शनिवार, २९ मे, २०२१

" न्यायप्रिय तीर्थस्वरुप अंबादास भाऊ पाटील शेळके..! "


 







आमचे गाव, आमची माणसं..!

" न्यायप्रिय तीर्थस्वरुप अंबादास भाऊ पाटील शेळके..! "

==============================

काही माणसांचे आयुष्य हे अगदी नियमबद्ध पध्दतीने मार्गक्रमण करीत आपल्या आयुष्यात तत्वनिष्ठांचे मापदंड संपूर्ण समाजाच्या समोर प्रस्तुत करत असते. जन्माला तर सगळीच माणसं आलेली असतात,पण याच इहलोकात आपल्या तत्वनिष्ठांचे मापदंड जी माणसं संपूर्ण समाजाच्या समोर आपल्या कृतीतून प्रस्तुत करतात,अशी माणसं नेहमी वंदनीयच असतात.आपल्या न्यायप्रिय अन् आदर्शवादी तत्वांच्या समोर, आप्त, सगे सोयरे गौण असतात, अन् जे योग्य अन् खरं आहे त्यासाठी आपलं आयुष्य वेचत ,आयुष्याचा रथ मार्गक्रमण करत असतात.

आमच्या पालखेड गावात वरील विवेचन केलेल्या दीर्घ व्याख्यात बसणारी दोनच  थोर पालखेडकरांनी सर्वोच्च स्थान प्राप्त केलेले आहे असे मला वाटते.त्यापैकी एकजण होते माझे स्वर्गीय वडील तीर्थरूप विष्णूपंत चंपतराव जाधव अन् दुसरे थोर व्यक्तिमत्व आहे, न्यायप्रिय तीर्थस्वरुप अंबादास भाऊ पाटील शेळके..!

' पाटील ' ही गावच्या प्रमुखाला दिलेलं सन्मानाच पद..! पाटील हे पद फक्त जातीवर आधारित आडनाव नसायचे तर, त्यामागे खूप मोठी सामाजिक जबाबदारी असलेली जाणीव अन् त्याच जाणिवेतून गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्यायप्रिय वागणूक देऊन, सामाजिक सलोखा राखण्याची त्यामागील नैतिक भूमिका होती. याच नैतिक मूल्यांना अभिप्रेत असलेल्या   व्यक्ती प्रत्येक गावात ,सर्व जाती धर्माच्या लोकांना वंदनीय होत्या,आहे अन् सदैव राहतील, कारण त्यामागे सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेला नैतिक वारस होता अन् आहे..! याच सन्मानाच्या  ' पाटील ' पदाला आपल्या न्यायप्रिय अन् तत्वनिष्ठ सात्विक वृत्तीने आमच्या पालखेड गावात अन् गावाच्या पंचक्रोशीत सन्मानाचे स्थान प्राप्त केलेले आहे,न्यायप्रिय तीर्थस्वरुप अंबादास भाऊ पाटील शेळके यांनी..!🙏🏻

न्यायप्रिय तीर्थस्वरुप अंबादासभाऊ  पाटील शेळके..! वय वर्ष ८४

आम्ही ज्यावेळी लहान होतो,त्यावेळी गावातील नाटकाच्या ओट्याच्या बाजूला असलेल्या अंबादास भाऊ पाटील यांच्या घरी नेहमी गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांची वर्दळ पाहत असायचो.त्यावेळी त्या नेहमीच्या वर्दळीच्या मागील कारणं काहीही माहीत नसायची.मात्र जसजसे आमचे वय वाढत गेले तसतसे त्याच परिसरात राहणाऱ्या बालमित्रांच्या घरी जाणं येणं होत असताना समजलं की, अंबादास भाऊ पाटील यांच्या घरी नेहमी गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांची वर्दळ ही सहज नसायची..! तर त्या माणसांच्या वर्दळीचा ,त्या माणसांच्या वर्दळीतील प्रत्येक माणसाचा न्यायनिवाडा करायचे अतिशय न्यायसंगत कार्य अंबादास भाऊ पाटील करायचे..! अंबादास भाऊ यांच्याकडे आपल्या घरगुती कौटुंबिक समस्या, जमीन- जायदाद यांच्या समस्या ,इतर समस्या सोडविण्यासाठी गावातील सर्व जाती धर्मातील महिला, पुरुष यायचे..! अर्थात आजही येतात हे सूर्य प्रकाशा एवढे सत्य आहे. तीर्थस्वरुप अंबादास भाऊ आपल्या परीने न्याय निवाडा करायचे अन् आजही करतात.पण एखादा मानवी घटक जर त्यांच्या प्रामाणिक न्याय निवाड्याने समाधानी झाला नाहीच,तर तीर्थस्वरुप अंबादास भाऊ अशांना सरकारी न्याय प्रक्रियेत जाण्यासाठी मोकळीक देतात.मात्र तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जाणाऱ्या बहुतांशी लोकांचे समाधान आज पर्यंत झालेले आहे हेही सत्य आहे..!

कोणत्याही एखाद्या व्यक्तीवर सर्व जाती धर्माच्या माणसांची निष्ठा अन् विश्वास कसा काय असू शकतो..?
तर यासाठी असे कार्य करणारी कोणतीही व्यक्ती असू द्या, ती स्वतः प्रामाणिक अन्  आपल्या आदर्शवादी तत्वांविषयी प्रामाणिक असायला हवी तरच असे होते.नसता कदापि शक्य नाही. अंबादास भाऊंनी ती योग्यता आपल्या कृतियुक्त आदर्शवादी तत्वांतून कमावलेली असल्याने आजही आमच्या पालखेड गावात तीर्थस्वरुप अंबादास भाऊंना खूप आदराचे स्थान प्राप्त आहे.

तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांचा जन्म १९३७ च्या आसपासचा..! तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांनी त्याकाळच्या मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. घरी शेती पन्नास - साठ एकर अन् भाऊ एकुलते एक अन् तीन बहिणी असा परिवार होता.
तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांनी त्यांचं काही शिक्षण धुळे येथे नातेवाईकांकडे काही काळ घेतले आहे.माझ्या तीर्थरूप वडिलांची सासुरवाडी देखील धुळे असल्याने कळत नकळतपणे दोघांमध्ये एकमेकांच्या सन्मानाच्या मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं..! अर्थात त्यामागे दोघांच्या आदर्शवादी तत्वांचा धागा देखील होताच..! पालखेड येथे असताना दरवर्षी तीर्थस्वरुप अंबादास भाऊ दसरा, मकरसंक्रांत दिवशी हमखास माझ्या तीर्थरूप वडिलांची भेट घ्यायला यायचेच.रात्री उशीर जरी झाला तरी यायचे..! ती भेट आमच्या पालखेड गावातील दोन आदर्शवादी तत्वनिष्ठ व्यक्तींची असायची.आपल्या महाराष्ट्राने संपूर्ण विश्वाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून लहान थोर , जातपात हा भेद न करता योग्यतेची दर्शन घेण्याची पवित्र कृती देणगी म्हणून दिलेली आहे, ती पवित्र कृती दोघेही करायचे..! हे पाहून मला प्रश्न नक्कीच पडायचा की, आमची तथाकथित आधुनिक पिढी कुठे तरी  चुकत आहे का..? आमच्या पिढीत या दोन जेष्ठांसारखी  प्रगल्भता नाही का..? 

तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांनी आता पर्यंत गावातील कित्येकांच्या  शेताच्या खरेदीखत साठी ,इतर कामासाठी एक जबाबदार व्यक्ती म्हणून तालुक्याच्या ठिकाणी, इतर ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे,तेही स्वखर्चाने हे विशेष..! आजकाल कुणी कुणासाठी आपला स्वार्थ असल्याशिवाय मदतीला येत नाही,पण भाऊ या सर्वांना अपवाद आहेत..! ना कुणाकडून चहा ना नाश्त्याची ना जेवणाची ना आर्थिक अपेक्षा..! तीर्थस्वरुप अंबादास भाऊ पूर्वीपासून ते आजतागायत चहा पित नाहीत.पहाटेच्या वेळी उठून थंड पाण्याने स्नान करतात.आपल्या आहारात शाकाहारी अन्न त्यात ज्वारीची भाकरी आवर्जून असते.पूर्वीपासून ते आजतागायत हिंदू धर्मातील विविध धार्मिक ग्रंथांचे  वाचन तीर्थस्वरुप अंबादास भाऊ आपल्या घरी करतात.त्यांचं धार्मिक ग्रंथांचे वाचन ऐकण्यासाठी काही माणसं श्रद्धेने हमखास उपस्थित असतात.फावल्या वेळात रामनामाचा जप किंवा स्वतच्या हस्तक्षारत रामनाम लिहिण्याचे श्रद्धेय कार्य  देखील भाऊ करतात..! भाऊंची जी, बैठक खोली आहे, तिथं सकाळपासून  ते रात्रीपर्यंत कमीतकमी एक तरी माणूस हमखास बसलेला असतोच. त्याचं कारण, भाऊंचा सहवास किंवा कुणी ना कुणी आपल्या समस्यांना भाऊंच्या समोर प्रस्तुत करायला आलेला असतो.

मागे एकदा मी अन् माझी पत्नी अन् मोठा मुलगा पालखेड येथुन मोटार सायकल वर दहेगाव शेड फाटा रस्त्याने लासूर स्टेशन कडे निघालो होतो. रस्त्यात काही अंतरावर तीर्थस्वरुप अंबादास भाऊ  एकटेच पायी पालखेड कडे येत होते.मी दुरूनच भाऊंना ओळखले. माझी दुचाकी थांबवली अन् भाऊंकडे गेलो. भाऊंनी ओळखले होते.मी दर्शन घ्यायला लागलो तर भाऊं नम्रपणे नकार देऊ लागले होते.मला तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांचा तत्वनिष्ठ स्वभाव माहीत होता.मी भाऊंना म्हणालो..
" भाऊ, आपल्या पालखेड गावात तुमच्या समकालीन पिढीत मी ,तुमचा अन् माझ्या वडिलांचा खूप आदराने सन्मान करतो,कारण तुम्ही दोघेही आपल्या मोडेन पण वाकणार नाही या तत्वासाठी ठाम  होता अन् आहात. तुम्हीच जर दर्शन घेऊन द्यायला नकार दिला तर मग अशी तत्वनिष्ठ माणसं, शोधून देखील सापडणार नाहीत.कृपया नकार देऊ नका..! माझे वडील अन् तुम्ही आपल्या पालखेड गावातील बहुदा शेवटचेच अशी दोन माणसं आहात, ज्यांनी आपल्या तत्वांशी ,मूल्यांशी कधीही तडजोड केलीच नाही..!"
हे ऐकून तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांनी माझा गाल धरला अन् आम्हाला स्मित हास्य करून दर्शन घेऊन दिले होते.पालखेडला गेलो की, तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांचा शक्य होईल तेंव्हा आशीर्वाद नक्कीच घेऊन येतो,कारण अशी माणसं,आमच्या तथाकथित आधुनिक पिढीत दुर्मिळ होत चालली आहे..!

तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांनी पूर्वी आमच्या पालखेड गावचे सरपंच पद भूषविलेले आहे.तसेच विनायक सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद देखील नव्वदच्या दशकात भूषविलेले आहे.साधी राहणी उच्च विचारसरणी, निर्व्यसनी आचरण, धार्मिक आचरण, न्यायप्रिय अन् तत्वनिष्ठ वागणं यामुळं तीर्थस्वरुप अंबादास भाऊ आमच्या पालखेड गावात अन् पंचक्रोशीत सन्माननीय थोर व्यक्तिमत्व नक्कीच आहे..! 

तीर्थस्वरुप अंबादास भाऊ यांचे धाकटे चिरंजीव आदरणीय नीलकंठ शेळके सर ( माध्यमिक शिक्षक ) देखील खूप विनम्र अन् बुद्धिवान आहेत. माझ्या अनेक अडी अडचणींच्या वेळी नीलकंठ सरांचे मार्गदर्शन मी घेतलेले आहे अन् सदैव घेत राहणार यात तिळमात्र शंका नाही. आदरणीय निळू भाऊ सरांचे सानिध्य जेंव्हा जेंव्हा शक्य होईल तेंव्हा मिळविण्याचा प्रयत्न नक्की करतो.एक समंजस, प्रगल्भ अन् शिक्षणाची जाण असणारा अनुभव नक्कीच येतो...!🙏

माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून  तीर्थस्वरुप अंबादास भाऊंच्या नैतिक वर्तनाला अन् कार्याला विनम्र वंदन ..!🙏🏻

वंदे मातरम्..!

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक - ३०/५/२०२१, रविवार.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा