ओट्याच्या बाजूला भला मोठ्ठा बाहुबली दगड होता.तो दगड नारायणराव कुमावत सरांच्या वजनापेक्षा दहा पट वजनदार होता.विजू गायकवाड अन् नारायणराव कुमावत यांच्या कुरबुरीचे रूपांतर हातघाईवर यायला लागले होते,पण अद्याप प्रत्यक्ष आले नव्हते. अखेर रागारागाने वैतागून नारायणराव कुमावत यांनी तो आयुष्यात कधीही न उचलता येणारा भला मोठ्ठा बाहुबली दगड उचलण्याचा प्रयत्न केला होता. कुमावत सरांना तो अशक्यप्राय बाहुबली दगड उचलून विजू गायकवाड याच्या अंगावर किंवा डोक्यात घालायचा होता.😊 तो बाहुबली दगड उचलण्याचा खूप कन्हुन कन्हुन प्रयत्न केला पण नारायणराव कुमावत सर,तो बाहुबली दगड उचलण्याच्या प्रयत्न करत असताना फक्त कन्हत होते..! बाकी तो बाहुबली दगड अनु रेणू इतका सुद्धा जागेवरून हलला नव्हता..!😊 अखेर विजू गायकवाड अन् नारायणराव कुमावत या तत्कालीन अतिशय किरकोळ तब्येतीच्या दोन मित्रांचे लुटुपुटुचे भांडणं ,तिथे उपस्थित आम्ही मित्रांनी , दोघांचा चेव ओसरल्यावर मिटविले होते..!😊🙏🏻👬 आज तोच प्रिय बालमित्र विजू गायकवाड वैजापूर येथे दैनिक पुढारीचा नामांकित अन् अतिशय निर्भिड वर्तमानपत्र पत्रकार आहे.आज जेंव्हा कधी मी आणि बालमित्र विजू गायकवाड पालखेड येथे गावच्या यात्रेच्या निमित्ताने जातो तेंव्हा स्व. पुंडलिक सुराशे यांच्या घराच्या समोरून जाताना तो भला मोठ्ठा बाहुबली दगड अन् किरकोळ तब्येतीच्या मित्रांची भांडणं आठवून हसू येते..!😊


आदरणीय नारायणराव कुमावत सरांच्या आयुष्यात माझा प्रिय बालमित्र नंदकिशोर जाधव पाटील याचं खूप मोठं योगदान आहे हे सूर्य प्रकाशा एवढे सत्य आहे..!


माझ्या स्वर्गीय तीर्थरूप वडिलांना आदरणीय नारायणराव कुमावत सरांचा अतिशय अभिमान होता. त्याचं कारण बहुदा दोघांच्या अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन यश प्राप्त करणे हाच एकसमान धागा होता.मला नेहमी माझे स्व.तीर्थरूप वडील म्हणायचे की, 

" आपल्या गावातील नारायण कुमावत अन् रायभान बाबा त्रिभुवन यांनी ज्या खडतर परिस्थितीत अन् अतिशय गरिबीतून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतः ला सिद्ध केलं आहे,ते खूप कौतुकास्पद आहे..! या दोघांचीही कौटुंबिक  पार्श्वभूमी शैक्षणिक नव्हती की घरी फार काही प्रॉपर्टी नव्हती,पण या दोघांनीही आपली जिद्द, मेहनत अन् बुध्दीच्या बळावर स्वतः ला समाजात सिद्ध केलं..! "


असो, आमच्यासाठी आदरणीय नारायणराव कुमावत सर, स्व.रायभान बाबा त्रिभुवन अन् माझे स्व.वडील नेहमी वंदनीय होते,आहे अन् सदैव राहील..! कारण वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मुलमंत्राचा, शिक्षणाचा खरा अर्थ यांनी समजून घेऊन स्वतः ला समाजात सिद्ध केले होते अन् आहे..!🙏🏻


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक -१३ मे २०२१, गुरुवार.

 

मंगळवार, ११ मे, २०२१

" पुरी येथील आम्ही..बिन बुलाये बाराती..! "☺


 




" मला प्रवासात भेटलेली माणसं..! "

" पुरी येथील आम्ही..बिन बुलाये बाराती..! "☺ 

======================================

चि.नबीन व चि.सौ.का.प्रियंका ताई यांचा शुभ विवाह..!
स्थळ: पुरी, ओरिसा, भारत.

काल  दिनांक ११ मे २०१८ रात्री मी एका लग्नातील निमंत्रित नसलेला पाहुणा होतो.मला सोबत होता..चिरंजीव नमन..!

मल कुठेही पर्यटनाला अथवा फिरायला गेलं की, तिथं आपला भारत देश शोधायची जुनी पण टवटवीत सवय आहे..! असचं  पुरी जगन्नाथ येथे संध्याकाळी आम्ही फेरफटका मारत असताना मला पुरी येथील मुख्य रस्त्यावर एका लग्नाची बारात जात असताना दिसली..!मी लगेच नमनला म्हणालो,
" नमन , तू येतो का माझ्या सोबत..मला या लग्नाला जायचे आहे..!"
नमन-  " अहो,दादा  ते आपल्या ओळखीचे ना पाळखीचे..कशाला   जायचे आपण..?"
मी म्हणालो " अरे,तू फक्त माझ्या सोबत चल, निदान आपल्याला इथली लग्नातील संस्कृती तर माहीत होईल..! आणि आपण कुठं कोणता गुन्हा करतोय..त्या नवरदेवाची भेट घेऊ,त्याला आपला परिचय देऊ..मग तर ठीक आहे ना..!"
नमन- " चला मग..!"

एका थ्री स्टार हॉटेल मध्ये लग्न होते.ज्या मार्गाहून स्वामी जगन्नाथ रथयात्रा निघते..त्याच मार्गाने वधू,वराची बारात चालली होती.मी प्रथम त्या नवरदेवाला भेटलो, इंजिनियर होता तो .! माझा परिचय करून दिला त्यालाही खूप आनंद झाला. आम्ही सहभागी झालो...नवरदेवाचे व-हाडी  म्हणून..!

या लग्नाच्या बारातीत वऱ्हाडी मंडळी खूप खूप जोशात नाचत होती.आपल्याकडील बटबटीत D J Band सारखा प्रकार येथे नव्हता.प्रत्येक वाद्य हातगाडीवर वेगवेगळ्या बांधिस्त गाडीत  वादक व वाद्य सह होते.त्या सर्व गाड्या दोरीने एकमेकांना बांधलेल्या होत्या.सर्वात पुढे जनरेटवर चालणारी गाडी त्या सर्वांना ओढीत होती.त्या बारातीत, आपल्या कडील नागराज मंजुळे दिग्दर्शित " फॅन्ड्री  चित्रपटातील  जब्या " अनेक रुपात दिसला..!अनेकजण डोक्यावर बॅटरीवर चालणारा दिवा घेऊन चालले होते..! तेच मला जब्या वाटले..! समाजातील हे भीषण वास्तव ओरिसातील पुरी येथे देखील पाहायला मिळाले..!
मला वाटलं.. " जब्या " फक्त आपल्या महाराष्ट्रातच आहे..!

मी तेथील पाहुण्यांना विचारले तर,त्यांनी सांगितले की,आमच्यात वधू व वर यांची एकत्र बारात काढतात.लग्न विधी,लग्न स्थळी वधू व वर यांची बैठक स्थितीत होत असतो. विशेष म्हणजे आपल्याकडील लग्नात ज्याप्रमाणे तांदूळ अक्षदा म्हणून वधू,वरच्या अंगावर बऱ्याच वेळा आपल्यातली  बरेच पाहुणे, मित्र मंडळी याच अक्षदा नेम धरून इतरत्र मारण्यात स्वतच्या नेमबाजीचे कौशल्य आजमावत असतात, तो भाग वेगळा..!

तर असला  तांदूळ अक्षदा म्हणून फेकण्याचा प्रकार तिथे नव्हता.जे गुरु होते त्यांनी विधिवत पूजा,मंत्र म्हणत वधू ,वरांना लग्नाच्या बेडीत बांधले..!

अजुन एक फार महत्त्वाचे वैशिष्टे पुरी येथील लग्नात मला आढळले..ते ही तेथील पाहूण्यानकडून समजले..व प्रत्यक्ष दिसले सुध्दा..! ते असे..ज्यावेळी वधू व वरची लग्न विधी सुरू असते..त्यावेळी तिथे फक्त आई,वडील व मामा यांचीच उपस्थिती अत्यावश्यक असते.बाकीचे अनुपस्थित असले तरी चालते. म्हणजे ते उर्वरित जेवण करण्यात मग्न असले तरी अती उत्तम..! कारण तेवढाच वेळ वाचतो.

मी बघितले तर..खरोखर..वधू,वर जवळ फक्त उपरोक्त नातेवाईक पूजा करिता उपस्थित होते.अन् बाकीचे स्वादिष्ट  जेवण करण्यात मग्न झाले होते.आता आम्ही सुध्दा नवरदेवाकडून असल्यामुळे व खुद्द नवरदेवाने सांगितल्यामुळे आम्ही यथेच्छ साजूक तुपातल्या बऱ्याच गोड गोड पदार्थांवर ताव मारला..!
 
शेवटी वर- चिरंजीव नबीन यांना शुभेच्छा देऊन व प्रेमाचा निरोप घेऊन मी व नमन रात्री ११:३० वा.लग्न ठिकाणाहून निरोप घेतला..!

ताजा कलम : दोन भारतीयांनी, दोन भारतीयांच्या लग्नाला ,एक भारतीय म्हणून उपस्थिती लावली..!

अतुल्य भारत..! भिन्न संस्कृती..तरी एकसंघ भारत..!

वंदे मातरम्..!

विवाह दिनांक: ११ मे २०१८
स्थळ: पुरी जगन्नाथ , ओरिसा
मुहूर्त: गोरज..!

लेखक व व-हाडी : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

लेखन दिनांक : १२ मे २०१८